वैचारिक बायोडाटा मी कम्म्युनिस्ट आहे का ? नसेन तर मग मी काय दृष्टीचा माणूस आहे ? श्रीधर तिळवे नाईक 

चं प्र देशपांडे ह्यांनी माझ्या एका पोस्टला कमेंट देतांना मुळात मी कम्म्युनिस्ट आहे असं तर उद्या तिळवे म्हणणार  नाहीत  ना अशी शंका व्यक्त केली आहे ते म्हणतात." Champra Deshpande:

या मार्गाचे माझे कवडीचे वाचन वा ज्ञान नसल्याने, खरेच, काहीच कळले नाही -- पण एक सुप्त भीती निर्माण झाली की सालं मुळात मी एक कम्युनिस्ट आहे असे तर उद्या तिळवे म्हणणार नाहीत ? !😁"

ही शंका माझ्याबाबत अनेकदा अनेकांनी व्यक्त केलेली आहे म्हणून मी इथे त्याचे उत्तर देतो आहे. 

ह्या उत्तराआधी सर्वात प्रथम एक खुलासा मी संन्यासी आहे आणि भारतीय शैव परंपरेनुसार संन्याशाची बांधिलकी ही फक्त लोकांशी व लोककल्याणाशी असली पाहिजे राज्यकर्त्यांशी नाही मी ही गोष्ट मानतो त्यामुळेच कुठल्या वादाकडून आणि व्यक्तीकडून काय कामे झाली पाहिजेत ह्याचे सुस्पष्ट आकलन माझ्या डोक्यात असते आणि मी त्याप्रमाणे कार्य करतो आणि शक्य असेल तर करवून घेतो म्हणजे अगदी एखादे व्यक्तिमत्व साहित्य-संपादक असेल तर त्याच्याकडून चौथ्या नवतेचा प्रसार व प्रचार कसा होईल ते मी पहात असतो भाजपकडून १ काश्मीर कलम रद्द , २ समान नागरी कायदा ३  कुटुंब नियोजनाची सक्ती ४ अल्पसंख्याकांचा स्पेशल दर्जा रद्द ५ व्यवहारिक म्हणजे प्रॅक्टिकल परराष्ट्र धोरण ह्या गोष्टी मला अपेक्षित होत्या व आहेत  कारण त्यात लोककल्याण आहे अशी माझी धारणा आहे भाजपने फक्त ह्यातील पहिली व काही प्रमाणात पाचवी गोष्ट केली आहे आणि मी त्याचे ताबडतोब स्वागतही केले होते त्यामुळे भाजप सरकार त्याच्याकडून अपेक्षित असलेली कामे करत नाही असं माझं मत आहे ते काहीतरी भलतीच कामं करत आहे. कम्युनिस्ट सरकारांच्याकडून मला श्रमिकांना योग्य त्या वेतननिश्चितीची हमी  व त्यांना योग्य त्या प्रमाणात अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण देण्याची व्यवस्था अपेक्षित आहे ह्या अंगाने काही चांगली कामे झाली कि मी त्यावर पॉझिटिव्ह कॉमेंट टाकतो आणि लोकांना मी कम्म्युनिस्ट असल्याचा संशय येतो केरळमध्ये कम्युनिस्ट सरकारने काही चांगली कामे केली आहेत तर त्याला दाद दिली पाहिजे असे माझे मत आहे 

आता मुख्य मुद्द्याकडे  मी कम्म्युनिस्ट आहे का ? नसेन तर मग मी काय दृष्टीचा माणूस आहे ? 

मी शैव आहे आणि मानवी आयुष्याचा  केंद्रबिंदू मोक्ष (निर्वाण )असला पाहिजे असे मी मानतो त्यामुळेच मोक्ष -निर्वाण प्राप्त केलेल्या सर्वांच्याविषयी म्हणजे भगवान शंकर , पार्वती , गणपती , कार्तिकेय , नकुलीश , बोधीधर्म ,औलुक्या , रामकृष्ण परमहंस , कपिल , बुद्ध , महावीर , अष्टावक्र , बसवेश्वर , अक्कमहादेवी , ज्ञानेश्वर , जे कृष्णमूर्ती , रमण महर्षी , तुकाराम , नामदेव , मीरा , जनाबाई , चोखामेळा , गोरा कुंभार , गोरखनाथ , सहजाबाई , रैदास , रुमी , मन्सूर , गुर्जींफ , झेन महाकाश्यप , सिद्ध सरहपा , मिलेरपा , लाओत्से वैग्रे  ह्या सर्वांच्याबद्दल माझ्या मनात अतिशय आदर सन्मान व प्रतिष्ठा आहे माझा आरंभबिंदू हे मोक्ष प्राप्त झालेले लोक आहेत 

माझा मध्यबिंदू बसवेश्वर , शिवाजी महाराज , गांधी , फुले आणि आंबेडकर हे आहेत मी आयडियालॉजीच्या पातळीवर फुले आंबेडकरवादी आहे हे अनेकदा उघडपणे कैकदा सांगितले आहे मात्र मी चिकित्सा बंद करणारा फुलेआंबेडकरवादी नाही तर त्यांची सामर्थ्यस्थळे व मर्यादास्थळे दोन्ही सांगणारा फुले आंबेडकरवादी आहे 

माणसाचा वर्तमानबिंदू तो  स्वतःच असला पाहिजे असे मी मानतो माझा वर्तमानबिंदू  मी स्वतःच आहे जो वर्तमानाची चिकित्सा भारतीय दार्शनिक चौकटीत स्वतःच्या चौथ्या नवतेच्या पद्धतीने स्वतंत्रपणे करत असतो 

मी सुरवातीला नास्तिक होतो कारण माझे वडील गांधीवादी असले तरी नास्तिक होते त्यामुळेच माझ्या कविता नास्तिकत्वाला धरून होत्या व त्यांचे कलेक्शन नास्तिकाचा ग्रंथ ह्या नावाने मी इथे टाकले होते त्या अत्यंत साध्या सरळ गद्य म्हणाव्यात अशा आहेत तर नंतर लिरिकल झाल्यावर ज्या लिहिल्या त्या माझ्या कविता काहीश्या बाळबोध होत्या व त्या  बाळबोध कविता भाग १ व २ मध्ये आहेत ह्या बाळबोधतेचा दुसरा टप्पा एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगारमध्ये आला आहे माझे आयुष्य बदलले ते १२ वीला अचानक ध्यानी मनी नसताना  मला प्राप्त झालेल्या सविकल्प समाधीमुळे ! ह्या घटनेने माझे आयुष्य बदलले ही घटना घडली नसती तर मी आय ए एस ऑफिसर झालो असतो 

माझा बसवेश्वरांच्या कायकवर  विश्वास आहे आणि त्याचा पडताळा कार्ल मार्क्समध्ये काही प्रमाणात येत असल्याने मी कार्ल मार्क्स वाचला पण मोक्षावर विश्वास नसलेले कुठलेही दर्शन वा विचारसरणी मला मोहात पाडू शकत नाही मात्र मार्क्सचा श्रमिकांना न्याय व त्यांच्या कष्टांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे व त्यांचे शोषण होता कामा नये हा विचार मला मान्य आहे पण त्याचबरोबर कार्यतत्पर व नैतिक लोकांनाच उत्तेजन व आळशी व भ्रष्ट लोकांना विवेकटोचणी मिळालीच पाहिजे असे मी मानतो एका अर्थाने आंबेडकरांना जेवढा कार्ल मार्क्स मान्य आहे तेव्हढाच कार्ल मार्क्स मला मान्य आहे 

१९८३ -८३ साली मार्क्सच्या पुण्यतिथीच्या १०० व्या वर्षाचे सर्वात जोरदार सेलिब्रेशन झाले व वक्तृत्व स्पर्धेत त्या वर्षी कार्ल मार्क्स हा विषय असायचा एक विद्यार्थी म्हणून ह्या वर्षी मीही भाषण दिले होते आणि त्या भाषणात मार्क्स का आऊटडेटेड आहे आणि रशियात मार्क्सवाद का कोसळणार आहे ह्याची मांडणी करणारे भाषण मी केले होते माझ्या डाव्या गुरूजनांच्या अनेक शिव्या मी त्या भाषणांनंतर खाल्ल्या होत्या पण माझ्या प्रेडिक्शननुसार रशिया कोसळला हेच बीजभाषण मी परिवर्तनवाद का कोसळला ह्या नावाने दीर्घलेख लिहून विस्तृत करून मांडले होते व प्रकाशनासाठी कुणीच न स्वीकारल्याने सौष्ठवच्या एका अंकात ते प्रसिद्धही झाले होते ह्या भाषणात मी कार्ल मार्क्सची सर्वांगीण चिकित्सा केली आहे ज्यांना शंका आहेत त्यांनी ह्या भाषणावर आधारित माझा दीर्घलेख वाचावा 

मला वाटतं माझ्या सार्वजनिक जीवनाचा इतका खुलासा पुरेसा आहे 

 मी कम्म्युनिस्ट आहे का ? नसेन तर मग मी काय दृष्टीचा माणूस आहे ? २ श्रीधर तिळवे नाईक 

आता माझ्या खाजगी जीवनाकडे वळू 

खाजगी  जीवनाचे प्रारंभबिंदू दोन असतात 

१ पूर्वजन्मबिंदू : तुमचे मागील जन्म तुम्हाला पूर्वजन्मबिंदू देतात माझी प्रचिती ह्याबाबत काहीही असली तरी जोपर्यंत विज्ञानाच्या आधारे ह्याचे नीट स्पष्टीकरण व पुरावे मिळत नाहीत तोवर ह्यावर बोलू नये असे माझे स्पष्ट मत आहे मात्र हा टॉपिक खुला असावा म्हणून त्याचा उल्लेख मी करतोय 

२ जनुकबिंदू : तुमचे जनुकबिंदू हे तुम्हाला मातुल आणि पैतुल अशा दोन्ही कडच्या पूर्वजांच्याकडून मिळालेले असतात माझी कवितेची आवड ही माझ्या सावंत आजीकडून (आईची मावशी माझी मातुल आजी सीकेपी होती पण शैव असल्याने सर्व जातीजमातीत माझ्या मातुल पणजोबाने आपल्या मुली दिल्या होत्या ) त्यातील मावसआजी सावंतांच्यात दिली होती तिला कवितेची विलक्षण आवड माझी आई तिच्याकडे शिक्षणासाठी होती तेव्हा तिच्याकडून तिला कवितेची आवड मिळाली आणि आईकडून मला ! माझे मातुल आजोबा हे नकुलीश दर्शनाचे आचार्य त्यांना अनेक विद्या व कला येत अगदी बल्लाळविद्याही त्यांच्यासारखे जेवण पंचक्रोशीत कुणी बनवत न्हवते ती एक विद्या सोडली तर त्यांच्याकडून अनेक विद्या माझ्याकडे आल्या तर पैतुल आजोबा चित्रकलेत रस घेणारे माझे वडील उत्तम चित्रकार होते त्यांची  वय वर्षे १५ ते १७ ह्या दरम्यानच्या वयातील काही चित्रे मी पाहिली होती साहजिकच कलेच्या क्षेत्रात माझी पहिली आवड चित्रकला होती त्यांच्याकडे गायकी होती आणि बालगंधर्वांनी केलेल्या काही स्त्रैण भूमिका त्यांनी मंदिराच्या नाटकात केल्या होत्या माझ्या  मातुल आजोबांनी अशा काही भूमिका केल्या होत्या विशेषतः शंकरावर त्यांचे प्रेम असल्याने ते शंकर उत्तम करत मात्र गायकी केशवराव भोसले थाटाची त्यामुळे गायन जीन्समधूनच आले असावे माझे आजोबा तालाला पक्के न्हवते  हा फौल्ट माझ्यातही आला आणि वडील तालासुरात नीट असल्याने त्यांनी मला तू गाऊ नकोस असा सल्ला दिला होता 

माझा स्वभाव आईवर गेला रागीट आणि प्रेमळ आक्रमक धाडसी पण दुसऱ्याला लागेल असं बोलणारा मात्र बुद्धिमत्ता वडलांच्याकडून आली ते स्वभावाने एकदम शांत आणि भित्रे रिस्क कॅल्क्युलेट करणारे टिपिकल गांधीवादी नास्तिक हळवे पण आतल्या पुरुषामुळे रडणे लपवणारे 

माझे खाजगी मध्यबिंदू आता पाहू 

ह्यात जन्माने वाट्याला आलेले कामबिंदू आणि अर्थबिंदू ह्यांचा समावेश होतो 

कामबिंदूत १ कुलबिंदू २ कुटुम्बबिंदू ३ आप्तावळा ४ गोतावळा ५ गणगोत ह्यांचा समावेश होतो माझ्यावर तिळवे आणि नाईक ह्या दोन्ही कुळांचे संस्कार झाले नाईक कुल हे नाथसंप्रदायी तर तिळवे नकुलीश दर्शनी मात्र दोघांचाही एकमेकांवर परिणाम झाला दोघेही रवळनाथ मंदिराचे पुजारी त्यामुळे त्याचे खोल संस्कार नागेशी बांदिवडे ह्या गावात आम्ही वेगवेगळ्या घरात पण एकत्रच राहतो एका अर्थाने आप्तावळा एकत्र आहे अजूनही सर्व घरातले गणपती एकत्र जातात मंदिरातल्या नाटकात आजही हा आप्तावळा एकत्र काम करतो मंदिर हा सर्वांना बांधणारा घटक रोहिदास नाईक ह्या माझ्या मामामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष त्याच्या जन्मापासून संपूर्ण कुळात अलीकडे सुरेल तिळवेमुळे आप पक्ष महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षामुळे बहुजनवाद  हाडामांसात खिळलेला !गोव्यातल्या बहुजनवादावर फुले आंबेडकरांचा काहीही प्रभाव नाही कारण पोर्तुगीज राजवटीमुळे ह्यांच्याशी फार खोल संबंधच न्हवता . महाजनवादामुळे तो आता जोडण्याचा प्रयत्न चालू आहे 

मी कोल्हापुरात हम दो हमारे पाँच मध्ये वाढलो आईला चौथ्या मुलावर थांबायचे होते पण चौथ्यांदा जुळे झाल्याने आम्ही पाच झालो दोन बहिणी दोन जुळे भाऊ आणि मी 

अर्थबिंदूत समुदायबिंदू आणि समाजबिंदू महत्वाचे माझे वडील व्यापारी समुदायातले तर समाज दुकानदार समाज दुकान जबरदस्त चालत असल्याने बक्कळ पैसे होते त्यांच्यामुळे सुरवातीला मी उच्च मध्यमवर्गीय वा निम्न श्रीमंत वर्गाच्या संस्कारात वाढलो पैशे कायमच चांगल्या कामासाठी खर्च तेही कसलाही आव न आणता गाजावाजा न करता वडिलांनी किती जणांच्या शिक्षणाच्या खर्च उचलला त्याची गणती नाही त्यांनी शून्यातून कारभार उभा केल्याने त्याचा सार्थ अभिमान होता प्रथम कामगार मग मालक असा त्यांचा प्रवास होता आणि आपल्याकडच्या नोकरांना त्यांनी दुकान काढायला प्रोत्साहनच दिले कामगार म्हणून सुरवात केल्याने कम्युनिस्टांच्याबद्दल त्यांना सहानुभूती होती मात्र तत्वज्ञान गांधींचेच ! अहिंसेवर गाढ श्रद्धा !मंदिराच्या चालून आलेल्या पुरोहितगिरीत त्यांना कसलाही रस न्हवता ते नास्तिक पण गाढ नास्तिक नाही ईश्वराबद्दल ते असेल बुवा पण मला अनुभव नाही म्हणायचे आयुष्याच्या शेवटी माझ्यामुळे थोडे बदलले थोडे ध्यान करायला लागले 

मी लग्न केले नाही त्यामुळे कामबिंदू पुढे सरकला नाही माझ्या वडिलांना माझे लग्न न करणे कधीच पटले नाही ते त्यांच्या बाजूने प्रयत्न करत राहिले मॅट्रिमोनियल ते स्थळे आणण्यापर्यंत पण मी फशी पडलो नाही शेवटी त्यांनी नाद सोडला माझी अफेयर्सही त्यांना कधी आवडली नाहीत त्यापेक्षा लग्न कर म्हणायचे 

आता माझे खाजगी वर्तमानबिंदू तुमची सुरवात कुठल्याही बिंदूपासून झाली तरी वर्तमान हा प्रत्यक्षात तुम्ही हाताळत असता मी माझे बिंदू उल्लंघत गेलो फुले आंबेडकरवाद प्रथम मी कमावला पण पुढे त्यापुढे निघून आलो गांधींचे जे पटले ते घेतले घरात बौद्ध परंपरा न्हवती ती मी कमावली नंतर ती उल्लन्घली माणूस सतत ट्रान्सेन्ड झाला पाहिजे असे माझे मत आहे जे थांबतात ते सडतात मी थांबलो नाही पुढे सरकत राहिलो आता मी केवळ निखळ वर्तमान आहे 

श्रीधर तिळवे नाईक 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट