विकलांगतेची दहा वर्षे मोबाईल डाटात खिळून 

त्यांची डाटखिळी बसलेली 

अकरावं वर्ष दृढ कि विकलांग ?


माहीत असूनही चालणारे पाय 

अपघाताकडे चालत गेले 

अन फ्लॅश सदुपयोग न होता वाया गेला 


तेव्हापासून फ्रॅक्चर झालेले हात सोसत 

बॉलिवूडमधल्या करिअरचा दि एन्ड सोसत 

शिवासोबत 


मोक्षाला सावली नसते 

मोक्ष झाड नसतो 

मोक्ष फक्त असतो 


भाषा विकलांग झालेली पाहिल्यावर 

शारीरिक विकलांगता 


वेळ जावा म्हणून विद्यापीठात सुरु केलेली लेक्चर्स 

जायबंदी हातांनी दिलेली 


कबुतरे उडतायत डोळ्यातून करुणेची 

दोन्ही कानांत कावळे 

टीनिट्स 

एकात पाऊस दुसऱ्यात शास्त्रीय गायकी 


डॉक्टर म्हणतायत 

कान उडून चाललेत 

मी म्हणतोय 

अनहद शिल्लक आहे 

ह्या देशात चालता न येणाऱ्या माणसाला रिस्पेक्ट नाही 

दुसऱ्या अपघातात पायबंदी 

माईलस्टोन मोजणं सोडून द्यावं का ?


मी चालतोय खुरटत 

एकट्या माणसाला जायबंदी पाय झेपत नाहीत 

पण मला चॉईस कुठाय 


मी पेनकिलर घेऊन चालतोय 

मुंग्यावरही पाय पडणार नाही ह्याची काळजी घेत 


लोकांचे बसणारे धक्के 

दैन्य उघडे करणारे 


ट्रेनमध्ये चढणे दिवसेंदिवस कठीण होतंय 

आणि मुंबई ट्रेनशिवाय जगणे देत नाही 


उपजीविकेसाठी पळावं लागतं 

माझे पायपालन सुरु 


मी सफेद दाढी वाढलीये 

मुली प्रेमात पडू नयेत म्हणून 


कामवासनेच्या अस्तानंतर ऍक्टिंग शिकवणे 

रोमँटिक सिन इंटिमेट सिन 


दिवस कापरासारखे जळून खाक 


असहाय्यता 

पुस्तके वाचता येत नाहीत 

अन एक कादंबरीकार कादंबरी वाचा व समीक्षा लिहा म्हणून 

नृशंसपणे फिल्डिंग लावत 


दोन पाय दोन हात जायबंदी असलेल्याने 

ऍक्शन सिन कसा शिकवावा ?


आपण दिव्यांग  कॅटेगरीत 

अन आंबेडकरवादी दोस्त तू ब्राम्हण कि शैव विचारत 

कागदोपत्री ब्राम्हण म्हणताच त्याचा संपलेला मैत्रीतला उत्साह 


काढून घेतल्या गेलेल्या असाइन्मेंट्स 

अपघाताचा केला गेलेला बागुलबुवा 


एक लेखक म्हणतोय 

तुमच्याकडं बघून अपघात झाला होता असं वाटत नाही 


लोकांना आपला चेहरा अपघातग्रस्त कसा दाखवावा ?


कविता वाचतो का श्रीधर ?


रूममध्ये एक संयोजिका एक कवी 


मला ऐकू येत नाही म्हणून सांगताच खर्र्कन चेहरा उतरलेला 

म्हणजे तू फक्त कविता ऐकवणार आणि जाणार ऐकणारच नाहीस ?


मी शरीर गोळा करून चालता 

कवी म्हणतोय 

"हा विक्षिप्त आहे "


आयुष्यावर वयाचा बर्फ आणि धूळ 

गंज लागलेल्या शरीराला गांजा घे म्हणणारे लोक 

मधूनच शिवाचे होणारे आगमन अन विसर्जन 

ते पेलता न येणारे शरीर 


शून्य सुदृढ 

आपण शक्तीचा वापर करावा का ?


हा निसर्गात हस्तक्षेप होईल 


मी जायबंदी हात मागं घेतोय 


अंगभर हसणारे शिवाचे शैशव 

शरीर तारुण्यात यायचं सोडत नाही 


पुरावा काय मोक्षाचा पुरावा काय 


मी शांत 

मोक्ष ही काही बातमी नाही 

चोवीस तास चालवायला 

आणि तो काही चॅनेलच्या दारी येत नाही 


चॅनेलच्या दारी आश्रम येतात आणि प्रवचनं 


एक खिळून राहिलेला हिवाळा त्वचेवर 

माहीत नाही कसलं कसलं आक्रमण अन कुणाकुणाचे अंगावर 


सरपटत जाऊन संडास करण्याचे दिवस संपले हीही अचिव्हमेंट 


विष विषाचे साईडइफेक्ट 


मी आंगऱ्यांना त्यांचा दैदीप्यमान इतिहास सांगतोय 

आणि शिवाकडे समाधीची अनुमती मागतोय 


विकलांगतेची दहा वर्षे अन अकरावं सदृढ कि पुन्हा विकलांग माहीत नाही 


गेली दहा वर्षे मी फारसा हिंडलेलो नाही 

घरकोंबडा पोझिशन पर्मनन्ट पोझिशन 


राजकारण खालावलेलं समाजकारण फाफललेलं 

कधी न्हवे तो आपण मीडियासेंट्रिक 

फसफसणाऱ्या बातम्या आणि झिंगलेले ओटीटी प्लॅटफॉर्म 

कविता लिहीताही येत नाहीत टाईपही करता येत नाहीत 

आपला सावरकर झालेला सुचलेली कविता लक्ष्यात ठेवून घोळवत सावकाश डिजिटल वॉलवर 


ज्याचे त्याचे अंदमान 

ज्याचे त्याचे शक्तीस्थान 


असिस्टंट विचारतोय 

सर कवितेतल्या काल्पनिक प्रतिमांची संख्या घटत का चाललीये 

मी म्हणतोय 

फार प्रतिमा लक्ष्यात राहत नाहीत  

सिक्वेन्स लक्षात ठेवणे अधिक आवश्यक आहे 


आपली कविताही दिव्यांग झाली आहे काय ?


श्रीधर तिळवे नाईक 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग १ ते २२