आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६१ ते १७०: श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६१ ते १७०गीतारहस्य : गीतेतील कर्म ह्या शब्दाची व्याप्ती श्रीधर तिळवे नाईक
यज्ञकर्म , ब्रम्हकर्म व भक्तीकर्म ह्यांचा विचार आपण केला तसाच कर्म म्हणजे ब्राह्मणधर्मानुसार १ नित्य २ नैमित्यिक ३ काम्य व ४ निषिद्ध अशी कर्मे होतात हेही आपण पाहिले ब्राह्मणधर्मानुसार दुसरे प्रकारची कर्म हे वर्ण्य कर्म होय ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शूद्र ह्यांना मनुस्मृतीनुसार जी वाटून दिलेली कर्मे आहेत त्यांना वर्ण्य कर्मे म्हणतात ह्या सर्व कर्मांचे तीन उपप्रकार होतात
१ सात्विक कर्म हे कर्म मनातल्या मनात घडते म्हणजे विचार करणे फील करणे मनन करणे चिंतन करणे
२ वाचिक कर्म इथे कर्म वाचेद्वारा व्यक्त होते बोलणे हुंकाराने
३ आंगिक कर्म इथे हात पाय इत्यादी अवयवांच्याद्वारा कर्म होते उदा खाणे पिणे चालणे उठणे बसणे हसणे वैग्रे
ह्या तिन्ही प्रकारच्या कर्मांना गीता लागू आहे
गीतेत कर्म हा शब्द अशा सर्व कर्मांना उद्देशून वापरला गेला आहे ह्याशिवाय ही सृष्टी ज्या अवाढव्य व्यापाराच्या आधारे चालते त्या व्यापारालाही कर्म हा शब्द लागू होतो
टिळक यज्ञकर्मावर विश्वास ठेवतात इतकेच न्हवे तर त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळांच्यावरही विश्वास ठेवतात त्यामुळेच टिळक परदेशातून आल्यावर प्रायश्चित्त घेतात कारण टिळकांचा नैमित्यिक कर्मांच्यावर विश्वास आहे मात्र शेअर खरेदी विक्री त्यांना फक्त वैश्य कर्म वाटत नाही ते त्यांना ब्राम्हण कर्मही वाटते
ह्या मांडणीबाबत आक्षेप अटळ आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे यज्ञकर्म करण्याचा अधिकार टिळक फक्त ब्राम्हणांना देतात साहजिकच शन्कराचार्य हा ब्राम्हणच असला पाहिजे आणि तो पुरुषच असला पाहिजे ह्या सनातन्यांच्या मताला ते पाठिंबा देतात
ते मनुस्मृतीनुसार जी वर्ण्य कर्मे आहेत त्यांनाही पाठिंबा देतात एका अर्थाने टिळक वर्णव्यवस्थेला पाठिंबा देतात आणखी एका गोष्टीकडे टिळकांचे साफ दुर्लक्ष्य ते म्हणजे वर्ण्य कर्मातही
१ नित्य २ नैमित्तिक ३ काम्य व ४ निषिद्ध असे कर्माचे चार प्रकार होतात आणि वर्णव्यवस्थेत स्वतःच्या वर्णानुसारी कर्माखेरीज इतर वर्णाची कामे करायला मनुस्मृती निषेध लावते ह्यातही घोळ असा आहे कि ब्राह्मणांना सर्व वर्णांची कर्मे करायला अनुमती आहे
ह्याही पुढचा प्रश्न असा आहे कि जर कर्मांची व्याप्ती ब्राम्हणधर्मानुसार ठरणार असेल तर गीता ही ब्राह्मणग्रंथच मानावी का ?
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६२ योग म्हणजे काय ?श्रीधर तिळवे नाईक
कर्म म्हणजे काय ह्याची मी तपशीलवार चर्चा केली कारण आर्य आणि शैव दोन्ही परंपरा सांगणारे लोक आपली परंपरा नेमकं काय सांगते हे विसरून गेले आहेत आणि आज सनातन धर्मवाले काय सांगतात तेच प्रमाण मानणाऱ्यांची संख्या वाढतीये अनेक महाभाग असे आहेत ज्यांना पाश्चात्य संदर्भ माहित असतात पण भारतीय लोक ज्ञान व कर्म ह्यांचा कसा विचार करतात ते माहीत नसतं त्यामुळे टिळकांचे संदर्भ काय आहेत तेच अनेकदा अनेकांना कळत नाही ते कळावेत म्हणून मी माझीही मांडणी मांडत असतो जेणेकरून विषय उलगडावा
कर्म म्हणजे काय हे पाहिल्यानंतर योग म्हणजे काय ते पाहायला हरकत नाही योग हा शब्द मूळचा शैव आहे तो शैव कसा वापरतात ?
शैव मनुष्याला पशु म्हणतात कारण तो पाशांनी बनलेला असतो हे पाश स्पंदांनी बनलेले असतात हे पाश हालचाल करण्यास सक्षम असतात शैव पाश आणि बंधने ह्यांच्यात भेद करतात बंधने टळ असतात पाश अटळ असतात कारण भूक तहान आणि श्वास अपरिहार्य असतात त्यांची पूर्ती नाही झाली तर आपण मरू असे भय माणसाच्या ठायी असते मनुष्याला जगायचे असते आणि मरायचे नसते त्यातूनच जगणे , टिकणे आणि टिकवणे ह्या तीन गोष्टींची मळसूत्रे माणसात अपरिहार्यपणे असतात पण त्यांच्यामुळेच मनुष्याच्या पाठीमागे वासना कामना आकांक्षा आदीं मळांचा ससेमिरा लागतो त्यांची बंधने तयार होतात मनुष्य मळसूत्रांच्या बंधनात कैद होतो त्यामुळे आजार होतात हा मळ नाहीसा करण्याचा उपाय पाश नाहीसे करणे मूळात परतणे हा आहे पाश नाहीसे केले कि मळ नाहीसा होतो मळ नाहीसा केला कि मनुष्य निर्मळ बनतो आणि निर्मळता प्राप्त झाली कि ब्रह्मांड जे मूळ आहे त्यात विसर्जन होऊन मोक्ष मिळतो ही शैवांची मांडणी आहे मोक्ष मिळवण्यासाठी उपाय करावे लागतात
१ तंत्र
२ भक्ती
३ ज्ञान
४ क्रिया
५ योग
असे पाच उपाय हे मुख्य उपाय आहेत आणि ह्यांच्यापैकी एक उपाय योग होय जो शंकराने म्हणजेच आदिनाथाने भैरवनाथ , वृषभनाथ वैगरेंना सांगितला व ज्याचा प्रचार नाथ संप्रदायी व जैन संप्रदायी लोक करत असतात ज्याला आज आपण पातंजलीनाथांचा योग म्हणतो त्यालाच योग हा शब्द वापरला जातो मूळ आदीशैव धम्मात योग हा चार योगांनी बनलेला आहे
१ हटयोग म्हणजे स्वतःसाठी योग्य ते आसन शोधणे व यमनियमांचे कठोर पालन करणे
२ मंत्रयोग म्हणजे प्राणायामात ओम ह्या शब्दाचा जप करून प्राणायाम साधणे प्रत्याहार साधणे धारणा साधणे
३ लययोग म्हणजे ध्यान करून सविकल्प समाधी साधून "स्व"चा लय करणे आणि
४ राजयोग म्हणजे निर्विकल्प समाधीने मोक्षाला उपलब्ध होणे
पुढे ह्या शब्दांना आर्यांच्यामुळे भलतेच अर्थ प्राप्त झाले तरी मूळ अर्थ बऱ्याच प्रमाणात शाबूत राहिले
स्वामी विवेकानंदांनी राजयोग शब्द ह्या सर्वांना मिळून वापरला कारण त्यांचा फोकस शेवटच्या टप्प्यावर होता आणि आता हिंदूं आर्यांच्यात विवेकानंदांचाच अर्थ प्रस्थापित झाला आहे
( राजयोग हा शब्दही शैव आहे आणि त्या संदर्भातील लिखित पुरावे योगशास्त्र सारख्या शैवांच्या मध्ययुगीन तंत्रसंहितात सापडतात )
दुर्देवाने वैष्णव परंपरेने पुढे योग हा शब्द ज्ञान , कर्म आणि भक्ती ह्यांच्याशीही जोडून ह्या शब्दाची रयाच घालवली आणि ह्यात गीतेचा सिंहाचा वाटा आहे
टिळक वैष्णव परंपरेतच लिहीत असल्याने आणि राजयोग हा पतंजलींनाथांच्यापासून सुरु होतो असा त्यांचा गैरसमज असल्याने तेही योग हा शब्द ह्या परंपरेच्या चौकटीत पाहतात टिळकांच्या मते योग्य म्हणजे कौशल्ययुक्त आणि योग म्हणजे विशेष प्रकारची कुशलता वा युक्ती वा चतुराई वा शैली आणि गीतेत योग हा शब्द ह्याच अर्थाने वापरला गेला आहे साहजिकच टिळक योग म्हणजे उपाय हा शैव अर्थ नाकारतात मात्र चोरी डकैती अशा कौशल्याला टिळक योग हा शब्द वापरत नाहीत ह्याचा अर्थ योग म्हणजे इष्ट कार्याचे कौशल्य असा होतो म्हणजेच कर्मयोग म्हणजे कुशलतेने केले जाणारे इष्ट कर्म होय
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६३ कर्मयोग आणि समता श्रीधर तिळवे नाईक
कर्मयोग म्हणजे विशेष कुशलतेने केले जाणारे इष्ट कर्म होय ही गीतेची व टिळकांची व्याख्या आपण पाहिली तू युद्ध का केले पाहिजे हे प्रथम सांख्य पद्धतीने सांगितले आता योग पद्धतीने सांगतो (२ . ३९)असे जेव्हा कृष्ण म्हणतो तेव्हा तो सांख्य व योग ह्या दोन भिन्न गोष्टी मानत असतो
ज्ञानी लोकांनी मोक्ष मिळाल्यानंतर कसे वागावे ह्याचे भारतीय म्हणजे शैव व आर्य ह्या दोन्ही परंपरेत दोन मार्ग सांगितले आहेत
१ ज्ञानप्राप्ती झाल्यावर कर्मांचा त्याग करून अरण्यात वा एकांतात जाणे
२ ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर फलाशा न ठेवता कर्म करत राहणे
आर्य परंपरेत पहिल्याला संन्यास म्हणतात दुसऱ्याला योग ह्याचा अर्थ टिळक असा करतात कि योग म्हणजे कर्मयोगच ! सन्यास म्हणजे सोड योग म्हणजे जोड ! योग म्हणजे सिद्धी आणि असिद्धी ह्यांच्याबद्दलची समत्वबुद्धी ! बुद्धी सम असेल तर कर्त्याला कर्माच्या पापपुण्याची फळप्राप्ति लागत नाही म्हणजेच एका अर्थाने ही समत्वबुद्धी राखणे हेच कौशल्य होय माझ्या मते समता ही एका अर्थाने कर्मयोगाचा प्राण आहे आणि ही समता सिद्ध करणे हेच खरे कौशल्य होय एकदा हे स्वीकारले कि प्रश्न असा निर्माण होतो कि असे असेल तर ब्राम्हण कर्म उच्च कसे व संडास साफ करणे हे नीच कर्म कसे ? जर समता ही समत्वबुद्धीची चावी असेल तर ती सामाजिक का नको ? टिळकांना समत्वबुद्धी पटते पण ती सामाजिक करायची वेळ आली कि टिळक पळ काढतात माझ्या मते शैव समता मानतात कारण त्यांचा क्रियायोग ही समत्वबुद्धी सामाजिक , राजकीय ,आर्थिक व सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात लागू करतो आणि त्यामुळेच त्यासाठी वैष्णवांशी भांडतो सर्वच क्रियांना समत्वबुद्धीने पाहायचे असेल तर समत्वबुद्धी ही फक्त अध्यात्मिक असून चालणार नाही ती जीवनाच्या सर्वच क्षेत्राला लागू होते टिळकांना हे कळत नाही आणि ही त्यांच्या आकलनाची गंभीर मर्यादा आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६४ कर्मयोग म्हणजे काय ? आणि गीता सांख्य आहे का ?श्रीधर तिळवे नाईक
ज्ञानेश्वरांनी लावलेला निवृत्तिपर अर्थ नाकारून आपण गीतेचा खरा प्रवृत्तिपर अर्थ सांगत आहोत असा टिळकांना आत्मविश्वास आहे त्यामुळेच तिसऱ्या प्रकरणात ते इतक्या विस्ताराने कर्म आणि योग ह्यांचा इतका तपशीलवार विचार करतायत भगवदगीता ह्या शब्दाचा मूळ अर्थच मुळी भागवत संप्रदायाची गीता असा होतो शिवगीता गणेशगीता ह्याही गीता उपलब्ध असल्याने भगवद हा शब्द लावणे गरजेचे बनले
गीतारहस्यातल्या कर्मयोग म्हणजे काय ह्याची चर्चा करणाऱ्या तिसऱ्या प्रकरणाची चर्चा आपण करत आहोत टिळक तीन निष्कर्षात्मक श्लोक घेऊन ह्या तिसऱ्या प्रकरणाची सांगता करतात उदा टिळक पहिला श्लोक म्हणून सहाव्या अध्यायातील ४६ वा श्लोक घेतात (टिळक गीतारहस्यात पूर्ण श्लोक देत नाहीत कारण ते ज्ञानी वाचकांना गृहीत धरतात व ग्रंथाच्या सर्वात शेवटी गीता देतात मी ते इथे देतोय कारण त्याशिवाय विवेचन कळणे शक्य नाही )
तपस्विभ्योऽधिकोयोगी
ज्ञानिभ्योऽपिमतोऽधिक:|
कर्मिभ्यश्चाधिकोयोगी
तस्माद्योगीभवार्जुन|| ४६||सहावा अध्याय ।।
तपस्वी ज्ञानी कर्मी ह्यांच्यापेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ असा ह्या श्लोकाचा अर्थ टिळक करतात इतर लोक योगी हा तपस्वी ज्ञानी कर्मी ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा अर्थ करतात टिळकांच्या मते अर्जुन योगी झाला तर लढणार कसा तेव्हा ह्याचा अर्थ योगी असा होऊच शकत नाही
हा अर्थविरोध होण्याचे खरे कारण गीता ही नंतर घुसवली गेली आहे ही वस्तुस्थिती आहे कि गीता ही अर्जुनाने विषाद सोडून युद्ध करावे म्हणून सांगितली गेली आहे पण मूळ उपदेश दोनच अध्यायांएव्हढा आहे नंतरचे अनेक अध्याय व श्लोक आद्य शंकराचार्यांनी लिहिलेत आणि इथे शंकराचार्य योग्याची महती सांगून त्याला सर्वश्रेष्ठ म्हणतायत टिळकांची ह्यामुळे पंचाईत झालीये कारण ह्या श्लोकात कर्मीचा स्पष्ट स्वतंत्र उल्लेख आहे ह्याचा अर्थ अंतिम निष्कर्ष कर्मी व ज्ञानी वा तपस्वी ह्यांच्याविषयी असूच शकत नाही तो फक्त योग्याविषयीच असू शकतो आणि शंकराचार्यांना योगीच म्हणावयाचे आहे शंकराचार्यांचा हा अंतिम निष्कर्ष टिळकांना परवडणारा नाही त्यामुळे ते योगी हा शब्दच गीतेत कर्मयोगी म्हणून वापरला आहे असा निष्कर्ष काढतात पण वरील श्लोक त्यांच्या ह्या गृहीतकाला उघडपणे छेद देणारा आहे कारण कर्मी आणि योगी ह्यांचे स्वतंत्र म्हणून असलेले उल्लेख !
केवळ सर्वसामान्य लोकांना मोक्षज्ञान व्हावे म्हणून शंकराचार्यांनी गीतालेखनाचे हे काम केले खरे आणि त्यामुळे हे ज्ञान सर्वत्र पोहचले आणि भारतातील वैष्णव भक्ती चळवळ उभी राहिली हेही खरे पण त्यातूनच काही गोंधळ निर्माण झाले आहेत कारण तंत्र सोडले तर बाकी जे शैवांचे मुख्य उपाय आहेत त्या सर्वांची एकत्रित चर्चा शंकराचार्यांनी गीतेत केली आहे ह्या गीतेची प्लेसमेंट महाभारतात खुद्द शंकराचार्यांनी केली कि त्यांच्या नंतरच्या अनुयायांनी केली हे सांगणे अवघड आहे शंकराचार्य स्वतः योगी होते त्यामुळे त्यांनी अर्जुनाला योगी हो असं सांगायला लावणे सहज स्वाभाविक आहे प्रॉब्लेम एकच आहे हा निष्कर्ष कुरुक्षेत्रावर जी सिच्युएशन आहे तिच्याशी जुळत नाही अर्जुन योगी झाला तर तो युद्ध करणे शक्यच नाही त्यामुळे त्याला योगी बनवण्यात काही हशील नाही शंकराचार्यांना मुळात अर्जुनाशी काही देणेघेणे नाही त्यांना ह्या सिच्युएशनच्या निमित्ताने उपाय सांगायचे आहेत आणि ते त्यांनी सांगितले आहेत तत्कालीन ब्राम्हणधर्माने उपनिषदांना वेद म्हणून ब्राम्हणधर्माचा भाग बनवल्याने सातव्या शतकानंतर उपनिषदे सर्वसामान्य जनतेला म्हणजे शूद्र अतिशुद्रांना बंद झाली ती पुन्हा महाभारताद्वारे उपलब्ध खुली करून देण्याचा हा शंकराचार्यांचा प्रयत्न आहे त्याकाळी महाभारत हे शुद्रांनाही वाचण्याची अनुमती होती महाभारताद्वारे शूद्रांच्यापर्यँत उपनिषदांचे सार पोचवण्याचा हा प्रयत्न आहे वास्तविक हा असा आडमार्ग चोखाळण्यापेक्षा शंकराचार्यांनी ब्राम्हणधर्माविरुद्ध शंकराचार्यांनी बंड करायला हवे होते पण तेव्हढी हिंमत शंकराचार्यांच्याकडे न्हवती पुढे गीता ही अशा हिंमत नसलेल्या लोकांची आधारशीला झाली पण त्यामुळेच क्रांतीच्या शक्यता लोप पावत राहिल्या तडजोड करणारे लोक व ग्रंथ भारतात खूप लोकप्रिय होतात पण ते अनेकदा शॉक ऍबसॉर्बरचे काम करून संपूर्ण संस्कृती सपाट व नपुंसक बनवतात गीतेबाबत हे झालेले आहे ह्या श्लोकाचा अर्थ लावताना टिळकांची जी पंचाईत झालीये त्याचे कारण शंकराचार्यांनी लिहिलेला हा श्लोक महाभारतातल्या सिच्युएशनशी मिसफिट असणे हे आहे
टिळकांनी घेतलेला दुसरा श्लोक चौथ्या अध्यायातील आहे ह्या श्लोकांबाबत मात्र टिळकांची गोची झालेली नाही हा पुढीलप्रमाणे
तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मन: |
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत || ४२|| चौथा अध्याय ।।
ज्ञानाच्या तलवारीने हृदयात अज्ञानामुळे उगवलेले संशय काप आणि हे भरताच्या वंशजा योगाने उभा रहा असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे ह्या श्लोकाचा अर्थ करताना टिळक योग म्हणजे कर्मयोग असा करतात जो बरोबर आहे कारण अर्जुनाला युद्धाला ऊभं करणं हाच श्रीकृष्णाचा उद्देश आहे ह्या श्लोकात संशयाचे मूळ अज्ञानात आहे असेही सांगितले आहे
टिळक तिसरा श्लोक म्हणून तिसऱ्या अध्यायातील तिसरा श्लोक घेतात
श्रीभगवानुवाच |
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ |
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम् || ३|| अध्याय तिसरा ।।
ह्या श्लोकाचे एक वैशिष्ट्य आहे इथे श्रद्धा ह्या शब्दाला पर्याय म्हणून निष्ठा हा शब्द वापरला आहे तर मार्गासाठी विधा ! सांख्यांचा ज्ञानयोग व योग्यांचा कर्मयोग अशा दोन विधा मी तुला निष्ठा म्हणून सांगितल्या आहेत असा ह्याचा अर्थ होतो
गीता ही अनेकदा सांख्य धर्म सांगते किंबहुना गीता हा सांख्य धर्माचा प्रचार आहे सांख्य धर्माच्या दोन विधा आहेत
१ ज्ञान विधा ही सांख्य दर्शनात येते
२ योग विधा ही पतंजली दर्शनात येते
खुद्द श्रीकृष्ण स्वतःला मी सिद्धांच्यात कपिल आहे असे सांगतोच ह्या श्लोकात त्याची स्पष्ट प्रचिती येते सांख्यांना भक्ती मान्य नाही आणि त्यांचा कर्मयोग हा राजयोगच आहे खुद्द महाभारतात शांतिपर्वात २४० व ३४८ हे दोन श्लोक ह्या दोन योगांचेच वर्णन करतात सांख्यांच्या मते राजकारणी लोकांसाठी राजयोग हाच कर्मयोग आहे आणि राजाने व राजकारण्यांनी सकाळी रोज राजयोगसाधना करणे आवश्यक आहे आणि आपल्या सर्व कर्मांना योगकर्मे म्हणून पाहणे आवश्यक आहे
टिळक हे लक्ष्यात न घेता राजयोग व कर्मयोग वेगळे काढतात व ज्ञानयोग निवृत्तिपर व कर्मयोग प्रवृत्तिपर ही पारंपरिक विभागणी स्वीकारतात व योगविधा ही पतंजलीय नसून कर्मयोगिक आहे असा निष्कर्ष काढतात ब्रम्हविधा प्राप्त झाल्यावर ज्ञानी माणसापुढे दोन विधा असतात १ एक प्रवृत्तीपर २ दुसरी निवृत्तिपर कर्मयोग ही प्रवृत्तिपर आहे असे ते म्हणतात आणि गीता ही असा कर्मयोग सांगणारी पहिली संहिता आहे असे ते मानतात प्रत्यक्षात गीतेमुळे जेवढी निवृत्ती पसरली तेवढी कुठल्याच ग्रंथाने पसरली नसेल कारण गीतेचे भारतभर पसरलेले मुख्य विधान हे भक्तीचे होते त्यामुळे जो तो टाळ कुटायला लागला
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६४ यादव आणि सर्व काही आमच्याकडे होते म्हणण्याची खोड श्रीधर तिळवे नाईक
महाभारताच्या शेवटी व्यास म्हणतात, "मी बाहु उभारून सांगत आहे कि धर्मानेच अर्थ प्राप्त होतो आणि धर्मानेच काम पण कोणीही माझे ऐकत नाही"
व्यासांची ह्या उदगारातील अगतिकता काळजाचा ठोका चुकवणारी आहे आणि त्यांचा विषाद अस्वस्थ करणारा आहे युद्धाच्या शेवटी कशावरच विश्वास उरत नाही व्यासांची ही अवस्था पाहायला श्रीकृष्ण जिवंत नाहीये व्याधाचा बाण लागून तो मरण पावला आहे त्यामुळे श्रीकृष्णाला आपण काय केले हे कळणे अशक्य आहे खुद्द त्याच्या यादव कुळाचा नाश झालेला आहे युद्ध करण्याचा श्रीकृष्णाचा निर्णय चुकीचा आहे हे बलरामाने आपल्या छोट्या भावाला समजावलेले होते पण श्रीकृष्णाने त्याचे म्हणणे ऐकलेले नाही द्रष्टा बलराम ठरलाय श्रीकृष्ण न्हवे आज जे यादव जिवंत आहेत ते गोप ह्याचे वंशज आहेत जो कुरुंच्या बाजूने श्रीकृष्णच्या विरोधात लढला होता आजचे यादव हे श्रीकृष्णाचे न्हवे तर श्रीकृष्णाच्या विरोधात कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या गोपचे वंशज आहेत त्यामुळेच कित्येक शतके वासुदेव म्हणून बलरामाची पूजा केली जात होती श्रीकृष्णाची न्हवे बॅक्ट्रियाच्या अगॅथॉक्लीसच्या नाण्यावर (इसवीसनपूर्व १८० ते १९०) वासुदेवाची जी प्रतिमा आहे व जी आतापर्यंतची सर्वाधिक प्राचीन वासुदेवाची प्रतिमा आहे ती बलरामाची आहे श्रीकृष्णाची न्हवे श्रीकृष्णाचा निर्णय हा वृष्णीच्यात कुळाचा सर्वनाश घडवणारा निर्णय म्हणूनच पाहिला जात होता आणि बलरामाची पूजा शिवाचा अवतार म्हणून केली जात होती कारण बलराम शेती करणारा असल्याने शिवाचा भक्त होता विष्णूचा न्हवे पुढे ब्राम्हणांनी हा वासुदेव संप्रदाय ताब्यात घेण्यासाठी महाभारत आपल्या ताब्यात घेतले आणि बलरामाला हटवून श्रीकृष्णाची पुन्हा वासुदेव म्हणून स्थापना केली वास्तविक बलराम श्रीकृष्णाचे वडील वासुदेव होते त्यानंतर थोरला भाऊ म्हणून बलरामच वासुदेव म्हणून ओळखला जात होता बलरामाची इच्छा नसतानाही श्रीकृष्ण सर्व यादव सेनेला घेऊन युद्धात उतरला होता हे लक्षात घेण्याजोगे आहे वृष्णी कुळ हे तोवर यज्ञापासून दूर होते श्रीकृष्ण हा पहिला यज्ञवादी आर्यन त्यामुळे त्याच्यासाठी यादवांची बलरामी शेतकरी प्रतिमा पुसून त्यांना क्षत्रियत्व देण्यात आले यादवांचे हे वर्णिकरण नंतर भारतीयांना महागात पडले कारण तेव्हापासून यादव उच्च वर्णात झुलतायत ते आजही झुलतायत
हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे कि व्यास "धर्मानेच अर्थ प्राप्त होतो आणि धर्मानेच काम प्राप्त होतो" असे म्हणतात पण कुठेही धर्माने मोक्ष प्राप्त होतो असे म्हणत नाहीत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे व्यासांना मोक्ष माहित नाही न्हवता त्यांनी वैदिक व ब्राम्हण धर्मानुसार महाभारत धर्म सांगण्यासाठी लिहिले मोक्ष ही नंतरची घुसखोरी आहे जी आर्य शैवांच्या संपर्कात आल्यानंतर शिकले हे मी ह्यासाठी सांगत आहे कि मोक्षाच्या अंगाने महाभारताचा विचार करणे हा व्यासांच्यावर अन्याय आहे मात्र मोक्ष आर्यांच्या संस्कृतीत शिरल्यावर आर्यांनी मोक्षानुरूप महाभारत व रामायण ह्यांच्यात काही बदल केले एकदा का हे लक्ष्यात आले कि मग श्रीकृष्ण एव्हढ्या मोठ्या हिंसेला का तयार झाला ते स्पष्टपणे कळते वैदिक, झोरॅष्ट्रियन व ब्राम्हण धर्माप्रमाणे ज्यू , ख्रिश्चन व इस्लाम हेही मोक्षावर विश्वास नसलेले धर्म आहेत आणि ह्या सहाही धर्मांनी फार मोठ्या प्रमाणात हिंसा घडवून आणलेली आहे हिंसा करतांना ह्यांचे हातपाय कापत नाहीत कारण मानवी जीवन परलोकातच खऱ्या अर्थाने जगते हा ह्या सहाही धर्मांचा विश्वास आहे
टिळक शास्त्राच्या तीन पातळ्यांच्याकडे वळतात टिळकांच्या मते शास्त्राचे तीन स्तर आहेत
१ अधिभौतिक : ह्यात वस्तूंचे इहवादी भौतिक ज्ञान येते म्हणजे सूर्य हा तारा आहे त्याची संरचना वैग्रे
२ अधिदैविक: ह्यात वस्तूंना दैवी मानले जाते म्हणजे सूर्य हा देव वैग्रे
३ अध्यात्मिक : ह्यात वस्तूंच्या मागे एक चैतन्यतत्व आहे असे मानून त्या चैतन्य तत्वाचे ज्ञान हे अंतिम मानले जाते
टिळकांच्या मते ऑगस्ट कोंतने हीच वर्गीकरण पद्धत सांगितली आहे व अधिभौतिक शेवटची स्टेज ठरवून त्याला पॉझिटिव्हिझम असे म्हंटले आहे व सर्वश्रेष्ठ ठरवले आहे टिळक इथे जे करत आहेत तेच पुढे सर्व हिंदुत्ववादी करायला लागले जे त्यांनी आता शोधले आहे ते आम्ही प्राचीन काळी शोधले होते वास्तविक ज्याला कोम्ट प्रॅगमॅटिक नॉलेज म्हणतो ते भारतात असते तर भारत ब्रिटिशांच्याकडून हरलाच नसता टिळकांची ही खोड पुढे सर्व हिंदुत्ववाद्यांची खोड बनलेली दिसते
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६५स्वर्ग,नरक आणि अर्जुन श्रीधर तिळवे नाईक
टिळक पाश्चात्य तत्वज्ञानाची विभागणी १ अधिभौतिक ह्यात ते कोम्ट मिल स्पेन्सर ह्यांचा व त्यांच्या फलप्रामाण्यवादाचा समावेश करतात २ अध्यात्मिक ह्यात ते शॉपेनहौर , हेगेल व कान्ट ह्यांचा समावेश करतात अशी करतात
टिळक हे एकमेव असे हिंदुत्ववादी होऊन गेले ज्यांचा पाश्चात्य तत्वज्ञानाशी सखोल परिचय होता आणि जे बऱ्यापैकी १८५० ते १८८० च्या दरम्यान अमेरिका युरोपात ऍक्टिव्हेट असणाऱ्या विचारांशी परिचित होते टिळकांचा स्वतःचा कल अध्यात्मिक होता आणि सामाजिक बाबतीत ते प्रॅक्टिकल होते एका अर्थाने ते प्रॅक्टिकल स्पिरिच्युऍलिझमचे पुरस्कर्ते होते जो राजाराम मोहन रॉयपासून सुरु झाला होता
त्यांच्यापुढे १ चांगले काय व वाईट काय
२ कार्य काय आणि अकार्य काय
आणि ३ धर्म्य काय अधर्म्य काय
असे तीन प्रश्न होते गीतारहस्य म्हणजे ह्या तीन प्रश्नांचा पाठलाग आहे
अधिभौतिक पंडितांवर जर अर्जुनाच्या युद्ध करणे श्रेयस्कर आहे कि नाही ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रसंग आला असता तर त्याने युद्धामुळे होणारे भौतिक फायदे व तोटे ह्यांचे कॅल्क्युलेशन करून त्या कॅल्क्युलेशनचा सारासारविवेकाने विचार करून युद्ध योग्य व न्याय्य कि अयोग्य व अन्याय्य हे ठरवले असते असे टिळक म्हणतात टिळकांच्या मते असल्या अधिभौतिक उत्तराने अर्जुनाचे समाधान झालेच नसते टिळकांच्या मते अर्जुनाचा प्रश्न पारलौकिक जगात हे युद्ध श्रेयस्कर ठरेल कि नाही हा आहे ? टिळकांच्या ह्या मतात सत्यता आहे अर्जुनाला इहलोकाची काही पडलेलीच नाही किंवा त्याला मोक्षाविषयी मुळात काही माहितीच नाही त्याचा प्रश्न मी माझ्या आप्तांना व गुरूंना मारले तर स्वर्गात जाणार कि नरकात हा आहे नंतरच्या महाभारतात मोक्ष वैग्रे आले
एक गोष्ट लक्ष्यात घेण्याजोगी आहे कि महाभारतात श्रीकृष्णाचा वध झाल्यावर श्रीकृष्णही स्वर्गात पोहचलेला आहे ह्याचा अर्थच तो परमेश्वर नाही असा होतो नंतरच्या लोकांनी त्याला परमेश्वर बनवले आहे त्यामुळे अर्जुनाचा प्रश्न हा आधिदैविक पारलौकिक होता आणि श्रीकृष्णाने तू ह्या आप्तजनांना व गुरुजनांना मारलेस तर वर्णाश्रमधर्माप्रमाणे तू क्षत्रिय म्हणून स्वधर्म पार पाडल्याने स्वर्गात पोह्चशील असे मूळ उत्तर दिले आहे श्रीकृष्णाने स्वर्गाची गॅरेंटी फक्त अर्जुनाबाबत दिलेली नाही तर अर्जुन ज्यांना यमसदनी धाडेल त्या सर्वांना ते क्षत्रिय असल्याने आणि क्षत्रिय म्हणून रणांगणात मृत्यू आल्यास क्षत्रियांना स्वर्ग मिळतो अशी तत्कालीन ब्राम्हणधर्मीय धार्मिक समजूत असल्याने ह्या आप्तांना व गुरुजनांनाही स्वर्ग मिळेल अशीही गॅरेंटी दिलेली आहे त्यामुळेच युद्धात ह्या सर्वांना मारतांना अर्जुनाची अशी समजूत आहे कि तो सर्वांना स्वर्गातच धाडत आहे
ह्या मांडणीमागचे राजकीय सूत्र उघड आहे सैनिकांना नेहमीच आपण ज्या माणसांना मारतो त्या माणसांच्याबद्दल एक गिल्ट वाटत असतो एकदा का आपण ज्याला मारतो तोही स्वर्गात जातो असं स्वीकारलं कि हा गिल्ट निघून जातो किंबहुना तत्कालीन धर्मसत्तांची व राजसत्तांची सामान्य लोकांनी व सैनिकांनी आपल्यासाठी मरावे व मारावे म्हणून शोधलेली ही युक्ती होती ती त्यावेळी नेहमीच फळत असे कृष्णही ह्याच युक्तीचा अवलंब करत आहे आणि अलीकडचे टेररिस्ट नेते अतिरेक्यांना मरण्यासाठी पाठवतांना ह्याच युक्तीचा अवलंब करत असतात मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल ही लालसा आपणाला कितीही चमत्कारिक वाटली तरी काहींच्यासाठी ती सत्याहून अधिक सत्य असते अर्जुन हाही ह्याच पद्धतीने विचार करतो आहे आणि आश्चर्यकारक म्हणजे श्रीकृष्णही !
टिळक म्हणतात कि अर्जुनापुढे प्रश्न आपणाला राज्यप्राप्ती होईल कि नाही आपले राज्य दुर्योधनापेक्षा श्रेयस्कर होईल कि नाही असा नाहीये त्याच्यापुढचा प्रश्न मी करतो ते धर्म्य कि अधर्म्य पुण्य कि पाप असा आहे आणि गीता ह्या प्रश्नाचे उत्तर देत आहे
टिळकांच्या मते सर्वसाधारण जीवनात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुझा धर्म कोणता असा प्रश्न विचारतो तेव्हा आपणाला पारलौकिक कल्याणार्थ तू कोणत्या मार्गाने जातोस असे विचारायचे असते वैदिक धर्म आणि ब्राम्हण धर्म हेही यज्ञ मार्गाने स्वर्ग हा परलोक प्राप्त होण्यावर विश्वास ठेवतात पारशी ख्रिश्चन इस्लाम हेही असेच पारलौकिक कल्याणार्थ निर्माण झालेले धर्मच आहेत धर्म अर्थ काम मोक्ष ह्यापैकी धर्म हा ह्याच अर्थाने वापरला जातो ह्याशिवाय ज्ञातिधर्म , कुलधर्म , पतिधर्म अश्या अर्थानेही तो वापरला जातो माझ्या मते मित्रधर्म कुलधर्म वैगरेही धर्म ह्या पारलौकिक कल्याणार्थ चालणाऱ्या धर्माचेच भाग आहेत आणि मित्रधर्म पाळल्यास त्याचे उत्तम फळ स्वर्गात मिळते हेच ह्यात अपेक्षित आहे नीती हा शब्द राजकीय नितीलाच उद्देशून आहे असे टिळक म्हणतात मी त्यांच्याशी सहमत आहे शैवांनी धर्म नाकारला असला तरी दंडनीती स्वीकारली आहे आणि दंडनीती जे ठरवेल त्याप्रमाणे कर्तव्य पार पाडायला हवीत अशी भूमिका घेतली आहे भारतीय संविधान ही आजची दंडनीती आहे त्यामुळे शैवांच्या मते संविधान पाळणे हेच प्रत्येक शैवांचे कर्तव्य आहे दंडनीतीत काळानुरूप बदल करणे शैव आवश्यक मानतात किंबहुना प्रत्येक तपानंतर म्हणजे दर बारा वर्षांनी राज्यकर्त्यांनी दंडनीतीचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे एका तपानंतर जग बदलते हा शैवांचा प्राचीन विश्वास आहे आजही तो लागू आहे
शैवांचा कुंभमेळा हा दर एका तपाने भरवला जाण्याची जी काही कारणे आहेत त्यातील एक दंडनीतीचा पुनर्विचार करणे हे एक महत्वाचे कारण आहे सर्व साधक ,साधू आणि सिद्धांनी साधकबाधक विचार करून राज्यकर्त्यांना दंडनीतीविषयी मार्गदर्शन करणे त्यात अपेक्षित आहे राजेशाही असेल तर राजाने वा लोकशाही गणशाही असेल तर गणपतीने हे मार्गदर्शन ऐकून पुढे त्याच्या दरबारातील व पंचायतीतील तज्ञ लोकांशी चर्चा करून जर त्याला आवश्यक वाटले तर दंडनीतीत बदल करावा असे हे धोरण आहे व होते दुर्देवाने इसवी सन १००० नंतर वैदिक व मुस्लिम पद्धतींचा सुळसुळाट झाला आणि शैव व्यवस्था फाफलली
धर्म कर्तव्य सांगतो आणि नीतीही कर्तव्य सांगते मोक्ष हा धर्म व नीतीपेक्षा वेगळा आहे असे टिळक मानतात ज्याच्याशी मी सहमत आहे पण टिळक मोक्षाचा संबंध जेव्हा पारलौकिकतेशी जोडतात तेव्हा त्यांना मोक्ष म्हणजे काय ते कळलेले नाही हे स्पष्ट होते टिळक धार्मिक अर्थ मोक्षात भरतात आणि घोळ घालतात टिळक स्वधर्माची चर्चा करतांना गीतेतल्या दोन श्लोकांची चर्चा करतात पहिला श्लोक दुसरा अध्यायातील आहे तो पुढीलप्रमाणे
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि |
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते || ३१|| दुसरा अध्याय ।।तर दुसरा श्लोक
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।३५।।तिसरा अध्याय ।।
ह्याचा अर्थ विगुण म्हणजे दोष असलेला वा गुण नसलेला स्वधर्म अधिक श्रेयस्कर अचूक व गुण असलेल्या परधर्मापेक्षा ! स्वधर्मात निधन पावणे म्हणजे मरणे अधिक श्रेयस्कर परधर्म कितीही चांगला असला तरी तो भयावहच
अलीकडे ओशोंपासून अनेकांनी ह्याला मॉडर्न फोडणी दिली असली तरी प्रत्यक्षात श्रीकृष्णाला स्वधर्म म्हणजे वर्णाश्रमधर्मच अपेक्षित आहे आणि म्हणूनच टिळकांनाही ! त्यामुळेच टिळक स्वधर्मातील धर्म ह्या शब्दाची व्याख्या "इहलौकिक चातुर्वर्ण्याचे धर्म" अशी आहे असे सांगतात
स्वधर्म चुकीचा असला तरी त्यात मरणे श्रेयस्कर हे गृहीतक स्वीकारून किती मेले ह्याची गणती नाही स्वधर्म चुकीचा असेल तर तो सुधारायला हवा असे श्रीकृष्ण म्हणत नाही आणि म्हणून टिळकही म्हणत नाहीत हिंदूंचे सर्वाधिक नुकसान ज्या काही श्लोकांनी केले त्यातला हा एक
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६६ धर्म : तीन व्याख्या श्रीधर तिळवे नाईक
धर्म म्हणजे शिष्टांनी घालून दिलेले व्यावहारिक कर्तव्ये किंवा नियम हे निश्चित केल्यावर व ही व्यावहारिक कर्तव्ये वर्णाश्रमधर्मानुसार निश्चित झालेली असतात व व ती पाळणे हा स्वधर्म हे गीतेचे व टिळकांचे म्हणणे पाहिल्यावर आपण थोडे पुढे जाऊ ह्यानंतर टिळक जैमिनी दर्शनानुसार जी धर्माची व्याख्या होते तिचा विचार करतात मीमांसा दर्शनानुसार "चोदना लक्षणो s र्थो धर्म :" (जैमिनी सूत्र १ :१:२) चोदना ह्या शब्दाला आता वलगर मानले जात असले तरी त्याचा मूळ अर्थ प्रेरणा असा टिळक देतात ही वैदिक धर्माने दिलेली व्याख्या असल्याने एका अर्थाने ती धर्माची पहिली व्याख्या आहे माझ्या मते चोदना ह्या शब्दाला जवळ जाणारा शब्द फ्रॉईडचा आहे तो म्हणजे लिबिडो चोदनात आहार , निद्रा , भय आणि मैथुन ही चार लक्षणे येतात आणि ही सर्व लक्षणे म्हणजे धर्म होय महाभारत म्हणते आहार , निद्रा , भय आणि मैथुन ह्या गोष्टी माणूस व पशु ह्या दोघांच्यात कॉमन आहेत फक्त एक धर्म असा आहे कि जो मनुष्यात आढळतो ज्यांना धर्म नाही त्यांना पशूच समजायचे (शांतिपर्व अध्याय २९४ :२९) माझ्या मते ह्या तर्काने पुढे गेले तर ह्यात उत्सर्जन ह्याही गोष्टीचा समावेश करायला हवा म्हणजे आहार , निद्रा ,भय , मैथुन आणि उत्सर्जन ह्या नैसर्गिक प्रेरणांनाही धर्म म्हणावे प्रश्न असा आहे कि ह्या गोष्टी कुठेही आणि कशाही करतात येतात का तर नाही ह्याबाबत आपण शिष्टाचार पाळतो ह्या शिष्टाचारांनाही धर्म म्हणावे मनूने धर्म ह्या शब्दाचा एक अर्थ शिष्टांनी घालून दिलेल्या आज्ञा असाही दिलेला आहे टिळक तोही प्रमाण मानतात स्वैर मनोवृत्तीला आळा घालणे टिळकांना आवश्यक वाटते
थोडक्यात वैदिक ब्राम्हणधर्म कसा निर्माण झाला आणि ह्या ब्राम्हणधर्मानुसार धर्म म्हणजे काय तर
१ चोदना अपरिहार्य म्हणून प्रवृत्तिरेषा अपरिहार्य चोदना म्हणजे प्रेरणा व प्रेरणेबाबत दिलेल्या आज्ञा होय आहार , निद्रा , भय आणि मैथुन अपरिहार्य ह्यांना प्रवृत्तिरेषा आखून देणे गरजेचे वाटले म्हणून धर्म जन्मला म्हणजे मैथुन कसेही चालत असे कुणाबरोबरही चालत असे त्याला प्रवृत्तिरेषा आखून देणे गरजेचे वाटले म्हणून श्वेतकेतूने लग्न ही संस्था जन्माला घातली किंवा एकेकाळी मद्य हे मैथुनाइतकेच नैसर्गिक मानले जात होते व त्यातून सतत भांडणे होऊ लागली म्हणून शुक्राचार्याने मद्यबंदी आणली हीच धर्माची सुरवात होय
२ ह्यातूनच पुढे आहार , निद्रा , भय , मद्य आणि मैथुन ह्याबाबत शिष्टांनी सांगितलेला आचार म्हणजेच शिष्टाचार पाळणे अपरिहार्य झाले ह्यामुळे धर्म स्थिर झाला आणि बंधन टाळताच येणार नाहीत ही गोष्ट स्वीकारली गेली
३ ह्या शिष्टांनी सांगितलेल्या शिष्टाचारांच्या आधारे जी मनू आदी लोकांनी आचारसंहिता निर्माण केली ती स्मृती व स्मृतींनी वर्णाश्रम व्यवस्थेनुसार घालून दिलेली व्यावहारिक कर्तव्ये आणि नियम म्हणजे आजचा धर्म होय
टिळक ह्या धर्माला सपोर्ट करतात आणि स्वीकारतातही पण त्यातून मूळ प्रश्न असा येतो कि खरोखरच शिष्टजनांचे आचार अनुकरणीय असतात काय टिळक आपल्याच मुलीच्या मागे लागलेल्या ब्रम्हदेवाचे , वाटेल तसे वध करणाऱ्या इंद्राचे , आईची हत्या करणाऱ्या परशुरामाचे उदाहरण देऊन विचारतात कि देवांचे सर्वच आचार अनुकरणीय आहेत काय तर नाहीत मग करावे काय ? टिळक ह्या प्रश्नाचे उत्तर गीतारहस्यातल्या पुढच्या प्रकरणात देतात
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६७ फलप्रामाण्यवाद ,स्वार्थ ,सुख व टिळक श्रीधर तिळवे नाईक
कर्म , योग आणि धर्म ह्या तिन्हींविषयी टिळकांची जी मते आहेत त्याविषयी आपण चिकित्सा केली पुढचा प्रश्न जर धर्मशास्त्रातच वेगवेगळ्या मतांचा गलबला असेल तर काय ? भारतात वैदिक राजवटी फारशा झाल्या नाहीत त्यामुळे आर्यांचे धर्मशास्त्र कधी फारसे पणाला लागले नाही भारतातल्या सगळ्या गाजलेल्या राजवटी ह्या कायमच शैव किंवा बौद्ध किंवा मुस्लिम किंवा ब्रिटिश व अपवादात्मक वेळी जैन होत्या इसवीसन १००० नंतर जसा जसा वैष्णव संतांचा तामझाम वाढत गेला ब्राम्हण धर्मशास्त्राचा प्रभावही वाढत गेला आणि चातुर्वर्ण्याच्या आणि जातीयवादाचाही ! बहुतांश मुस्लिम राजवटी हिंदू प्रजेसाठी शरियत किंवा स्मृतींचे कायदे लावून राज्यकारभार करत होते साधारण चौथ्या शतकात वैदिक राजवटींनी अस्पृश्यता आणली आणि मुस्लिम राजवटींनीही तिचा स्वीकार केला मात्र अस्पृश्य इस्लाम स्वीकारणार असेल तर त्याची अस्पृश्यतेतून मुक्तताही केली मात्र ह्याही सहस्त्रकात धार्मिक मतांचा गलबला संपला नाही मनुस्मृती ही उत्तरपेशवाई येईतोवर कुठेही मेजर टेक्स्ट मानली जात न्हवती अनेक ठिकाणी याज्ञवल्क स्मृती प्रमाण मानली जात होती एकच एक कायदा नसल्याने आर्य कायमच गलबल्यात वावरत राहिले शैवांच्यात राजा वा गणपती जी दंडनीती निर्माण करेल तीच धर्म अशी धारणा असल्याने शिवाजी व रणजितसिंग ह्या दोघांचीही दंडनीती त्या त्या काळानुरूप आहे टिळकांना ह्याची कल्पना असल्याने त्यांनी गीतारहस्याच्या अधिभौतिक सुखवाद ह्या चौथ्या प्रकरणात ह्याची चर्चा सुरु केली आहे
जो प्रश्न एकेकाळी हिंदू धर्माच्या संदर्भात होता तो आता जगभर आहे कारण धार्मिक मतांचा गलबला हे उत्तराधुनिकतेचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे शिव विष्णू कृष्ण गॉड अल्ला हे आजचे मुख्य देव आहेत आणि शैव , वैष्णव , भागवद , ख्रिश्चन , मुस्लिम आमचाच देव श्रेष्ठ म्हणून भांडत आहेत . हा पोस्टमॉडर्न गलबला आहे .
ह्यातून वाट काढायची कशी ?
मैथुन , आहार , निद्रा , भय आणि उत्सर्जन ह्या माणसाच्या मूलभूत चोदना आहेत आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी धर्म जन्मला आजही ह्या चोदना पूर्वी जशा होत्या तश्याच आहेत महाजन म्हणजेच शिष्टजन ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाणे इष्ट असं परंपरा सांगत असली तरी महाजनच वेगवेगळ्या मार्गाने गेले असले तर !किंवा अति सर्वत्र वर्ज्य हे परंपरेचे दुसरे तत्व स्वीकारले तरी काय केले कुठवर केले म्हणजे अति होते हा प्रश्न उरतोच
ह्या प्रश्नाचा उहापोह अधिभौतिक म्हणजे वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक मार्गाने करता येईल का ?
विज्ञानात पारलौकिक वा अध्यात्मिक गोष्टींना जागा नसते हे खरे असले तरी तिथेही कार्म्य म्हणजे करण्याजोगे काय आणि अकार्म्य काय हा प्रश्न निर्माण होतोच अणुबॉम्ब तयार करणे कार्म्य असेल कदाचित पण तो इनोसन्ट लोकांच्यावर टाकणे कसे कार्म्य मानावे ? कर्माच्या परिणामावरून कर्म बरे कि वाईट ठरवावे असे फलप्रामाण्यवादी मानतात पण इथे गोची अशी आहे कि फळ काय मिळणार हे पाहण्यासाठी मग कर्म आधी करावे लागते म्हणजे अणुबॉम्ब टाकल्यावरच त्याचे फळ काय ते लक्षात आले म्हणजे इथे विज्ञानाप्रमाणे प्रथम प्रयोग करून मग जो परिणाम येतो त्यावरून निष्कर्ष काढणे भाग आहे
सर्व माणसांचे सुख हे फलप्रामाण्यवाद्यांच्या मते नीतिशास्त्राचा मुख्य आधार आहे माझ्या मते
१ सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असलेले कर्म सर्वश्रेष्ठ
२ बहुजन हिताय बहुजन सुखाय असलेले कर्म श्रेष्ठ
३ सर्वजन वा बहुजन ह्यांच्या हिताला धक्का न लावता केले जाणारे अल्पजन हिताय अल्पजन सुखाय हेही कर्म इष्ट
४ ५० टक्के असलेल्या अर्धजनांच्या हिताला थोडा धक्का लावून केले जाणारे अर्धजन हिताय अर्धजन सुखाय कर्म अर्धइष्ट
५ सर्वजन वा बहुजन ह्यांच्या हिताला धक्का लावून केले जाणारे अल्पजन हिताय अल्पजन सुखाय हे कर्म अनिष्ट होय
अशी कसोटी आपण लावू शकतो व ह्या कसोटीनुसार होणाऱ्या सर्वश्रेष्ठ , श्रेष्ठ व इष्ट कर्मांना उत्तेजन देऊ शकतो प्रश्न असा आहे कि ही कसोटी लावण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे का माझ्या मते नाही ह्यासाठी दंडनीती पुरेशी आहे
टिळक फलप्रामाण्यवादी दृष्टिकोनाला अधिभौतिक सुखवाद म्हणतात परलोकाबद्दल व अध्यात्माबद्दल फलप्रामाण्यवादी उदासीन असतात मात्र ते स्वार्थसाधू व अप्पलपोटे असतात असे न्हवे त्यातील काहीजण जगाचे ऐहिक कल्याण साधू इच्छितात असे टिळक म्हणतात मी टिळकांशी सहमत आहे
फलप्रामाण्यवादाच्या पाऊलखुणा आपणाला चार्वाकांच्यात आढळतात पण टिळक चार्वाकांना स्वार्थसुखवादी ठरवतात स्वतःच्या देहाचे सुख हेच खरे सुख म्हणून ते साधणे गैर नाही उलट तोच साधणे हा स्वार्थ व स्वतःचा हा स्वार्थ येनकेनप्रकारे साधणे आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाणे हाच खरा कर्मयोग असे मानणारे लोक आहेतच टिळक त्यांना स्वार्थसुखवादी मानतात व तो अनिष्ट मानतात मी ह्याबाबत टिळकांशी सहमत आहे माझे म्हणणे इतकेच कि ब्राम्हणांनी एकदा स्वतःला आपण स्वार्थसुखवादी आहोत का असा प्रश्न जरूर विचारावा आपण सामूहिक झुंड करून धर्माच्या नावाने स्वतःचा स्वार्थसुखवाद साधत आहोत का असा प्रश्न विचारावा टिळक हा प्रश्न विचारत नाहीत
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६८ फलप्रामाण्यवाद ,स्वार्थ ,सुख व टिळक २ श्रीधर तिळवे नाईक
फ्रांस देशात हॅल्वेशियस व इंग्लंडमध्ये हॉब्स ह्यांनी मानवी कर्म आणि फळ ह्यांना जोडणारा एक अतिशय महत्वाचा वाद मांडला ज्याला आज आपण प्रॅगमॅटिझम अर्थात फलप्रामाण्यवाद असे म्हणतो हा वाद प्रथम इंग्लंडमध्ये प्रभावी ठरला व नंतर अमेरिकेत ! टिळक ह्या वादाची चर्चा गीतेसंदर्भात करतात
फलप्रामाण्यवादाचे तीन प्रकार आहेत
१ स्वार्थसुखवाद ह्याचा काहीप्रमाणात चार्वाकवादाशी संबंध आहे ह्याने अर्जुनाला काय उपदेश दिला असता तर युद्धात विजयी झाला तर तुला सर्व प्रकारचे सुख मिळेल म्हणून युद्ध कर सुंदर स्त्रिया सुंदर भोजन दासदासी हे सर्व प्राप्त होईल म्हणून युद्ध कर
२ दूरदर्शी स्वार्थसुखवाद ह्याने अर्जुनाला काय उपदेश दिला असता तर युद्धात आप्तांना मारल्याने तुला काहीकाळ दुःख होईल पण दूर काळाचा विचार करता युद्धात विजयी झाला तर तुला सर्व प्रकारचे सुख मिळेल म्हणून युद्ध कर सुंदर स्त्रिया सुंदर भोजन दासदासी हे सर्व प्राप्त होईल आणि तू ह्या हत्या विसरून जाशील म्हणून युद्ध कर
३ शहाणा स्वार्थसुखवाद
गीतेसंदर्भात प्रश्न असा आहे कि मुळात अर्जुन असा चार्वाकीय किंवा स्वार्थसुखवादी आहे का ? तर नाही कारण स्वतः अर्जुनच म्हणतो आहे कि
आचार्या: पितर: पुत्रास्तथैव च पितामहा: |
मातुला: श्वशुरा: पौत्रा: श्याला: सम्बन्धिनस्तथा || ३४||
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन |
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो: किं नु महीकृते || ३५||
म्हणजे ह्यांना मारून मला जर त्रैलोक्याचे राज्य जरी मिळाले तरी मला नको . म्हणजे अर्जुन स्वार्थसुखवादी नाही हे स्पष्ट आहे
पण ह्याचा एक अर्थ असाही होतो कि हे श्लोक ऐकून कृष्णाला कळून चुकते कि अर्जुनाला स्वार्थसुखवादी उपदेश देऊन अर्जुन आपला बाणा सोडणार नाही म्हणजेच अधिभौतिक फायदे सांगून हा चळणारा नाही अशा माणसाला मग थोडे उच्च तत्वज्ञान सांगावे लागते ही मजबुरी फक्त श्रीकृष्णाची नाही प्रत्येक सैनिकाला ज्याला नोकरी म्हणून सैनिकगिरी करायची नाही त्याला राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम अशा महान गोष्टी किंवा धर्म धर्मरक्षण अशा महान गोष्टी सांगाव्या लागतात अन्यथा तो लढायला तयारच होत नाही श्रीकृष्ण नेमके हेच करतो आहे तो ह्या लढाईला धर्मयुद्धाचे स्वरूप अतिशय जाणीवपूर्वक देतो आहे वैदिक सनातन धर्माच्या रक्षणासाठी तू हे युद्ध लढले पाहिजे असं श्रीकृष्ण वारंवार त्यासाठी सांगतो आहे ह्याचा अर्थ फलप्रामाण्यवादाचा स्वार्थसुखवादी हा प्रकार अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही नाकारतात म्हणून आपोआप टिळकही नाकारतात
मग पर्याय काय उरतो तर फलप्रामाण्यवादाचा दुसरा प्रकार !
भारतात याज्ञवल्क्य आणि गार्गी ह्यांच्या सुप्रसिद्ध संवादात याज्ञवल्क्य म्हणतो कि माणसे सर्व कर्मे आत्मप्रीत्यर्थ करतात अगदी बायकोही नवऱ्यावर प्रेम आत्मप्रीत्यर्थच करते म्हणूनच आपण प्रथम आत्मा म्हणजे काय ते जाणून घेतले पाहिजे शेवटी आपला सगळा खटाटोप हा आत्म्यासाठी चाललेला असतो ह्या आत्म्याची ओळख पटली कि स्वार्थ आणि परार्थ हा भेद नाहीसा होतो आणि सर्व जग आत्ममय होऊन जाते फलप्रामाण्यवाद आत्मप्रीत्यर्थ म्हणत असला तरी तो मोक्षाचा विचार करत नाही त्याऐवजी तो नीतीचा विचार करतो म्हणजे काय ? तर ह्या विचारात फलप्रामाण्यवाद्याला हे माहित असते कि जसे आपल्याला सुख हवे असते तसे इतरांनाही सुख हवे असते त्यामुळे जगात पहिल्या प्रकारातला ढळढळीत नागडा स्वार्थ किंवा अप्पलपोटेपणा चालत नाही इतरांचा सुख मिळवण्याचा हक्क मान्य करावा लागतो आणि दुसऱ्याचा हा हक्क स्वतःच्या सुखात बिब्बा टाकू शकतो अशावेळी करायचं काय ? तर नीती स्वीकाराची सुरवात इथूनच येते जगात अहिंसा धर्म का निघाला तर मी लोकांना मारले तर लोकही मला मारतील ह्या स्वार्थमूलक भीतीमुळे ! दुसरा रडतो किंवा दुखी होतो तेव्हा आपल्याला सहानुभूती वाटते कारण त्यांच्याप्रमाणे आपलीही अवस्था होऊ शकते अशी भीती आपल्या ठायी असते आपल्यालाही अडचणीत कुणी मदत करावी म्हणून आपण दुसऱ्याला मदत करतो आपल्यावर लोकांनी माया करावी म्हणून आपण लोकांच्यावर माया करतो अगदी आईसुद्धा आपल्या मुलाला सांभाळते कारण पुढे हे मूल तिला सुख देईल असे तिला वाटत असते असे हा वाद सांगतो लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे आपणाला वाटत असते म्हणून आपण चांगली कृत्ये करतो असे हा वाद म्हणतो
स्वतःला सुख हवे असल्यास इतरांना आपण सुख देणे गरजेचे आहे हाच मानवी नीतिमत्तेचा आधार आहे असे फलप्रामाण्यवाद मानतो म्हणूनच सर्वांना सुख देतील असे नीतिधर्म सर्वांनीच पाळायला हवेत असे हा वाद सांगतो
चार्वाक आणि फलप्रामाण्यवाद ह्यांच्यातील मुख्य फरक हाच आहे कि चार्वाकवाद स्वार्थसुखवादाच्या पलीकडे गेला नाही फलप्रामाण्यवाद मात्र अमेरिकेचे तत्वज्ञान बनला कारण सर्वसुखवाद स्वीकारला व नीतिमत्ता स्वीकारली
हॉब्सच्या ह्या उपपत्तीला बटलरने चॅलेंज केले व मनुष्य हा प्रत्येकवेळी अप्पलपोटा असतोच असे नाही असे सिद्ध केले व फलप्रामाण्यवादाचा तिसरा प्रकार मांडला ह्या तिसऱ्या प्रकाराच्या मते भूतदया प्रेम कृतज्ञता वैग्रे सद्गुणही माणसात असतात त्यामुळे माणूस स्वार्थ आणि स्वार्थाशी निगडित परार्थ अशा दोन्ही गोष्टी करत असतो सांख्यांच्या भाषेत सांगायचे तर मनुष्य केवळ तामस नसतो तर सात्विकही असतो प्रश्न असा निर्माण होतो कि स्वार्थ आणि परार्थ ह्यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यावर मनुष्याने स्वार्थ साधावा कि परार्थ साधावा ? ह्यावर ह्या तिसऱ्या प्रकारचे म्हणणे असे कि मनुष्य स्वार्थी असला तरी तो शहाणा स्वार्थी आहे त्यामुळे आपल्या शहाणपणाचा वापर करून योग्य निर्णय घेऊ शकतो मिल ह्याला ग्रेटर गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर्स म्हणतो
भर्तृहरीने नितीशतकाच्या ७४ व्या श्लोकात म्हंटले आहे कि स्वार्थ न सोडता लोकांसाठी झटणारे सामान्य स्वार्थ सोडून लोकांसाठी झटणारे सत्पुरुष होत स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या हिताचा बळी देणारे आहेत त्यांना राक्षस म्हणता येईल पण स्वतःचा स्वार्थ नसतांनाही लोकांच्या हिताचा बळी देणाऱ्यांना काय म्हणावे हे मला सुचत नाही
म्हणजे प्राचीन काळापासून स्वार्थ कसा ऑपरेट होतो हे भारतीयांना माहित आहेच फलप्रामाण्यवाद शहाणा स्वार्थ पाळणाऱ्या सामान्य माणसाचा विचार करतो सत्पुरुषांचा नाही भारतीय तत्वज्ञानात ह्याचा चौथा प्रकार येतो तो म्हणजे संपूर्ण मनुष्यजातीच्या सुखाचे तारतम्य बाळगत नीतिशास्त्र साधत कर्म करणे टिळकांच्या मते हा सर्वश्रेष्ठ फलप्रामाण्यवाद आहे सात्विक अधिभौतिक सुखाचा पुरस्कार हा प्रकार करतो टिळकांच्या मते सर्वांचे सुख शक्य नसले तरी पुष्कळांचे पुष्कळ सुख हे आता शक्य आहे आणि अध्यात्मिक पातळीवरही त्यालाच स्वीकारावे लागते सर्वभूतहीत साधतो तो कर्मयोगी !
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६९ फलप्रामाण्यवाद ,स्वार्थ ,सुख व टिळक ३ श्रीधर तिळवे नाईक
कर्माबाबतचा सर्वात मोठा तिढा जर कुठला असेल तर कर्म चांगले कि वाईट हे कसे ओळखायचे ? ह्याचे फलप्रामाण्यवाद जे उत्तर देतो ते कर्माचे फळ चांगले कि वाईट ह्यावरून कर्म चांगले कि वाईट ह्यावरून हे ठरवावे पुष्कळांचे पुष्कळ हित साधणारे कर्म चांगले असे फलप्रामाण्यवाद सांगतो ह्याउलट गीतेत हा प्रश्नाचे उत्तर वेगळे आहे गीता म्हणते
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय |
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा: फलहेतव: || ४९|| द्वितीय अध्याय ।।
गीता सांगते कि प्रथम बुद्धियोग साध व त्या बुद्धीच्या सहाय्याने ए धनंजय निष्काम कर्म कर फळहेतूने केलेल्या कर्मापेक्षा असे निष्काम कर्म श्रेष्ठ
ह्याचा अर्थ बुद्धी आधी येते मग तिच्या आश्रयाने निष्काम कर्म येते आणि हे निष्काम कर्म सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ होय पण ह्याचा अर्थ असाही होतो कि बुद्धीच्या आधी फळाची कामना येते म्हणजे
१ कामना
२ बुद्धी
३ कर्म
अशी त्रयी येते
भारतीय सांख्य दर्शनानुसार हा प्रश्न असा कि सात्विक आणि राजस ह्यांच्यातील फरक कसा ओळखायचा असा आहे आणि गीता ह्याचे उत्तर जे निष्काम कर्म आहे ते सात्विक आणि सकाम कर्म आहे ते राजस असे देते समजा दोन व्यक्तींनी सारखीच रक्कम दान केली तर बाह्य कर्म तर समान झाले मग ? माणसाच्या बुद्धीचा प्रवेश इथे येतो जर एखाद्याने निष्काम बुद्धीने दान केले असेल तर ते सात्विक पण जर एखाद्याने काही इच्छा धरून सकाम दान केले असेल तर ते राजस असं गीता सांगते सुदाम्याचे पोहे हेही श्रेष्ठ ठरतात ते कर्म करणारा सुदामा निष्काम बुद्धीने ते पोहे आणतो म्हणून !
टिळकांच्या मते फलप्रामाण्यवादाची सर्वात मोठी मर्यादा तो बाह्य कर्म व त्याचे परिणाम ह्यांच्या आधारे कर्माची मांडणी करतो ही आहे प्रत्यक्षात ह्यात तथ्य नाही हे स्वतःच टिळक पुढे मान्य करतात मिलच्या मते जर बाह्यकर्म समान असेल तर कर्त्याच्या हेतूत शिरण्याची गरज नाही मात्र बाह्य परिणाम समान असेल व श्रेष्ठ कर्म कोणते हे ठरवायचे असेल तर कर्म करणाऱ्याचा हेतू पाहावा लागेल
थोडक्यात काय टिळकांच्या मते पुष्कळांचे पुष्कळ सुख ही कसोटी अपुरी पडते शिवाय मी पुष्कळांचे पुष्कळ हित मी का करू हा नैतिक प्रश्न उरतोच लोकांच्या सुखापेक्षा माझे सुख वेगळे नाही त्यामुळे लोकांचे सुख साधताना माझेही सुख आपोआपच साधले जाते हा ह्यावर युक्तिवाद करता येतो डेटा ऑफ एथिक्स ह्या ग्रंथात हरबर्ट स्पेन्सरने ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना असे म्हंटले आहे कि ही एक जैविक प्रवृत्ती आहे म्हणजे काय तर अमीबात अमिबा स्वतःपासून दोन अमिबा तयार करतो तेव्हा तो प्रजननासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करतो अनेक प्राण्यांच्यात स्वतःच्या संततीसाठी मादी किंवा नर अशा प्रकारचे सॅक्रिफाइस करत असतात मानव हा ह्या जीवसृष्टीचा सर्वोच्च अविष्कार असल्याने मानवही आपल्या संततीसाठी असे बलिदान देतो आणि हीच प्रवृत्ती विस्तार पाऊन माणूस स्वतःच्या ज्ञातिबांधवासाठी आपल्या हिताचा बळी देण्यास तयार होतो थोडक्यात परार्थ हीही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे ह्या सात्विक नैसर्गिक प्रवृत्तीस माणुसकी म्हणता येईल टिळकांच्या मते कर्मफळाची अपेक्षा करणारा परोपकार हा चांगला पण कर्मफळाची अपेक्षा न करता केलेले कर्म म्हणजे माणुसकी होय ही माणुसकी वाढवण्याचे धोरण म्हणजे नीती होय
१ स्वार्थ साधावा म्हणून केलेले कर्म
२ पुष्कळांचे पुष्कळ हित साधावे म्हणून केलेले कर्म
३ परोपकार म्हणून केलेले कर्म
४ माणुसकी म्हणून केलेले कर्म
हे कर्माचे चार प्रकार ह्यातून पुढे येतात ह्यातील पहिल्यापेक्षा दुसरे दुसऱ्यापेक्षा तिसरे श्रेष्ठ व चौथे सर्वश्रेष्ठ असा क्रमही ह्यातून स्पष्ट दिसतो
व्यवहारात अगदी सामान्य माणसेही परोपकार करत असतात आणि परार्थही ! प्रेय म्हणजे इंद्रियसुख देणारे श्रेय म्हणजे खरे चिरकालीन कल्याण साधणारे ह्यांच्यात निवड करायची वेळ आली तर श्रेय आणि श्रेयस्कर निवड असे भारतीय परंपरा सांगते जो प्रेयस निवडतो तो मंदबुद्धीचा मानला जातो प्रेयसी वा प्रियकर ह्या शब्दांचा मूळ अर्थ बाह्य इंद्रियसुख देणारी वा देणारा असाच होतो सत्यासाठी प्राण द्यायला सिद्ध असणारे जसे आहेत तसे प्रेमासाठी प्राण देणारेही आहेत ज्याच्यासाठी प्राण घ्यावे लागतात ते प्रेयस्कर तर ज्यासाठी माणूस प्राणही देण्यास सिद्ध होतो ते श्रेयस्कर होय
ह्या पार्श्वभूमीवर गीतेकडे पाहिले तर काय दिसते तर पहिली गोष्ट श्रीकृष्ण अर्जुनाला प्राण घ्यायला सांगत आहे आणि त्यासाठी त्याचे प्राण द्यायलाही सांगत आहे कारण युद्धात अर्जुनाचे प्राण जाण्याचीही शक्यता आहे ह्याउलट श्रीकृष्ण हा सारथी असल्याने त्याला मात्र कोणी मारणार नाहीये म्हणजे श्रीकृष्ण स्वतःचे प्राण पणालाही लावत नाहीये श्रीकृष्णाच्या ह्या कृत्याचे समर्थन करावे म्हणून दुर्योधनाने यादवांच्याकडे मदत मागितली व तिथे श्रीकृष्णाने एका बाजूला मी आहे दुसऱ्या बाजूला यादवांची सेना ह्यापैकी तू एक निवड असे सांगितले व दुर्योधनाने सेना निवडली अशी कथा घुसवलेली आहे प्रत्यक्ष युद्धात सात्यकीसारखे अनेक यादव पांडवांच्या बाजूनेच लढलेले दिसतात सात्यकिने तर दुःशासनाला हरवलेले आहे आणि तो सेनापतीही झालेला आहे त्यावरून ही घटना घुसवलेली आहे हे स्पष्ट आहे श्रीकृष्ण स्वतःची कातडी वाचवणारा वाटू नये म्हणून ही कथा घुसवलेली आहे असो
गीतेत बाह्य कर्माऐवजी कर्म करणाऱ्याच्या बुद्धीचा व हेतूचा विचार केलेला आहे पण ह्यातूनच सगळा विध्वंस झाला आहे माझ्या मते गीतेचा भर बाह्य कर्मावर नाहीच आहे त्यापेक्षा कर्म करणारा कोणत्या बुद्धीने कर्म करतो सकाम कि निष्काम हे गीतेसाठी महत्वाचे आहे म्हणूनच लाखो लोकांची हत्या करायला श्रीकृष्णाला प्रॉब्लेम वाटत नाही तो हे सहज घडवतो व हे घडवतांना आपण निष्काम बुद्धीने हे कर्म करतो आहे असा त्याचा दावा आहे हा दावा खोटा आहे कारण स्वतः श्रीकृष्णच गीतेत हे वारंवार सांगतो आहे कि हे धर्मयुद्ध आहे आणि धर्माकरता आपण हे लढत आहोत श्रीकृष्णाला आपण माणुसकी वाढवणारे कर्म करतोय असे वाटत होते का ? तर नाही गीतेत माणुसकीचा उच्चार नाही पण धर्माचा उच्चार मात्र वारंवार आहे ह्याचा अर्थच जी नीती श्रीकृष्णाला योग्य वाटते ती माणुसकीला धरून नाही मात्र ब्राम्हण धर्मानुसार ती योग्य आहे ब्राम्हण धर्म नीती -अनीती पहात नाही तो माणुसकी पहात नाही तो फक्त ब्राह्मणांचे क्षत्रियांच्या द्वारा वर्चस्व कसे सिद्ध होईल व वाढेल ते पाहतो गीता ही त्यासाठीच सांगितली गेली आहे सांगणारा क्षत्रिय असल्याने हे सहजासहजी दिसत नाही किमान क्षत्रिय लोक तरी गीतेमुळे आंधळे होतात हा इतिहास आहे
ह्या संदर्भात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक चाफेकर बंधू ,खुदिराम बोस मदनलाल धिंग्रा आणि गांधीहत्या करणारा नथुराम गोडसे ह्यांचे उदाहरण पाहण्यासारखे आहे एका हातात गीता आणि दुसऱ्या हातात फाशीचा दोर घेऊन फाशी जाणाऱ्यात पहिले नाव चाफेकर व नंतर खुदिराम बोस ह्यांचे आहे आणि गीतारहस्य लिहिण्याची एक प्रेरणा खुदिराम बोसही असावा कारण खुदिरामच्या हातात फाशीपूर्वी गीता होती ही बातमी त्यावेळी पसरली होती खुदिरामाला कर्मयोगाने प्रेरणा दिली होती खुद्द लाला लजपत राय ह्यांनीही १९०७ साली त्यांना शिक्षा झाली तेव्हा गीतेवर लिखाण केले होते जे बहुदा टिळकांच्या आधीचे लिखाण आहे
भक्तियोग व ज्ञानयोग बाजूला सारून गीतेतील कर्मयोग स्वीकारून फाशी जाणारे पहिले चाफेकर होते मग खुदिराम बोस ! टिळकांनी ह्यांचा आदर्श मानला असावा खुद्द वंदे मातरम लिहिणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी कृष्ण चरीत लिहिले होतेच पुढेही गांधींनी गुजराती भाषेतील गीतारहस्य वाचून लिहिले होते,“I went reverentially through the Gujrati translation of the Lokamanya’s great work. The reading whetted my appetite for more and I glanced through several works on Gita” पुढे मदनलाल धिंग्रानेही एका हातात फाशी जाण्यापूर्वी गीताचं घेतली होती
एकीकडे हे महान क्रांतिकारक असतानाच दुसरीकडे नथुराम गोडसेही आहे त्याच्याही एका हातात गीता आणि दुसऱ्या हातात फाशीचा दोर होता ह्यावरून हे उघडच आहे गोडसेचाही अविर्भाव हा कर्मयोग्याचा आहे आपण जे काही करतोय त्यात पुष्कळांचे पुष्कळ सुख आहे ह्याची खात्रीच गोडसेला पटली होती असे त्याच्या लिखाणावरून वाटते गीतेला कर्मयोग सांगत असेल तर हिंसा हा प्रॉब्लेम वाटत नाही कारण गीतेच्या दृष्टीने कर्मापेक्षा त्याचे स्वरूप सकाम आहे कि निष्काम हे अधिक महत्वाचे आहे गोडसेने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही कारण तो स्वतःला अर्जुन व गांधींना भीष्म व द्रोण समजत होता जो चुकीच्या बाजूने उभा आहे असे त्याला वाटत होते त्यामुळेच गांधींची हत्या केल्यानंतरही गोडसे गांधींचा उल्लेख आदरणीय असाच करतो ही स्टाईल पांडवांची आहे हत्या करावयाची आणि पुढे आदरणीयही म्हणावयाचे इतकेच नाही तर पितामह भीष्माकडून उपदेशही घ्यायचा
क्रांतिकारक इंग्रजांचा उल्लेख आदरणीय म्हणून करत नाहीत ते थेटच इंग्रजांना शत्रू मानतात कारण स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिश हे स्पष्ट शत्रू आहेत पण जे मवाळ आहेत त्यांना ते आदरणीय आहेत जहाल आणि मवाळ ह्यांच्यात जो फरक आहे तो हाच आहे जहालांना ब्रिटिश आदरणीय वाटत नाहीत पण मवाळांना ते भीष्माचार्य द्रोणांच्याप्रमाणे आदरणीय वाटतात म्हणूनच गोखलेपासून गांधींच्यापर्यंत सर्वांना गीता आवडते
नथुराम गोडसे इंग्रज आणि महात्मा गांधी ह्यांच्यात फरक करत नाहीत वास्तविक हत्याच करावयाची होती तर जीनांची करावयाची होती पण गोडसेंना जीना शत्रू वाटत नाही गांधी शत्रू वाटतो ह्यामागचे गौडबंगाल काहीकेल्या उलगडत नाही जिना का नाही आणि गांधी का हा नथुराम गोडसेबाबत सर्वात कळीचा प्रश्न आहे फाळणी हा एक प्रचंड केऑस म्हणजे कोलाहल होता आणि कोलाहलात गोडसेला बहुदा आपला शत्रू स्पष्ट दिसला नाही आणि मग संदिग्धतेतील निश्चितता ही अनेकदा चुकीची असते ह्या न्यायाने त्याने ही कृती केली गोडसे कायमच गांधीवध हा शब्द वापरतो कारण भीष्म द्रोण ह्यांचे महाभारतात वध झालेत
ह्यातून प्रश्न निर्माण होतो कि गीता ही हिंसेला पूरक आहे का ? क्रांतिकारकांनी केलेल्या हत्येलाही गीतेने समर्थनच पुरवले आहे असे स्पष्ट दिसते मात्र इथे कोलाहल होत नाही कारण जो दुसरा आहे तो परका आहे गांधींच्याबाबत असे होत नाही गांधी हा आपला आहे आणि तरीही त्या संतांवर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत गांधींच्या जिवंत असण्यामुळे हिंदूंच्या हत्या होत राहतील कारण गांधींचं ऐकून हिंदू हत्यार खाली ठेवतील पण मुस्लिम हत्यार खाली ठेवणार नाहीत आणि मग ही लढाई एकतर्फी होऊन हिंदूंची फक्त कत्तलच होत राहील हे थांबवायचे असेल तर गांधी जिवंत राहता कामा नयेत असा काहीतरी विचार गोडसेंच्या आत चालला होता ह्याशिवाय गांधीजींनी पाकिस्तानला पैसे दिले व गांधीजींनी देशाची फाळणी केली हे गैरसमज ! प्रत्यक्षात फाळणीला मुख्य जबाबदार व्यक्ती महम्मद अली जिना होती पण जिनांना मारणे सोपे न्हवते पोलीस बंदोबस्त न घ्यायला ते काही गांधी न्हवते जिनांच्यापर्यंत पोहचणेच शक्य न्हवते पण गांधींच्याबाबत ते सहज शक्य होते अर्जुनाने श्रीकृष्णाला सतत प्रश्न विचारून मग एक उत्तर घेतले तसे गोडसेचे झालेले दिसत नाही त्याने जर का स्वतःच्या श्रीकृष्णाला म्हणजे सावरकरांना अर्जुनासारखे प्रश्न विचारले असते तर कदाचित त्याच्या हातून ही हत्या झाली नसती पण इथे अर्जुनाने कुठल्याही कृष्णाला न विचारता स्वतःच पितामह भीष्माची हत्या केली आणि हा एक सपशेल चुकीचा निर्णय होता तो अंमलात कितीही अचूकपणे आणला गेला असला तरी ! मुळात गांधी द्रोणाप्रमाणे निःशस्त्र होते त्यामुळे मारण्यात कसलेही शौर्य न्हवते ह्याचा अर्थ नथुराम गोडसेने आपण ज्या कारणांसाठी मारतोय त्यांची सत्यअसत्यता नीट पडताळून पहायला हवी होती पण हे झालेले नाही मनात अढी आणि बायस ठेऊन केले गेलेले हे अमानुष कृत्य आहे आपण देशाच्या सर्वोच्च नेत्याला मारतोय ह्याचे भान कुठेही दिसत नाही गांधी आणि सावरकर ह्यांच्यातील लढा हा मुळात हिंसा विरुद्ध अहिंसा ह्या दोन मूल्यांच्यातील लढा आहे हेच नथुरामच्या लक्षात आलेले नाही जर हिंदू सावरकरांचे न ऐकता गांधींचे ऐकत असतील तर तो दोष कुणाचा ? हिंदूंचा ? सावरकरांचा ?कि गांधींचा ? जर खोलात जाऊन पाहिलं तर लक्ष्यात येते कि हा दोष ह्या तिघांचाही नाही हा दोष भगवद्गीतेचा व स्मृतींचा आहे ज्यांनी वर्णव्यवस्था निर्माण करून शस्त्र वापरण्याचा हक्क फक्त क्षत्रियांना दिला आणि आपद्धर्म म्हणून ब्राम्हणांना ! सावरकरांनी सगळे क्षत्रिय जमवायला हवे होते पण ते केले असते तर सावरकरांचे नेतृत्व टिकले असते ? क्षत्रियांनी नेतृत्व क्षत्रियाकडेच हवे आग्रह धरला नसता कशावरून ? मुळात सावरकरांचा प्रस्ताव क्षत्रियांनी स्वीकारला असता ? एकंदर बघता बहुतांशी क्षत्रिय व नवाब इंग्रजांच्या राजवटीत खुश होते असे दिसते कारण जबाबदाऱ्या न घेता आयते उपभोग मिळत होते कुठेतरी शाहू महाराज सयाजी महाराज अपवाद वास्तविक किमानपक्षी समतेचे समताकरण आपापल्या राज्यात तुम्ही पार पाडा आम्ही स्वातंत्र्याचे राजकारण बाहेर चालवतो अशी सन्माननीय जापनीज पद्धतीसारखी तडजोड ब्राम्हणांना व हिंदुत्ववाद्यांना काढता येणे सहज शक्य होती पण हिंदुत्ववादी ब्राम्हणांना ब्राम्हणी अधिकार सोडायचेच न्हवते आणि पुढेही त्यांनी ते सोडलेले नाहीतच त्यांना समताकारण नकोच होते ह्याचे कारण आपण सरकारी नोकऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या नोकऱ्या व पौराहित्य सोडले तर दुसरे काही करू शकतो हा आत्मविश्वास अनेक ब्राम्हणांना न्हवता ब्राम्हणांना आपली पापे धुवायची ही एक संधी होती काही ब्राम्हणांनी ती साधली काहींनी भयापोटी ती गमावली टिळकांनी धाडसी ब्राम्हण व भयग्रस्त ब्राम्हण ह्या दोघांना सांभाळत कुशलतेने जशी वाट काढली तशी वाट काढणे सावरकरांना जमलेले दिसत नाही किंबहुना हिंदुत्ववाद्यांचा सर्वश्रेष्ठ नेता आजही टिळकच आहेत त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी
गांधींना आपला बहुतांशी समाज निशस्त्र आहे ह्याची जाणीव होती म्हणूनच त्यांनी निःशस्त्र प्रतिकाराची योजना केली टिळकांना गांधींच्याप्रमाणे हिंसेचे वावडे न्हवते पण क्षत्रिय समाज शस्त्र उचलणार नाही ह्याची त्यांना जाणीव होती त्यांना अपेक्षा होती टी ब्राम्हण समाजाकडून म्हणून त्यांनी ती शक्यता खुली ठेवली होती ह्या खुल्या ठेवलेल्या शक्यतेचेच फलित सावरकर होते दुर्देवाने त्यांना शिक्षा झाली त्यामुळे हिंदुत्ववाद टिळकांच्यानंतर हवा तसा वाढला नाही ह्याउलट राजाराम मोहन रायपासून सुरु झालेल्या हिंदुवादाला गांधीजींचे नेतृत्व लाभले जे अहिंसावादी होते आणि बहुतांशी हिंदू गांधींच्या मागे गेले . नथुरामला ह्याचा राग होता का ? त्याची सावरकरभक्ती लक्ष्यात घेता तो ह्या सिच्युएशनवर खुश नसावा असं दिसतं म्हणजेच ज्या परंपरेच्या नावाने हिंदुत्ववादी गळे काढतात ती परंपराच ह्याबाबत सावरकरांची शत्रू झाली असं दिसतं नथुरामाला हे का दिसलं नाही ?
गोपाळ गोडसे ह्यांनी मी गांधींचा वध का केला हे सांगतांना देशासाठी व जातीच्या भल्यासाठी असं म्हंटल आहे ह्यातील जात ह्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा ? ब्राम्हण कि हिंदू ? ह्याचा अर्थ जर ब्राम्हण असेल तर ह्या हत्येची पार्श्वभूमी साफ बदलते गांधीजींच्यामुळे ब्राम्हणांच्या हातून नेतृत्व गेलं ही वस्तुस्थिती ! त्याचा सूड म्हणून हे कृत्य केले असेल तर मग हा एक जातीयवादी मर्डर ठरतो आणि फक्त हिंदुत्ववादी ब्राम्हणांसाठी अभिमानाचा विषय बनतो
आता
ज्या परंपरेच्या नावाने तुम्ही गळे काढता ती परंपराच तुमची ह्याबाबत शत्रू झाली असेल तर दोष कुणाचा ?
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: |
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: || 23||
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १७० सुख आणि दुःख आणि फटाके श्रीधर तिळवे नाईक
अधिभौतिक सुखवादाचा विचार केल्यानंतर टिळक पाचव्या प्रकरणात सुखदुःखाविवेक हा विषय घेतात पुष्कळांचे पुष्कळ सुख हा अधिभौतिक सुखवादाचा पाया आहे पण नुसत्या सुखाचा विचार कसा करणार ? सुखाची वृद्धी कशी होईल आणि दुःख कसे टळेल हे प्रत्येक मनुष्य पाहत असतो मनुष्य मृत्यू पाहतो तरी ह्या भवचक्रातून मुक्त होत नाही सतत सुखाचा पाठलाग करत राहतो
प्रश्न असा कि सुख म्हणजे काय ? तहान लागली असता पाणी पिल्यास सुख वाटते ह्यात पाण्याला सुख म्हणता येईल का ? तर नाही अन्यथा पाण्यात बुडालेल्या माणसाला सुखात बुडाला म्हणावे लागेल पाण्यामुळे जी इंद्रियतृप्ती होते ती इंद्रियतृप्ती म्हणजे सुख ! नैय्यायिकांनी जी वेदना आपणाला अनुकूल ती सुख व जी वेदना आपणाला प्रतिकूल ती दुःख अशी सुखदुःखाची व्याख्या केली आहे
ह्यानंतर टिळक जे लिहितात ते चकित करणारे आहे टिळक सर्व देवतांच्यावर विश्वास ठेवतात आणि ह्या देवतांच्यामुळे निर्माण होणाऱ्या सुखदुःखांना ते चक्क स्वीकारतात व त्यांना अधिदैविक सुखदुःखे म्हणतात टिळकांचा महालक्ष्मी , कृष्ण , विष्णू ह्या सर्व देवतांच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच सर्व हिंदुत्ववाद्यांचा देवतांच्यावर विश्वास आहे ह्याशिवाय १ भौतिक जगापासून शरीराला प्राप्त होणारी अधिभौतिक २ अध्यात्मात मनाला प्राप्त होणारी मानसिक अध्यात्मिक सुखदुःखे आहेतच
दुःख कोणासच नको असते म्हणून सांख्य कारिकेतील पहिलीच कारिका पुढीलप्रमाणे आहे
दुःखत्रयाभिघातात् जिज्ञासा तदभिघातके हेतौ।
दृष्टे साऽपार्था चेन्नैकान्तात्यन्ततोऽभावात्॥ १॥
हीचा अर्थ दुःखत्रय असते आणि त्याचा अंत वरवरच्या जिज्ञासेने होणे होईल ? दुःखाची निवृत्ती करणे केवळ मूलभूत अभिघातक कारणांच्या निर्मूलनाने शक्य होते
पण हा मोक्षाचा मार्ग झाला सामान्य मोक्षपरांगमुख माणसाचे काय ? भर्तृहरी तर व्याधीचे वा दुःखाचे निवारण होणे ह्या गोष्टीलाच लोक सुख म्हणत असावेत असं म्हणतो
सांख्यांचा विचारच पुढे न्हेणाऱ्या गौतम बुद्धाने तर सगळं जगच दुःखमय असल्याचे सांगून दुःखाचे मूळ तृष्णात असल्याचे सांगितले आणि तृष्णांचा अंत करण्याचा मार्गही सांगितला
आनंदगिरीने दुसऱ्याचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते म्हणून आपल्याला दुसऱ्याचे दुःख पाहून जे दुःख होते त्या दुःखाच्या निवारणार्थ आपण दुसऱ्यावर उपकार करतो वा त्याला मदत करतो असे सांगितले होते पुढे हाच विचार अब्राहाम लिंकनने सांगितला आणि भारतीयांना अलीकडे तो लिंकनमुळे पुन्हा माहित झाला
टिळक महाभारताचा दाखला देऊन म्हणतात तृष्णामुळे दुःख निर्माण होते व दुःखामुळे सुख (शांतिपर्व ) म्हणजे तहान लागते त्यामुळे दुःख निर्माण होते मग ह्या तहानेची तृप्ती करण्याकरता माणूस पाणी शोधतो आणि पाणी पिऊन त्याला जी तृप्ती लाभते ते सुख होय पण समजा माणसाला पाणी मिळाले नाही तर त्याने दुसऱ्याचे पाणी चोरून प्यावे का कि पाणी मागावे ? इथे सुखदुःखाचा विवेक येतो आणि हा विवेक सांगतो कि पाणी मागावे पण समजा समोरच्याने पाणी द्यायचे नाकारले तर मग ते हिसकावून घ्यावे का ? भारतात पाण्याचा प्रश्न प्रथम अस्पृश्यांच्या संदर्भात मग शेतीसंदर्भात अत्यंत तीव्रपणे अस्तित्वात आहे टिळकांच्या काळात त्याची तीव्रता कमी होती जर शुद्ध पाणी बाटलीत भरूनच विकले जाणार असेल तर प्रश्न असा निर्माण होतो कि गरिबांचा शुद्ध पाण्यावर अधिकार आहे कि नाही ? जी गोष्ट निसर्गाने फ्री दिली होती तिच्यावर सर्वांचाच समान हक्क आहे कि नाही ? मग एकाला बिसलरी आणि दुसऱ्याला नळातून अशुद्ध पाणी पुरवठा असे कसे चालेल? निसर्ग स्वभावतः समाजवादी आहे माणसाने भांडवलवाद निर्माण केला कारण निसर्गातल्या प्रत्येक वस्तूचे त्याने भांडवलात रूपांतर केले जमिनीपासून आता पाण्यापर्यंत अगदी साम्यवादीही निसर्गाला माणसाचा उपयुक्त अवयव समजतात माणूस समाजाचा अवयव निसर्ग माणसाचा अवयव ह्यामुळे नुसते अवयव निर्माण होतात माणसे नाही साम्यवाद कोसळला त्याचे मुख्य कारण हा अवयववाद आहे प्रॉलिटरीयत माणसाच्या दुःखाचा विचार सर्वांच्या सुखाचा विचार हा साम्यवादाचा आकर्षक मुद्दा पण कोणत्या पद्धतीने आणायचा ह्याबद्दल अवघडलेपण ! साम्यवादाचा सामूहिक सुखदुःखविवेक काय ?
वर्णाश्रमव्यवस्थेत माणसाचा विचार अवयववादी पद्धतीनेच होतो आणि टिळकही असाच विचार करतात आणि हिंदुत्ववादीही ! एकदा माणसाला अवयव मानले कि समाज माणसाविषयी बेपर्वा होत जातो वर्णाश्रम व साम्यवादी ह्या दोन्ही व्यवस्थेत ही माणसांविषयीची बेपर्वाई ठासून भरलेली आहे
हीच गोष्ट निसर्गाबाबत एकदा निसर्गाला अवयव मानले कि समाज निसर्गाविषयी बेपर्वा होत जातो वर्णाश्रम व साम्यवादी ह्या दोन्ही व्यवस्थेत ही निसर्गाविषयीची बेपर्वाई ठासून भरलेली आहे
सुखदुखविवेक त्यामुळेच गरजेचा ठरतो आपण फटाके उडवले तर फटाक्यांच्यामुळे आपणाला सुख मिळते हे खरे पण निसर्गाचा हवातोल ढळतो मग अशावेळी करायचे काय ? इथे सुखदुःखविवेक येतो जी हवा प्रदूषित होणार आहे ती आपल्याही फुफ्फुसात जाणार आहे हा विवेक जागा असेल तर निर्णय घेणे सोपे जाते ह्याला धार्मिक मुलामा देऊन आमच्यावेळीच का असा प्रश्न विचारणे फिजूल असते त्यातून निसर्गाला अवयव समजण्याची बेपर्वा वृत्ती दिसते मग इतिहासात दीपावलीला फटाके उडवलेच जात नसत हे कळले कि आपल्या १५५० पर्यंतच्या पूर्वजांनी दिवाळी फटाके न उडवतात साजरी केली हे लक्ष्यात येते मग धार्मिक युक्तिवादालाही काही अर्थ उरत नाही कारण फटाक्यांना धार्मिक आधार नाही हे स्पष्ट होते
सुखदुःखविवेक हा असा पावलोपावली आपण सांभाळत असतो म्हणूनच टिळक त्याचा विचार करतात
श्रीधर तिळवे नाईक
व
श्रीधर तिळवे नाईक
कान्टने
श्रीधर तिळवे नाईक
आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा