आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५१ ते १६० श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५१ ते १६० श्रीधर तिळवे नाईक
गीतेत काय आहे धर्म कि आपद्धर्म कर्मजिज्ञासा २
मागील प्रकरणात अर्जुन व हॅम्लेट ह्यांच्या तुलनेच्या अंगाने मांडलेली टिळकांची मते आपण खोडली आता गीतेत नेमक्या कोठल्या धर्माची मांडणी केली आहे ते आपण पाहू
टिळक माणसांच्यात १ सज्जन आणि २ लुच्चे अश्या दोन टाईपचे लोक मानतात आणि जर का सज्जन लोक श्रीकृष्णाप्रमाणे वागले नाहीत तर त्यांचे केवळ लुच्च्या लोकांच्याकडून शोषण होईल असे त्यांना वाटते श्रीकृष्णाचे जे आकर्षण आहे ते ह्या युक्तिवादामुळेच ! प्रत्यक्षात श्रीकृष्णनीतीचा सर्वाधिक वापर लुच्चे लोकच अधिक करतात रामरहीम पासून आसाराम बापूंच्यापर्यंत सर्वचजण स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार म्हणून सादर करत होते हे बघण्याजोगे आहे श्रीकृष्णाचे नाव घेतले कि स्वतःच्या कामलीलांना रासलीला म्हणून सादर करता येते स्वतःच्या पॉलीटिक्सला चोरीला व भ्रष्टाचाराला श्रीकृष्ण दह्याची चोरी करत न्हवता काय असा प्रश्न विचारून धार्मिक कृत्य बनवता येते , खोटं बोलता येते व त्या खोट् बोलण्याला डिप्लोमसीचे नाव देता येते ,स्वतःच्याच लोकांची नृशंस हत्या करता येते , विवाहित स्त्रीशी व्यभिचार करून ती राधा मी श्रीकृष्ण म्हणता येते आणि काहीही अनैतिक करून श्रीकृष्णनीतीचे नाव देता येते दुसरा बाजीरावही स्वतःला श्रीकृष्ण समजत असे हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे भारतातले ९९ टक्के भ्रष्टाचारी लोक स्वतःला श्रीकृष्णाचे भक्त म्हणवतात एखादा देव कुणाला मदत करतो हे सांस्कृतिक जडणघडणीत फार महत्वाचे असते श्रीकृष्ण हा लुच्चे लोकांना मदत करतो ही वस्तुस्थिती !
दुसरी गोष्ट खुद्द श्रीकृष्णाचीच आहे मूळ श्रीकृष्ण हा अथपासून इतिपर्यंत राजकारणी आहे आणि तो आर्यांचा आदर्श आहे बहुजन समाजाने त्याला स्वीकारावे म्हणून आर्यांनी बरीच खटपट केली आणि त्याला व रामाला देव म्हणून प्रस्थापित केले परिणामी बहुजन समाजातील नैतिकतेचा ऱ्हास सुरु झाला तुम्ही एकाचवेळी नैतिक आणि रामकृष्णवादी असू शकत नाही इतकी अनैतिकता ह्या दोघांच्या चारित्र्यात ठासून भरलेली आहे दाक्षिणात्य लोकांचा उल्लेख वानर किंवा नरभक्षक राक्षस म्हणून करणाऱ्या लोकांची मानसिकता काय असणार ? खुद्द टिळक ह्या मानसिकतेचे शिकार होते
टिळक कर्मजिज्ञासा ह्या प्रकरणात नेमकी कशाची चर्चा करत आहेत ? आपण जर बारकाईने पाहीले तर ही चर्चा यमनियम म्हणजे सत्य , अहिंसा , अचोर्य , अपरिग्रह , पंचशीले आणि आपद्धर्म ह्यांच्या संदर्भातील आहे टिळकांच्या मते मनूने १०:६३ मध्ये अहिंसा ,सत्य , अस्तेय ,कायावाचामने शुद्धता आणि इंद्रियनिग्रह ह्यांची चर्चा श्रीकृष्णाच्या आधीच केली होती प्रश्न असा आहे अर्जुनाने काय करावे ?
आर्यांच्या धर्मात १ धर्म २ आपद्धर्म अशा दोन धार्मिक संकल्पना आहे धर्म नित्यपालन करावयाच्या गोष्टी सांगतो तर आपद्धर्म धर्माचे पालन करता येत नसेल तर काय करावयाचे ते सांगतो म्हणजे दुष्काळ असेल व आपण उपाशी पोटी मरणार असू तर अन्नधान्याची चोरी करून स्वतःला टिकवणे हा आपद्धर्म जर एखाद्या व्यक्तीची हत्या करण्यासाठी मारेकरी पाठलाग करत असतील ती व्यक्ती तुमच्यासमोरच कुठे गेली असेल आणि मारेकरी तुमच्यापर्यंत पोहचून ऍड्रेस विचारत असतील तर त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही खोटे बोलत असाल तर तो आपद्धर्म
ब्राम्हणांनी हा आपद्धर्म का शोधला ? तर वेळप्रसंगी सगळी अनैतिक कृत्ये करता यावीत म्हणून ! वास्तविक ह्या सर्व तडजोडी आहेत आणि तडजोडींचा समावेश धर्मात वा नैतिकतेत करायचा नसतो लोकं तडजोडी करतच असतात भगवान शिव भगवान महावीर भगवान बुद्ध , जिझस ह्यांना लोक अशा तडजोडी करतात हे माहित न्हवतं काय ? तेवढी अक्कल त्यांना नक्कीच होती पण कोणीही आपद्धर्म सांगितला नाही कारण ह्या तडजोडीना धार्मिक परमिशन धार्मिक सॅंक्शन दिलं तर आपद्धर्म हाच धर्म बनणार ह्याची त्यांना कल्पना होती त्यामुळेच नैतिकतेत वा धर्मात आपद्धर्म असताच कामा नये शिवाय अनेकदा त्याची गरजच नसते उदा दुष्काळात जर अन्न मिळत नसेल तर समोरच्यांकडून ते मागावे तरीही तो देत नसेल तर सत्याग्रह करावा हा मार्ग आहे श्रीकृष्णाला तो दिसत नाही हीच गोष्ट मारेकऱ्यांच्याबाबत तुम्ही मला तो कुठे गेलाय ते माहीत आहे पण मी तुम्हाला ते सांगणार नाही असा स्टान्स घेता येतो आणि जीव वाचवण्यासाठी मारेकरांच्यापासून पळून जाण्याचाही चॉईस असतो आणि पोलिसांना बोलावण्याचा चॉईस असतो मारेकरी येतांना साक्षात दिसत असतांना मुळात ज्याच्या मागे ते येतात तो माणूस पोलिसांना फोन करत नसेल तर त्याचा अर्थ त्याने काही अनैतिक काम केले आहे असा होतो किंवा मग तो संन्यासी असू शकतो अशावेळी इतर लोकांना फोन करण्याचा चॉईस उपलब्ध असतोच तेव्हा आपद्धर्म गरजेचा नसतो ज्यांना चोरी करायची असते किंवा खोट्याचे समर्थन करावयाचे असते त्यांना तो सुचतो आपद्धर्म ह्या तडजोडींना धार्मिक सॅंक्शन देतो ही गोष्ट दुर्देवाने टिळकांच्या लक्षात येत नाही किंबहुना त्यांना ती लक्ष्यात घ्यायची नाही कारण श्रीकृष्णाला देव म्हणून लोकांच्या डोक्यात घुसवणे त्यांना जास्त गरजेचे वाटते ह्या देशात वैष्णवांचा सतत प्रचार आणि अपप्रचार चाललेला असतो फक्त शैवांनी जैनांनी बौद्धानी प्रचार केला कि आर्यांना प्रॉब्लेम होतो
टिळक ह्या प्रकरणात मूळ धर्म कुठे कुठे आलाय ते सांगतात उदा अहिंसा परमो धर्म : हे तत्व महाभारतात आल्याचे ते सांगतात आणि मग प्रश्न विचारतात कि समजा आपला जीव घेण्यास किंवा आपल्या मालमत्तेचे हरण करण्यास किंवा आपल्या कन्येवर वा पत्नीवर बलात्कार करण्यास कोणी आला तर त्याच्यावर हिंसक कृती करायची कि नाही टिळक म्हणतात कि अशावेळी हिंसा करणे आवश्यक आहे पुढेही ते एकामागोमाग एक अशी अपवादात्मक उदाहरणे देत राहतात ह्यातून टिळकांना साधायचे काय आहे ? तर अर्जुनापुढे जो अनन्यसाधारण प्रसंग आला तो ह्या प्रसंगासारखाच होता असे ते सुचवतात माझे म्हणणे असेच आहे माझ्याही मते अर्जुनावर जो प्रसंग आलाय तो अपवादात्मकच आहे प्रश्न असा आहे कि अपवादात्मक म्हणून करावयाची कृती व त्या कृतीच्या समर्थनासाठी केला गेलेला उपदेश मुख्य धर्म व मुख्य धर्मोपदेश कसा असू शकतो तो तर आपद्धर्म व आपद्धधर्मोपदेश झाला ना ? गीतेचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे कि ती एका युद्धजन्य परिस्थितीत सांगितलेली अपवादात्मक धर्मोपदेशात्मक कृती आहे तिला मुख्य उपदेश म्हणून मिरवणारे अर्धवट शहाणे आहेत कारण मग तुम्ही प्रत्येक कृती युद्धजन्य कृती म्हणून पाहायला लागता बलात्कार ही अपवादात्मक घटना असते तिला मुख्य मानून कुणी कामशास्त्र रचायला लागला तर त्याला मूर्खच म्हंटले पाहिजे बलात्काराचा प्रतिकार केलाच पाहिजे पण कामशास्त्र हे अरबो लोकांच्या शरीरसंबंधासाठी सांगावयाचे शास्त्र आहे हे लक्ष्यात घेतले पाहिजे
मुळातच जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण न्हवता तेव्हा पांडवांनी कौरवांना हरवून परत पाठवले आहे कौरवांना कैद करून त्यांच्याकडून राज्य मिळवणे हे अर्जुनाला कधीच अवघड न्हवते पण श्रीकृष्णाने ह्या साध्या युद्धाला धर्मयुद्धाचे स्वरूप देऊन लाखो लोकांची हत्या घडवून आणली जर खरोखर युद्ध टाळायचे असते तर भर दरबारात कर्णाला तू ज्येष्ठ पांडव आहेस असं सांगून सर्व राज्य पांडवांच्या बाजूने वळवणे सहज शक्य होते पण हे श्रीकृष्णाने केलेले नाही कारण त्याला युद्ध हवेच होते दुर्योधनाची आणि कर्णाची मैत्री लक्ष्यात घेता दुर्योधनाने हे राज्य नक्कीच परत केले असते जो माणूस अंगराज्य देतो त्याला इंद्रप्रस्थ देणे मुळीच अवघड न्हवते कारण पांडव कर्णाच्या अंकित राहिले असते आणि कर्ण दुर्योधनाच्या अंकित होताच त्यामुळे राजकीय दृष्ट्या हे सर्वात बेस्ट सोल्युशन होते पण मुळात धर्मराज्य स्थापन करावयास निघालेल्या माणसाचा आंधळेपणा फार तीव्र असतो श्रीकृष्णाबाबत हेच घडलेले आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५२ गीतेत काय आहे धर्म कि आपद्धर्म कर्मजिज्ञासा ३
मनूने बलात्कार करू पाहणाऱ्या , प्रॉपर्टी बळकावयास आलेल्या , वा जीवाची हत्या करवयास आलेल्या माणसाला आततायी असे म्हंटले असून अशा आततायी माणसाला बेशक ठार करावे असे म्हंटले आहे टिळक मनुशी सहमत आहेत स्थूल जीवांची हत्या टाळता येईल पण सूक्ष्म जीवांचे काय असाही प्रश्न टिळक विचारतात हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे कारण अहिंसा सूक्ष्म जीवाबाबत सांगितली गेलेलीच नाही ते श्वासात मरत असतील तर आपण ही हिंसा टाळूच शकत नाही मूळ मुद्दा मनुष्य हिंसेचा आहे त्यातही भगवान शिवांनी संरक्षण म्हणून किंवा बलात्कार करू पाहणाऱ्यास अडवण्यासाठी हिंसा आवश्यकच मानली आहे खुद्द भगवान शिवांनी अशी हिंसा केलेली आहे तेव्हा संरक्षणाचा मुद्दा गृहीतच आहे जर द्रोण किंवा भीष्म अर्जुनाची हत्या करावयास निघाले असते आणि अर्जुनाने त्यांची हत्या केली असती तर ते मान्य झाले असते पण युद्ध अजून सुरूच झालेले नाही तोपर्यंत श्रीकृष्ण त्यांच्या हत्येसाठी अर्जुनाला तयार करत आहे हे लोक म्हणजे काही सूक्ष्म जंतू नाहीत कि चला हत्या करूया म्हणायला ही माणसे आहेत तीही भलं करणारी शक्य असूनही अर्जुनाशी हे लोक प्रामाणिकपणे लढलेले नाहीत उलट ह्यांनी मृत्यू पत्करलेला आहे आणि श्रीकृष्णाने त्यांचे वध होऊ दिलेले आहेत भीष्माला मारणारी मानसिकता आणि गांधींना मारणारी मानसिकता एकच आहे गोडसेने मी वध केला असं म्हंटले आहे त्याचा संदर्भ गीता आहे मरणाराही गीतावादी आणि मारणाराही गीतावादी असे काहीतरी अजिबोगरीब घडले आहे
क्षात्रधर्म टिकण्यासाठी निदान क्षत्रियांनी हिंसा केलीच पाहिजे असे टिळक म्हणतात म्हणजे इथेही ते हिंसेचे परमिट फक्त क्षत्रियांना देतात हे लक्षात घेण्याजोगे आहे क्षत्रिय करत असलेल्या अयोग्य हिंसेचं वा बलात्काराचं काय करायचं ? हा प्रश्न टिळकांना पडत नाही म्हणजे इतरांनी क्षत्रियांचे अत्याचार सहन करावे असा अर्थ निघतो टिळकांना हे अपेक्षित आहे काय ? मुळात योद्धावृत्ती एखाद्या वर्णाला मक्तेदारी म्हणून देणे हा गाढवपणाच आहे बरं पुढे टिळकच क्षत्रिय नष्ट झालेत ह्या सिद्धांतावर विश्वास ठेवतात म्हणजे आपद्धर्म म्हणून शस्त्र उचलण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना उरतो बाकीच्यांनी फक्त मरायचं पेशवाई स्थापन करण्याचा सुप्त हेतू ह्यामागे नसेल ह्याची काय खात्री ? ब्राम्हणेतर चळवळ टिळकांच्याविषयी कायमच साशंक राहिली त्याची कारणे टिळकांच्या ह्या मांडणीत आहेत
नेहमीच क्षमा करणाऱ्या माणसाजवळ त्याची बायका पोरेही राहणार नाहीत असे वाटणे स्वाभाविक क्षमेला अपवाद असतो हेही ठीकच पण पुन्हा तोच प्रश्न ! टिळक पुन्हापुन्हा अपवादाचीच चर्चा का करत आहेत ?
सत्याची चर्चा करतानाही टिळकांना मनू आठवतो पुढे शांतिपर्वात भीष्मांनी सुटका होणार असेल तर (मोक्ष ह्या शब्दाचा आर्य अर्थ सुटका असाच होता पुढे तो शैव अर्थाने वापरला गेला ) किंवा सत्य बोलून संशयाने कल्लोळ माजणार असेल तर अशावेळी खोटं बोलणंच योग्य असे जे म्हंटले होते (महाभारत शांतिपर्व १०९ १५-१६) त्याचा स्वीकार टिळक करतात पण पुन्हा तोच प्रश्न येतो टिळक पुन्हापुन्हा अपवादाचीच चर्चा का करत आहेत ?
सत्यापेक्षा ज्यात सर्वांचे हीत आहे ते बोलावे असा उपदेश भीष्म देतात (शांतिपर्व ३२९: १३ २८७ :१९ )आता प्रश्न असा कि सर्वांचे हित कशात आहे हे ठरवणार कोण तर राजसत्ता म्हणजे अंतिमतः काय बोलायचे हे राजसत्ताच ठरवणार ह्यातला मूर्खपणा उघडच आहे भीष्म वैष्णवांची पॉलिसी सांगतायत जी चुकीची आहे वस्तुस्थिती अशी आहे कि राजसत्तेने सत्याच्या बाजूने उभं रहायला हवं आणि जर एखादी राजसत्ता सत्याच्या बाजूने उभी रहात नसेल तर ती केवळ लोकद्रोहच न्हवे तर धर्मद्रोह व राजद्रोहही करत आहे असं खुशाल समजावे
सेंट पॉलने माझ्या खोट्या बोलण्यामुळे जर प्रभूचा महिमा वाढत असेल तर मला पाप कसे लागणार असा प्रश्न विचारून धर्मांतरासाठी आणि बाटवाबाटवीसाठी खोटं बोलण्याची तरतूद केली होती आता एकदा का पॉलचा तर्क स्वीकारला कि मग खोटे चमत्कार खोटे प्रचार ह्यांचा उदोउदो होणे अटळ आपल्याकडे असाच खोटेपणा ब्राम्हणांचा चालतो सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे सर्व देवाच्या नावाने होते पण पुन्हा तोच प्रश्न येतो टिळक पुन्हापुन्हा अपवादाचीच चर्चा का करत आहेत ?
राजकीय पुरुषास कारस्थान लपवण्यासाठी आणि व्यापाऱ्याला माल खपवण्यासाठी खोटे बोलावे लागते असे सिझवीक म्हणतो त्यातील राजकीय पुरुषास कारस्थान लपवण्यासाठी खोटे बोलावे लागते हे टिळक स्वीकारतात पण व्यापाऱ्याला माल खपवण्यासाठी खोटे बोलावे लागते हे टिळक नाकारतात कारण टिळकांचे ब्राम्हणक्षत्रिय पुण्ययोनी प्रेम ! वास्तविक कारस्थाने मुळात करावीच कशाला ? आणि खोटं बोलून जो खपवावा लागतो असा माल ठेवावाच कशाला ? पण टिळकांना कारस्थान चालते कारण टिळक स्वतः राजकारणी होते टिळक अनेकदा गीतेच्या नावाखाली स्वतःच्या किंवा ब्राम्हणांच्या क्षत्रियांच्या कृत्यांचं समर्थन करतात आणि गीता हा अधिकार त्यांना देते गीता भारतीय राजकारण्यांच्यात का लोकप्रिय झाली त्याचे उत्तर टिळकांच्या ह्या मांडणीत आहे
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५३ गीतेत काय आहे धर्म कि आपद्धर्म कर्मजिज्ञासा ४
महाभारतात खोटे कधी बोलायचे ह्याच्या पाच सिच्युएशन्स सांगितल्या आहेत
१ बायकांच्याजवळ
२ थट्टेत
३ विवाहकाळी
४ प्राणावर संकट आले असता
५ मिळकत वाचवण्यासाठी (पहा महाभारत आ ८२ . १६ व शांतिपर्व १०९ व मनुस्मृती ८. ११०)
भारतीय बायकांशी खोटं का बोलतात ते ह्यामुळे कळावे हीच गोष्ट विवाह जुळवतांना बिनदिक्कत खोटं बोलण्याबाबत वैष्णव धर्माने अनुमती दिली आणि बायकांशी खोटं बोलणं आणि विवाह ठरवतांना खोटं बोलणं ही प्रथाच होऊन गेली वैष्णव धर्म हा असा आपल्या नसानसात भिनला आहे थट्टेत खोटं बोलणं योग्य न्हवे पण अपवाद म्हणून सोडता येईल प्राणावर संकट आले असता खोटे बोलणे अपवाद धर्म म्हणून सोडून देता येईल पण मिळकत वाचवण्यासाठी किंवा बायकांशी किंवा विवाहकाळी खोटं बोलणं मला अजिबात मान्य नाही कारण एखादा गुंड कुठलीही मिळकत जबरदस्तीने बळकावून नंतर त्याबाबत खोटं बोलायला मोकळा होईल आपण एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी युधिष्ठर ह्या युद्धात फक्त एकदाच "नरो वा कुंजो वा " असं खोटं बोलला आहे तरीसुद्धा त्याला ह्या खोटं बोलण्यासाठी काही काळ नरकवास सोसावा लागला आहे (महाभारत स्वर्गा ३. १५) व्यास जेव्हा महाभारताच्या शेवटी सगळ्यांच्या कर्मांचा हिशेब मांडायला बसतात तेव्हा ते कुणालाच सोडत नाहीत हे लक्ष्यात घेण्याजोगं आहे ह्यामुळे निर्माण होणारा एक विरोधाभास ना भीष्मांच्या ना पांडवाच्या ना व्यासांच्या ना कृष्णाच्या लक्ष्यात आलाय तो म्हणजे जर का मिळकतीसाठी खोटं बोलण्याची आणि खोटं बोलून संरक्षण करण्याची व्यवस्था मान्य केली तर ह्या व्यवस्थेनुसार दुर्योधन अजिबातच दोषी ठरत नाही आणि सर्व युद्ध निरर्थक ठरते कारण जुगाराने त्याने मिळकत कमावलेली आहे धर्मानुसार जुगारात कमावलेली कमाई परत करायची कि नाही हे ठरवण्याचा अधिकार दुर्योधनाला आहे आणि आता जर का तो खोटं बोलत असेल म्हणजे मिळकत परत करणे समजा त्याने मान्य केले असेल तर मग ह्या व्यवस्थेनुसार त्याला खोटं बोलण्याची अनुमती मिळते आणि तो दोषी ठरत नाही आणि जर का तो दोषी नसेल तर मग युद्ध कशाला ?
ह्याउलट ह्याच महाभारतात भगवान शिवांचे एक वचन आले आहे शिव म्हणतात ,"स्वार्थाकरिता किंवा परहितार्थ किंवा थट्टेनेही जे खोटे बोलत नाहीत ते स्वर्गगामी जातात (पहा महाभारत अनु १४४. १९) शैवांच्यात कुठल्याही सिच्युएशनमध्ये खोटं बोलण्याची अनुमती नाही हे खुद्द महाभारतच सांगते
आपले वचन पाळणे किंवा प्रतिज्ञा पाळणे हे भारतीय संस्कृतीच्या आर्य व शैव ह्या दोन्ही धारात सारखेच महत्वाचे आहे श्रीकृष्णाचे जे काही सर्वोत्कृष्ट गुण आहे त्यात त्याचे शब्द पाळणे व प्रतिज्ञा पाळणे हे येते मला त्याचे जे काही गुण आवडतात त्यात थंड डोक्याने विचार करणे ह्या गुणांनंतर शब्द पाळणे व प्रतिज्ञा पाळणे हे गुण येतात साहजिकच टिळक ह्या गुणांचे समर्थन करतात आणि मी इथे टिळकांशी सहमत आहे
टिळक सत्य आणि अहिंसा ह्यांची चर्चा इतक्या खोलवर का करतायत ? ते एका बाजूला मुख्य धर्म काय आहे ते सांगतायत आणि दुसरीकडे आर्य ज्याला आपद्धर्म म्हणतात त्याची मुबलक उदाहरणे देऊन चर्चा करतात शैव आणि आर्य ह्या दोन्ही धर्मात दुष्टाला प्रथम समजवावे मग घाबरवावे मग वॉर्निंग द्यावी आणि तरीही तो ऐकत नसेल व हिंसक कृत्य कंटिन्यू करत असेल तर त्याच्या हिंसेपासून संरक्षण करण्यासाठी हिंसा करणे मान्य केलेले आहे जैन आणि बौद्ध धर्मातील टोकाची अहिंसा ह्या दोन्ही धर्मांना मान्य नाही मात्र शैवांच्यात हिंसा हा शेवटचा पर्याय आहे आणि तोही संरक्षणासाठी हे सांगणे आवश्यक आहे आपली घटनाही स्वसंरक्षणासाठी अपरिहार्यपणे प्राण वाचवण्यासाठी हिंसा करावी लागत असेल तर तिला कायदेशीर मान्यता देते अट आहे ती हे सिद्ध करण्याची !
सत्य आणि अहिंसा ह्या दोन मुख्य यमांची चर्चा केल्यानंतर टिळक पुढे वेगळ्या मुद्द्याकडे सरकतात तो मुद्दा पुढील भागात !
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५४ गीतेत काय आहे धर्म कि आपद्धर्म कि कार्याकार्यव्यवस्थिती कर्मजिज्ञासा ५
मॅनेजमेंटला गीतेने एक सुंदर शब्द दिला आहे कार्याकार्यव्यवस्थिती ह्याचा शॉर्ट फॉर्म म्हणून आपण व्यवस्थिती हा शब्द वापरू शकतो टिळकांच्या मते गीता ही कार्याकार्यव्यवस्थिती आहे आणि आपण ह्या व्यवस्थितीचा आधार धर्म आहे कि आपद्धर्म हे तपासतो आहे
टिळक सत्य आणि अहिंसा ह्यांच्यानंतर अस्तेय म्हणजे अचोर्यांचा मुद्दा चर्चेला घेतात सध्याच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा आहे दुष्काळात अन्नाची चोरी करावी कि करू नये वैग्रे मिल आणि हॉब्स ह्या दोन्ही तत्त्वज्ञांनी ह्या अवघड परिस्थितीत चोरी हा अपराध न्हवे असे सांगितले आहे टिळक ह्या संदर्भात एक उदाहरण म्हणून विश्वामित्राची कथा सांगतात प्रचंड दुष्काळात विश्वामित्राने आपद्धर्म म्हणून काय काय केले काय काय खाल्ले त्याची ही कथा आहे आणि शेवटी विश्वामित्र सर्वायवलसाठी मरण्यापेक्षा जगणे श्रेयस्कर हे योग्यच असे समर्थन करतो नंतर टिळक व्याध गीतेची चर्चाही करतात जीवो जीवस्य जीवनम हे जीवनाचे सूत्र ह्यानिमित्ताने चर्चेला येते दुष्काळात ब्राम्हणाने कुणाकडूनही खाल्ले तर ते योग्यच असे शास्त्र सांगते असे टिळक म्हणतात ह्यावरचे माझे म्हणणे मी आधी मांडले आहे
ह्याउलट स्वतःच्या देहाच्या जगण्यापेक्षा एखादे उत्तम मूल्य म्हणून एखादी गोष्ट असेल तर त्यासाठी स्वतःच्या देहाच्या त्यागाचीही तयारी असणारे लोक असतात टिळक दधिची गोष्ट घेतात प्रत्यक्षात शैवांच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा अन्वयार्थ वेगळा आहे दधिची शिवभक्त असल्याने आणि त्याने सतीला मदत केल्याने त्याची दक्षाने केलेली हत्या असे ह्या घटनेचे स्वरूप आहे पूर्ण वैष्णव असलेल्या टिळकांना ते दिसणे शक्य नाही स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी लोकांनी हौतात्म्य पत्करले आहे वा प्राणत्याग केला आहे हे मात्र खरे ! स्वातंत्र्यचळवळीत बाबू गेनूपासून भगतसिंगांच्यापर्यंत अनेकांनी केलेला प्राणत्याग प्रसिद्ध आहे प्रश्न आहे ही उदाहरणे नेहमीची आहेत कि अपवादात्मक आहेत माझ्या मते ती अपवादात्मक आहेत
ह्यानंतर टिळक एक वेगळा मुद्दा चर्चेला घेतात
जर राजापुढे अपराधी म्हणून राजाचा स्वतःचा पिता किंवा आचार्य आला तर काय करावे हा तो मुद्दा ! हा मुद्दा टिळक का घेतात ते उघड आहे इन्डायरेक्ट्ली टिळकांना असं सुचवायचं आहे कि भीष्म व द्रोणाचार्य हे अधर्म करत असल्याने त्यांची हत्या ही धर्माला धरून होती टिळकांचा हा आटापिटा केविलवाणा आहे टिळक त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे मनुस्मृतीकडे वळतात मनुस्मृती ह्याबाबत राजाने प्रत्यक्ष पिता व आचार्य ह्यांनीअधर्म केला असल्यास त्यांना दण्ड करावा असे म्हणते असा टिळकांनी दाखला दिला आहे ह्यासंदर्भात टिळक सगर राजाने प्रजेशी नीट न वागणाऱ्या आपल्या असमंजस नावाच्या मुलाला राज्याबाहेर काढले त्याचे उदाहरण देतात पुढे परशुरामाने आपल्या मातेची केलेल्या हत्येचे उदाहरण घेतात मुळात टिळकांना मातृसत्ताक व पितृसत्ताक ह्यांच्या दरम्यानचा हा संघर्ष आहे हे दिसत नाही ते पुराणांनी सांगितलेले झापडबंद अर्थच सांगत राहतात महात्मा फुले एकीकडे पुराणातील कथेचे नवीन अर्थनिर्णयन करत असतांना टिळकांचे सतत पारंपरिक अर्थनिर्णयन स्वीकारत राहणे खटकत राहते टिळकांची ही मर्यादा आहे
पुढे मग ते वयाचा प्रश्न घेतात आणि धर्म कळण्याचा संबंध वयाशी नसतो हे ते सिद्ध करू पाहतात म्हणजे श्रीकृष्ण हा वयाने लहान असला तरी त्याला भीष्म व द्रोणाचार्य ह्यांच्यापेक्षा धर्म नीट कळला होता हे टिळकांना सुचवायचे आहे मरुताने त्याच्या गुरूने स्वार्थासाठी त्याचा त्याग केल्यावर घमेंडीत राहणाऱ्या व काय करावे काय न करावे हे न कळलेल्या गुरूचा वध करावा असे म्हंटले होते त्याचा दाखला टिळक देतात भीष्मही पापी गुरूला मारणारा धर्मज्ञ असा उपदेश देतात त्याचा दाखला टिळक देतात धर्म पाळा नाहीतर धर्म तुमचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही हे मनूचे वचन टिळक देतात थोडक्यात काय अथपासून इतिपर्यंत टिळक मनुस्मृतीने सांगितलेल्या धर्माचा पुरस्कार करतात .
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५५गीतेत काय आहे धर्म कि आपद्धर्म ? कर्मजिज्ञासा ६
गीतारहस्याच्या पहिल्या दोन प्रकरणाची चर्चा इतक्या खोलवर केली कारण टिळकांनी आपण गीतेकडे का वळलो ते ह्या दोन प्रकरणात मांडले आहे गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे असे कायद्याने ठरल्याने गीतेविषयी चर्चा सुरु झाली साहजिकच टिळकांनीही हिंदूंच्या ह्या धर्मग्रंथाची चर्चा सुरु केली युरोपिअन प्रबोधनात ज्याप्रमाणे बायबलविषयी चर्चा झाली तशीच चर्चा गीतेविषयी व्हावी हीच टिळकांची अपेक्षा असावी
एक गोष्ट आपण सर्वांनी लक्ष्यात घ्यायला हवी आपला प्रबोधनाचा प्रोजेक्ट जसा इंग्रजांच्यापासून स्वातंत्र्य मिळवणे ह्या एका गोष्टीच्या दिशेने वहात व वहावत गेला तसाच युरोपियन प्रोजेक्ट हाही
१ चर्चपासून मुक्तता
२ राजेशाहीपासून मुक्तता
ह्या दोन दिशांनी वहात वहावत गेला आपल्याला प्रबोधनाच्या प्रोजेक्टमधील राजेशाहीपासून मुक्तता ही इंग्रजांपासून मुक्तता ह्या स्वरूपात मिळाली मात्र तिकडे विज्ञानाला प्रस्थापित करण्यासाठी चर्चचे पाखंड जेवढ्या मोठ्या प्रमाणात उखडून टाकलं गेलं तितकं आपल्याकडं झालं नाही ह्याचं कारण लोकमान्य टिळकांच्या हिंदुत्ववादाचं सुरवातीलाच केंद्रस्थानी येणं आणि महात्मा गांधींच्यासारख्या गीताशरण धार्मिक नेत्याच्या नेतृत्वाकडं स्वातंत्र्याच्या चळवळीचं नेतृत्व जाणं तिकडेही राजे लोकांना प्रोटेस्टंट धर्माचा आधार मिळाला आपल्याकडे मात्र ब्राम्हो समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज आर्य समाज ह्यांना म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही कारण प्रोटेस्टंट हा जास्त एकसंध पर्याय पुढे आला आपल्याकडे अनेक धर्म असल्याने हा धार्मिक प्रोटेस्ट हा अनेक समाजात व मिशनमध्ये विखुरला गेला म्हणजे
शैव प्रोटेस्ट : बसवेश्वर , गुरु नानक , शिवाजी महाराज , पहिला बाजीराव , महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , साईबाबा
हिंदू प्रोटेस्ट : ब्राम्हो समाज , रामकृष्ण मिशन , सेक्युलर हिंदूवादी काँग्रेस
वैदिक प्रोटेस्ट : आर्य समाज
वैष्णव प्रोटेस्ट : प्रार्थना समाज , भक्तिवेदांत
ब्राम्हण प्रोटेस्ट : टिळकांच्या नेतृत्वाखालची हिंदुत्ववादी काँग्रेस , हिंदू महासभा , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंघ , भाजप
क्षत्रिय प्रोटेस्ट : संभाजी ब्रिग्रेड , आ ह साळून्खे ह्यांचा शिवधर्म
मुस्लिम प्रोटेस्ट : अहमदिया , बहाई
जैन प्रोटेस्ट : विरचंद गांधी , ओशो
बौद्ध प्रोटेस्ट : ज्योथी , जे कृष्णमूर्ती , नवयान (बाबासाहेब आंबेडकर )
अशा अनेक संघटनात तो वाटला गेला
पंथांची सुंदोपसुंदी तिथेही होती पण धर्म एकच ख्रिश्चन धर्म होता भारतात धर्म अनेक त्यामुळे धार्मिक फुटीरता कमाल पातळीवर ! ह्या सर्व फुटीरतेत फक्त वैष्णवच असे होते ज्यांना संत चळवळीची जबरदस्त पार्श्वभूमी असल्याने लोकप्रियता व जनाधार होता साहजिकच तो फोफावला
दुसरी गोष्ट तिकडे फर्स्ट इस्टेट चर्च ब्राम्हणांसारखी सेकण्ड इस्टेट सरंजामशाही क्षत्रिय थर्ड इस्टेट वैश्य व शूद्र फोर्थ इस्टेट गुलाम हा प्रकार हजारो वर्षे होता व तिकडेही गुलामगिरी सर्फडमच्या रूपाने हजारो वर्षे अस्तित्वात होती तरी तिला वर्णजातीसारखे जन्मजात व्यवस्थेचे पाठबळ न्हवते दुसरी गोष्ट तिकडच्या राजे लोकांनी स्वतःच चर्चच्याविरोधात बंड केले व नॅशनल चर्चना पाठिंबा दिला आपल्याकडे १८८० नंतर आपल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कधीही इथल्या प्रोटेस्ट चळवळींना पाठिंबा दिला नाही उलट रोमन कॅथॉलिक प्रमाणे कट्टर असलेल्या ब्राम्हण मुल्ला मौलवी टाईप लोकांच्या मागे ब्रिटिश ठामपणे उभे राहिले म्हणजेच तिकडे जसा प्रबोधनाला शासकीय पाठिंबा मिळाला तसा आपल्याकडे प्रबोधनाला शासकीय व राजकीय पाठिंबा मिळाला नाही साहजिकच समाजसुधारणेची जबाबदारी शासनाने फारशी उचललीच नाही आणि राजकीय लोकांच्यात समाजसुधारणा करायच्या कि नाहीत ह्यावरून वितंड सुरु झाले आपला स्वातंत्र्य चळवळीचा पूर्ण प्रोजेक्ट स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या वैष्णवांनी चालवलेला प्रोजेक्ट आहे मुस्लिमांनी ह्या प्रोजेक्टमध्ये अल्प भाग घेतला आहे ह्याचा एक परिणाम असा झाला कि वैष्णव ठरवतील ती पूर्वदिशा असा संकेत ठरत गेला टिळकांचे गीतारहस्य ह्या साऱ्या प्रक्रियेची एक मुख्य सुरवात आहे
भारतात टिळकांच्यामुळे राजा राम मोहन रॉय ह्यांनी सुरु केलेल्या हिंदूवादी चळवळीला सेट बॅक बसून हिंदुत्ववाद काँग्रेसच्या केंद्रस्थानी आला आणि ह्या हिंदुत्ववादाच्या सेटिंगमध्ये गीतारहस्य ह्या ग्रंथाचा सिंहाचा वाटा आहे पुढे गांधींनीही गीतेचे अनासक्त योगाच्या दृष्टिकोनातून जी मांडणी केलीये ती गीतारहस्यापासून फार वेगळी नाहीये
टिळक आणि गांधी हे दोन मुख्य नेतेच गीतावादी असल्याने आज गीता हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून पूर्णच प्रस्थापित झाली आहे शैवांच्यातील १ आदीशैव २ विश्वंशैव(नकुलीश , काश्मिरी शैवागम , सिद्धांत , नवनाथ संप्रदाय , कापालिक ,अघोर वैग्रे ) ३ नवशैव ह्यांच्यापैकी नवशैवांच्यातील फक्त शीख व लिंगायत हे दोनच पंथ स्वतःची आयडेंटिटी राखून आहेत बाकी बहुतेकांनी ज्ञानेश्वरीवाद स्वीकारून गीतेच्या चरणी आपले शीर कापून दिले आहे कुलदेवता शैव आणि धर्म वैष्णव हा विरोधाभास तर कॉमन झाला आहे आणि ह्या विरोधाभासाला हिंदू असे नाव मिळाले आहे एका अर्थाने टिळकांना मिळालेले हे यश आहे ह्याला काउंटरचेक नंतर फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे जो अजूनही मान्यताप्राप्त नाही बाबासाहेब एव्हढे रामकृष्णांच्या व गीतेच्या विरोधात का बोलतात हेच अनेकांना कळत नाही किंबहुना आंबेडकर एकटेच असे आहेत ज्यांना रामायण महाभारत गीतेमागची मानसिकता नीट कळलेली आहे असो
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५६गीतेत काय आहे धर्म कि आपद्धर्म कि मॅनेजमेंट ? कर्मजिज्ञासा ७
टिळकांची गीतेबाबतची सर्वात मोठी क्रांती कोणती ? तर टिळक हे असे पहिले विचारवंत आहेत जे गीतेचा विचार मॅनेजमेंटच्या अंगाने करतायत पुढे गीतेचा मॅनेजमेंटच्या अंगाने अनेकांनी विचार केला पण त्याचा पाया लोकमान्य टिळकांनी घातला आहे हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे १८२० पासून केवळ ज्ञानाच्या अंगाने चाललेला ब्राम्हणवाद टिळकांनी कर्मप्रधान केला आणि ह्या कर्मप्रधानतेला व्यवस्थापकीय आधार गीतारहस्य लिहून पुरवला
टिळकांच्या भाषेत सांगायचे तर गीता ही वेदांताची कर्माकर्मव्यवस्थितिकी आहे प्रश्न असा आहे कि मॅनेजमेंटचा ग्रंथ धर्मग्रंथ कसा असू शकतो ? ह्या जगात दोन धर्म असे आहेत ज्यांचे धर्मग्रंथ हे असे मॅनेजमेंटचे ग्रंथ आहेत एक हिंदूंचे महाभारत ज्याची गीता ही भाग आहे व दुसरे मुस्लिमांचे कुराण मॅनेजमेंटीय धर्मग्रंथ प्रॅक्टिकल असतात आणि राजकीय लोकांना त्याचा प्रचंड फायदा होतो अनेकदा हे राजकीय लोक धर्माचा धार्मिक ग्रंथांचा आधार घेऊन , सर्व कटकारस्थाने करून प्रसंगी नृशंस होऊन हिंसा करून सत्तेवर येतात पण त्यांची सत्ता जनतेचा सत्यानाश करणारी असते असा इतिहास आहे
जगाच्या इतिहासात मोक्षाच्या अंगाने विचार करणारे नकुलीश , पतंजलीनाथ , कपिल , महावीर , गौतम बुद्ध , लाओत्से असे लोक इसवीसनपूर्व सहाशेच्या आगेमागे झाले पण ह्या सर्वांच्याविरुद्ध प्रतिक्रांती करणारे ग्रंथ नंतर उदयाला आले त्यात वैष्णव , इस्लाम , चायनीज कन्फ्यूशियन व प्रोटेस्टंट धर्मग्रंथांचा समावेश आहे राजकीय व व्यापारी सत्ता प्राप्त करणे हा त्यामागचा उद्देश ह्यातील वैष्णवांनी यादवांची , इस्लामने अरबी मोंगल व तुर्कांची , कन्फ्यूशियन्सने चायनीज व्यापाऱ्यांची , प्रोटेस्टंटने युरोपियन ईस्ट इंडियन कम्पन्यान्ची सत्ता सर्वदूर पसरवली (ज्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कम्पनीही येते ) ह्या सर्व धर्मांना मॅनेजरियल धर्मग्रंथांची गरज होती ही गरज नव्या धर्मग्रंथांनी भागवली गीता ह्याला अपवाद नाही प्रश्न असा आहे कि यादव गीतेसारखा ग्रंथ धर्मग्रंथ असूनही कुराण धर्मग्रंथ असलेल्या अरब तुर्क पठाणांच्याकडून का हरले दोघांचेही ग्रंथ व्यवस्थिति होते तर एक का जिंकला एक का हरला टिळकांना हा प्रश्न पडत नाही कारण मुळात त्यांना शिवाजी महाराज हे का जिंकले हे समजून घ्यायचंच नाही उलट ते ब्राम्हणप्रतिपालक व ब्राम्हणवादी होते असं सिद्ध करण्यात त्यांना जास्त रस आहे जे निखालस चुकीचं व सत्याचा अपलाप करणारं आहे ब्राम्हणांचं वर्चस्व हा टिळकांचा अजेंडा आहे आणि दुर्देवाने गीतारहस्यांमध्ये तो फार उघडपणे येतो श्रीकृष्ण हे काल्पनिक पात्र त्यांना फार उपयोगी पडतं कारण खरा क्षत्रिय हा कपिल ,महावीर , बुद्ध , शिवाजी महाराज ,संभाजी महाराज , शाहू महाराजांच्यासारखा हाडामांसाचा असतो त्याच्यात मानवतावादी कळकळ असते असा मानवतावादी क्षत्रीय टिळकांचा ब्राम्हणवादी अजेंडा का स्वीकारेल ? राम आणि कृष्ण काल्पनिक असल्याने त्यांच्या नावाने काहीही खपवता येते पुराणांच्यात व महाकाव्यांच्यात तेवढी भरताड आहेच आता काही क्षत्रियांना काल्पनिक व्यक्तिरेखा आवडतात हे खरं पण आयुष्यात कधी ना कधी ही जाणीव होतेच कि अस्सल काय आणि नकली काय कारण शेवटी किती वयापर्यंत तुम्ही पौगंड राहणार ?
ह्या दोन्ही महाकाव्यांचा मुख्य विषय युद्ध आहे आणि युद्धाच्या वेळी सांगितले जाणारे तत्वज्ञान हे युद्धाचे आणि अहिंसेचे समर्थन करणारेच असणे अटळ असते अगदी बॉलिवूडच्या ऍक्शन चित्रपटातही हिरो युद्धाचे आणि हिंसेचे समर्थन करत असतात ही तर महाकाव्ये आहेत इथे युद्धाचे आणि हिंसेचे समर्थन अटळच श्रीकृष्णाचे काल्पनिक आयुष्य इतके आणि सतत युद्धाने भरलेले रंगवण्यात आर्य मानसिकतेचा नेमका हेतू काय असावा कि युद्ध सर्वात मनोरंजक असल्याने सर्वाधिक मनोरंजक व्यक्तिरेखा म्हणून हे पात्र असं जतन केलं गेलं आहे कि स्वतःच्या वर्णाचे मिळणारे फायदे आणि त्यांचे समर्थन ह्यासाठी श्रीकृष्ण परफेक्ट व्यक्तिरेखा आहे कि अशा युद्धमय वातावरणाच्या निमित्ताने धर्म सांगितला तर तो अधिक ठसतो अशी स्ट्रॅटेजी आहे ?
आपण बारकाईने पाहिले तर काहीशी अशीच युद्धमय स्थिती मोझेस आणि महम्मद पैगम्बरच्या आयुष्यात दिसते विशेषतः पैगंबरांचे आयुष्य हे सतत युद्धमय स्थितीतून गेलेले दिसते आणि त्याचा सखोल परिणाम कुराणावर म्हणजे त्यांच्या उपदेशावर झालेला दिसतो हे युद्धाचे ओझे आणि त्या अंगाने दिला गेलेला उपदेश शांती निर्माण करण्याऐवजी पुन्हा नवीन युद्धेच निर्माण करणार असेल आणि मानवजातीला सतत युद्धमय वातावरणात ठेवणार असेल तर हे धर्म खरोखर शांती आणतील ह्यावर कसा विश्वास ठेवायचा ? युद्धकालीन उपदेश युद्धच रिपीट करणार कारण सार्वजनिक सुप्तावस्थेत व गुप्तावस्थेत त्या व्यक्तीला घरातल्या धार्मिक संस्कारामुळे सतत युद्धमय स्थितीचा भास होत राहणे अटळ बनते आणि आसपासचे लोक विशेषतः परधर्मीय शत्रू वाटायला लागतात
ऋग्वेद वाचताना आर्यांना युद्ध आणि हिंसा ह्यांच्याखेरीज काही काम न्हवतं कि काय अशीच शंका येते हीच गोष्ट शिवपुराण व शिवलीलामृत वाचतांना शंकराला जे आर्यांनी रौद्र रूप दिले तो सर्व त्यांनी रुद्राविषयी केलेला कल्पनाविलास आहे हा वैदिक ब्राम्हणी रुद्र त्यांनी शंकरावर लादून त्याचीही प्रतिमा हिंसक बनवण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे महाभारतात तर एके ठिकाणी शंकराला डुकराच्या शिकारीवरून अर्जुनाशी भांडताना दाखवलं आहे ह्यातला उथळपणा उघड आहे शेवटी इथेही ह्या भांडणाचा मूळ उद्देश डुक्कर नसून अर्जुनाचे गर्वहरण करणे आहे असेच सांगितले आहे ह्या युद्धात शेवटी महादेव अर्जुनाला संपूर्ण हरवतात आणि मगच अस्त्र देतात भीमाचे गर्वहरण मारुती व अर्जुनाचे गर्वहरण साक्षात शिव करताना दाखवण्यामागचा एक उद्देश सर्वात प्राचीन परंपरेला नमन करण्याचा आहे अर्जुनही भगवान शिवांना नमन करतो आणि आशीर्वाद घेतो महाभारतात हे वारंवार होते अगदी श्रीकृष्णही रामाप्रमाणे शिवभक्त आहे एक गोष्ट दखल घेण्याजोगी आहे अर्जुन तावातावाने लढतो आहे आणि शिव हसत हसत ! भीमाबाबत तेच मारुती हसत हसत ! अनार्य आपणाला का हसतात ह्याचा विचार कधीतरी आर्य करणार आहेत का ?तावातावाने नाही हसत हसत !
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५७गीतेचे खरे स्वरूप काय ? अंतिम निष्कर्ष कर्मजिज्ञासा ८
टिळकांच्या मते गीता अंतिमतः काय आहे ह्या प्रश्नाचा आपण विचार करतोय टिळकांच्या मते गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे जो कर्माकर्मव्यवस्थिती सांगतो गीतारहस्यांच्या पहिल्या दोन प्रकरणात टिळक ही मांडणी करतात व तिसऱ्या प्रकरणाच्या आरंभी हा निष्कर्ष सादर करतात
प्रत्यक्षात आपण हे सिद्ध केलंय कि गीता धर्म सांगत नाही तर आपद्धर्म सांगते त्यामुळे त्याला धर्मग्रंथाचा दर्जा देता येत नाही खुद्द आर्य परंपराच ह्याला मान्यता देत नाही माझ्या मते गीता हा कधीच धर्मग्रंथ न्हवता तर संपूर्ण महाभारत हा ग्रंथ स्मृती वाङ्मयात वैष्णव यादव काळात वैष्णवांची व मुस्लिम काळात हिंदूंची स्मृती म्हणून मान्य केला गेला आहे आणि गीता ह्या महाभारत नामक स्मृतीचा केवळ एक भाग आहे महाभारत हे जन्मानुसार वर्णव्यवस्था स्वीकारते म्हणून वैष्णवही व मुस्लिम काळात हिंदूही जन्मानुसार वर्णव्यवस्था स्वीकारतात महाभारत ह्या स्मृतीने सांगितलेल्या धर्माचा एक भाग आपद्धर्म आहे आणि ह्या आपद्धर्माची कर्माकर्मव्यवस्थिति म्हणजे भगवदगीता होय
मुस्लिम काळात समग्र एत्तद्देशीय भारतीयांच्यावर ब्राम्हणांनी व मुस्लिम राज्यकर्त्यांनीही हिंदू धर्म लादला व ब्राम्हण व शूद्र अशी द्विवर्णीय व्यवस्था निर्माण केली कारण मुस्लिम राजांना मुस्लिमांचं काय करायचं ह्याविषयीचं स्पष्ट मार्गदर्शन शरियतद्वारा मिळत होतं प्रश्न होता तो गैरमुस्लिम गैर इस्लमिक प्रजेला हाताळायचं कसं हा ! ह्याबाबतचे धोरण हळूहळू विकसित झालं ते पुढीलप्रमाणं
१ हळूहळू सर्व हिंदूंना मुस्लिम करणं
२ जे हिंदू होणार नाहीत त्यांना गुलाम बनवणं व त्यांच्याकडून गुलांमांना असाइन केलेली कामे करवून घेणे
३ ज्यांना गुलाम करता येणार नाही व ज्यांना मुस्लिम करता येणे शक्य नाही अशा राजपूतांसारख्या वा मराठ्यासारख्या वा जाटांसारख्या वा शिखांसारख्या बलाढ्य गैरमुस्लीमांना मांडलीक बनवून त्यांना आपल्या दरबारात मनसबदारी देऊन आपल्या अंकित ठेवणे त्यासाठी त्यांच्या घराण्यातल्या स्त्रियांशी विवाहसंबंध करणे व ठेवणे
४ जे सामान्य आहेत पण ज्यांना आपला धर्म त्यागायचा नसेल त्यांना शासनाच्या सवलती नाकारणे शक्य असेल तर जिझिया लादणे व त्याबदल्यात संरक्षण देणे
इस्लाममध्ये धर्मांचे दोन प्रकार सांगितलेत
१ किताबी
२ गैरकिताबी
ब्राम्हणांनी ह्या काळात रामायण व महाभारत ह्यांना स्मृती शरियत म्हणून सादर केले कारण वेद परंपरा मौखिक म्हणजे गैर किताबी होती आणि एखाद्या मुस्लिमाने त्यांना हात लावणे ब्राम्हणांना मंजूर न्हवते ह्यावर तडजोड म्हणून रामायण महाभारताचा उदय स्मृती म्हणून झाला साहजिकच ब्राम्हणधर्म वैष्णवधर्म व हिंदुधर्म हे सर्व हिंदुधर्म झाले व रामायण महाभारत पुराणे शरियत ग्रंथ होऊन त्यांचा झपाट्याने प्रसार झाला मुस्लिम बादशहांनी त्यांना प्रोत्साहनच दिले शैव किताबी नसल्याने फाफलले आणि ब्राम्हणांनी लिहिलेली शैव पुराणे त्यांची अधिकृत ग्रंथावली बनली ब्राम्हणांनी हे करून जिझियापासून मुक्तता मिळवली खरी पण ब्राम्हणेतरांना कायमचे अंधारात गाडून टाकले
पुढे सम्राट अकबराने व मलिक अंबरने हळूहळू ही परिस्थिती बदलली पण औरंगजेबाने तिचे पुनर्जीवन केले
ह्यावेळी गैरमुस्लिमांना संघटित करण्याची जबाबदारी ब्राम्हण क्षत्रियांच्यावर होती पण ह्या दोघांनीही ही जबाबदारी पार पाडली नाही ब्राम्हणांनी तर ह्या काळात स्वार्थाचा कळस गाठून वैष्णवधर्मात असलेली चातुर्वर्णीय व्यवस्थाही मोडीत काढली आणि ब्राम्हणेतरांना शूद्र बनवले ह्याला अपवाद शैव राजवटी होत्या ज्या त्या त्या राजाच्या दंडनीतीनुसार चालत होत्या ब्राम्हणांनी केरळ व महाराष्ट्रात प्रथम ही द्विवर्णीय हिंदू धर्मव्यवस्था आणली जिला शिवाजी महाराजांच्या शैव राजवटीने शह दिला दुर्देवाने उत्तरपेशवाईत मनुस्मृतीने कमबॅक केला
ब्रिटीश ख्रिश्चन होते आणि त्यांनाही ख्रिश्च्नांचे काय करायचे हे माहित होते प्रश्न गैरमुस्लिम व गैरख्रीश्चन असणाऱ्यांचं काय करायचं हाच होता इस्लाममध्ये धर्मग्रंथ व धर्मशास्त्र हे तितकेसे भिन्न नाहीत ज्युडायिक परंपरेत धर्मग्रंथ व धर्मशास्त्र ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत तालमूद व ओल्ड टेस्टामेन्ट अशी ही परंपरा आहे हिंदूंचे तालमूद कोणते व टेस्टामेन्ट कोणते असा हा प्रश्न होता मुस्लिमांच्यापुढे ब्राम्हणांनी आम्हीच समस्त आर्यांचे व शैवांचे(अनार्यांचे ) प्रतिनिधी म्हणून स्वतःला सादर केले होते तेच त्यांनी ब्रिटिशांच्यापुढे केले ब्राम्हणांनी त्यांच्यापुढे स्मृती विशेषतः मनुस्मृती ह्या धर्मशास्त्र म्हणून तालमूद म्हणून व वेद वाङ्मय व गीता (श्रुती ) हे टेस्टामेन्ट म्हणून सादर केले भारतीय अनार्य शैव परंपरेविषयी अडाणी असलेल्या ब्रिटिशांनी हे स्वीकारले
बारकाईने पाहिले तर हा सगळा घोळ आपण परकीय आक्रमकांच्यापुढं हरलो त्यामुळे झाला हे स्पष्टच आहे वास्तविक कुठल्याही जमातीने ह्या दारुण पराजयांनंतर आपण का हरलो ह्याची मीमांसा केली असती पण ब्राम्हण इतके नतद्रष्ट कि मीमांसा करण्याऐवजी ज्या धर्मशास्त्रांनी तयार केलेल्या वर्णव्यवस्थांमुळे आपण हरलो त्या वर्णव्यवस्था प्रमोट करणाऱ्या धर्मशास्त्रांना स्मृतींना ब्रिटिशांच्यापुढं व नंतर ब्रिटिशकाळात ब्राम्हणांनी प्रमोट केले प्रश्न हाच पडतो ब्राम्हणांची मानसिकता नेमकी आहे तरी काय ? कि आपल्या वर्णाचं भलं झालं कि झालं मग त्यासाठी बाकीचे वर्ण मेले तरी चालतील अशी ही मानसिकता आहे ? ब्राम्हणांनी एकदा स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा कि ब्राम्हणांची सामूहिक मानसिकता काय आहे ? ह्याला लोकहितवादींच्यासारखे अपवाद आहेत पण असे ब्राम्हण मूठभरपण नाहीत
टिळकसुद्धा कसलंही आत्मनिरीक्षण न करता इतके आंधळेपणाने स्मृतीप्रामाण्य स्वीकारतात कि ह्या बधिरपणापुढे आपण केवळ अचंबित होऊ शकतो ह्या बधिरपणामुळेच गीतेतल्या आपद्धर्माला टिळक धर्म म्हणतात आणि वारंवार जी उदाहरणे अपवाद आहेत किंवा भीषण आहेत ती धर्मपालनाची उदाहरणे म्हणून सादर करतात श्रीकृष्णाला पूर्णावतार म्हणून सादर करण्याच्या बधिर मानसिकतेतून हे घडते अगदी विसाव्या शतकात असाच बधिरपणा रजनीश ओशो करतात ते श्रीकृष्णाचा आव आणतात आणि राजनीशपुरममध्ये आपल्या शिष्यांना धर्माच्या नावाखाली मजूर म्हणून राबवतात वाटेल ती मनमानी आणि ऐयाशी करतात आणि मग अमेरिकेने कायद्याचा बडगा दाखवला कि जगभर कांगावा करून पूर्णावताराचा शौक असलेल्या भारतात सेटल होतात
थोडक्यात काय गीता ही आपद्धर्माची व्यवस्थिती म्हणूनच बघायला हवी अन्यथा आतापर्यंत इतिहासात जे पराजयाचे अनर्थ झाले तेच पराजय व अनर्थ रिपीट होतील भारत हा जर आपणाला मजबूत देश बनवायचा असेल तर गीता ही आपद्धर्माची व्यवस्थिती म्हणूनच बघायला हवी ब्राम्हणांचं भलं त्यातच आहे त्यांना ते तस पहायचं नसेल तर निदान ब्राम्हणेतरांचं भलं ब्राम्हणेतरांनी ओळखावं हे उत्तम !
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५८
मराठी माणूस आणि कर्मयोग १ श्रीधर तिळवे नाईक
भारतीय परंपरेत अनेक गीता आहेत हे आपण पाहिलं टिळकांनी ह्या गीतांची केलेली चर्चाही आपण पाहिली त्यानंतर टिळक हे गीतेकडे काय दृष्टीने पाहतात तेही पाहिलं टिळकचिकित्सा तीही त्यांच्या मूळ लेखनाच्या आधारे आपण करतोय त्यांच्या लेखनाच्या आणि हिंदुत्ववादाच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींची चर्चा आपण करतोय समर्थक आणि विरोधक अश्या दोन कॅम्पमध्ये कुठलाही विचारवंत वाटायचा आणि मग त्यावर अनेकदा मूळ लेखन न वाचताच ऐकीव गोष्टींच्यावर विश्वास ठेवून भांडत बसायचं असा काळ असल्याने समतोल विचार करू पाहणाऱ्या लोकांना सध्याच्या जगात वाचक मिळणे हे थोडे दुरापास्त आहे ही मर्यादा स्वीकारूनच आपण लेखन करतो आहोत
टिळकांच्या गीतारहस्यात कर्माचा विचार हा तिसऱ्या प्रकरणापासून होतो आर्य परंपरेत जैमिनी सूत्रांचा प्रारंभ अथातो धर्मजिज्ञासा ह्या वाक्याने होतो कारण आर्यांचा धर्म हा यज्ञधर्म आहे आणि वेद हे यज्ञमंत्र आहेत हे मंत्र सुरवातीला टोळीमंत्र होते पुढे त्यांच्याविषयी श्रद्धा निर्माण झाली आणि पुढे स्मृतीकाळात स्मृतीं ब्राम्हणे आरण्यके ह्यांच्या आधारे कायदे निर्माण करून ब्राम्हणधर्म निर्माण करण्यात आला जो हर्षवर्धन काळापर्यंत टिकला
ह्याउलट बादरायणाच्या ब्रम्हसुत्रांचा आरंभ हा अथातो ब्रम्हजिज्ञासा ह्या वाक्याने होतो ह्यावरून हे स्पष्ट व्हावे कि आर्य परंपरा धर्म व ब्रम्ह ह्यांना भिन्न समजते धर्म आणि मोक्ष ह्यांना भिन्न समजते टिळक कर्मजिज्ञासेविषयी अशीच सुरवात करतात आणि अथातो कर्मजिज्ञासा म्हणत कर्ममीमांसा करतात ह्यामुळे धर्म , मोक्ष व कर्म अशी त्रयी तयार होते संसारात कर्मे कशी करावी त्याचा हा उपदेश आहे कुठे अडते हे कळल्यावर पाऊल पुढे पडते
भारतीयांना कर्माविषयीं जिज्ञासा उरली आहे का विशेषतः मराठी माणसाला ? जर ती उरली असती तर टिळकांच्या कर्मयोगाचे पुन्हा पुन्हा परीक्षण झाले असते पण वायफळ आणि बिनबुडाच्या चर्चा करून आयुष्य वाया घालवण्याची खोड सांप्रतच्या मराठी माणसाला जडली आहे साहजिकच निकम्मेपणा हे मराठी संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहे अशावेळी कर्मयोगाची चर्चा मराठी लोकांना वांझोटी वाटली तर आश्चर्य न्हवे पाश्च्यात्य मोटिवेशनल पुस्तके वाचून कर्मयोग समजून घेणाऱ्या व एतद्देशीय कर्मयोगावरील ग्रंथांना विसरणाऱ्या मराठी संस्कृतीला करंटीच म्हंटले पाहिजे मराठी विचारवंत जोवर कर्मप्रवण होते तोवर त्यांना किंमत होती आता ही स्थिती उरलेली नाही
घोकलेली शास्त्रे कार्यान्वित केली कि त्यांच्या मर्यादा कळतात त्यामुळे कर्मयोग केवळ घोकून चालणार नाही तर तो कार्यान्वित केला पाहिजे म्हणजे त्याचा विकास होईल मराठी व भारतीय माणसाने काय करावे व काय करू नये असा प्रश्न आज निर्माण झाला आहे अर्जुन कर्मसंन्यास घेऊन हा प्रश्न सोडवू इच्छितो हे माझ्या मते चुकीचेच आहे कर्मसंन्यास हा कुठल्याही समस्येचा उपाय नसतो ब्रम्हज्ञानाच्या व धर्मज्ञानांच्या मोठ्या मोठ्या वार्ता अर्जुन करतो आहे आणि श्रीकृष्णाला त्याच्या पिंडाशी सुटेबल वाटत नाही श्रीकृष्णाचा हा निष्कर्ष योग्यच आहे जर कर्मसंन्यास ही अर्जुनाची प्रवृत्ती असती तर आरण्यवासातच त्याने तो घेतला असता अर्जुनाची प्रवृत्ती ही कार्मिक प्रवृत्ती आहे साहजिकच त्याने कर्म केले पाहिजे श्रीकृष्णाला हे अचूक कळले आहे
युद्ध हे कुठल्याही योद्धयाला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी असते आराम करून हाडाचा सैनिक अनेकदा कन्टाळलेला असतो त्यामुळे हे युद्ध योद्धयांचे उत्साह वाढवणारे ठरेल असे वाटत असतानाच अर्जुनाला कर्मसंन्यास घ्यायचा आहे जो अनुचित आहे प्रश्न असा आहे कि अशावेळी आक्रमण करावे का ? श्रीकृष्णाने शिष्टाई केलीये खरी पण ती मनापासून केलेली नाही भावाभावांच्यात शिष्टाई कशी करू नये त्याचा नमुना म्हणजे ही शिष्टाई आहे किंबहुना श्रीकृष्णाला नवीन धर्म व त्या धर्मानुसार चालणारे नवीन धर्मराज्य निर्माण करावयाचे आहे हे अगदी मूळ महाभारतातही स्पष्टपणे मांडलेले आहे आणि हा नवीन धर्म कोणता त्याचे कायदेकानून कोणते ह्याची अत्यंत स्पष्ट मांडणी आपणाला रामायण व महाभारतात केलेली मिळते ह्या धर्माचा उपदेश विदुर नीती , शांतिपर्वातील भीष्म दर्शन , युधिष्ठर निवेदने , गीता ह्यांच्यामार्फत आपणाला केला जातो हा धर्म व्यासनिर्मित आहे आणि व्यास आपणाला तो वेगवेगळ्या पात्रांच्याद्वारे सांगत आहेत व्यासांच्यासाठी श्रीकृष्ण हेही केवळ एक पात्र आहे ह्या पात्राला देवत्व लाभेल असं खुद्द व्यासांना वाटले न्हवते ही डेव्हलपमेंट नंतरची आहे जी अनपेक्षित आहे व्यासांनी महाभारत लिहून आर्यांच्या धर्मप्रवाहाला तिसरा टप्पा दिला व त्यातूनच पुढे वैष्णव धर्माची स्वतंत्र निर्मिती झाली व्यासांच्या ह्या धर्मात वाल्मिकीने रामायण लिहून भर टाकली
व्यास श्रीकृष्णाद्वारे आपदधर्म , त्याचे स्वरूप ह्यांची मांडणी करत आहेत ह्याचा विस्तार पुढे शंकराचार्यांनी किंवा सौतीने पुढे केला एका अर्थाने टिळकांचा शब्द उसना घेऊन सांगायचे तर ही कर्मजिज्ञासा व तिचे उत्तर असे महाभारताचे स्वरूप आहे आर्यांचा ब्राम्हणधर्म हा ज्ञानकेंद्री व कर्मकांडकेंद्री होता व्यासांनी तो बदलून कर्मकेंद्री केला
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १५९
माणूस आणि कर्मयोग कर्म म्हणजे काय २ श्रीधर तिळवे नाईक
कर्मे करण्याची शैली , चातुर्य आणि कुशलता म्हणजे कर्मयोग अशी सुरवात करून श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मसंन्यासाने तुला स्वर्ग मिळणे दूर उलट तुझी दुष्कीर्ती होईल असे गीतेत म्हणतो वैष्णव धर्माचा मेल्यांनंतर मनुष्य त्याच्या कर्मानुसार स्वर्ग वा नरकात जातो ह्यावर विश्वास आहे हे इथे स्पष्ट आहे पुढे ह्यात वैकुंठाची भर पडली आहे अर्जुनाला भय आहे कि आप्तांना मारल्याने आपण नरकात जाऊ आता आप्तांना मारून नरकात जायचे नसेल तर काय करायचे तर श्रीकृष्ण ह्याचे उत्तर देतो कर्मयोग साधून ! कर्मयोग साधत ह्या हत्या केल्या तर पाप लागणार नाही व त्यामुळे नर्कातही जावे लागणार नाही ह्याची खात्री श्रीकृष्ण देतो (प्रत्यक्षात महाभारतात अर्जुनाला पाप लागून नरकवास झाला आहे आणि जैनांनी इतक्या लोकांच्या हत्येला जबाबदार म्हणून श्रीकृष्णाला लाखो वर्षाच्या नरकवासाची शिक्षा मिळाली असे सांगितले आहे )
कर्मयोगाबाबत कर्म म्हणजे काय हा सर्वात मूलभूत प्रश्न आहे टिळकांच्या मते कृ ह्या धातूपासून हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ
१ करणे
२ व्यापार
३ हालचाल
असा होतो आणि भागवद्गीतेला हेच अर्थ अपेक्षित आहेत कर्म हा शब्द कम्म ह्या पाली अर्धमागधी भाषेचे संस्कृत रूप आहे कम्म ह्या शब्दाला मराठी समांतर शब्द काम आहे मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे जो हालचालींना हव्या त्या दिशेने वळवून त्यांचे रूपांतर कर्मात वा कामात करतो
आपण ह्या आधीच्या प्रकरणात पाहीले होते कि क्रियांचे स्थितीनुसार खालील प्रकार होतात
१ सुप्त स्पंद ह्या इंद्रियांना अनेकदा कळतच नाही
२ गुप्त कणतरंग ह्या पूर्वी कळत नसत पण विज्ञानाने व तंत्रज्ञानाने ह्या आपल्या आकलनाच्या कवेत आणलेत
३ निद्रिस्त हालचाल हालचाली सहज स्वाभाविक असतात आणि अनेकदा त्या प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या झोपेतही घडू शकतात
४ प्रकट कम्म अथवा काम अथवा कर्म प्रकट अवस्था ही सर्वांनाच दिसते त्यामुळे तुमची कर्मे कामे सर्वांना दिसतात किंबहुना अनेकदा ती दिसावीत म्हणूनही केली जातात
५ जागृत कृती इथून पुढे मनुष्याचे वैभव सुरु होते कारण काम करतांना कामाचे जागृत भान असणे awakening हे फक्त माणसाबाबत घडू शकते
६अवधानी कर्तव्य इथे फक्त भान असत नाही तर अवधानही {अवेअरनेस } असते
७ उन्नत कार्य कर्तव्यात अहंकार असतो मी काम करतोय हे माहित असते कार्यात अहंकार लुप्त होतो
८ मुक्त लीला इथे शुद्ध अहंकाररहित भानरहित आत्मरहीत आनंदक्रिया असते
टिळकांनी कर्म ह्या शब्दाचा जो अर्थ दिलाय त्यांचा क्रम मी बदलून तो १ हालचाल २ व्यापार ३ करणे असा करतो म्हणजे काम अथवा कम्म अथवा कर्म ह्याचा नेमका अर्थ आपणाला कळेल कर्मात अवयवांची शरीराची हालचाल असतेच पण ह्या हालचालींचा समोरच्या गोष्टीशी त्या गोष्टीच्या हालचालींशी व्यापारही होतो हा व्यापार इंद्रियांचा असू शकतो तसा विचारांचा असू शकतो किंवा भावनांचाही असू शकतो ह्या व्यापारांनंतर मनुष्य काहीतरी करतो कामात कर्मात ह्या तिन्ही गोष्टी घडतात करणे संपले कि आपण म्हणतो माझे काम संपले पण हेच काम आपण पूर्ण जागृत राहून कुशलतापूर्वक केले कि ती कृती होते एरव्ही आपण आपल्या आयुष्यात कामच करत असतो अनेकदा तर सवयीने करत असतो त्यामुळे त्यात अनेकदा तोचतोचपणा येतो व परफॉर्मन्स घिसापीटा होतो क्रियावान जागृत कृती म्हणजे सवय मोडून भान राखून काम करणे ताजी कृती करणे
जैमिनी दर्शन ज्याला पूर्वमीमांसा म्हणतात यज्ञयागालाच स्वर्ग मिळवून देणारे कर्म समजायचे यज्ञयाग म्हणजेच धर्म अशी वैदिकांची समजूत होती जैमिनी सूत्रे त्या समजुतीला एक व्यवस्थित मांडणी पुरवतात ज्या वस्तूविषयी मनुष्याला प्रीती आहे ती वस्तू प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे पुरुषार्थ होय अशी जैमिनी दर्शनाची पुरुषार्थाची व्याख्या आहे वैदिक इच्छेला पाप समजत नाहीत उलट तिला पुरुषार्थ समजतात
श्रीधर तिळवे नाईक
आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १६०
यज्ञकर्म , ब्रम्हकर्म व भक्तीकर्म श्रीधर तिळवे नाईक
आर्यांची सामाजिक व्यवस्था ही सुरवातीला त्रैवर्णिय होती ब्राम्हण क्षत्रिय व विश ! तत्कालीन अनेक आदिवासी टोळीसमाजाप्रमाणे व संघसमाजानुसार आर्यांच्यावर वर्चस्व होते पुरोहित विप्र ब्राम्हण वर्णाचे ! सुरवातीला ब्राम्हणक्षत्रिय दोघेही धर्माधिकारी होते पण कालांतराने धर्मसत्ता व राजसत्ता वेगळ्या झाल्या व धर्मसत्ता व राजसत्ता दोघांनी वाटून घेतल्या विश वर्ण ह्यात कुठेच न्हवता हा सामान्य आर्यांचा वर्ण होता ज्याला यज्ञधर्मात फारसे धार्मिक अधिकार न्हवते त्याकाळी लढाईत पराभूत झालेल्या प्रतिस्पर्धी लोकांना गुलाम केले जाई . ह्यात जसे अनार्य असत तसे आर्यही असत अनेक आर्य गुलामांच्या कथा आपणाला आर्य वाङ्मयात आढळतात कालांतराने ह्या ब्राम्हण व क्षत्रिय लोकांनी धर्मसत्ता व राजसत्ता आपल्याच घराण्यात राहावी म्हणून ती जन्मदत्त करून टाकली व विश व गुलाम कायमचे जन्मदत्त विश व गुलाम झाले सुरवातीला हे सर्वच विश होते पण हळूहळू गुलामांची लोकसंख्या वाढत गेली तशी त्यांचे काय करायचे हा प्रश्न उभा ठाकला आणि शेवटी त्यांच्यासाठी शूद्र हा चौथा वर्ण निर्माण करण्यात आला
ह्या आर्य विश धर्मियांचा संपर्क गुलाम बनलेल्या अनार्यांशी यायला लागला आणि त्यातून जन्माला आला वासुदेव धर्म हा विश व अनार्य लोकांनी जन्माला घातलेला धर्म होता ब्राम्हण क्षत्रिय वर्णियांच्या दृष्टीने अडाणी लोकांनी जन्माला घातलेला धर्म ! वासुदेव हा ह्या सामान्य आर्य लोकांचा देव ! एलिट सूर आर्यांनी त्याच्याकडे सुरवातीला दुर्लक्ष्य केले खरे पण सामान्य आर्य लोकांच्यातली त्याची लोकप्रियता वाढतच राहिली
आर्यांच्यात सूर आर्य व असुर आर्य असे दोन प्रकार होते आणि श्रीकृष्णासारखे लोक असुर आर्य होते अगदी रामही असुर आर्य होता कपिल ,महावीर व गौतम बुद्ध हेही असुर होते असुर हे क्षत्रियप्रधान होते आणि त्यांना ब्राम्हणांचे वर्चस्व मान्य न्हवते साहजिकच संघर्ष अटळ होता पुढे असुर वेगळे होत बहुतांशी असुर झोरॅष्ट्रियन झाले आणि भटकत भटकत अनेकजण इराणमध्ये सेटल झाले काही भारतात होते त्यांनी ब्राम्हणधर्माला चॅलेंज द्यायला सुरवात केली त्यातून उपनिषदे जन्मायला लागली उपनिषदांनी स्पष्टपणे यज्ञकर्मामुळे मोक्ष प्राप्त होत नाही अशी ठाम भूमिका घेऊन कर्माची
१ ब्रम्हकर्म
२ यज्ञकर्म
अशी विभागणी केली
उपनिषदांच्या उदयानंतर आर्यांच्या ब्राम्हणधर्माला आव्हान उभं राहीलं ब्राम्हणधर्माला ब्राम्ह्णणप्रभुत्वाला क्षत्रियांनी दिलेले हे आव्हान होते आर्यांच्यातले हे दोन पुण्ययोनीतले गट पण धर्मावर वर्चस्व कुणाचे ह्यावरून कायमच भांडत होते ब्राह्मणधर्म हा यज्ञकर्माला सर्वस्व समजत असे व स्वर्ग नरकाची प्राप्ती यज्ञकर्मानुसार मिळते अशी त्याची ठाम समजूत होती क्षत्रियांना ह्याविषयी रास्त शंका होत्या आणि त्याविषयीची उत्तरे मिळत न्हवती ब्राम्हणांनी नंतर क्षत्रिय राजकन्यांच्यावर हक्क सांगायला सुरवात केली आणि हे क्षत्रियांना असह्य होणे स्वाभाविक होते
ज्यावेळेला ब्राम्हण व क्षत्रिय असे भांडत होते त्याचवेळेला आर्यांच्यात शेती व व्यापार वाढीला लागला व ह्या नव्याने उदयाला आलेल्या व्यापारी व कामगार समुदायाला स्वतःचा सापडलेला वासुदेव धर्म हा सर्वश्रेष्ठ वाटायला लागला त्यांनी वासुदेवाची मंदिरे उभी करायला सुरवात केली त्यांचे इराणी आर्यांशी सतत संपर्क यायला लागले तिकडे अग्निमंदिरे उभी रहायला लागली इकडे शैव मंदिरे होतीच आता वासुदेव मंदिरेही उभी राहायला लागली ह्यांनी आर्य संस्कृतीत भक्तीकर्म हे तिसरे कर्म जन्माला घातले ह्या वासुदेव धर्माचा स्वर्ग नरकावर विश्वास होता हा आर्यांच्यातला सामान्य आर्यांचा धर्म असल्याने त्याच्याविषयी आजसुद्धा अनेक ब्राम्हण क्षत्रिय विचारवंत मौन पाळतात
ह्याचवेळेला ब्राह्मणधर्माविरुद्ध सर्वंकष बंड करून सांख्य , जैन व बौद्ध धर्म जन्माला आले ज्याविषयी अनेकदा चर्चा केली आहे ह्याचा अर्थ व्यासांच्यापुढे तीन प्रकारचे धर्म उभे होते
१ पारंपरिक यज्ञकर्म मानणारे वैदिक व ब्राम्हणधर्म
२ उपनिषदीय , सांख्य , जैन , बौद्ध असे ब्रम्हकर्म मानणारे क्षत्रिय धर्म
३ वासुदेव हा वैश्य व शूद्रांचा धर्म
व्यास स्वतः ब्राम्हण होते क्षत्रियांचे गुरु होते पण आईकडून कोळी त्यामुळे पारंपरिक यज्ञकर्म मानणारे वैदिक व ब्राम्हणधर्म ,उपनिषदीय , सांख्य , जैन , बौद्ध असे ब्रम्हकर्म मानणारे क्षत्रिय धर्म व वासुदेव हा वैश्य व शूद्रांचा धर्म ह्यांची सांगड घालणे मानसिकदृष्ट्या त्यांना आवश्यक वाटत होते त्यामुळे त्यांनी एक असा नायक निर्माण केला जो प्राचीन कुळानुसार वैश्य होता पण आता अर्वाचीन कुळानुसार क्षत्रिय बनला आहे ही तीच स्थिती होती जी मौर्य व गुप्त ह्या घराण्यांची होती हे मूळचे वैश्य होते पण आता क्षत्रिय बनले होते ह्या दोन्ही घराण्यांच्या राजवटीत महाभारताची लोकप्रियता वाढीस लागली कारण खुद्द लेखक व नायक दोघेही प्राचीन कुळानुसार वैश्य व अर्वाचीन कुळानुसार क्षत्रिय होते
व्यासांनी अत्यंत हुशारीने ह्या तिन्ही धर्माची सांगड घालून वैष्णव धर्म निर्माण केला आणि गीतेत त्याचे स्पष्ट प्रतिबिंब पडले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा