उद्धव ठाकरे ह्यांचा राजीनामा आणि पुढे श्रीधर तिळवे नाईक 

संन्याशाला  सगळी घरं जशी सारखी तसे सगळे पक्षही सारखेच ! त्याची कमिटमेंट फक्त लोककल्याणाशी !

सिद्ध हा मोक्षाचे शरीर , द्वादशशीलता ही त्वचा , सभ्यता ही मोक्षाचा अलंकार असेल तर सुसंस्कृतपणा हा मोक्षाचा वाचा आहे उद्धव ठाकरे ह्यांची वाचा व वाणी ही माझ्या कायमच आदराचा विषय राहिली आहे आजचे त्यांचे भाषण हे सभ्य वाचेचे सुसंस्कृत सादरीकरण होते . वाचाळांच्या जगात हे अतिशय दुर्मिळ ! न्यायालयाचा निकाल , त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा व विधानपरिषदेचा राजीनामा हे सर्व अपेक्षित होते मात्र जाताना त्यांनी जनतेचे डोळे ओले केले हे निश्चित ! पुढची इलेक्शन भाजपला त्यामुळे जड जाणार हे निश्चित ! शेवटच्या बैठकीत त्यांच्यासोबत फक्त चारजण असावेत ह्या घटनेतून हा राजीनामा आलेला असावा अन्यथा फ्लोर टेस्टपर्यंत हे सर्व गेले असते अशोकरावांनी आम्ही बाहेरून पाठिंबा देतो हे केलेले सूतोवाच अखेरचे प्रयत्न होतं . आता प्रश्न असा कि भाजपशी युती झाल्यावर शिंदे सेना काय करणार ? अहंकार ही अशी गोष्ट आहे कि ती शिंदे ह्यांना मातोश्रीवर जाण्यापासून थांबवणार म्हणजेच शिंदेंना अहंकार बाजूला तरी ठेवावा लागेल किंवा आपल्या शिवसेनेची वेगळी चूल मांडावी लागेल जर का शिंदे सेना भाजपमध्ये गेली तर पुढील इलेक्शन जिंकणे सोपे जाणार नाही शिवाजी महाराजांबरोबरच्या अनेकांनी संभाजी महाराजांची साथ सोडली तेव्हा संभाजी महाराज एकटे पडले होते पण त्यांना नवी माणसे मिळाली तसेच उद्धव ठाकरे ह्यांचे होईल एका अर्थाने हे बरेच झाले आता जी सेना असेल ती उद्धव ठाकरे ह्यांची असेल . 

मराठी लोकांना भाजप औरंगजेबासारखी दिसणार कि लोककल्याणकारी राजासारखी दिसणार ह्यावर पुढचा खेळ अपेक्षित आहे भाजपने अलीकडे सूडाच्या राजकारणाची लाईन पकडली तर त्यांचा सर्वनाश अटळ आहे तेव्हा भाजपने लोककल्याणच्या दिशेने जावे आणि लोककल्याणात सूडाला जागा नसते ह्याची जाणीव ठेवावी नाहीतर ये जो पब्लिक हैं सब जानती हैं 

श्रीधर तिळवे नाईक 


कार्पोरेट हिंदुत्वाचा मास्टरस्ट्रोक श्रीधर तिळवे नाईक 

हा ह्या मालिकेतला तिसरा लेख आहे मी पहिल्या लेखात म्हणालो होतो कि मोदी शहांचे हिंदुत्व हे वैश्यांचे कार्पोरेट हिंदुत्व आहे आणि ते आधीच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे हेच अनेकांना कळत नाही भाजपला ह्या हिंदुत्वाने कार्पोरेट पार्टी बनवलं आहे साहजिकच कार्टेल आणि कार्पोरेट ह्यांचा समन्वय साधत ते पुढे जात आहे ह्या कार्पोरेट हिंदुत्वाचा उद्देश शिवसेनेचे विसर्जन हा आहे हे घडवायचं असेल तर शिवसेनेची सगळी कार्टेल्स आपल्या ताब्यात आणायची हे धोरण आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना हा त्या दिशेने टाकलेला पहिला धोरणीपणा होता ह्याला उद्धव ठाकरेंच्या भाषणाने चांगलाच शह दिला होता आणि हे कार्पोरेट हिंदुत्व ह्या शहाला प्रतिशह कसा देणार हा प्रश्न होता त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एकनाथ शिंदे ह्यांना दिलेले मुख्यमंत्रीपद होय हा मास्टरस्ट्रोक आहे ह्याविषयी शंका नाही 

शिवसेनेचा मुख्य आधार बाळासाहेब ठाकरे हे होते त्यांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या पुत्रांची सत्ता संपुष्टात आणायची अशी ही खेळी आहे ही कार्पोरेट खेळी आहे ब्राह्मणी न्हवे हे समजायला वेळ लागेल तोपर्यंत इलेक्शन आलेली असेल 

ह्या खेळीने शिंदे ह्यांच्या बंडाचे रूपांतर एका नव्या शिवसेनेत होईल आणि ही स्थिर झालेली शिंदे शिवसेना भाजपशी वफादार राहील अशी अपेक्षा आहे ती अपेक्षा शिंदे पूर्ण करतील कि नाही हे पुढच्या महानगर पालिका व  विधानसभा इलेक्शनला स्पष्ट होईल पुढची लढत शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव शिवसेना अशी होणे अटळ आहे 

फडणवीस ह्यांनी उद्धव ह्यांच्या त्यागाला मुख्यमंत्रीपदाचा प्रतित्याग करून उत्तम उत्तर दिले आहे सत्तामोही आम्हीही नाही हे त्यांनी दाखवून दिल्याने त्यांच्यावर ह्या अंगाने होणारी टीका बारगळणे अटळ आहे त्यांनी ह्या भांडणाला तात्विक लढाईत आणून उभे केल्याने उद्धव शरद युतीची आता चांगलीच पंचाईत होणे अटळ आहे 

आनंद दिघे ह्यांनी ठाण्यात प्रचंड मेहनत करून शिवसेना उभी केली होती भिवंडीतल्या काही कर्मठ मुस्लिमांनी त्यांना सुरवातीला ही थोडी राजकीय जागा निर्माण करून दिली त्या जागेचा आनंद दिघे ह्यांनी प्रचंड विस्तार केला शिंदे हे दिघे ह्यांचे शिष्य त्यांना राजकीय जागा शिवसेनेने दिली भाजपने त्यांना त्यापेक्षा मोठी राजकीय जागा निर्माण करून दिली ह्या जागेचे स्वरूप एका चायवाल्याने एका रिक्षावाल्याला मुख्यमंत्री केले असे संकुचित नाही तर एका कार्यकर्त्याने जो पीएम झाला त्याने शिवसेनेतल्या एका कार्यकर्त्याला दिलेली ही जागा आहे काँग्रेसमधल्या घराणेशाहीत पंतप्रधान नारसिंहरावांनंतर झालेले कार्यकर्त्याच्या जागेचे झालेलं पतन पडझडीला कारण ठरलं आणि त्याने भाजप शिवसेनेला मोकळे रान दिले आता कार्यकर्ता काय करू शकतो हे दाखवण्याची सुवर्णसंधी एकनाथ शिंदे ह्यांना प्राप्त झाली आहे त्यांनी ह्या सुवर्णसंधीचे चीज केलं तर ते पुन्हा सत्तेत परततील अन्यथा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल 

लोक कुठल्या शिवसेनेच्या मागे आहेत हे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट होईलच किंबहुना उद्धव ठाकरेंना ह्या निवडणुकीत स्वतःला प्रूव्ह करण्याची ही संधी असेल त्यांनी काय का कसे घडले ह्याविषयी कठोर आत्मपरीक्षणाशिवाय पर्याय नाही शिंदे ह्यांची पहिली कसोटी ही निवडणूक आहे ते महानगरपालिकेच्या राजकारणातून आल्याने त्यांच्याविषयी भाजप नेतृत्वाच्या निश्चित काही अपेक्षा आहेत  भाजप कार्पोरेट हिंदुत्ववादी नेतृत्व हे संधी देऊन तुमचे  नेतृत्वगुण चेक करतं फडणवीसांनी अजित पवार केसमध्ये जी धोबीपछाड खाल्ली त्याला ह्या नेतृत्वाने अजूनही माफ केलेलं दिसत नाही 

एकनाथ शिंदे महानगर पालिकांची निवडणूक हरले तर सर्वच गोष्टींचा पुनर्विचार होईल फडणवीस त्यासाठीच मुख्यमंत्रीपदात सामील नाहीत केंद्रीय सत्ताना महाराष्ट्राइतकाच कधीकधी जास्तही मुंबई इलाका महत्वाचा वाटतो एकनाथ शिंदे ह्यांना हा इलाका भाजपला जिंकून द्यावा लागेल ते हरले तर पुन्हा विचार केला जाईल 

मला ह्या सर्व प्रकरणात दीपक केसरकर काय करतात ह्याविषयी उत्सुकता आहे वैश्यद्वेषी  लोकांच्यापासून ते हरी नरके ह्यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांना वैश्यवाणी वैश्यवाणी म्हणत नामोहरम केले असले तरी त्यांनी ज्यातऱ्हेने शिंदे गटाचे वक्तव्य सांभाळले ते काबिलेतारीफ होतं त्यांना ह्या मंत्रिमंडळात काय रोल मिळतो आणि ते शिंदे गटात शेवटपर्यंत राहतात कि भाजपमध्ये जातात हा माझ्या औत्सुक्याचा विषय आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

माझी विश्लेषणपद्धत , शिंदे ,फडणवीस आणि आडवातिडवा शेवट श्रीधर तिळवे नाईक 

जगाच्या इतिहासात सर्व ज्ञानाची एकात्मता कशी साधायची हा कायमच एक प्रश्न आहे आणि विधिनियम म्हणजे कायदे हे ह्या एकात्मीकरणामुळे बनत असल्याने तो राष्ट्राच्या व राज्याच्या  संदर्भातला एक मूलभूत प्रश्न आहे ह्या प्रश्नाचे पहिले निसर्गयुगातले उत्तर आन्वीक्षिकी उर्फ तत्वज्ञान हे होते मोक्षयुगात हे दर्शन होते धर्मयुगात ह्याचे उत्तर धर्म असे होते प्रबोधनाच्या युगात मात्र वाद सुरु झाला आणि हा वाद सोडवण्यासाठी ऑगस्ट कोम्ट व इतरांनी समाजशास्त्र मांडायला सुरवात केली व ज्ञान एकात्म करण्याची जबाबदारी उचलली हे समाजशास्त्र तत्वज्ञान ,विज्ञान व शास्त्र ह्यांचा समन्वय करून काय दिशेने कायदे करायला पाहिजे ह्या दिशेने एका बाजूला सामाजिक आंदोलने उभारत तर दुसऱ्या बाजूला कायदे करत वावरायला लागले ह्या समाजशास्त्राने भारतात वर्ण व जात ही केंद्र मानत एका नव्या विश्लेषणात्मक संश्लेषणाची  चौकट  स्वीकारली जी ब्रिटिश राजवटीत अंधाधुंद बोकाळली आंबेडकरांनी वर्ण , जात ह्यांच्यात प्रवर्ग ही भर टाकली आणि त्यातूनच स्वातंत्र्योत्तर काळात ओपन , ओबीसी , बीसी , भटके आणि आदीवासी हे पाच प्रवर्ग जन्माला आले आधुनिक समाजशास्त्रतेने ही पुरोगामी चौकट नाकारत वर्ण व जात ह्यांना नाकारत वर्ग व गट ही संकल्पना स्वीकारली व कम्युनिस्टांनी ती रुजवण्याचा खूप प्रयत्न केला पण उत्तराधुनिकतेने वर्ग ह्या संकल्पनेची मर्यादा दाखवत वर्ग , धर्म , वर्ण , जात , गट आणि जमात ह्या सहाही  गोष्टींचा स्वीकार केला आणि ह्या सगळ्यांना एक समाजशास्त्रीय व्हॅलिडिटी मिळाली ह्याचा परिणाम म्हणून समाजशास्त्रीय विश्लेषण हे ह्या सहाही अंगाने होऊ लागले मी ही व्होकॅबलरी वापरतो म्हणून अनेकांना मानसिक त्रास होतो पण भारतीय उत्तराधुनिकता समजून घ्यायची असेल तर ह्या व्होकॅबलरीला पर्याय नाही कारण ती ह्या सहा अंगाने भारतीय समाजात भारतीय समाजाचे वास्तव म्हणून वावरत आहे निवडणुका लढवत आहे  कम्युनिस्टांनी तिला ठाम नकार दिला खरा पण त्यामुळे कम्युनिस्ट नामशेष झाले व्होकॅबलऱी टिकली  

हिंदुत्व हे ह्या व्होकॅबलरीपासून दूर नाही ब्राम्हण हे ह्या ब्रिटिश प्रबोधन काळात सर्वात प्रथम जागृत झाल्याने साहजिकच हिंदुत्वाची सुरवात स्वामी दयानंद सरस्वतींनी केली त्यांनी जे हिंदुत्व मांडले ते पहिले आर्य वैदिक ब्राह्मणी हिंदुत्व होते आणि त्यांनी वैदिक धर्मात जन्माने नाही तर कर्माने वर्ण होते व जातव्यवस्था व अस्पृश्यता वैदिक धर्माच्या भाग नाहीत असे स्पष्ट सांगितले मी वैदिक धर्मात जन्मदत्त वर्ण , जात ,अस्पृश्यता न्हवती ह्या त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे आणि स्वतःला वैदिक म्हणवणाऱ्या ब्राम्हणांनी स्वतःला आर्य सामाजिस्ट वैदिक ब्राम्हण म्हणवून घ्यावे ह्या मताचा मी आहे 

ब्राम्हण धर्माने कधीही वैदिक धर्म स्वीकारला नाही फक्त मंत्रासाठी वापरला व जन्मदत्त स्मृतिजन्य वर्णव्यवस्था स्वीकारली साहजिकच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आर्य समाजाच्या विरोधात जाऊन ब्राह्मणी हिंदुत्व मांडले किंबहुना हिंदुत्व हा शब्द  चिपळूणकरांनीच मांडला  हे मी इतरत्र साधार सिद्ध केले आहे 

लोकमान्य टिळकांनी दोघांचा समन्वय साधत गीताधर्मी वैष्णव हिंदुत्व मांडले वैष्णव धर्माप्रमाणे त्यांनी स्मृती स्वीकारल्या आणि गीताही साहजिकच त्यांनी गीतारहस्य लिहिले आणि हिंदुत्व ही संकल्पना एलॅब्रेट केली 

पुढे सावरकरांनी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वरील तिन्ही हिंदुत्वाचा मेळ घालत हिंदू हिंदुत्व मांडले व सांस्कृतिक आर्य राष्ट्रवाद डेव्हलप केला जो ज्युडायिक व त्यातील प्रामुख्याने इस्लामसंस्कृतीच्या विरोधात होता 

ह्याला शह म्हणून प्रबोधनकर ठाकरे ह्यांनी क्षात्र हिंदुत्व मांडले आणि माझे हिंदुत्व हे जानवधारी ब्राह्मणांचे नाही असं सांगितलं भाजपमध्ये ह्या क्षात्र हिंदुत्वाची सुरवात योगी आदित्यनाथांचा गोरखनाथ मठ व मठाधीपती व लालकृष्ण अडवाणी ह्यांनी केली गोरखनाथांच्या नावामुळे शैवही ह्या हिंदुत्वाकडे आकर्षिले गेले आणि ह्यातून पुढे राममंदिर आंदोलन उभे राहिले व त्याने भाजपला नवी ओळख दिली ह्यानिमित्ताने ब्राह्मणकेंद्री हिंदुत्व व क्षात्र हिंदुत्व एकत्र आले  आणि बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही आपले क्षात्र हिंदुत्व ह्या क्षात्र हिंदुत्वाशी जोडले 

ह्या दोन्ही प्रकारच्या हिंदुत्वाची सांगड घालत प्रमोद महाजन ह्यांनी तिसरे वैश्य कार्पोरेट हिंदुत्व जन्माला घातले खरेतर ते जगले असते तर तेच पंतप्रधान झाले असते पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे नरेंद्र मोदी ह्यांच्यासाठी जागा तयार झाली मोदींनी वैश्य आणि ओबीसी ही पारंपरिक युती पुन्हा घडवली भारतात ना वर्णसंघर्ष आहे ना वर्गसंघर्ष आहे आहे ते वर्गसमन्वय व वर्णसमन्वय ह्यांचे तत्वज्ञान ! मोदींनी घडवलेल्या ह्या प्रवर्गसमन्वयामुळे आणि त्यांना ब्राह्मणकेंद्री हिंदुत्व व क्षात्र हिंदुत्व ह्यांनी पाठिंबा दिल्याने ते प्रचंड बहुमतांनी निवडून आले 

आता हा कार्पोरेट हिंदुत्ववाद सेटल झालाय आणि त्याला ब्राह्मणांची आवश्यकता वाटत नाहीये जे प्रमोद महाजनांच्यासारखे (प्रमोद महाजन हे फक्त नावालाच ब्राम्हण होते त्यांची मनोवृत्ती ही पक्की वैश्य होती ) वर्णजातिमुक्त ब्राम्हण आहेत त्यांच्याशीच त्याचे जुळू शकते ह्या हिंदुत्ववादाला मी मागे म्हणालो त्याप्रमाणे आता पक्षातील व बाहेरील ब्राह्मणकेंद्री हिंदुत्ववाद व क्षात्र हिंदुत्ववाद रिप्लेस करायचा आहे मात्र जे प्रमोद महाजनसारखे वैश्य वृत्तीचे ब्राम्हण व शरद पवारांसारखे वैश्य वृत्तीचे पुढारलेले क्षत्रिय आहेत त्यांना सोबत घेऊन जायचे आहे त्यासाठीच शरद पवारांशी अधूनमधून बैठकी होत असतात शरद पवार भाजपमध्ये गेले असते तर त्यांना आता राष्ट्रपतीपद व सुप्रिया सुळेंना केंद्रात गृह , अर्थ वा कृषी पद मिळाले असते पण शरद पवारांना पंतप्रधानपद हवे आहे आणि ते देणे भाजपला शक्य नाही . हे पंतप्रधान मिळणार नाही हे पक्के झाल्यास भविष्यात सुप्रिया सुळे भविष्यात भाजपमध्ये गेल्या तर आश्चर्य मानू नये जर पुन्हा काँग्रेस उभारली गेली व विजयी झाली तर मात्र त्या काँग्रेसमध्येच राहतील व अजित पवार राज्यात व सुप्रिया सुळे केंद्रात हा पारंपरिक करार सुरूच राहील  

एकनाथ शिंदे हे क्षात्र हिंदुत्व घेऊन अजूनतरी ठाम आहेत त्यांच्यात व ठाकरेंच्यात एक फरक आहे उद्धव ठाकरे ह्यांचे राजकीय गुरु त्यांचे वडील आहेत तर शिंदे ह्यांचे मेंटॉर आनंद दिघे ! ठाकरे घराणेशाहीशी आवडो न आवडो जोडले गेलेत आनंद दिघे काय किंवा शिंदे काय सेल्फमेड आहेत आणि त्याचे आकर्षण काही शिवसैनिकांना आहे उद्धव ठाकरे नवाजुद्दीनला बाळासाहेबांची भूमिका देऊ शकतात शिंदे आनंद दिघेंची भूमिका हिंदूंलाच देणार हे जाज्वल दाखवतात ठाकरे व धर्मवीर ह्यांच्यात ठाकरे हा सिनेमा ऍव्हरेज व्यवसाय करणारा होता तर धर्मवीर सुपरहिट ! ठाकरे ह्यांचे ह्याकडे पुरेसं लक्ष गेलेले नाही हा सिनेमा अनेक गोष्टींचा राजकीय इशारा होता   

गुजरात व युपी दोन्ही राज्यात जाज्वल हिंदुत्वच विजयी झालंय उद्धव ठाकरेंचा आवाज आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व इतकं सभ्य आहे कि त्यांनी जाज्वल हिंदुत्व दाखवलं तरी ते सभ्य वाटतं एकनाथ शिंदे बघताक्षणीच लडाकू वाटतात आता ह्याचा फायदा त्यांना होईल का ह्याचे उत्तर इलेक्शनला मिळेल मोदी व शहा ह्यांना शिंदे ह्यांच्या जाज्वल हिंदुत्वाची गरज निवडणूक जिंकण्यासाठी वाटणे सहज स्वाभाविक आहे पण प्रॉब्लेम एकच आहे शिंदे हे अजूनही शिवसैनिक आहेत ते शपथविधी घेताना कुणाचे नाव घेतात ह्यावर दिल्लीकरांची नजर होती आणि त्यांनी ना मोदी ना शहा ह्यांचे नाव घेतले त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे ह्यांचेच नाव घेतले 

ह्याउलट फडणवीस आहेत ते जाणकार आहेत मेहनती आहेत त्यांनी हे सत्तांतर घडावे म्हणून जीवाचे रान केले आहे हे खरं पण फडणवीस आक्रमक झाले कि आक्रस्ताळी वाटतात पण  जाज्वल वाटत नाहीत मात्र ते बुद्धिमान आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचा एक बेस तयार झालाय हा बेस कार्टेलचा नाही तर संघाच्या कार्यकर्त्यांचा आहे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हा संगम महाराष्ट्रातला चालताबोलता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ब्राह्मणकेंद्री हिंदुत्व त्यांच्यामुळे परत येऊ शकतं दोघेही वैदिक हिंदुत्व मानत असल्याने वर्णजात मानत नाहीत त्यामुळे इतर वर्णजातीतही त्यांना स्पेस आहे त्यामुळे मोदी ह्यांना हा संगम  डोईजड वाटला तर आश्चर्य काय ? एखाद्या माणसाला केंद्रात येऊ द्यायचं नाहीये पण महाराष्ट्रात खिळवून ठेवायचं आहे आणि त्याला असलेला बेस पण गमवायचा नाहीये पण त्याला मुख्यही होऊ द्यायचं नाही तर करायचं काय ? तर उपमुख्यमंत्रीपद देणे हे सर्वात उत्तम ! ते दिलं गेलेलं आहे ह्यातून एक इशाराही आहे मुख्यमंत्री व्हायचं असेल तर स्वतंत्र बहुमत कमवा व मुख्यमंत्रीपद हक्काने मिळवा 

एका अर्थाने रावही पडले आणि पंतही पडले आणि शिंदे विजयी झाले अशी ही सिच्युएशन आहे 

उद्धवराव पुन्हा शिवसेना उभीच करू शकणार नाहीत असे वातावरण निर्माण करण्यात आले आहे त्यावर मात करून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पक्ष उभा करणे ह्याशिवाय उद्धव ठाकरेंना पर्याय नाही खरेतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्यांनी एकत्र येणे ही काळाची आणि ह्या परिस्थितीची गरज आहे पण हे दोघांनाही कसे पटवायचे ?

ह्या सगळ्यात सामान्य माणसाचे काय ?

आदित्य ठाकरेंनी राखलेले आरे जंगल पुन्हा दावणीला बांधले जणार काय ?

केंद्रांची अडवणूक थांबून विकासकामांना अधिक गती मिळणार काय ?

लोकशाहीत मतदारांनी दिलेला कौलच महत्वाचा आहे असतो हा कौल हिंदुत्वाच्या बाजूने होता पण वचनमोडल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे विरोधात गेले जर मतदार महत्वाचा होता तर ठाकरेंना निषेध म्हणून मंत्रिमंडळाबाहेर राहून बाहेरून पाठिंबा देता आला असता पण हे घडले नाही उद्धव ठाकरे बाहेर जातायत म्हंटल्यावर त्यांना थांबवण्यासाठी मतदारांचा कौल प्रमाण मानून त्याचवेळी एकनाथ शिंदे ह्यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपला मतदारांचा रिस्पेक्ट करता आला असता पण हेही घडले नाही उलट राष्ट्रवादी फोडून शिवसेनेला बाहेर ठेवण्याचे कारस्थान रचले गेले पण ते फसले ते जर फसले नसते व अजित पवार एकनाथ शिंदेंच्याइतके आमदार घेऊन बाहेर पडले असते तर भाजपने सरकार बनवले नसते काय ? मग हेच उद्धव ठाकरे ह्यांनी घडवल्यावर ते अयोग्य कसे ठरते आणि कुठल्या तर्कानुसार ? मतदारांचा अनादर दोन्ही बाजूंनी झाला मग एकमेकांवर चिखल उडवून काय फायदा ? शरद पवार ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे एव्हढ्या मोठ्या संख्येने आमदार घेऊन गेले हे त्यांचे मोठेच कर्तृत्व ! त्याचे बक्षिसही त्यांना घसघशीत मिळाले , समटाईम करेज वर्क्स , एकनाथ शिंदे ह्यांच्याबाबत ते वर्क झाले अजित पवारांच्याबाबत ते वर्क आऊट झाले नाही एव्हढेच ह्या सगळ्या गड्बडकांडीत मतदार कुठे होता ?

आता एका अर्थाने मतदारांनी दिलेला कौल सत्तेवर आला हे खरंच पण त्यात राजकारणी लोकांचे कर्तृत्व कमी आणि सत्ताकारणाचा फिरता रंगमंच अधिक जिम्मेदार आहे 

असो 

डावे समाजवादी धोरण फेल गेलं म्हणून नरसिंहरावानी उजवे धोरण स्वीकारले मात्र गांधीवादी चौकट त्यांनी व पुढे मनमोहनसिंगांनी तोडली नाही मोदींनी गांधीवादी आर्थिक चौकट पूर्णच तोडून अतिउजवे धोरण आणले खरे पण त्याची फळे अजूनही दिसत नाहीत मोदीवादी व मोदी सतत दूर गगनके तले पहायला सांगतायत पण लोक दूर पाहून पाहून आता कंटाळले आहेत लोकांना काही नजीकचे इफेक्ट्स लागतात एकनाथ शिंदे ह्यांच्यावर हे नजीकचे इफेक्ट्स घडवून आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे माझ्या त्यांना शुभेच्छा 

चांगल्या लोकशाहीत सत्ताधारी व विरोधी दोन्ही बळकट लागतात आता दोन्हीही बळकट व युतीत आहेत हे ह्या राजकारणाचे सर्वात उत्तम फळ होय . 

श्रीधर तिळवे नाईक 


एकनाथ शिंदे ह्यांचे बंड कि उठाव कि क्रांती कि बंडाळी कि ही यादवी ? श्रीधर तिळवे नाईक 

एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस व अजित पवार ह्यांच्यावरची अभिनंदनपर भाषणे संपली आहेत मात्र ह्या भाषणातूनही एक वाद उद्भवला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे ह्यांनी जे काय केले त्याचे स्वरूप काय ? खुद्द शिंदे गटातील सर्वांनी आवर्जून सांगितलं कि हे बंड नाही उठाव आहे 

ह्यावर प्रतिक्रिया सभासदांतच उमटल्या काही लोकांना हे क्रांतीसदृश्य वाटलंय काहींना एकनाथ शिंदे नवे राजकीय सुपरस्टार वाटलेत त्यामुळे प्रथम त्या अंगाने चर्चा करणे भाग आहे रोमँटिक लोकांनी प्रबोधनकाळात रिव्होल्यूशन ह्या संकल्पनेचा जोरदार प्रचार केला ज्यात रॉजर बेकन , फ्रान्सिस बेकन , व्हॉल्टेअर , रुसो व मार्क्स हे प्रमुख होते ह्यातील दोन्ही बेकन्समुळे इंग्लिश क्रांती झाली आणि तिने प्रबोधनात्मक क्रांतीचा श्रीगणेशा केला ही क्रांती प्रामुख्याने ज्ञानात्मक होती व तिने धार्मिक वर्चस्वाला सुरुंग लावून अर्वाचीन लोकशाहीचा पाया घातला ह्याच विचारांना पुढे न्हेऊन अमेरिकन क्रांती झाली जिने ब्रिटिश साम्राज्यवाद उलथवला व स्वतंत्र राष्ट्राची निमिर्ती केली व्हॉल्टेअर व रुसो ह्यांनी स्वातंत्र्य महत्वाचे मानून एक मांडणी केली त्याचा प्रभाव पडून फ्रेंच राज्यक्रांती झाली व तिने जगभर सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य , समता व बंधुता ह्यांचा पुरस्कार केला अमेरिकन राज्यक्रांतीत गुलामगिरीचे निर्दालन न्हवते त्यावरून पुढे तिच्यात यादवी माजली फ्रेंच राज्यक्रांतीत समता प्रखरपणे अधोरेखित केली गेली होती आणि जगभर समता पसरायला लागली जगभरात तोवर फक्त अध्यात्मिक समता होती सामाजिक गुलामगिरीविरुद्ध कोणी आवाज उठवत न्हवते भारतात तर अध्यात्मिक व धार्मिक समता न्हवती ती पूर्वी शंकर , बुद्ध , महावीर ह्यांनी प्रस्थापित केली होती तरी त्यात दोष होता महावीरांना स्त्रियांना मोक्ष मिळेल असं वाटत न्हवतं तर गौतम बुद्धांनी आनंदच्या सांगण्यावरून स्त्रियांना प्रवेश दिला तरी गुलामगिरीला नकार दिला नाही पुढे प्रतिक्रांती होऊन पुन्हा एकदा अध्यात्मिक व धार्मिक समता नाकारण्यात आली त्याविरोधात महाराष्ट्रात चक्रधर , नामदेव , एकनाथ , तुकाराम ह्यांनी अध्यात्मिक समता प्रस्थापित केली कार्ल मार्क्सने प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देऊन आर्थिक समता केंद्रीभूत होऊन प्रस्थापित व्हावी म्हणून कम्युनिस्ट क्रांतीची संकल्पना मांडली व त्याआधारे लेनिन व ट्रॉट्स्कीने रशियन राज्यक्रांती घडवली 

कुठल्याही ब्रह्मांडजालात खालील गोष्टी असतात 

१ सुशासन ह्यात अनुशासन , शासन व प्रशासन सर्व नेटवर्क्स लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात व भ्रष्टाचारविरहित असतात 

२ अनुशासन :  ह्यात यमनियम येतात जसे कि १ सत्य २ सुकाम वा ब्रह्मचर्य ३ अहिंसा ४ अचोर्य ५ अपरिग्रह पतंजलींनी योगाला अनुशासन म्हंटले आहे इंदिरा गांधींच्या काळात ह्या शब्दाला विपरीत अर्थ प्राप्त झाला तरी मी इथे हा शब्द यमनियम म्हणजे द्वादशशीलता व त्यांचे आचरण ह्या अर्थाने हा शब्द वापरला आहे 

३ शासन ह्यात कायदे वा विधिनियम येतात 

४ प्रशासन ह्यात अधिनियम येतात व विधिनियमांची अंमल बजावणी येते 

५ कुअनुशासन ह्यात अनुशासन भ्रष्ट होते पण 

६ कुप्रशासन ह्यात अनुशासनाबरोबर प्रशासन भ्रष्ट होते 

७ कुशासन ह्यात प्रशासनाबरोबर शासनही भ्रष्ट होते 

८ अपशासन ह्यात अनुशासन , शासन व प्रशासन सर्वच भ्रष्ट होते 

९ कुअपशासन ह्यात अनुशासन , शासन , प्रशासन ह्यांच्याबरोबर नागरिकही पूर्ण भ्रष्ट होतात 

१० अशासन ह्यात अनुशासन शासन प्रशासन आणि नागरिक भ्रष्ट तर होतातच पण कुणाचाच पायपोस कुणातच रहात नाही 

आणि ब्रह्मांडजालातील ग्रहजालावर व ग्रहजालातील राष्ट्रजालावर कार्यरत असलेल्या प्रत्येक नागरिकजालात सुशासन हेच लक्ष्य असते अनुशासनात यमनियम व त्यांची साधना असते ही मोक्षासाठी किंवा लोककल्याणासाठी चाललेली असते 

मोक्ष ही अंतःकरणक्रांती असते तर लोकक्रांती ही संपूर्ण राष्ट्रात किंवा राज्यात होत असते लोकक्रांतीत 

१ ज्ञानक्रांती 

२ राज्यक्रांती 

३ धर्मक्रांती 

४ समाजक्रांती 

५ अर्थक्रांती 

युरोपमध्ये फ्रान्सिस बेकन व रेने देकार्तने ज्ञानक्रांती घडवून आणून प्रबोधनाची सुरवात केली वर राज्यक्रांती व अर्थक्रांती ह्यांच्याबद्दल वर लिहिले आहेच क्रांत्या फार क्वचितच घडतात आपल्याकडे बसवेश्वर ह्यांनी ज्ञानक्रांती व मोक्षक्रांती शिवाजी महाराजांनी पुढे ब्रिटिशांनी व ब्रिटिशविरोधात महात्मा गांधी ह्यांनी राज्यक्रांती फुले ह्यांनी समाजक्रांती घडवली जिला पुढे अधिक अर्वाचीन व स्पष्ट आकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला ह्यानंतर खरेतर कम्युनिस्टांनी राज्यक्रांती घडवायला हवी होती पण त्यांना ते जमले नाही आणि आता तर ते आऊटडेटेडच झाले 

भारतात महात्मा गांधी ह्यांनी घडवलेल्या राज्यक्रांतीतून १९४७ साली काँग्रेस सत्तेवर आली १९७८ साली जनता पक्ष क्रांती आणली जी फार काळ टिकली नाही मात्र मंडल आयोगासारखे काही दूरगामी बदल तिने घडवले पण ती फसल्याने बहुजनवाद विस्कळीत झाला तर १९९८ साली प्रमोद महाजन , अटलबिहारी बाजपेयी , बाळासाहेब ठाकरे व लालकृष्ण अडवाणी ह्यांनी घडवलेल्या हिंदुत्व  राज्यक्रांतीतून भाजप सत्तेवर आली आणि मोदींनी ही क्रांती पूर्ण केली ही प्रतिक्रांती आहे असाही दावा आ ह साळूनखें ह्यां सारख्या विचारवंतांनी केला आहे 

राज्यक्रांतीत स्वशासन आणण्यासाठी क्रांती केली जाते राज्यक्रांती शासक बदलते , शासन बदलते , शासनप्रणाली , प्रशासनप्रणाली व प्रशासन यंत्रणा बदलते व कधीकधी अनुशासन बदलते उदा रशियन राज्यक्रांतीत अनुशासनातील अहिंसा हा यम पूर्णपणे बदलला परिणामी अनेकांच्या हत्या झाल्या व स्टॅलिनच्या काळात तर हत्याकांडे झाली भारतातल्या तिन्ही राज्यक्रांत्या ह्या अपूर्ण राज्यक्रांत्या आहेत कारण तिन्ही राज्यक्रांत्यांनी अनुशासनप्रणाली  , प्रशासन व प्रशासकीय अधिकारी बदलले नाहीत तसे काही केले असते तर अराजक निर्माण होईल ही भीती क्रांतिकारकांच्या मनात असावी 

पुरोगामी लोकांना हिंदुत्व राज्यक्रांती सहन झालेली नाही आणि त्यांनी ह्या क्रांतीवर कायमच जोरदार हल्ले केले आहेत तर हिंदुत्व राज्यक्रांतीने १९४७ ची राज्यक्रांती व १९७८ ची राज्यक्रांती ह्या दोन्ही राज्यक्रांत्या मोडीत काढण्याचे सर्व प्रयत्न चालवले आहेत शासक बदलले शासनप्रणाली बदलली आणि आता अभ्यासक्रम बदलण्याचे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यात हिंदुत्ववादी अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत १९४७ नंतरच्या काँग्रेस राज्यक्रांतीनंतर काँग्रेस व समाजवादी शासनांनी हेच केले होते फक्त अभ्यासक्रम हा लोकशाही समाजवादाला पूरक होता तर अधिकारी लोकशाही समाजवादी असत मात्र भाजपने अश्याच स्टाईलने बदल केल्यावर मात्र लोकशाही समाजवाद्यांनी व कम्युनिस्टांनी बोंबा मारायला सुरवात केली अशा बोंबा मारणे हे त्यांचे कर्तव्यच होते व आहे पण ह्याचवेळी आपणही हेच केले होते ह्याचा विसर पडू देऊ नये हिंदुत्ववादी क्रांती मुळात होऊच न देणे ही तुमची जबाबदारी होती पण मुस्लिम लांगुलचालन करण्यापासून देशीवादाला पाठिंबा देण्यापर्यंत  तुम्ही ज्या अनेक चुका केल्या त्याचा फायदा हिंदुत्वाला झाला आणि आज झोपा केला आणि बैल गेला अशी तुमची अवस्था झाली आहे बरं तुमची ही झोपा अवस्था निदान उद्धव ठाकरे तुमच्या बाजूने आल्यावर जागृत व्हायला हवी होती पण असं झालं नाही उद्धव ठाकरे आले  म्हणजे आख्खी शिवसेना ताब्यात आली अशा भ्रमात तुम्ही राहिले आणि शिवसेनेत काय जळते आहे हे तुमच्या लक्ष्यात आले नाही परिणामी आणखी एकदा बैल गेला व एकनाथ शिंदे ह्यांचा लोकांच्यातून आलेला गट गेला रिक्षावाला म्हणून तुमच्यापैकी काही जणांनी केलेल्या कॉमेंट्स हेटाळणीप्रवण होत्या ज्या तळागाळातल्या जनतेला आवडल्या नाहीत एकनाथ शिंदेंच्याबाबत एक गोष्ट निगेटिव्ह आहे ती म्हणजे त्यांच्यावर असलेला गद्दार हा शिक्का ! हा शिक्का ते कसा पुसतात हे बघणे इंटरेस्टिंग असेल कारण त्यांचे राजकीय भवितव्य ह्यावरच अवलंबून आहे 

ह्यादृष्टीने टाकलेली त्यांची पहिली खेळी म्हणजे आम्ही जे केले ते बंड न्हवते तर उठाव होता ही केलेली मांडणी ! एकनाथ शिंदे गट हा शासनप्रणालीवर व शासनावर खुश न्हवता आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली पण उद्धव ठाकरे ह्यांच्याभवतीच्या लोकांनी त्यांच्यापर्यंत ती पोहचू दिली नाही असे एकनाथ शिंदे ह्यांचे म्हणणे ! नंतर त्यांनी जे केलं ते एका आवेगात केलं असं ते म्हणतात आणि माझ्या मते ते सत्य असावं आपण अनेकदा रॅशनॅलिटी गृहीत धरतो पण कधीकधी ती अस्तित्वात नसते माणसे एका भावनिक आवेगात व प्रक्षोभात ऍक्टिव्हेट होतात मात्र हे ऍक्टिव्हेशन सामूहिक ऍक्टिव्हेशन होईल असं मात्र कुणालाच वाटलं नसावं ते झालं 

बंडात शासक , शासनप्रणाली  व शासन बदलतात अनुशासन  व  प्रशासन तेच राहते 

उठावात शासक व शासन बदलते शासनप्रणाली , अनुशासन व प्रशासन तेच राहते 

एकनाथ शिंदे ह्यांनी शासक व शासन बदलले आहेत पण ना प्रशासन ना शासन त्यांनी बदलले आहे ना शासनप्रणाली ! बाळासाहेब ठाकरे ह्यांचे हिंदुत्व हीच त्यांची शासनप्रणाली आहे उद्धव ठाकरे ह्यांच्या शासनयंत्रणेत प्रशासन व शासन हे नको तितके काँग्रेसधार्जिणे झाले होते असा त्यांचा आरोप आहे त्यात तथ्य किती आणि हितसंबंधांना पोहचलेली हानी झाल्याने उफाळलेली नाराजी किती हे ठरवणे सद्या तरी अशक्य आहे पण ते कुशासन होते असा संकेत दिला गेला आहे मला स्वतःला संपूर्ण सहमती द्यावीशी वाटत नाही उद्धव ठाकरे आणि अजित पवार ह्यांनी अतिशय चांगले काम केले असं माझं मत आहे एकनाथ शिंदे ह्यांनी दिलेला दणका अजित पवारांनी ज्या खेळीमेळीने पचवला त्याबद्दल त्यांचे जितके अभिनंदन करावे तितके थोडेच ! शरद पवारांच्या घराण्यात एकाचवेळी राज्य पातळीवर अजित पवार व केंद्रीय पातळीवर सुप्रिया सुळे अशी दोन नेतृत्वे उदयाला यावीत हे पवारांचे नशीबच म्हंटले पाहिजे माझ्या आयुष्यात इंदिरा गांधींच्यानंतर ज्याला राजकीय लाघव म्हणता येईल असे मी फक्त सुप्रिया सुळेंच्यातच पाहीले आहे 

एकनाथ शिंदे ह्यांचा रांगडेपणा व बिनधास्तपणा व शिवसेनेच्या राजकीय संस्कृतीवर उघडपणे बोलणे हे दिलखेचक होते आता मुख्यमंत्री म्हणून आलेल्या अनुभवांच्यामुळे ते अधिक घडणार कि आधिक बिघडणार हे येणारा काळच ठरवेल त्यांनी ह्यापूर्वी असे भाषण कधी केले न्हवते हे अजित पवार ह्यांचे म्हणणे बरोबरच आहे 

केंद्रीय प्रशासनयंत्रणेचा गैरवापर हा मुद्दा सद्या वारंवार चर्चेला येतो आहे मी त्याचा माझ्या आधीच्या चारही लेखात उल्लेख केला नाही कारण ह्याविषयीचे कसलेही ऍक्सेस मला नाहीत मात्र शिंदे गटाच्या नाराजीलाच मी पहिल्याच लेखात अधिक महत्व दिले होते ते सकृतदर्शनी तरी खरे ठरले आहे भाजप फुटीर आमदारांची संख्या कन्फर्म होत नाही तोवर पुढे येणंच शक्य नाही हे मी सूचित केले होतेच 

मी ही लेखमाला लिहितोय ह्याचे कारण आधीच्या वेळी सोडणाऱ्या नेत्यांनी शिवसेना सोडली होती शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही उद्धव ठाकरे ह्यांच्यावरही त्यांची खूप म्हणावी अशी नाराजी दिसत नाही उलट कदाचित प्रेमच असावे असं दिसतं शिंदे गटांचा रोष हा उद्धव ठाकरे ह्यांच्या भवतालच्या लोकांवर आहे असं दिसतं ह्याबाबत कम्युनिकेशन गॅप पडलाय हे स्पष्टच दिसतंय नंतरच्या वक्तव्यांनी हा कम्युनिकेशन गॅप भरण्याऐवजी तो वाढवलाय असे शिंदे गटाच्या भाषणांवरून दिसते हा गॅप भरून निघून शिवसेना अभंग रहावी ही सदिच्छा ! हे अवघड आहे पण अशक्य नाही . उद्धव ठाकरे ह्यांनी हे करून दाखवल्यास स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्यांचे ते प्रचंड यश असेल . 


श्रीधर तिळवे नाईक 


शिवसेनेतील गोंधळ आणि कार्यकर्त्यातील पेच श्रीधर तिळवे नाईक 

महाराष्ट्रातील सत्तांतर महाराष्ट्राला नेमके कुठे घेऊन जाणार आहे ?

शिवसेनेत दोन गट आहेत आणि जो पेच आहे त्याचे एक उत्तर उद्धव ठाकरे ह्यांनी संघटन सांभाळावे व एकनाथ शिंदे ह्यांनी सत्ताकरण असा मध्य काढणे हा आहे हे उत्तर मान्य नाही झाले तर काय होईल ?

१ भाजपाला शिवसेना विसर्जित करायची आहे त्याला यश मिळेल लक्ष्यात घ्या शिवसेना म्हणजे ठाकरे हे आतापर्यंतचे समीकरण होते भाजपचा उद्देश हे समीकरण बदलणे हा आहे त्यासाठी दोन गोष्टी करणे आवश्यक आहे पहिली ठाकरे ह्यांच्याकडचे सगळे आमदार आपल्याकडे खेचून घेणे जे झालं आहे 

२ ठाकरे ह्यांच्याकडचे कार्यकर्ते खेचून घेणे एकदा का आमदार गेले आणि शिवसैनिकही गेले तर ठाकरे ह्यांच्याकडे काय उरते ? हे इप्सित आता एकनाथ शिंदे ह्यांना मुख्यमंत्रीपद देऊन साध्य करायला सुरवात केलीये आम्ही साध्या शिवसैनिकांची किती कदर करतो हे दाखवण्याचे प्रभावी गेस्चर म्हणजे शिंदेंना दिलेले मुख्यमंत्रीपद ! ह्याचा प्रभाव पडतांना दिसतो आहे म्हणजे उरलेसुरले आमदारही खेचून घेण्याला सुरवात झालीच आहे पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात जो प्रश्न होता कि भाजपबरोबर जाऊन आम्हाला काय मिळणार त्याचे उत्तर सत्ता मिळणार असे भाजपने दिले आहे ह्याचा परिणाम ज्यांना शिवसेना ही सत्ता प्राप्त करण्याचे माध्यम वाटत होती असे सर्व कार्यकर्ते शिंदे गटाकडे येणे आता अटळ आहे उद्धव ठाकरे ह्यांच्याकडे आता फक्त सत्ताप्राप्तीसाठी हपापलेले नसलेले सैनिक राहतील 

ह्याबाबतीतला पेच असा आहे कि जे शिवसैनिक उरतील त्यात हिंदुत्ववादी फार थोडे उरण्याची शक्यता आहे म्हणजे ठाकरे घराण्याकडे उरलेली तिसरी गोष्ट हिंदुत्ववाद ही आयडियालॉजीही जाणे अटळ आहे मग शक्यता उरते काय तर भाजपला जी कधीही ढापता येणार नाही अशी दुसरी आयडियालॉजी मराठीवाद मराठीझम पण ही आयडियालॉजी स्वीकारली तर मुख्य आयडियालॉजी जी हिंदुत्ववाद तिचा त्याग करावा लागणे अटळ आहे आणि भाजपला हेच तर साध्य करायचे आहे शिंदे ह्यांच्या भाषणात एकदाही मराठीवाद आलेला नाही हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे म्हणजे ते हिंदुत्ववादाचे सेकंडरी फिड्ल वाजवणारे मुख्यमंत्री असतील 

मी म्हणालो होतो कि भाजपच्या दोन्ही हातात लाडू आहे 

प्रश्न असा आहे कि मग शिंदे ह्यांचे भवितव्य काय ? पुढच्या विधानसभेत भाजपबरोबर युती झाल्याने आम्ही २०० जागा जिंकून आणू अशी सिंहगर्जना त्यांनी केली आहे हे जर सत्य झाले तर ज्याला जास्त जागा मिळतील तो मुख्यमंत्री होईल आणि मागच्या निवडणुकीचा अनुभव लक्ष्यात घेता भाजपला शिंदेसेनेपेक्षा अधिक जागा मिळणे अटळ आहे उलट उद्धवसेना व शिवसेना आपापसात लढल्याने शिंदे ह्यांची ताकद अतिशय कमी होईल आणि मोदीशहांच्या कार्पोरेट हिंदुत्वाला हे नीट माहित आहे उद्धव ठाकरे ह्यांच्या किती सिटा निवडून येतील ? भाजपला असं वाटतं कि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही घरात बसूनच जास्त राजकारण खेळतात आणि स्वभावाला औषध नसल्याने ते येत्या निवडणुकीत असेच राहतील आणि साहजिकच बाहेर रणांगण लढवणारे उरलेसुरले नेते शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे फारसं यश मिळवणार नाहीत  आणि ठाकरे सेना संपुष्टात येईल 

ह्याला ठाकरे बाहेर सतत हिंडून व पुन्हा नवे कार्यकर्ते जोडूनच शह देऊ शकतात एका अर्थाने बाळासाहेब ठाकरेंनी जशी शून्यातून शिवसेना निर्माण केली तसेच त्यांना करावे लागेल ह्याची प्राथमिक लढाई महानगरपालिका निवडणूक आहे 

मी मागे म्हंटल्याप्रमाणे दिल्लीकरांच्या मुख्य उद्देश मुंबई महानगरपालिका आहे आणि दुर्देवाने मुंबईतला मराठी टक्का कमी झाला आहे कधी न्हवे इतके मराठी माणसाला ह्यावेळी संघटित एकगठ्ठा मतदान करावे लागेल अन्यथा मुंबई केंद्रशासित प्रदेश होणे अटळ आहे आधी मुंबईतले प्रकल्प गुजरातेत न्हायला सुरवात झालीच आहे एकदा मुंबईच न्हेली कि मिशन कम्प्लिट होईल 

ह्या सगळ्या राजकारणातला एक खाली येणारा कर्व म्हणजे शिवसेनेच्या मतामुळे मागच्या निवडणुकीत भाजपचे किती आमदार निवडून आले होते ? भाजपला शिवसेनेची मिळणारी मते दोन गटात फुटली तर त्यांच्या किती सीटा पडतील ? असं तर होणार नाही ना सीटा वाढण्याऐवजी सीटा कमी होऊन त्याचा फायदा दोन्ही काँग्रेसना विशेषतः शरद पवारांना मिळेल ही शक्यता भाजपने नजरेआड केलेली नाही म्हणूनच शिंदेंनी शरद पवार ह्यांची भेट घेतली आहे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप किमान १२ लोकसभा सीट्स गमावणार आहे आणि हे भाजपला परवडणारे नाही अजित पवार ह्यांना तिकडून इकडे या असं शिंदे उगाच म्हणालेले नाहीत शरद पवार ह्याला बळी पडणार नाहीत कारण भविष्यात लोकसभेत त्रिशंकू स्थिती येण्याची बरीच शक्यता आहे आणि कदाचित तसे झालं तर भाजप फुटू शकते आणि शरद पवार सोनिया काँग्रेसने मूर्खपणा केला नाहीतर पंतप्रधान होऊ शकतात 

मोदी शहांचा एक डोळा म्युनिसिपलवर तर एक डोळा लोकसभेवर आहे त्यामुळेच हे सगळे डावपेच टाकलेले आहेत मराठी माणूस नेहमीप्रमाणे झोपलेला आहे आणि नेहमीप्रमाणे काही मराठी नेते झोपेचे सोंग घेऊन सत्तेच्या किरकोळ प्राप्तीत जीव द्यायला तयार आहेत 

शिवाजी महाराजांच्यावेळी नेमकी हीच स्थिती होती प्रश्न उद्धव ठाकरे स्वराज्य निर्माण करू शकतील का हाच आहे राजारामशास्त्री भागवतांच्या मते यादव घराणे मराठी होते हे प्रमाण मानले तर यादवींची थोर परंपरा मराठी असून ती थेट श्रीकृष्णापासून सुरु होते 

ही सगळी उलथापालथ यादवी असेल तर पराभव अटळ आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२