राजा राम मोहन रॉय आदिम शैव ते आदिम हिंदू : हिंदुवादाची पहिली सांस्कृतिक उडी श्रीधर तिळवे नाईक
राजा राम मोहन रॉय आदिम शैव ते आदिम हिंदू : हिंदुवादाची पहिली सांस्कृतिक उडी श्रीधर तिळवे नाईक
आज सर्व आर्य राजा राममोहन रॉय ह्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणत असले तरी प्रत्यक्षात राजा राम मोहन रॉय (१७७२ ते १८३३)ह्यांचे भारतीय संस्कृतीतील केऑटिक स्थान हे अजूनही विश्लेषणाच्या कक्षांत आलेलं नाही
हिंदुइझम (म्हणजेच हिंदुवाद ) हा शब्द त्यांनी वापरला हेसुद्धा अनेकांना माहित नाही दुसऱ्या अकबराने त्यांना राजा हे टायटल दिले असल्याने हिंदुत्ववादी हल्ली ते वापरत नाहीत व विकिपिडीयावर त्यांचा उल्लेख राममोहन रॉय असा होतो सती व बालविवाह ह्यांना त्यांनी विरोध केला असे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून वाचत असतोच मात्र राममोहन रॉय ह्यांनी जातिव्यवस्थेला सुरवातीला कडक विरोध केला होता हे मात्र आपणाला सांगितलं जात नाही प्रत्यक्षात सांगितलं जातं त्यापेक्षा रॉय ह्यांचे व्यक्तिमत्व प्रत्यक्षात फार गुंतागुंतीचे होते रॉय ह्यांच्यानंतर अनेकांनी हिंदुइजम हा शब्द वापरला आणि त्याबद्दल सुरवातीच्या काळापासून कोलाहल होता उदाहरण म्हणून रा ना दांडेकर घेऊ
रा ना दांडेकर ह्यांनी हिंदुवादाबद्दल जे म्हंटल होतं ते आजही विचार करण्याजोगे आहे ते म्हणतात
Hinduism can hardly be called a religion at all in the popularly understood sense of the term. Unlike most religions, Hinduism does not
regard the concept of god as being central to it. Hinduism is not a
system of theology—it does not make any dogmatic affirmation regarding the nature of god ... . Similarly, Hinduism does not venerate any
particular person as its sole prophet or as its founder.
It does not also recognize any particular book as its absolutely authoritative scripture.
Further, Hinduism does not insist on any particular religious practice as being obligatory, nor does it accept any doctrine as its dogma. Hinduism can also not be identified with a specific moral code. Hinduism, as a religion, does not convey any definite or unitary idea. There is no dogma or practice which can be said to be either universal or essential to Hinduism as a whole. Indeed, those who call themselves Hindus may not necessarily have much in common as regards faith or worship.
What is essential for one section of the Hindu community may not be necessarily so for another. And, yet, Hinduism has persisted through centuries as a distinct religious entity.
ह्याच विवेचनाच्या पावलावर पाऊल ठेऊन १९९५ च्या एका निकालपत्रात सुप्रीम कोर्टाच्या Chief Justice P. B. Gajendragadkar ह्या न्यायधीशानी म्हंटले ,"When we think of the Hindu religion, unlike other religions in the world, the Hindu religion does not claim any one prophet; it does not worship any one god; it does not subscribe to any one dogma; it does not believe in any one philosophic concept; it does not follow any one set of religious rites or performances; in fact, it does not appear to satisfy the narrow traditional features of any religion or creed. It may broadly be described as a way of life and nothing more"
प्रश्न असा आहे कि हिंदू बाबत हा सगळा गोंधळ का निर्माण होतो ?
निसर्ग हा मानवाच्या केंद्रस्थानी सुरवातीपासूनच होता आणि त्याला निसर्गाविषयी एकाचवेळी कुतूहल आणि औत्स्युक्य होते त्याच्या आत तो स्वतः निसर्गातून जन्मल्याने निसर्गाप्रमाणे जन्माला घालण्याची उर्मी होती जिला मी सर्जनाची उर्मी म्हणतो व निसर्गात विरघळून जाण्याची नैसर्गीक उर्मी होती हिला मी विसर्जनाची उर्मी म्हणतो सर्जन आणि विसर्जन ह्या दोन्ही उर्मीतूनच त्याने निसर्गाशी नाते जुळवण्याचे चार प्रकार शोधले
१ श्रद्धा सर्वात प्रथम त्याने निसर्गातील वस्तूंच्यावर व त्यातील वस्तूंच्यावर त्यांच्या जादूरूपावर श्रद्धा ठेवायला सुरवात केली
२ रिलिजन म्हणजे महाश्रद्धा काही काळाने माणसाने आपल्या श्रद्धांचा प्रचार व प्रसार करायला सुरवात केली ह्यातील ज्या श्रद्धांचा प्रचार व प्रसार वेगाने होऊन ज्या महाव्याप्त झाल्या व ज्यांनी श्रद्धेसोबत कायदे दिले त्या कायदेबद्ध श्रद्धा महाश्रद्धा म्हणजे रिलिजन झाल्या ज्यू , ब्राम्हण , ख्रिश्चन , इस्लाम ह्या महाश्रद्धा म्हणजेच रिलिजन आहेत
३ भारतात भगवान शिवांनी ह्या श्रद्धा व महाश्रद्धा नाकारून मोक्षप्राप्ती केली त्यातून अनेक शैव दर्शनांचे महादर्शन जन्मले
४ ज्या श्रद्धांनी श्रद्धेबरोबर मोक्ष स्वीकारला त्या धर्म झाल्या वैदिक , ब्राम्हण , वेदांत , वैष्णव व हिंदू हे सर्व धर्म आहेत ह्यांच्याजवळ स्वतःचे स्मृती नावाचे कायदेही आहेत
५ पुढे मोक्षयुगात स्मृती नाकारणारे , दर्शन मांडणारे व मोक्ष स्वीकारणारे धम्म तयार झाले आणि ह्या धम्मानी स्वतःची एक धम्मव्यवस्था निर्माण केली भारतात शैव , जैन , बौद्ध ह्या धम्मव्यवस्था आहेत ह्यातील सम्राट अशोकाची बौद्ध धम्मव्यवस्था किंवा सम्राट हर्षवर्धन वा शिवाजी महाराजांची किंवा राजा रणजितसिंगची शैव धम्मव्यवस्था गाजलेल्या आहेत
हे पाचही प्रकार आपल्याप्रमाणे इतरांनी व्हावे म्हणून आग्रहशील आहेत आणि रिलिजन तर ह्याबाबत कट्टर आहेत आणि त्यातूनच हिंदुइझमबाबत गोंधळ उडाला आहे जैन धर्मात तब्बल चोवीस तीर्थन्कर आहेत तर शैवांच्यात हजारो सिद्ध जरी शिव मुख्य आहे तर रिलीजनप्रमाणे एक ग्रंथ एक प्रेषित येणार कुठून ? प्रेषित ही संकल्पना लागू करून पाहणे म्हणजे माझ्या हाताला एक बोट आहे म्हणून तुलाही एका बोटाचा हात पाहिजे असा आग्रह धरणे आहे असे एकमेकांच्या टाइपमधून दुसऱ्याचा टाईप पाहण्यापेक्षा पाचही टाइपांना मान्यता द्यावी हे उत्तम पाचही निसर्गाकडे जाणारे पाच भिन्न प्रकार आहेत म्हणून त्यांचा स्वीकार करणे योग्य आहे
पुढचा प्रश्न असा आहे कि हा हिंदुवाद आला कुठून ?
भारतात आलेल्या ख्रिश्च्णांना विशेषतः ज्येसुइटांना वैदिक धर्मात फारसा रस न्हवता कारण भारतावर वैदिकांचे राज्य न्हवते आणि धर्मांतर ज्यांचे करायचे त्यांना संस्कृत येत न्हवती साहजिकच ख्रिश्चन मिशनऱ्यांना सुरवातीला व्हर्नाक्युलर भाषा शिकण्यात व त्या व्हर्नाक्युलर भाषेत बायबलचा अनुवाद करण्यात जास्त रस होता साहजिकच प्रथम जो ओरिएंटॅलिझम आला तो प्लुरल ओरिएंटॅलिझम होता कारण हे लोक संतांचे दिवाने होते मराठी साहित्यातूनही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जे ग्रंथ निर्माण केले वा भाषांतरित केले ते पौराणिक वैष्णव टाईप होते मराठीतही त्यामुळे ख्रिस्तपुराण सांगण्यात आले
पण पुढे उत्तरापेशवाईशी लढावे लागल्यानंतर मात्र आपला शत्रू जाणण्यासाठी त्यांनी वेदांचा व स्मृतींचा अभ्यास करायला सुरवात केली १७५७ च्या प्लासीच्या लढाईनंतर हा रस द्विगुणित झाला कारण मराठे हे फार मोठा अडथळा बनून उभे होते ह्यातून ओरिएंटॅलिझमची दुसरी फेज जन्मली ती म्हणजे आर्यन ओरिएंटॅलिझम ! वैदिक , ब्राम्हण , जैन , बौद्ध , वैष्णव व वेदांत ह्या आर्यन धर्मांचा अभ्यास करणे ह्या आर्यन ओरिएंटॅलिझमने सुरु केले ह्या आर्यन ओरिएंटलवाद्यांनी प्रथम भारतातील नॉन मुस्लिम जनतेसाठी हिंदू शब्द वापरायला सुरवात केली आणि भारतीय घटना आजपावेतो ह्याच अर्थाने हा शब्द वापरत होती राजा राममोहन रॉय ह्यांची उत्तरकालीन जडणघडण ह्या आर्यन ओरिएंटॅलिझममध्ये झाली होती
त्यांची पूर्वकालीन जडणघडण मात्र मिश्र होती घरात तानीबाईचा म्हणजे आईचा धर्म शाक्त पंथीय शैव धम्म होता आणि वडिलांचा म्हणजे रमाकांतचा धर्म वैष्णव धर्म होता साहजिकच ह्या दोन्हीचा समतोल साधू इच्छिणारा तत्कालीन हिंदू हा शब्द त्यांना आकर्षक वाटला तर आश्चर्य ते काय ?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे राम मोहन रॉय ह्यांना सुरवातीपासूनच शाक्तपंथीय शैव धम्मात रस होता पण पुढे वेदान्त आणि इस्लाम ह्यांच्यामुळे त्यांना एकतत्ववादात रस निर्माण झाला गंमतीचा भाग असा कि ह्याचवेळी विल्यम कॅरी हा भारतीयांचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने भारतात आला व त्याने वैदिक , ब्राम्हण , जैन , बौद्ध , वैष्णव व वेदांत ह्या आर्यन धर्मांचा अभ्यास करणे ह्या आर्यन ओरिएंटॅलिझमच्या परंपरेनुसार सुरु केले त्याने साईहार्द विद्यावाकिश ह्या तंत्रिकांशी चर्चा केल्या आणि पहिला ग्रंथ कॅरी रॉय व विद्यावागीश ह्यांनी मिळून लिहिला तो म्हणजे महानिर्वाण तंत्र ! हा ग्रंथ तंत्र परंपरेत असला तरी तो एकेश्वरवादाला समर्पित होता कॅरीबरोबरचे हे काम हिंदू लॉ बनवण्याच्या संदर्भात ब्रिटिशांनी नापसंद केले आणि ब्रिटिश तंत्राच्या अंगाने जाणार नाहीत हे स्पष्ट झाले साहजिकच साईहार्द विद्यावाकिश हे वेगळे झाले पुढे राममोहन रॉयही ! प्रश्न असा आहे कि सुरवातीला शाक्त असलेले व जातीव्यवस्था , बालविवाह व सती प्रथेच्या विरुद्ध सरळ उभे ठाकलेले रॉय मग हिंदू वेदांती कधी झाले ?
१८०३ पासून रॉय हे ब्रिटिशांच्या सेवेत रुजू झाले आणि मग नोकरी करता करता ब्रिटिशांना वेदांतात जास्त रस आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांची त्या दिशेनेच वाढ सुरु झाली ह्याचा शैवांना प्रचंड तोटा झाला कारण ह्यांनंतर रॉय ब्रम्हवादी होणे अटळ होते आदिम शैव धर्मातून ते आदिम हिंदू धर्मात उडी घेणार होते आणि ही उडी भारतीय प्रबोधनाच्या इतिहासात शैवांना दुय्यम स्थान देणार होती १८०६ पर्यंत रॉय ह्यांना उपनिषदे माहित न्हवती हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे १८१० ला ती माहित झालेली दिसतात
शैव मानसिकता असलेले रॉय जातीव्यवस्था , बालविवाह व सती प्रथेच्या विरुद्ध सरळ उभे ठाकले पण वेदांती झालेले रॉय पुढे ब्रिटिशांना त्यांनी सती प्रतिबंधक कायदा केल्यावर आमच्या धर्मात हस्तक्षेप करण्याचा ब्रिटिशांना हक्क काय हे कायदे त्यांनी आमच्या संमतीने करायला नकोत काय असा प्रश्न विचारू लागले पुढे लोकमान्य टिळकांनी रॉय ह्यांचीच री ओढलेली दिसते
१८१० ते १८२० ह्या दरम्यान शैव आणि वेदांत ह्यांच्यात दोलायमान झालेल्या राजाराम मोहन रॉय ह्यांनी ह्या दोघांचा समन्वय साधण्यासाठी हिंदुवाद हिंदुइझम हा शब्द तयार केला
१८२८ ला त्यांनी देवेंद्रनाथ टागोर ह्यांच्याबरोबरीने ब्राम्हो समाज स्थापन केला तत्कालीन बंगाली लोकांच्या दृष्टीने हे दोघेही बनिया झालेले होते एकेश्वरवाद आणि समाजसुधारणांचा आग्रह हे ब्राम्हो समाजचे वैशिष्ट्य होते त्यांनी म्हंटले आहे
"The present system of Hindus is not well calculated to promote their political interests…. It is necessary that some change should take place in their religion, at least for the sake of their political advantage and social comfort"
हे वाक्य म्हणजे हिंदू धर्म नावाचा एकच धर्म आहे ह्याचा ठाम उच्चार आहे आणि इथूनच पुढे हिंदू धर्म ठामपणे उदयाला आला
सर्वात आश्चर्यकारक म्हणजे हिंदुवाद हा शब्द ही संकल्पना देणाऱ्या राममोहन रॉय ह्यांचा अंत्यसंस्कार मात्र शैव पद्धतीने दफन करून झाला वैदिक पद्धतीने दहन करून न्हवे
श्रीधर तिळवे नाईक
दयानंद सरस्वती : आदिम शैव ते वैदिक हिंदू : शैववादातून आदिम वैदिकतेत उडी १ श्रीधर तिळवे नाईक
राजा राममोहन रॉय ह्यांनी आदिम शैव धम्मतेतून हिंदुवादात उडी मारल्याचे आपण पाहिले
वर्ण जातिव्यवस्थेला विरोध करणारे , धर्मांतर करावयास आलेल्या ऍडम ह्या पाद्र्याला स्वतःचा अनुयायी बनवणारे , गोमातेची हत्या करतो असा खोटा आरोप लादणाऱ्या ब्राम्हणांना अनुयायी पळून गेले तरी सामोरे जाणारे , सतीप्रथेच्या समर्थनार्थ खोटे मंत्र ऋग्वेदात घुसडून त्यांना समर्थन म्हणून सादर करणाऱ्यांचा भांडाफोड करणारे , येशू स्वतःला सर्वत्र मनुष्य पुत्र म्हणवून घेतो तर तो ईश्वरपुत्र कसा ? असे अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणारे राजा राममोहन रॉय गेल्यावर पुढे काय हा एक प्रश्न होता
ह्याला काउंटर कर्मठ ब्राम्हण टाकणार हे उघड होते फक्त हा काउंटर ब्राह्मणधर्मी असणार कि वैदिकधर्मी असणार एव्हढाच प्रश्न होता ह्यातील वैदिकधर्मी भूमिका आदिम असणार कि ब्राह्मणधर्माला शरण जाणारी असणार हा अनुषंगिक प्रश्न होता ,
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून पुन्हा दुसरा जो ब्राम्हण आला तो अनपेक्षितपणे मूळचा शैव ब्राम्हणच होता ह्या शैव धम्मातून समाज निर्माण करणाऱ्या नव्या त्रिमूर्तीचे राजाराम मोहन रॉय हे निर्माणकर्ते असतील तर दुसरे संरक्षक होते दयानंद सरस्वती ! त्यांचा जन्म गुजरातमधील काठियावाडी येथे १८२४ साली झाला ते औदीच्य कुलीन शैव ब्राम्हण होते व घरात शैव परंपरा असल्याने त्यांचे नाव मूळशंकर असे ठेवले गेले वडील अंबाशंकर शंकराचे परमभक्त होते पण एकदिवस महाशिवरात्रीला शिवाच्या मूर्तीवर तीन उंदीर चढून प्रसाद खातांना त्यांनी पाहिले आणि मूर्तिपूजेवरचा त्यांचा विश्वास उडाला आणि ते खऱ्या शंकराच्या शोधात निघाले आणि त्यांना शेवटी जे गुरु मिळाले त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून वैदिक धर्माचा प्रचार करण्याचा आदेश त्यांना दिला मात्र घरातले वर्णजात न मानणारे शैव संस्कार जाईनात तेव्हा हे शैव संस्कार व माध्यम वेद अशा संरचनेतून त्यांनी आदिम वैदिक धर्म सादर करायला सुरवात केली जो आजही वैदिक आहे कि नाही ह्यावर वाद चालू आहेत
आपण पाठ्यपुस्तकात त्यांना आर्य समाजचे संस्थापक मूर्तिपूजेचे विरोधक कर्मकांडाचे विरोधक स्त्रीपुरुष समानता मानणारे व स्त्रीशिक्षणाचा व वेदांचा अधिकार स्त्रियांना देणारे म्हणून ओळखतो
त्यांच्या आगमनापूर्वी वेदांबाबत आर्य दर्शनाची वेगवेगळी मते होती म्हणजे ब्राम्हणधर्म व मीमांसक वेदांना अकृतक अपौरुषेय कूटस्थ व नित्य मानत होते ह्याला शह शैवप्रभावित सांख्यांनी व वैशेषिकांनी दिला त्यांनी वेद प्राकृतिक पौरूषेय व अनित्य मानले पुढे विश्व-शैव , जैन , बौद्ध ह्यांनी वेदांना एक मानवी व्यवस्था एव्हढाच दर्जा दिला नंतर ब्राम्हणांनी शैव व सांख्य वैदिक ईश्वर मानतात अशी मखलाशी केली वास्तविक ईश्वर ही संकल्पना मूळची शैवांची आणि तिचा अर्थ विश्वाचा प्राण एव्हढाच ! त्याला कर्ताकरवता बनवला वैदिकांनी स्वतःची पुरुष ही संकल्पना ईश्वरावर लादून !नाथ , पती व ईश्वर हे तिन्ही प्राण ! ईश्वर विश्वाचा प्राण , नाथ सिद्धाचा प्राण आणि पती शरीराचा प्राण (ह्यात स्त्रीशरीरही येते ) ! पुढे हे भेद मिटले आणि प्राण ह्या अर्थाने ते कसेही स्वैरपणे वापरले जाऊ लागले त्यातूनच काशी ह्या शहराचा प्राण म्हणजे काशिनाथ , अंबर ह्या सिद्धाचा प्राण म्हणजे अंबरनाथ , पशूंचा प्राण तो पशुपती , पशुपती ह्या सिद्धाचा नाथ तो पशुपतीनाथ , माझ्या प्राणाचा नाथ तो प्राणनाथ , वैद्यक विद्येचा ईश्वर तो वैद्येश्वर वैग्रे आजही ईश्वर हा प्रत्यय शंकराला लावून रंकाळेश्वर ,रामेश्वर अशी नावे शंकराला दिली जातात पुढे वैष्णवांनी ही प्रथा उचलली
महर्षी दयानंद सरस्वतींनी घरातून प्राप्त झालेला शैवांचा ईश्वरसिद्धांत डेव्हलप केला आणि तीन सिद्धांत मांडून आपला एकेश्वरवाद सिद्ध केला हे तीन सिद्धांत पुढीलप्रमाणे
१ वेदांतील अग्नी वायू वैग्रे देवता नसून एकाच ईश्वराची भिन्न नावे आहेत
२ विश्वामित्र वैग्रे हे एका ऋषींचे नाव नसून अनेक ऋषींचा तो समुच्चय होता व अशा समुच्चयांनीं ईश्वर प्रेरणेने वेद रचले
३ वेद हे ईश्वरी आहेत
दयानंदांनी वेद साम्यवादी असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सुचवले त्यासाठी त्यांनी वेदातील काही ऋचा काढल्या ज्यात कोणी छोटा नाही कि कोणी मोठा असं म्हंटल होतं ज्याप्रमाणे जठराग्नी तापाग्नी सूर्याग्नि एक त्याप्रमाणे उपादान कारण एक व ते ईश्वर असे दयानंद वेदाचा दाखला देऊन म्हणतात शाहू महाराज आर्य सामाजिस्ट असण्याचे कारण दयानंदांची ही मांडणी होती बारा राशी ह्या ग्रीक आहेत असे आपण मानतो पण अगदी बारा राशींची मांडणी हीही वैदिक होती हे सांगण्यासाठी त्यांनी ऋग्वेदातील द्वादश प्रधय : प्रचक्रे हा श्लोक चर्चेला घेतलेला आहे ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील १६४ वे सूक्त ४६ वी ऋचा पुढीलप्रमाणे आहे
इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्य: स सुपर्णो गरुत्मान्।
एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु: ।।१-१६४-४६।।
दयानंदांच्या मते ही ऋचा एकाच सत्याला विद्वान लोक वेगवेगळ्या अर्थाने पुकारतात हे सत्य सांगते ही वेगवेगळी नावे म्हणजे इंद्र , मित्र , वरूण ,अग्नी ,यम , वैग्रे विप्र ह्या शब्दाचा अर्थ ते ब्राम्हण असा करत नाहीत विद्वान असा करतात दयानंदांच्या मते आर्य ह्या शब्दाचा अर्थ जाती किंवा समुदाय असा नसून श्रेष्ठ असा होतो त्यांच्या मते वेदांना उच्चनिच्च , काळा गोरा भेद मान्य नाही वेदांना राष्ट्र मान्य नाही वेद मानवधर्म व विश्वकल्याण सांगतात संपूर्ण विश्वाला आर्य म्हणजे श्रेष्ठ बनवण्याची आज्ञा वेदात दिली आहे असा त्यांचा दावा आहे
वेदाचा अधिकार फक्त ब्राम्हणांना होता हेही दयानंद नाकारतात त्यांच्यामते वेदकालीन समाजव्यवस्थेत वर्ण कर्मानुसार होते जन्मानुसार न्हवते त्यामुळे आजही आर्य समाजात वेद सर्वांना शिकवले जातात आणि आर्य समाजात कुणाचाही विवाह वैदिक पद्धतीने होऊ शकतात मी स्वतः ज्यांना वैदिक पद्धतीने विवाह करायचा आहे त्यांना आर्य समाज रिकमेण्ड करतो किंवा आर्य समाजात पाठवतो दयानंद सरस्वती वेदात कर्मानुसार वर्णव्यवस्था होती हे सिद्ध करण्यासाठी उदाहरणे देतात म्हणजे ऐतरेय ब्राम्हणाचा कर्ता महिदास हा चांडालीनीचा पुत्र होता असा ते दाखला देतात किंवा विश्वामित्र समुदाय क्षत्रिय होता वैग्रे ते श्रेष्ठ कर्मालाही यज्ञ म्हणतात ते विदेश गमन पाप मानत नाहीत आणि अस्पृश्यतेला वेदात आधार नाही असे ते स्पष्ट ठणकवतात
आर्य समाज हे भारतातील मिशनरी पद्धतीचे पहिले वैदिक संघटन होते १९२० पर्यंत थेट संथाळांसारख्या जमातीत ते पोहचले होते आणि जवळजवळ २०० च्या आसपास अस्पृश्य जातीतून आलेले लोक वेद शिकून आर्य सामाजिस्ट झाले होते आणि वेदांचा प्रचार करत होते मी नेहमीच म्हणत आलोय आर्य समाजाशी लढाई करण्यापेक्षा आर्य समाजाला सोबत घेणे परिवर्तनवादाला पूरक ठरेल अनेक कर्मठ ब्राम्हणांना सुधरवायला आर्य समाज हे चांगले औषध आहे
आज भारताच्या प्रत्येक शहरात किमान एक शैक्षणिक संस्था ही आर्य समाजाची आहे आणि ही जबरद्स्त अचिव्हमेंट आहे पण एका बाबतीत ते साफ चुकले ती बाब म्हणजे हिंदी भाषा ! हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचे पहिले स्थापत्य दयानंदांनी रचले आणि त्यांनीच दक्षिणेवर हिंदी लादण्याचा पहिला प्रयत्न केला स्वतःची मातृभाषा गुजराती असूनही सत्यार्थप्रकाश त्यांनी हिंदीत लिहिला ते हिंदीला संस्कृतचा दर्जा देण्याच्या मनसुब्यात होते पण हिंदीची आर्यन वृत्ती त्यांना दिसत न्हवती कारण मुळात तेच आर्यन झाले आणि ह्या आर्यनतेनेच हिंदुत्ववाद्यांना आर्य समाज बळकवण्याचे राजकारण खेळणे सोपे झाले
श्रीधर तिळवे नाईक
दयानंद सरस्वती : आदिम शैव ते वैदिक हिंदू : शैववादातून आदिम वैदिकतेत उडी २श्रीधर तिळवे नाईक
लोकहितवादी आणि दयानंद सरस्वतींना पडलेला पहिला प्रश्न हा हिंदू जाती इंग्रजांची गुलाम होऊन इतकी पराधीन कशी झाली हा होता स्वराज हा शब्द दयानंदांनी वापरला असे विकिपीडियाने म्हंटले असले तरी तो शब्द प्राचीन आहे आणि शिवाजी महाराजांनी तो वापरला होता भारतीयांच्या गुलामीचे मुख्य कारण जन्मजातीव्यवस्था आहे हे दयानंदांनी शोधलेले उत्तर होते ह्या व्यवस्थेमुळेच योग्यतेला प्रतिष्ठा नाही आणि भ्रामक उच्चनिच्चपणा बोकाळला आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला हे दूर करायचे असेल तर गुणकर्मानुसार वर्ण मानणाऱ्या आदिम वैदिक धर्माचे आपण पुनर्जीवन केले पाहिजे असे त्यांना वाटायला लागला मूर्तिपूजेमुळे शिक्षणसंस्था काढण्यापेक्षा मंदिरे बांधण्याची स्पर्धा सुरु झाली असं त्यांना वाटायला लागलं साहजिकच त्यांनी नवीन मंदिरबांधणीला विरोध केला व विद्यामंदिरे उभी करायला सुरवात केली
दयानंदाच्या मते ईश्वरभक्तीच्या नावाने शैवांच्यात वाम अघोर पंथ सुरु आहे विद्यामंदिर बांधण्याऐवजी शैव शिवमंदिर बांधण्यात नाहक पैसे खर्च करत आहेत आणि हे चित्र बदलणे आवश्यक आहे आचरणाच्या नावाने फक्त स्पर्शबंदी चालू आहे हे बदलायला हवे
भारताची धार्मिक राजधानी काशी असल्याने दयानंद सरस्वतींनी काशीपासून सुरवात करावयाचे ठरवले शंकराच्या त्रिशूळावर काशी वसली आहे हा सर्वच शैवांचा विश्वास ! १६ नोव्हेंबर १८६९ ला दयानंद सरस्वती काशी नरेशच्या साक्षीने शास्त्रार्थाला बसले एका बाजूला काशीचे पंडित व दुसऱ्या बाजूला दयानंद सरस्वती ! हा शास्त्रार्थ वेदात प्रतिमा पूजन आहे कि नाही ह्या विषयावर होता दयानंदांनी प्रतिमापूजनाच्या समर्थनार्थ वेदातील किमान एक श्लोक काढून दाखवा असे आवाहन दिले कुणाही पंडिताला असा श्लोक काढून दाखवता येईना मग पंडितांनी एक खोटा श्लोक आणला आणि गलका केला पण प्रत्यक्षात तो खोटा असल्याचे सिद्ध झाले दयानंद शास्त्रार्थ जिंकले अपेक्षेप्रमाणे पराभूत वैदिक पंडितांनी त्यांच्यावर शेण वैग्रे फेकले पण त्याने दयानंद सरस्वतींच्या लोकप्रियतेत भरच पडली दयानंदांनी आपले काम सुरु केले पण काही वर्षांनी आपल्या कार्याला काही संस्थात्मक स्वरूप दिलं पाहिजे असं दयानंदांना वाटायला लागलं .
अनेकांना आर्य समाज ही संस्था कुठेतरी गुजरात पंजाब मध्ये स्थापन झाली असे वाटते प्रत्यक्षात ही संस्था चक्क मुंबईत गिरगावात १८७५ साली स्थापन झाली. आणि आजही ती दमदारपणे काम करत आहे
स्वामीजींचा मृत्यू हा आजही विवादास्पद मानला जातो वंदेमातरम वीरभद्र राव ह्यांच्या मते १८८३ मध्ये दयानंद सरस्वतींनी महाराजा जसवंतसिंग ह्यांना ते नन्हीजान नावाच्या एका मुस्लिम नर्तकीच्या बाहुपाशात पाहिले तेव्हा त्यांनी राजाला हे वागणे सोड व चांगल्या आर्याप्रमाणे जग असे सांगितले राजाने हे मान्य केले साहजिकच नर्तकीचे उत्पन्न थांबले तेव्हा सूड घ्यावा म्हणून महाराजांच्या जगन्नाथ ह्या खानसाम्याला नन्हींजानने स्वामीजींच्या जेवणात घालायला विष दिले व त्या विषाने हळूहळू स्वामीजींचा प्राण घेतला स्वामींनी मरण्यापूर्वी खानसाम्याला माफ करून त्याला राज्याबाहेर जायला पैसे दिले त्यांनी नर्तिकेलाही माफ केले ह्याउलट दुसरी कथा जी मी स्वतः आर्य समाजात ऐकलीये ती सांगते कि सत्यार्थ प्रकाशमध्ये स्वामीजींनी जो इस्लामचा प्रतिवाद केला होता तो मुस्लिमांना सहन झाला नाही व अली मर्दन खां ने महाराजांच्या जगन्नाथ ह्या खानसाम्याला स्वामीजींच्या जेवणात घालायला विष दिले व त्या विषाने हळूहळू परिणाम करत शेवटी ३० ऑक्टोबर १८८३ रोजी दीपावलीला स्वामीजींचा प्राण घेतला
दोन्ही कथांत विषप्रयोग कॉमन आहे आणि देणारी वा देणारा मुस्लिम आहे . ह्याचा जो परिणाम व्हायचा तो झाला आर्य समाज जो वैदिक हिंदूवादी होता हळूहळू वैदिक हिंदुत्ववादी झाला
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा