अवकाशता , देशीयता , स्थानिकता आणि देशीवाद (फिरसे) श्रीधर तिळवे नाईक
नेमाडेंनी देशीवाद मांडला आणि तो मराठी साहित्याने कवटाळला ह्यालाही आता पन्नास वर्षे पूर्ण होतील ह्या देशीवादाने प्रथम नेमाडे शहाणे मग चित्रे कोलटकर बदलले आणि मग मराठी साहित्य ! ह्या लोकांनी स्वतःच्याच कोसला , कविता , अरुण कोलटकरांच्या कविता , जेजुरी ह्या माईलस्टोन ठरलेल्या आधुनिक कलाकृती नाकारल्या आणि देशीवादी लेखन करायला सुरवात केली चित्रेंचा कवितानंतरच्या कविता हा संग्रह , नेमाडेंच्या बिढार जरीला झूल ह्या कादंबऱ्या कोलटकरांचे नंतरचे संग्रह हे देशीवादी वाङ्मय हे उत्थान होते कि पतन हे ठरवणे आजही अवघड आहे माझ्या मते हे पतन होते मात्र पुढे देशीवादाचा बोभाटा नाकारून ह्यांनी जेव्हा पुन्हा एकदा अवकाशतेवर फोकस ठेवला तेव्हापासून हिंदू , भिजकी वही सारख्या कलाकृती जन्मलेल्या दिसतात
अवकाशाचे वर्गीकरण करणे अवघड असले तरी ते करावे लागते
ह्यात प्रथम
प्रायोजित अवकाश
व
नैसर्गिक अवकाश
असे दोन प्रकार होतात
प्रायोजित अवकाश हे इंटेन्शनल असतात ते मानवी हितसंबंधांनी प्रायोजित केलेले असतात
नैसर्गिक अवकाश हे निसर्गाने निर्माण केलेले असतात आणि त्यांना मनुष्यविरहित अस्तित्व असते
साहित्यिकाचा किंबहुना कुठल्याही कलेचा अवकाश हा प्रायोजितच असतो मात्र तो दोन प्रकारचा असतो
१ गणितमानी प्रायोजित अवकाश
२ गतिमानी प्रायोजित अवकाश
(गणितमानी आणि गतिमानी ह्यांच्या अधिक अभ्यासासाठी रोमॅंटिक देशीवादाची पायाभरणी करण्यात ज्यांच्या लिखाणाचा सिंहाचा वाटा आहे अशा द ग गोडसे ह्यांचे गतिमानी हे पुस्तक जिज्ञासूंनी पहावे )
नैसर्गीक अवकाशाचे वर्गीकरण
१ ब्रह्मांडावकाश
२ विश्वावकाश
३ जगावकाश
४ पृथ्वी अवकाश
५ राष्टावकाश
६ राज्यवकाश
७ प्रदेशावकाश
८ ज़िल्हावकाश
९ तालुकावकाश ह्यात पंचक्रोशी , कस्बा वैग्रे येतात
१० महाशहरावकाश
११ महानगरावकाश
१२ शहरावकाश
१३ नगरावकाश
१४ महागावावकाश
१५ गावावकाश
१६ खेडावकाश
१७ पाडावकाश
१८ जागावकाश म्हणजे चौक , मैदान रास्ता वैग्रे
१९ वस्ती अवकाश
२० घरावकाश
२१ शरीरावकाश
असे प्रकार पडतात
देशीवाद ह्यातील सहा ते एकवीस पर्यंतचे अवकाश स्वीकारतो व एक ते पाच नाकारतो म्हणजेच निसर्गअवकाशातील ९९. ९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ टक्के अवकाशाला नकार देतो मला हे मान्य नाही माझ्या मते चौथ्या नवतेने सर्व एकवीसच्या एकवीस अवकाशांना कलाकृती निर्माण करतांना खुलं ठेवलं पाहिजे
दुसरी गोष्ट हे सगळे अवकाशप्रकार परंपरेने युक्त असतात असं देशीवाद मानतो आणि लेखकाने ह्या परंपरेच्या सातत्यात उभे राहून लिखाण केले पाहिजे असे देशीवाद मानतो मला हे परंपरेच्या सातत्यात सतत उभे राहणे मान्य नाही माझं म्हणणं असं कि परंपरा नसतातच प्रोग्राम असतात आणि ह्या प्रोग्रॅमसवर जो नियंत्रण ठेवतो तो अनेकदा स्वतःचा प्रोग्राम परंपरा म्हणून लादतो हे म्हणजे माझे जनेटिक प्रोग्रॅम घेऊन तू तुझ्या अपत्यांना जन्म दे असं म्हणण्यासारखं असतं आम्ही तुमचे जनेटिक प्रोग्रॅम का घ्यावेत तुमच्या घरात महानुभवी प्रोग्राम होता म्हणून तो माझ्याही घरात असला पाहिजे किंवा तुमच्या घरात वारकरी प्रोग्राम असेल तो माझ्याही साहित्यात उमटला पाहिजे हा अट्टाहास आम्ही का पेलावा ?
माझ्या घरात एखादा प्रोग्राम असेल आणि तो तुमच्या परंपरेत बसत नसेल तर मी काय माझ्या घरातला प्रोग्राम फेकून द्यावा काय ?
दुसरी गोष्ट समजा आपला प्रोग्राम एकच आहे आणि मला हा कॉमन असलेला प्रोग्रॅमच भंपक वाटत असेल तर तो नाकारण्याचा मला हक्क आहे कि नाही ?
तिसरी गोष्ट मला समजा युरोप किंवा अमेरिका किंवा जपान ह्या देशातला प्रोग्रॅम माझ्या अभिव्यक्तीसाठी योग्य वाटला तर मी तो वापरू नये काय ? त्याचे देशीकरण कसे करायचे किंवा थेट त्याचे परदेशीकरण थेट आयात करायचे हे ठरवण्याचा अधिकार मला आहे कि नाही
चौथी गोष्ट देशीवाद म्हणतो लेखक परंपरेत उभा असतो लेखक परंपरेत फक्त उभा नसतो तर तो परंपरेविरुद्धही उभा असतो नवता ही लेखक परंपरेच्याबाहेर किती जातो त्यावर अवलंबून असते परंपरेत राहून लिखाण करणाऱ्या लेखकाला चटकन मान्यता मिळते पण ही मान्यता परंपराशरण लोकांनी आणि समीक्षापुरोहितांनी दिलेली मान्यता असते अनेकदा त्यांना सत्ता स्पॉन्सर करत असते अशावेळी सत्ता धारण करणाऱ्या परंपरेपासून आणि परंपरा धारण करणाऱ्या सत्तेपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असते
कुठलाही लेखक हा अवकाशातच क्रियाळत असतो तो उभा असतो बसलेला असतो पळल असतो बागडत असतो झोपत असतो प्रश्न इतकाच असतो कि हा अवकाश चिन्हांच्यातून उभा कसा करायचा लेखकाने जगण्यासाठी निवडलेला अवकाश हा अनेकदा स्वाभाविकरित्या त्याच्या कलेत क्रियाळतो लेखकाने जगण्यासाठी निवडलेल्या अवकाशाला मी स्थानिक अवकाश म्हणतो हा स्थानिक अवकाश २१ पैकी कुठल्या प्रकाराचा असू शकतो स्थानिक अवकाशात आणि देशीय अवकाशात मग फरक काय असतो स्थानिक अवकाश लवचिक असतो तो स्वतःची व्याप्ती कितीही वाढवू शकतो देशीय अवकाश हा ताठर असतो स्थानिक अवकाश हा
१ ब्रह्मांडावकाश
२ विश्वावकाश
३ जगावकाश
४ पृथ्वी अवकाश
५ राष्टावकाश
ह्यांच्यात असू शकतो पृथ्वी अवकाशाच्या व जगावकाशाच्या आंतरराष्ट्रीय मूल्यांचा तो सहज स्वीकार करतो देशीय अवकाश हा देशी मूल्यांची ठामपणे पाठराखण करतो आंतरराष्ट्रीय मूल्यांना तो ठामपणे नकार देतो अनेकदा त्याच्या मते आंतरराष्ट्रीय मूल्ये ही साम्राज्यवादी शक्तींनी स्पॉन्सर केलेली असतात मी स्वतः कोल्हापूर नागेशी बांदिवडे आणि मुंबई ह्या अवकाशात उभा असतो पण मी त्यांचा अविष्कार स्थानिक अवकाश म्हणून करतो आणि पृथ्वी अवकाशाच्या व जगावकाशाच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी तिचे द्वंदात्मक असो कि मैत्रीपूर्ण असो सर्व संबंध कवटाळतो माझे कोल्हापूर वा नागेशी बांदिवडे वा मुंबई जागतिकतेत उभे असतात आणि स्थानिक अवकाशात उभे असल्यानेच हे शक्य असते एका अर्थाने कोल्हापूर वा नागेशी बांदिवडे वा मुंबई मी स्मार्टफोनसारखी वापरतो हाताळतो कनेक्ट करतो कनेक्टिव्हिटी हाताळतो स्थानिक अवकाश ही वर्तमान वस्तुस्थिती असते आणि तिला जगायला वा तगायला परंपरेच्या सातत्याची गरज नसते
भारतात तर अनेकदा परंपरा हे स्थानिक साम्राज्यवादाने बळकावलेली असते आणि ती आर्य मार्गीची स्थानिक अवकाश गिळंकृत करण्याची खेळी असते परंपरा ताब्यात घ्यायची मग तिचे आर्यीकरण करायचे मग ती आर्यच असल्याचे ठामपणे सांगायचे असा हा खेळ असतो आणि देशीवाद हा ह्या खेळाचा भाग असतो आणि अनेकदा स्थानिक क्षत्रिय व क्षेत्रपती हे हा खेळ खेळत असल्याने बहुजन समाजाला त्यातले राजकारणच कळत नाही ह्यामुळेच विठ्ठल अंतिमतः विष्णू बनतो आणि चातुर्वर्ण्याच्या कमबॅक होतो
तरीही ज्यांना देशीवादी व्हायचे आहे त्यांना शुभेच्छा !
श्रीधर तिळवे नाईक
आशुतोष दिवाण ह्यांच्या कमेंटला दिलेले उत्तर ते इतरांनाही उपयुक्त वाटेल म्हणून इथे दिलेले आहे
फार महत्वाचे लिहीले आहे.
कलाकृतीतील स्थळ त्यातील मानसिकता गव्हर्न करत असते का? का अगदी लोकल कादंबरी लिहूनही त्यात ब्रम्हांडावकाश वगैरे असू शकते?
मला नीट समजत नाही पण उलट हिंदूमधेच त्यांनी ? कोणी कोणास मुक्त केले वगैरे मधून संकुचीत वर्णव्यवस्था रेकमेंड केली अशी टीका झाली.किंवा भिजकी वहीत समजा पृथ्वी अवकाश आला असला तरी ती कविता भलतीच इंटेलीजंटली डिझाईन्ड व कृत्रिम किंवा स्टीरीयोटाईप्ड भावनीक वाटते.
मार्गदर्शन व्हावे.
=============================================================
कलाकृतीचे स्थळ मानसिकता गव्हर्न करेलच असे नाही शिवाय किती टक्के गव्हर्न करेल हाही प्रश्न असतो उदाहरणार्थ मी ज्या आझाद चौकात जन्मलो वाढलो ती जागा अतिशय आक्रमक अवकाशाची जागा आहे साहजिकच ती आक्रमकता माझ्यातही विरघळली आहे शिवाजी पेठ आणि आझाद चौक दिलबहार तालीम इथे मारामाऱ्यांचे ट्रेनिंग तुम्हाला अनेकदा अपसुख मिळते जर घरातून बंदी नसेल तर आता आझाद चौकातल्या सगळ्यांच्यावर हा परिणाम झाला का ? तर नाही माझे अभय बहिरशेठ व अमोल कडोलीकर हे दोन मित्र इथल्या संस्कारापासून पूर्ण दूर ठेवले गेले होते तर ते वेगळे झाले नुसत्या अवकाशात असण्याने काहीच होत नाही त्या अवकाशाचे संस्कार शरीरावर झाले पाहिजेत ह्यापुढे हे संस्कार कलाकृतीतून उमटवायचे कि नाही हा पुढचा प्रश्न मी अडाहॉकाबानासुनात फार सभ्य नायक उभा करायचा असं ठरवलं होतं पण शेवटी त्याची गोप्याबरोबरची मारामारी आलीच बापाचे मला वाटलं तू बामन हुतोस कि काय असं टिपिकल ब्राम्हणेतरी वाक्य आलंच तेव्हा पात्र लेखकाच्या ताब्यात तरी कुठं राहतात पण मुंबईत आल्यावर हा कोल्हापुरी कंड शमलेला दिसतो तुमच्या नाटकातला घटत्कोच त्याच्या अवकाशाबद्दल इंफेरियर कॉम्प्लेक्स घेऊन आहे आता पुणे मुंबईकरांच्या पुढे काही कोल्हापूरकरांना येणाऱ्या कॉम्प्लेक्सचे हे अनकॉन्शस सादरीकरण आहे का ?
इथे देशपांडेंच्चीही कंमेंट आहे तर कोल्हापुरात असतांना त्यांनी लिहिलेली नाटके व इतरत्र असतांना लिहिलेली नाटके ह्यांच्यात अवकाशामुळे काही फरक पडला आहे का ? तर गव्हर्निंग काही टक्के असतेच पण संपूर्ण कलाकृतीचा कब्जा ते घेईलच असं नाही
हिंदू मला प्रथम वाचनात तितकी आवडली न्हवती पण दुसऱ्या वाचनात आवडली सर्वच कादंबऱ्या पहिल्याच वाचनात आवडल्या पाहिजेत असं नाही हिंदूंमध्ये असलेला कर्मठपणा हा खास वैष्णव वारकरी कर्मठपणा आहे तो सहजासहजी दिसत नाही पण तो आहे भिजकी वहीच का पण कोलटकरांची सगळी कविताच डिझाइनींक आहे पण आधुनिकतेला कॉस्मो संवेदनशीलतेला ही डिझाइनींक मानसिकता शोभून दिसते दुसरी गोष्ट भिजकी वही ही रचलेली असावी असा मला संशय आहे इतरत्र आढळणारी उस्फूर्तता इथे मिसिंग आहे कारण ग्लोबलताच आर्टिफिशियल आहे ह्याउलट चित्रेंच्या कवितेतील ग्लोबलता सहज स्वाभाविक वाटते
ब्रह्मांडाचा अनुभव सद्यातरी मोक्ष मिळालेल्या व्यक्तीला येतो तुकारामांना देहूत असूनही तो आलाच की ! एखादा गावातला लेखक संपूर्ण भारत कवेत घेऊ शकतोच की ! जी ए कुलकर्णींच्या ग्रीक अवकाशाविषयीच्या कथा पाहिल्या तर अशी झेप शक्य वाटते मानसिक झेप ही सापेक्ष आहे मात्र स्वतःच्या स्थानिक अवकाशातील तपशिलाविषयी जो कॉन्फिडन्स आपणाला असतो तो इतर अवकाशाविषयी असेल अशी शक्यता फार कमी आहे अनेकदा तर अवकाश समोर असूनही तो का दिसला नाही असा प्रश्न पडतो गोलपिठा सर्वच पहात होते ढसाळांनी तो साहित्यात आणला तर अवकाश भिनलाही गेला पाहिजे गावकूस काय पूर्वी न्हवतं ?
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा