बुद्ध , आंबेडकर आणि निर्वाण श्रीधर तिळवे नाईक
चं प्र देशपांडे ह्यांनी माझ्या कवितेच्या अंगाने उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार मी हे लेखवजा टिपण लिहितोय देशपांडे म्हणतात
चं प्र देशपांडे : Champra Deshpande
ते भारताचे ठीक -- मुळात आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्मात ' निर्वाण ' आहे का हीच मला उत्सुकता आहे. कुणीही यावर काही बोलत नाही !
श्रीधर तिळवे नाईक :सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझे निर्वाण मला १२ वीला प्राप्त झालेल्या आकस्मिक सविकल्प समाधीवर आधारित आहे बुद्ध वैग्रे नंतर आयुष्यात आलेत तेव्हा प्रत्यक्ष बुद्ध जरी मला म्हणाला असता निर्वाण वैग्रे मी काही सांगितलेलं नाही तर मी म्हणालो असतो ठीक आहे सर तुमचा अनुभव असेल पण माझा अनुभव असाच आहे कि निर्वाण आहे आंबेडकर काय म्हणतात ह्याचा ह्या कवितेशी काय संबंध ? तरीही कुणीही यावर काही बोलत नाही असं तुम्ही म्हणताय म्हणून माझ्या मर्यादित वाचनानुसार बोलतो
बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथात आंबेडकरांनी निर्वाण मान्य केले आहे असे दिसते मात्र बुद्धाची पुनर्जन्म व कर्मफलसिद्घान्त थेरी त्यांनी अमान्य केलीये त्यांच्या मते ही थेरी बुद्धाने मांडलेली नाही ती त्याच्या नावावर बुद्ध धम्मात घुसलेल्या ब्राम्हणांनी त्याच्या नावे घुसवली मला आंबेडकरांचे हे म्हणणे मान्य नाही माझ्या मते बुद्धाने पुनर्जन्म सांगितला आहे आणि कर्मफलसिद्धान्तही ! आंबेडकरांनी हे दोन्ही सिद्धांत अमान्य केले कारण ह्या सिद्धांताचा झालेला गैरवापर ! ह्या सिद्धांताच्या तर्काला दुष्ट वळण देत ब्राम्हणांनी अस्पृश्य किंवा कुठल्याही शूद्र व वैश्य ह्या पापयोनीतील जातीत झालेला जन्म किंवा ब्राम्हण व क्षत्रिय ह्या पुण्ययोनीत झालेला जन्म हा मागील जन्मात केलेल्या कर्माचे फळ आहे असा तर्क मांडला व सारी वर्णव्यवस्था जन्मवादी बनवली त्याला विरोध करण्यासाठी आंबेडकरांनी हे दोन्ही पूर्वापार चालत आलेले सिद्धांत नाकारले आंबेडकर ज्या स्थितीमुळे हे दोन सिद्धांत नाकारतात ती स्थिती दलितांची आहे आणि त्या स्थितीत मी असतो तर मीही हेच केले असते ह्या दुष्ट तर्कशास्त्राला छेद देण्याचा हाच मार्ग आहे व होता बुद्धाने आत्मा नाकारला आहे तो अनात्मवादी आहे साहजिकच मग प्रश्न निर्माण होतो कि पुनर्जन्म कसा होतो आत्म्याशिवाय पुनर्जन्म शक्य आहे का ? आद्य शंकराचार्यांनी ह्या प्रश्नाच्या आधारे बौद्ध पंडितांना हरवले होते मग हा युक्तिवाद जिंकायचा कसा तर आत्मा नाकारायचा पुनर्जन्म नाकारायचा आणि कर्मफलसिद्धान्त नाकारायचा एकदा हे तिन्ही नाकारले कि शंकराचार्यांचा प्रश्नच फिजूल ठरतो आणि बौद्ध धर्म विजयी होतो उलट तो उलट प्रश्न विचारू शकतो कि ह्या तिन्ही सिद्धांताचे वैज्ञानिक पुरावे द्या असे वैज्ञानिक पुरावे देणे आद्य शंकराचार्यांना देताच आले नसते आणि शंकराचार्य पराभूत झाले असते त्यामुळेच बाबासाहेब अनात्मवाद स्वीकारतात निर्वाण स्वीकारतात पण पुनर्जन्मआणि कर्मफलसिद्धान्त नाकारतात आणि बुद्धानेही ते सांगितलेले नाहीत असा स्टान्स घेतात प्रश्न असा आहे कि हा स्टान्स योग्य आहे का ? तर नाही . बुद्धाच्या उपदेशात हे दोन्ही सिद्धांत आहेत म्हणूनच जगभर पसरलेल्या बौद्ध धर्मात हे दोन्ही सिद्धांत आढळतात मग बाबासाहेबांनी जगभर पसरलेल्या बौद्ध धर्माला आव्हान दिलं आहे का ? तर हो बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धर्म नाकारला आहे आणि म्हणूनच ते आपल्या बौद्ध धर्माला नवयान म्हणतात जे हीनयान , महायान व वज्रयान ह्या तिन्ही यानांना नाकारते
आंबेडकरांचे हे नवयान भविष्यात कसे वळण घेईल कितपत यशस्वी होईल हे सध्या कुणीही सांगू शकत नाही मात्र बौद्ध धर्मात ती एक क्रांतिकारक घटना आहे हे मान्य करायला हरकत नाही
बाबासाहेब म्हणत कि प्रथम आणि शेवटी मी इंडियन आहे बौद्ध धर्म हा भारतीय धर्म स्वीकारून त्यांनी हे सिद्ध केले दुर्देवाने आजही हिंदू बाबासाहेबांनी हे का केलं ह्याचा नीट विचार करत नाहीत एकीकडे वर्णव्यवस्था स्वीकारायची आणि दुसरीकडे बाबासाहेबांनी वर्णव्यवस्था स्वीकारणारा मनुस्मृती स्वीकारणारा धर्म सोडायला नको होता अशी अपेक्षा करायची हे म्हणजे गुलामांनी मालकाचा धर्म स्वीकारून पिढ्यानपिढ्या गुलामच राहायला हवं असं म्हणणं आहे एकदा गुलाम जागा झाल्यावर हे कसं शक्य आहे ? बाबासाहेब हे जागृतीचे दुसरे नाव आहे त्यांचा सारासारविवेक कधीही सुटलेला नाही त्यांच्या काळाच्या त्यांना मर्यादा आहेत पण त्या कुणाला नसतात ?
बाबासाहेबांनी कायमच श्रद्धेच्या विरोधात बंड केले दुर्देवाने बाबासाहेबच आता श्रद्धा बनलेत हे क्लेशकारक ! असो !
मला वाटतं हे आजच्यासाठी पुरेसं आहे .
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा