विराज जगताप ह्याच्या हत्येचा तीव्र निषेध !

पुन्हा पुन्हा अशा हत्या का घडतात ?

एकेकाळी ब्राम्हण समुदायाला ह्या संदर्भात धारेला धरून काम संपत होते पण जातीयता सर्वांच्याच हाडीमांसी खिळलीये हे अशा हत्यांवरून आता स्पष्ट आहे ह्यातून प्रश्न निर्माण होतो इतकी वर्ष काय घंटा प्रबोधन झालं ? शिक्षणानंही धर्मव्यवस्था आणि वर्णजातव्यवस्था बदलत नसेल तर ज्ञानाने सर्व बदलेल ह्या गृहीतकाचं करायचं काय ? खोटी प्रतिष्ठा आणि समाज काय म्हणेल ह्या दोन गोष्टी शिक्षणांनंतरही बदलत नाहीत हा अनुभव आहे ज्या समाजात प्रेम करण्याचा हक्क नसतो त्या समाजात बाकी हक्क म्हणजे बोलबच्चनगिरी ठरते प्रेमसुद्धा अरेंज करता येते हा भारतीयांचा विश्वास आहे का ?

विवाहाला समोरची व्यक्ती पात्र आहे कि नाही ह्याची कसोटी वर्ण अथवा जात असूच शकत नाही आणि वर्ग आणि संस्कार ह्या कसोटीचा विचार पालकांनी करावा हे नैसर्गिक आहे पण त्या त्या व्यक्तीशी ह्याबाबत आपण किती अड्जस्ट होऊ शकतो हा विचार त्या त्या प्रेमात पडलेल्या व्यक्तींनी करावा हे उत्तम ! पाल्याचा निर्णय  पालकांनी स्वीकारायचा आहे जो स्वीकारला जात नाही बाकी प्रेम आहे कि नाही हे फक्त ते दोन प्रेमीच ठरवू शकतात कारण हा खाजगी एहसास आहे

प्रेमविवाह म्हणजे थोर आणि अरेंज मॅरेज म्हणजे मागासलेपणा असं आपल्या समाजात मानता येत नाही एक आचार्य म्हणून मी दोन्ही पद्धतीचे विवाह लावले आहेत अशा घटनांत मला नेहमीच प्रश्न पडतो हत्या होण्यापर्यंत प्रकरण पोहचलेच कसे ? दोन्ही बाजूचे शहाणेसुरते लोक नेमकं काय करत होते ?अशा प्रकरणात दोन्ही बाजूंशी खूप विचारविनिमय करावा लागतो हा माझा अनुभव आहे अनेकदा त्यांचा राग समजून घ्यावा लागतो त्या रागाच्या मुळाशी परंपरेचे ओझे असते आणि ते खूप हलक्या हाताने काढावे लागते कधी कधी कठोर व्हावे लागते माझ्या क्सक्सक्सक्सक्सक्स  नावाच्या मित्राच्या बापाने मला तू हे लग्न कॅन्सल करायला नकार दिलास तर मी आत्ता इथून (पाचव्या मजल्यावरून )उडी मारतो म्हणून मला धमकी दिली होती आणि मी थंडपणाने म्हणालो होतो मारा कारण तो उडी मारणार नाही ह्याची मला खात्री होती अर्थातच उडी मारली नाही आणि लग्न थाटामाटात झाले

आंतरजातीय प्रेमप्रकरण असेल तर मुळात दोन्ही प्रेमींनी शहरातील व गावातील ज्येष्ठ लोकांशी मसलत करणे फार आवश्यक असते तुम्ही जर मिसफिट प्रेमी वा प्रेमिका घेऊन जाणार असाल तर राग स्वाभाविक आहे . नोकरी धंदा न करता लग्न करायला निघालेले शहाणे मी पाहिलेत अशावेळी ज्येष्ठांनी नेमका काय मुद्दा आहे त्याची उकल करणे आवश्यक असते माझा मित्र  सुनील तर एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडला पण ज्येष्ठांनी फार समजूतदारपणाने प्रेमप्रकरण हाताळले आणि प्रेमीही खूप समजूतदार होते आणि अगदी पत्रिका छापून लखनोसारख्या शहरात हे आंतरधर्मीय लग्न झाले अशा प्रकरणात फक्त जातीच्या अंगाने चर्चा करण्यापेक्षा अशी लग्ने समजूतदार पद्धतीने होण्याच्या काही शक्यता आहे का हेही पाहावे

आपण सर्वच गोष्टी आयडियालॉजीच्या पातळीवर घेतो आणि अनेकदा आंतरजातीय प्रेमप्रकरणात मॅनेजमेंट जास्त महत्वाची असते त्यामुळे हत्येचा निषेध केलाच पाहिजे पण मॅनेजमेंट कुठे चुकते हेही पहायला हवे जातीव्यवस्था ही आज ना उद्या जाणारच ह्यावर मुळात विश्वास हवा जात जाणारच नाही असं म्हंटल कि मग ती घालवणे अशक्यच बनते आज एका प्रकरणात हत्या होते आणि ती वाईटच गोष्ट आहे पण त्याचवेळी दहा आंतरजातीय विवाह झालेले असतात ज्यांच्याविषयी मीडिया काहीही बोलत नाही आणि ह्यामुळे वातावरण अधिकच गढूळ होत जाते

मी कवितेत निराशा व्यक्त करत असलो तरी जगातल्या मागच्या कुठल्याही कालखंडापेक्षा आपण आधिक चांगल्या व समजूतदार कालखंडात वावरत आहोत असा माझा अनुभव आहे जुन्या गोष्टी पडतांना जरा जास्तच आवाज करतायत , मीडिया व्हॉल्युम वाढवून ह्या घटना पोहचवतोय आणि ज्यांना त्या पडण्याचे भय आहे असेच लोक अशा हत्या करतायत त्यांना भयमुक्त होण्याची सदबुध्दी लाभो अशी प्रार्थना !

न्यायालय ह्याबाबत योग्य तो निर्णय घेवो आणि त्वरित निर्णय घेवो ही अपेक्षा !

विराज , तुला आदरांजली ! जे तुझ्या वाट्याला आले ते कुणाच्याही वाट्याला न येवो !

श्रीधर तिळवे नाईक

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट