लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २३ ते भाग ४१ श्रीधर तिळवे नाईक

लोकमान्य टिळक
काँग्रेसच्या आऊट सायडर कंट्रोलचे पायोनियर : लोकमान्य टिळक २३
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २३ ते ४१ श्रीधर तिळवे नाईक

मागील भागात लोकमान्यांना काँग्रेसने एकदाही अध्यक्षपद दिले नाही हे आपण पाहिले तरीही लोकमान्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही ह्यामागे काय कारण होते ?

काँग्रेस कशीही असली तरी तिच्यामागे प्रशासकीय अधिकारी होते त्यामुळे टिळकांना मते मांडण्यासाठी आवश्यक असलेला फ्लॅटफॉर्म पुरवत होती साहजिकच पुन्हा नवीन संस्था काढून त्यात वेळ खर्च करणे टिळकांच्या गणितात बसले नाही

दुसरी गोष्ट मुळात काँग्रेसची स्थापना हीच आऊटसायडर ब्रिटिश ऑफिसर्स लोकांनी केली होती टिळकांनी ह्यूमचे नेतृत्व रिप्लेस करून स्वतःचे नेतृत्व पुढे आणले दादाभाई नौरोजी व गोपाळ गोखले ह्या काळात काँग्रेसचे  इन्सायडर पुढारी होते पण ताबा ब्रिटिश लोकांच्याकडेच होता

प्रश्न असा आहे कि ही आउटसायडर थेरी आली कुठून ?

तिचा उगम महाभारतात आहे गीतेत आहे नवव्या अध्यायात हा श्लोक पुढीलप्रमाणे आहे

मां हि पार्थ व्यपाश्रित्य
येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि
यान्ति परां गतिम् ॥९- ३२॥

 त्याचा अर्थ जरी स्त्रिया , वैश्य व शूद्र हे पापयोनी असतात तरी त्यांना मला शरण आल्यावर परम गती प्राप्त होते

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या
भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं
प्राप्य भजस्व माम् ॥९- ३३॥

आणि मग जे ब्राम्हण व राजर्षी आहेत त्या पुण्यभक्तांना काय सांगावे ?त्यांनाही मला शरण आल्यास परमगती प्राप्त होते
सर्वसाधारण निगम समाजात ह्या काळात जे जन्मजात वर्ण होते त्यांच्या श्रीकृष्णांनी  तीन योनी  बनवल्या होत्या
१ पुण्य योनी : ह्यात ब्राम्हण व क्षत्रिय वर्ण होते भगवान श्रीकृष्णानीं  गीतेत म्हंटल्याप्रमाणे ह्या पुण्य योनी होत्या
२ पाप योनी :  ह्यात वैश्य , स्त्री आणि शूद्र होते भगवान श्रीकृष्णांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या पाप योनी होत्या
३ अयोनी :  ह्यात अतिशूद्र आणि आदिवासी होते ज्यांना योनीचा दर्जाचं न्हवता म्हणजे ह्या अयोनी होत्या त्यांचा उल्लेख करण्याची गरज भगवान कृष्णांना वाटली न्हवती

मागील जन्मी पाप केल्याने पाप योनींना पाप योनी प्राप्त झाली होती तर पुण्य केल्याने पुण्य योनीवाल्यांना पुण्य योनी प्राप्त झाली होती ही निगमांची वर्गव्यवस्था होती आणि तिच्याकडे विचारवंतांनी कायमच दुर्लक्ष केले

भारतातील प्रस्थापित व्यवस्था ही पुण्य योनीवाल्यांची व्यवस्था आहे तर पाप योनीवाल्यांना पुण्य संपादन करून पुढील जन्म पुण्य योनीचा संपादन करण्याचा चान्स आहे त्यासाठी अनुष्ठाने व्रतवैकल्ये यज्ञ वैग्रे मार्ग होते व आहेत अतिशूद्र आणि आदिवासी हे गीतेनुसार मनुष्य योनीत मोडत नाहीत

 भगवान श्रीकृष्णाने मांडलेल्या ह्या योनी सिद्धांताने सातव्या आठव्या शतकात धुमाकूळ घालायला सुरवात केली आणि वैष्णवानी सर्व व्यवस्था आपल्या ताब्यात घ्यायला सुरवात केली ह्या वैष्णवांनी प्रथम आउटसायडरची थेरी जन्माला घातली

ह्या थेरीनुसार मुख्य नेता युद्धभूमीवर नेतृत्व करतो युक्तीच्या चार गोष्टी सांगतो काय धर्म काय अधर्म ते ठरवतो थोडक्यात भगवान श्रीकृष्ण हा भारतातील निगम समाजाचा (म्हणजे वैदिक , ब्राम्हणी , वैष्णव व हिंदू ) पहिला आउटसायडर नेता आहे जो युद्धभूमीवर आहे आणि मुख्य नेताही आहे पण पक्षात नाहीये सत्तेत नाहीये तो अनऑफिशियल अध्यक्ष आहे पण पंतप्रधान नाहीये

पुढे पेशव्यांच्या काळात हेच रोल बदलले गेले जिथे छत्रपती श्रीकृष्ण आहेत तर बाळाजी व बाजीराव पेशवे अर्जुन आहेत तर उत्तर पेशवाईत छत्रपती बाजूला गेलेत आणि खुद्द पेशवे व त्यांचे शहाणे  श्रीकृष्णाच्या रोलमध्ये आहेत तर शिंदे होळकर गायकवाड भोसले आणि खुद्द छत्रपती असे पाच पांडव आहेत

ह्या आउटसायडर थेरीचा नंतर इतका परिणाम झाला कि खुद्द शिवाजी महाराजांच्यासाठी दादोजी कोंडदेव नावाचा एक काल्पनिक श्रीकृष्ण विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तयार केला तर चंद्रगुप्त व विष्णुगुप्त ह्या काका पुतण्या जोडीला चंद्रगुप्त आणि चाणक्य असे काल्पनिक स्वरूप देण्यात आले

टिळकांच्यावर चिपळूणकरांचा इतका प्रभाव इतका होता कि खुद्द काँग्रेसमध्ये टिळकांनी स्वतःचा रोल श्रीकृष्णांनुसार बेतून आउटसायडर असा केला आणि दादाभाई नौरोजी व अँनी बेझेन्ट ह्यांना अर्जुन बनवून पाठीमागून काँग्रेसचे सारथ्य केले

टिळकांच्या ह्या आउटसायडर स्टान्सचा प्रभाव महात्मा गांधींच्यावर इतका पडला कि खुद्द गांधीही काँग्रेसमध्ये आउटसायडर म्हणून श्रीकृष्णाचा रोल करत राहिले आणि पंडित नेहरू , सरदार पटेल , मौलाना आझाद , सुभाषचंद्र बोस व विनोबा भावे ह्या आपल्या पांडवांना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढवत राहिले आणि लढतही राहिले .त्यांच्याही दृष्टीने काँग्रेस ही स्वातंत्र्यासाठी स्थापन झालेली एक सर्वसमावेशक संघटना होती पक्ष न्हवता

हे चिपळूणकर टिळक मॉडेल पुढे हिंदुत्ववाद्यांनी गिरवले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीकृष्ण आणि हिंदू महासभा जनसंघ व भाजप हे पक्ष अर्जुनासारखे काम करत राहिले

ह्या मॉडेलमध्ये पुण्य योनीतील दोघांचेही हितसंबंध शाबूत ठेवले जातात राजा हा विष्णूचा अवतार असल्याने त्याला थेट देवाचा दर्जा मिळतो आणि तो फार भाग्यवान असेल तर त्याला राम व कृष्णाइतकी अफाट लोकप्रियता प्राप्त होते तर ब्राम्हण हा भूदेव असल्याने आणि राजा त्यालाही नमस्कार करत असल्याने त्याचेही देवत्व अबाधित राखले जाते दोघेही एकमेकांचे देवत्व शाबूत ठेवून पद्धतशीरपणे पापयोनीज  व अयोनिज लोकांच्यावर राज्य करत राहतात आणि मनू ब्राम्हण होता कि क्षत्रिय होता ह्यावर वाद घालत राहतात

आजही हे मॉडेल ऑन आहे मोदी अर्जुन आहेत तर संघ व भागवत आउटसायडर नेते आहेत

श्रीधर तिळवे नाईक
गीतेतील योनीव्यवस्था आणि टिळक
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती भाग २४ श्रीधर तिळवे नाईक

मागील भागात आपण पाहिले कि भगवान श्रीकृष्णांनी योनिविचार कसा मांडला ?

वैदिकांनी आडवी कर्मकेंद्री  वर्णव्यवस्था मांडली तर ब्राम्हण धर्माने उभी जन्मवादी वर्णव्यवस्था ह्या दोन्हींना छेद देत श्रीकृष्णांनी दिलेली योनिव्यावस्था वैष्णवांनी स्वीकारली ही योनीव्यवस्था काय होती ?

वैष्णवांनी जी  योनीव्यवस्था मांडली ती  जन्मवादी आणि कर्मवादी ह्यांचे त्रांगडे होती म्हणजे जन्म झाला तो योनीनुसार पण ह्या जन्मी पुण्यकर्म केले तर पुढच्या जन्मी पुण्ययोनी मिळणार असा हा सिद्धांत होता ह्या योनीव्यवस्थेत  कर्माचे फळ मिळणार पण ते पुढील जन्मात मात्र ह्या जन्मात तुमचा वर्ण  जन्मानुसार असणार होता त्यामुळेच व्रतवैकल्य यज्ञ उपासतापास पूजा अर्चना दान पान करून पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याची सोय होती त्यामुळे साहजिकच पुढील जन्मात पुण्ययोनी प्राप्त करण्याच्या व पुण्य संपादन करण्याच्या कामात वैश्य व शूद्र गुंतून पडले आणि ह्यातून मिळणाऱ्या दक्षिणेवर ब्राम्हण गब्बर झाले ह्या योनिव्यावस्थेमुळेच  कर्ण ह्या जन्मानुसार सूतपुत्र होता व कुंतीने रहस्य सांगितल्यावर ताबडतोब ह्या जन्मी क्षत्रिय ठरून राज्य करायला लायक झाला

वैष्णव संतांचे तर्कशास्त्रही ह्या योनिव्यावस्थेनुसार चालते मात्र मोक्ष मात्र जर तुम्ही विष्णू राम कृष्ण ह्यांना किंवा ह्यांच्या अवतारांना शरण गेलात कि मिळतो कारण तशी गॅरंटी खुद्द भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत  दिलेली आहे
जिच्या आधारे वारकरी चळवळ उभी होती व आहे म्हणजे ह्या जन्मात वर्ण जन्मानुसार व पुढील जन्मात वर्ण कर्मानुसार मात्र मोक्ष तुमच्या भक्तीनुसार वा साधनेनुसार अशी ही व्यवस्था आहे ती आपल्याकडच्या विचारवंतांना कधीच कळली नाही हे दुर्देव ! म्हणूनच पुन्हा एकदा तिची चर्चा केली असो

ब्रिटिशांच्या आगमनानंतर ब्राम्हणांचा हा पुण्ययोनी व पुण्य कमावून देण्याचा उद्योग घसरणीला लागला कारण क्षत्रिय मांडलिक झाले तर पापयोनीतले वैश्य बुडाले तर शूद्र देशोधडीला लागले तर अयोनिज अंत्यजांना ब्रिटिश सत्तेने अचानक शिक्षण व फौजेची दारे खुली केली

आता योनीव्यवस्थेवर उपजीविका चालणे अशक्य होते ब्राम्हणांनी पर्याय शोधायला सुरवात केली कारण ब्रिटिशांनी ब्राम्हणांची राज्ये व वतने हिसकावून घ्यायला सुरवात केली तर जे दक्षिणेवर अवलंबून होते असे ब्राम्हण कायमस्वरूपी दरिद्रीनारायण झाले साहजिकच ह्या दोन्ही प्रकारच्या ब्राम्हणांनी पर्याय शोधणे सुरु केले  ह्यातील एक पर्याय बहुजन शैव पुजाऱ्यांना हाकलून देऊन शैवांची श्रीमंत देवस्थाने बळकावणे हा होता जो मुस्लिम काळात अतिशय प्रभावीपणे अंमलात आणला गेला होता आणि ब्रिटिश पोर्तुगीज काळात ज्याची व्याप्ती वाढवणे सुरु झाले  दुसरा पर्याय ब्रिटिश शासनात नोकऱ्या शोधणे हा होता आणि काँग्रेसची पहिली मागणी शासकीय नोकऱ्या एतद्देशीयांना म्हणजे त्याकाळात अधिकतर ब्राम्हणांना खुल्या व्हाव्यात अशी होती शासन विशेषतः न्याय खाते तिसरा पर्याय स्वतःच्या शिक्षणसंस्था , प्रकाशनसंस्था , मीडियासंस्था सुरु करणे हा होता तर  चौथा वैदिक धर्म अधिकाधिक सुधारून व व्यापक बनवून सर्वांसाठी खुला करून पौराहित्य व्यापक बनवून उत्पन्न कमावणे हा होता आणि पाचवा वैश्यिकरण स्वीकारून वैश्य होत डीकास्ट होत व्यापार करणे हा होता (ह्या पर्यायाची सुरवात रविंद्रनाथ टागोरांच्या आजोबांनी केली होती )

नेमकी ह्याचवेळी लॉर्ड डफरिनसारखी व्यक्ती भारतात आली होती जिला भारतीयांना राजकीय पातळीवर जाणून घेण्यात रस होता त्यामुळेच ऍलन ह्यूमनें जेव्हा सामाजिक संस्था म्हणून काँग्रेससारखी संघटना काढण्याची योजना डफरीनपुढे चर्चेला घेतली तेव्हा डफरीनने तिला सामाजिक बरोबर राजकीय करण्याच्याही सूचना केली जी ह्यूमनें स्वीकारली व २८ डिसेम्बर १९८५ ला काँग्रेस स्थापन झाली

परिणामी ब्राम्हणी प्रबोधनाची व सुरवातीच्या काँग्रेसची आख्खी चळवळ ह्या पाच पर्यायात व ब्रिटिश चौकटीत घुटमळत होती

टिळकही ह्या योनिव्यावस्थेत व पाच पर्यायात कैद होते पण त्यांनी शासकीय नोकरीचा पर्याय शोधला नाही आणि इथेच त्यांचे व आगरकरांचे वेगळेपण दिसते महात्मा फुलेंनी ब्रिटिश सत्तेकडून गुणवत्तेच्या जीवावर बांधकामाची काँट्रॅक्टस मिळवली व भक्कम बांधकामे करून दाखवली टिळकांनी हाही पर्याय नाकारला आहे

टिळकांना शासकीय नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्ट न्हवे तर शासनच आपल्या ताब्यात हवे होते त्यामुळेच त्यांनी स्वशासित शाळा व महाविद्यालये सुरु केली व शासकीय अनुदान नाकारले

टिळकांची स्वशासनावरची निष्ठा सुरवातीपासूनच दिसते आणि ह्याबाबत कथनी आणि करणी ह्यात अंतर दिसत नाही त्यातूनच ब्राम्हणांना पुढे सहावा पर्याय खुला  झाला तो म्हणजे पेशव्यांच्याप्रमाणे राज्यकर्ता वर्ग होणे देवेन्द्र फडणवीसांनी व नेहरूगांधी फॅमिलीने टिळकांना कायमच मुजरा करायला हवा कारण ते आज जिथे आहेत त्याचे श्रेय टिळकांना जाते

प्रश्न असा आहे कि मग ह्या आद्यहिंदुहृदयसम्राटाला राज्यकर्ता होण्यासाठी काँग्रेसमध्ये एन्ट्री मिळाली कशी ?

श्रीधर तिळवे नाईक


लोकमान्य टिळकांनी आद्यहिन्दूहृदयसम्राट असूनही काँग्रेस का स्वीकारली व  स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना का काढली नाही
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २५ श्रीधर तिळवे नाईक

काँग्रेसची विचारसरणी ही दादाभाई नौरोजी न्यायमूर्ती रानडे गोपालकृष्ण गोखले ह्यांनी घडवली होती आणि हे सर्वच लोक इंग्लंडमधील लिबरलीझमने भारावून गेलेले होते परंपरेने ते वैष्णवीझमशी निगडित होते मात्र जन्मानुसार वर्ण कि कर्मानुसार वर्ण ह्याबाबत ते वैष्णव संतांच्याप्रमाणे काहीसे गोंधळलेले होते वैष्णवीझम ही एक मोठी छत्री होती जी वैष्णव संतांच्या भक्ती चळवळीमुळं खूप खोलवर रुजली होती काँग्रेसने तिला राजकीय केले परंपरा मोडायची पण कुणाला न दुखावता क्रांतीचा आवाज न करता मोडायची ही वैष्णव परंपरा काँग्रेसने आत्मसात केली आणि आजूबाजूला असलेले सर्व देव गिळायची अजगरी वृत्तीही जोपासली वैष्णवीझमचे सर्वात मोठे वैशिष्ठ म्हणजे तो परंपरावाद्यांना परंपरावादी वाटतो तर सुधारकांना सुधारणावादी त्यामुळे आंबेडकरही रानडे गोखलेंच्याविषयी आस्थेने लिहतात आणि धर्मातर करतांना " मी गांधींना आश्वासन दिले आहे कि मी हिंदू हितसंबंधांना धोका पोहचेल असा धर्म स्वीकारणार नाही म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारत आहे जो हिंदूंच्या हिताचाच आहे " असे म्हणतात हिंदुत्ववाद आणि काँग्रेसवाद ह्यामध्ये चॉईस करायची वेळ आली तर आंबेडकर काँग्रेसच निवडतात कारण त्यांना कायमच हिंदुत्ववाद मनुस्मृतीचे पुनर्जीवन करेल असे भय वाटत होते नवबौद्धांनाही हेच भय वाटते आहे जे नैसर्गिक आहे

काँग्रेसच्या ह्या वैष्णव छत्रीत आणि हिंदुत्ववादाच्या ह्या हिंदू छत्रीत काय फरक आहे ह्याची यथावकाश चर्चा मी पुढे करेनच मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे टिळक सुरवातीला हिंदू छत्रीखाली उभे होते आणि काँग्रेस ही वैष्णव छत्री घेऊन उभी होती

प्रश्न असा आहे कि टिळकांनी स्वतंत्र हिंदुत्ववादी संघटना का काढली नाही ?

ह्या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या तत्कालीन परिस्थितीत आहे टिळकांना सुरवातीला ब्रिटिशांशी थेट पंगा नकोच होता त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काढलेली काँग्रेस संघटना ही सेफ बेट होती

दुसरी गोष्ट टिळकांचे दादाभाईंच्यावर असलेले प्रेम दादाभाई हळूहळू जहाल बनत चाललेले होते आणि त्यामुळे टिळकांना हे स्पष्ट व्हायला लागले कि काँग्रेसमध्ये जहालवादाला चांगले दिवस येतील तसे संकेत खुद्द दादाभाई नौरोजी देत होते

तिसरी गोष्ट काँग्रेस ही काही वैष्णववादी लोकांनी स्वतःहून काढलेली संघटना न्हवती ती शेवटी ब्रिटिश ऑफिसर्संनी काढलेली संघटना होती आणि ती वैष्णवांच्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांनाही खुली होती किंबहुना पुढेही अनेक हिंदुत्ववादी काँग्रेसमध्ये काम करत राहिले त्यामुळे टिळकांना ती त्याकाळात खुली वाटली तर त्यात आश्चर्य काय ?

चौथी गोष्ट ब्रिटिशांनी पाठिंबा दिलेली काँग्रेस ही एकमेव राजकीय संघटना होती बाकी अनेक संघटना ह्या प्रामुख्याने सामाजिक व सांस्कृतिक वा धार्मिक होत्या टिळकांना राजकारणात अधिक रस होता आणि त्यासाठी काँग्रेस हा एकमेव राजकीय पर्याय  त्याकाळात उपलब्ध होता

पाचवी गोष्ट होती ह्याकाळात काँग्रेस संस्थापक ऍलन ह्यूमला आलेले फ्रस्टेशन ! इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस जशी अचानक गोंधळली होती तसेच काहीसे गोंधळाचे वातावरण १८९० साली काँग्रेसमध्ये निर्माण झाले होते काँग्रेसच्या  पहिल्या अधिवेशनात पास केलेल्या नऊ ठरावापैकी एकालाही नीट दाद मिळाली न्हवती कायदे  मंडळात एतद्देशीय लोकप्रतिनिधी घ्यावा ह्या मागणीला सरकारने कचऱ्याची टोपली दाखवली होती १८९२ च्या लॉर्ड क्रॉसच्या इंडियन कौन्सिल बिलनुसार सरकारचे सरकारनियुक्त प्रतिनिधी स्वराज्यसंस्थात येणार हे स्पष्ट झाले

काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनातच ह्यूमने ,"सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आम्ही केला पण सरकारने जागे होण्याचे नाकारले आहे "अशी टीका केली "आता प्रत्येक हिंदू मनुष्य सैनिक बनला पाहिजे" असेही ते म्हणाले साहजिकच काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनाला सरकारने जागा देण्याचे नाकारले व काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहणे दुर्वर्तन आहे असे जाहीर करून चांगल्या वर्तनाची हमी मागितली काँग्रेसचे कार्य करणाऱ्या दहा हजार कार्यकर्त्यांना सरकारने हद्दपार केले पण ह्यूम दबले नाहीत त्यांनी आपले काम व त्यासंदर्भातील  पत्रव्यवहार सरकारकडे नेटाने लावून धरला ह्या काळात उमेशचंद्र बॅनर्जी ह्यांनी चार्ल्स  ब्रॅडलॉ ह्या ब्रिटिश सांसद द्वारा ब्रिटिश संसदेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला मात्र एतद्देशीय काँग्रेसच्या नेतृत्वाकडून ज्या कार्याची ह्यूम ह्यांना अपेक्षा होती ती पुरी होईना त्यांना हळूहळू सर्व एतद्देशीय काँग्रेस पुढारी फक्त बोलघेवडे पुढारी आहेत असे वाटू लागले जेवढा  जहालपणा ह्यूम दाखवत होते त्याच्या पन्नास टक्केही जहालपणा हे लोक दाखवत न्हवते सरकारने काँग्रेसच्या पाचव्या अधिवेशनात सरकारी अधिकाऱ्यांच्यावर भाग घेण्यास बंदी घातल्यावर हे सगळे बोलघेवडे अधिवेशनातून गायब झाले ह्या  पार्श्वभूमीवर आगरकरांनी ह्या पळपुट्यांचे वाभाडे काढले ह्यात नवल ते काय ? ह्यूम ह्यांनी काँग्रेसचे एतद्देशीय नेते बेफिकीर व निष्काळजी आहेत असा थेट आरोप केला व काँग्रेसचे कार्य इंग्लंडमधून चालवण्याचा निर्णय घेतला आणि एकच गोंधळ उडाला काँग्रेस चालू ठेवावी कि बंद करावी असा प्रश्न निर्माण झाला

अशा पार्श्वभूमीवर टिळक आणि आगरकर काँग्रेस ही चालूच राहिली पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन उभे राहिले दोघांच्यात कितीही सामाजिक मतभेद असले तरी दोघेही राजकीय पातळीवर जहालच होते

काँग्रेसमधील ह्या सर्व घडामोडींवर टिळक व आगरकर नजर ठेऊन होते आगरकरांनी एतद्देशीय काँग्रेस नेत्यांच्यावर टीकेची राळ उडवली टिळकांनी ह्यूम ह्यांच्या सर्क्युलरमधील "हिंदुस्तानातील गरीब माणूस फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणे नेत्यांना डावलून स्वतःच राज्यक्रांती करू शकतो" ह्या मताला पाठिंबा दिला ह्यूमने ह्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट म्हंटले होते कि काँग्रेसमधील पुढाऱ्यांना जी प्रतिष्ठा पद संपत्ती प्राप्त झाली आहे ती ब्रिटिश राज्यामुळे प्राप्त झाली आहे आणि जर ब्रिटिश राज्य टिकले नाही तर काँग्रेस नेत्यांचीही  ही प्रतिष्ठा पद संपत्तीही टिकणार नाही जर ह्या गोष्टी टिकाव्यात असे वाटत असेल तर ह्या नेत्यांनी पळपुटेपणा सोडून ब्रिटिश राज्याला इथल्या एतद्देशीय प्रजेची जी दैना व वाताहत झाली आहे ती काँग्रेसतर्फे कळवलीच पाहिजे

एका अर्थाने देशासाठी नाही तर निदान स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पद प्रतिष्ठा व संपत्तीच्या रक्षणासाठी तरी किमान काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहा असे आवाहन ह्यूम करत होता आणि काँग्रेसचे नेते त्याच्या ह्या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी  ब्रिटिश शासनाच्या दहशतीला घाबरून वाटाण्याच्या अक्षता लावत होते साहजिकच काँग्रेसच्या प्रांतिक कमिट्यांनी ह्यूमचे सर्क्युलर डिस्ट्रिब्युट  केलेच नाही . काँग्रेसच्या नेत्यांची वृत्ती सुरवातीपासूनच कशी थर्ड क्लास होती हे ह्यावरून स्पष्ट व्हावे

अशा ह्या काँग्रेसच्या  निर्नायकी अवस्थेत लोकमान्य टिळकांना काँग्रेसच स्वतःच्या नेतृत्वासाठी योग्य वाटली तर आश्चर्य ते काय ?

श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक आणि सांस्कृतिक अस्मितेचा प्रश्न
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २६ श्रीधर तिळवे नाईक

भारतीय आर्यांच्या ज्या काही गैरसमजुती आहेत त्यातील एक म्हणजे जगभर पसरण्याची लायकी असलेली एकमेव संस्कृती ही आर्यांची आहे आणि तिचा आधार धर्म आहे साहजिकच भारतीय राष्ट्रवाद हाही धार्मिक राष्ट्रवाद म्हणूनच उभा राहू शकतो आणि तो आर्य राष्ट्रवाद असणे अटळ आहे हा आर्य राष्ट्रवाद कसा असावा ह्याची विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी जी काही रूपरेखा दिली तिचा लोकमान्य टिळकांनी राजकीय नकाशा बनवला आणि पुढे स्थापत्य डिझाईन केले

भारतीय आर्यांचा ह्याकाळात जो क्लॅश झाला तो इस्लामिक संस्कृतीशी आणि मराठ्यांनी इस्लामिक संस्कृतीला जवळ जवळ हरवून हिंदू पादशाही उभी केली जी दुर्देवाने फार काळ टिकली नाही कारण समोर तिच्यापेक्षा सबळ संस्कृती ठाकली जी आर्यांचीच होती जिचे नाव ब्रिटिश संस्कृती होते चिपळूणकरांच्या मते ब्रिटिश हे आर्यच होते त्यामुळे हा संघर्ष भावाशी होता ह्याचा एक परिणाम असाही झाला कि भारतीय संस्कृतीत भावाला नेहमीच समजावले जात असल्याने ब्रिटिश भावाला तो बिघडलेला असल्याने व सत्तेने मस्तवाल झालेला असल्याने ह्या जीर्ण शीर्ण भावाच्या अहंकाराने समजवण्याचा प्रयत्न केला तो थेट गांधीजीच्या हत्येपर्यंत ! ब्रिटिशांनी मुळात आर्य सिद्धांताला खतपाणी घातले तेच मुळी ब्रिटिशांच्याविषयी एतद्देशीयांना परकेपणा वाटू नये खिश्यात हात घालून सगळा पैसा काढून घ्यायचा आणि वर ब्रदरहूड फिलिंग द्यायचे ही एक कमालीची इमोशनल स्ट्रॅटेजी होती जिच्यात सगळेच फसले होते साहजिकच ह्यूमने चळवळ तीव्र करायचे ठेवल्यावर काँग्रेसच्या एतद्देशीय नेत्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली काहींनी तर डेक्कन संस्था स्वतंत्रपणे चालू केली ह्या काळात ह्या काँग्रेसी नेत्यांना सरळ सरळ भित्रे व डरपोक म्हणणारे दोनच विचारवंत होते आगरकर आणि टिळक एखादा दादागिरी करणारा मनुष्य घरात घुसला कि भित्रा मनुष्य अरे तू माझा भाऊ वैग्रे अशी भाषा सुरु करतो तसा प्रकार ह्या काळात मवाळवाद्यांनी सुरु केला नेमक्या ह्याच काळात आगरकरांचे निधन झाले आणि टिळक एकटे पडले आता त्यांना एकट्याने निर्णय घ्यायचा होता

नेमक्या ह्याच काळात सर सैय्यद अहमद व इस्लामिक संस्कृतीला ब्रिटिशांनी हिंदू संस्कृतीच्या विरोधात क्लॅश असल्यासारखे उभे केले आपण दोघेही ज्युडायिक असल्याने मित्र आहोत व आपला कॉमन शत्रू हिंदू आहे हे पटवण्यात ब्रिटिशांना यश मिळू लागले आणि मुस्लिम विचारवंत ह्या जाळ्यात अडकत गेले भारतातील बहुसंस्कृतीवादाला नेमका कसा तडा द्यायचा हे ब्रिटिशांना नेमके माहित  होते व त्यासाठी त्यांनी धर्म वर्ण व जातीचा यथेच्छ वापर करायला सुरवात केली काँग्रेसच्या विरोधात एक मुस्लिम काँग्रेससारखी  संघटना आवश्यक आहे हे मुस्लिमांना पटवण्याची धडपड सुरु झाली ज्यातून पुढे मुस्लिम लीग उदयाला आली

डार्विनचा प्रभाव पडून १८७० नंतर आलेल्या ब्रिटिशांनी सर्वायवल ऑफ फिटेस्ट आणि ब्रिटिश स्पेसीज ही निसर्गतः हिंदू स्पेसीज व मुस्लिम स्पेसीज पेक्षा श्रेष्ठ आहेत हे स्वीकारायला सुरवात केली होती ह्या कमअस्सल लोकांच्यावर राज्य करण्याचा अधिकार निसर्गतः आपल्याला आहे असे मानणारे अधिकारवादी व ह्या कमअस्सल स्पेसीजचा उध्दार करण्यासाठी आपण आलो आहोत असे मानणारे उद्धारवादी दोघेही डार्विनच्या कृपेने हिंदू स्पेसीजला कमअस्सलच समजत होते आधुनिक रेसिझमची सुरवात डार्विनमुळे झाली व ती भारतात पोहचली तिला काउंटर म्हणून चिपळूणकरांचा हिंदुत्ववाद जन्मला होता

टिळकांना एकीकडे ह्यूमचे धैर्य दिसत होते व हिंदूंचे भित्रेपण ! ब्रिटिशांना वेगळे काढण्यासाठी त्यांनी आर्य सिद्धांत स्वीकारला खरा पण त्यांना थेट उत्तर ध्रुवावरून स्थलांतरित करवून इंडियात आणले आणि इंडियन आर्य प्रथम सुसंस्कृत होते व युरोपियन आर्य त्यांना पाहून सुसंस्कृत झाले अशी मांडणी केली हे ब्रिटिशांचे डार्विनियन ओझे फेकून देणे होते ही डी -डार्विनायझेशनची प्रक्रियाच टिळकांना इंग्रजांच्याविरुद्ध लढायचे बळ देऊन गेली पण त्याच बरोबर आर्य धर्म श्रेष्ठ असल्याची जाणीवही ! भारतात ह्या निमित्ताने प्रथमच जीवशास्त्र , साम्राज्यवाद आणि इतिहास ह्यांची युती झाली

लढा अटळ आहे हे उमजलेले टिळक आता हिंदूंना कसे संघटित करता येईल ह्याचा विचार करू लागले ब्रिटिशांनी स्वतःच जागतिक साम्राज्य उभं केलं होतं मुस्लिमांचे आटोमन साम्राज्य अद्याप जिवंत होते आणि ह्या प्रतिसृष्टीय सृष्टीय संमिश्र जागतिकीकरणात फक्त हिंदूच असे होते जे स्वतःच्या देशात घायाळ आणि गुलाम होऊन पडले होते अमूर्त जागतिक संस्कृती जन्माला घालण्याची सुरवात शैवांनी केली असली तरी आणि बौद्धांनी ह्या सुरवातीचा चांगला विस्तार केला असला तरी हा विस्तार मोक्षाचे जागतिकीकरण होता ह्याला काटशह म्हणून ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम ह्यांनी धर्माच्या जागतिकीकरणाची सुरवात करून जगभर धार्मिक धुमाकूळ घातला टिळकांच्यापुढे ह्या दोन्ही धर्मांचे ज्युडायिक जागतिकीकरणाचे मॉडेल उभे होते एक मागासलेले व कालबाह्य तर दुसरे अर्थवादाने भारावले गेलेले पण आधुनिक ! टिळकांना ह्या दोन्हींचा मध्य हवा होता

ख्रिश्चन मॉडेल  व इस्लामिक मॉडेल दोघेही स्थलांतर करून व एतद्देशीयांना बाटवून धार्मिक जागतिकीकरण साजरे करत होते पण ब्रिटिशांचा मुख्य रस आर्थिक होता आणि धर्म केवळ प्राचीन हाथियार होते त्याउलट कॅथॉलिकांच्या दृष्टीने ब्रिटिश साम्राज्य हे केवळ धर्मांतरासाठी लोकसंख्या उपलब्ध करून देणारे हाथियार होते धर्मशाही आणि भांडवलशाही ह्यांचे हे अजिबोगरीब साटेलोटे होते जे अंतिमतः हिटलरी जर्मनीत ज्यूंचे बळी घेऊन काहीकाळ थांबले टिळकांनी आर्यांचे स्थलांतर व बाहेरून येणे स्वीकारले कारण इसवी सन १००० नंतर बाहेरून येणारा हा आतमध्ये असणाऱ्यांच्यापेक्षा बलवान असतो असा समज रूढ झाला होता हा आऊटसायडर इज बेटर फिटेस्ट दॅन इन्सायडर चा सिद्धांत ह्या काळात ब्राम्हणांना आपण बाहेरचे आहोत हा खोटा भ्रम स्वीकारायला लावणारा ठरला ब्राम्हणांच्यासाठी मुद्दा कधीच बाहेरचा कि आतला हा नसतो मुद्दा सत्ता कुणाला मिळेल हा असतो सत्ता बाहेरच्याला मिळणार असेल तर ब्राम्हण ताबडतोब ह्या देशात आउटसायडर व्हायला तयार असतात आणि सत्ताप्राप्तीसाठी आतील रहिवासी असणे गरजेचे असेल तर ब्राम्हण ताबडतोब इन्सायडर होतात टिळकांनी त्यांच्या काळानुरूप आउटसायडर होणे पसंत केले कारण आउटसायडरनेस त्यांना ब्रिटिशांच्या तुलनेत ब्रिटिशांच्यासमोर ब्रिटिशांच्याबरोबरचा इक्वलपणा बहाल करत होता

जनेटिक लेव्हलला आपण सगळे बरेचसे एकसारखे असलो तरी सांस्कृतिक अस्मितेवर आजही आपली श्रद्धा आहे टिळकांनी ही सांस्कृतिक अस्मिता  आर्य हिंदू अस्मितेत  शोधली मात्र हे करतांना मुस्लिम सांस्कृतिक अस्मितेचे  काय करायचे हा प्रश्नही बाकी होता जो वाटेवरच उभा होता ह्या देशाने पन्नासदा आपली सांस्कृतिक अस्मिता बदलली होती आणि तिला एका सूत्रात गोवणे फार कठीण होते ब्रिटिशविरोध हे ह्या गोवणीचे निगेटिव्ह सूत्र होते पण पॉझिटिव्ह सूत्राचे  काय ? चिपळूणकरांनी टिळकांना हे सूत्र दिले ज्याचे नाव हिंदुत्व होते जे परंपरा आणि इतिहास ह्याच्या आधारे उभे होते टिळकांच्या सुरवातीच्या कर्मठपणाचे रहस्य ह्या सूत्रात आहे ओळख व अस्मिता धर्माच्या आधारे उभी करायची ठरली कि माणूस धार्मिक बाबतीत योग्य-अयोग्य विवेक गमावतो टिळकांचे हेच झाले आणि आजच्या हिंदू ज्यू ख्रिश्चन इस्लामिक नेत्यांचाही हाच प्रॉब्लेम आहे

अस्मितेचा  हत्ती पकडायचा कसा हा टिळकांच्यापुढचा खरा प्रश्न होता कारण सात आंधळ्यांची कथा टिळकांनाही माहीत होती धर्मयुगात धर्म तर मोक्षयुगात दर्शन तुम्हाला अस्मिता पुरवत असे सृष्टीय युगात अस्मिता पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रावर , विज्ञानावर ,  विचारप्रणालीवर व विचारप्रणालीच्या आधारावर उभ्या असलेल्या संविधानावर आली होती आणि भारतीयांची मग ते हिंदू असोत कि गैरहिंदू शोकांतिका हीच होती कि त्यांच्या ताब्यात त्यांचे राष्ट्र न्हवते राष्ट्र निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांना हाकलून देणे सर्वाधिक गरजेचे होते त्यामुळेच टिळकांनी सामाजिक सुधारणा साईडलाईन केल्या आणि ब्रिटिशांना हाकलून देणे हा आपला अजेंडा बनवला टिळकांच्या दृष्टीने किती राष्ट्रे बनवायची हाही मुद्दा दुय्यम होता ब्रिटिशांना प्रथम हाकलून लावू मग आपण एकत्र बसून ठरवू असे त्यांचे म्हणणे होते जे बरोबर व काळाशी सुसंगत होते कारण राष्ट्रसत्तेशिवाय आणि राजसत्तेशिवाय सुधारणा अशक्यच किंवा लुटुपुटीच्या होतात भारताची सर्वात मोठी शोकांतिका हीच आहे कि ज्यावेळी राष्ट्रवाद आवश्यक होता त्या काळात भारतातील विचारवंत सामाजिक सामाजिक करत बसले तर १९४७ नंतर धार्मिक पूर्णपणे गाडून सामाजिक सामाजिक वैज्ञानिक वैज्ञानिक करणे आवश्यक होते तेव्हा सामाजिक वैज्ञानिक आर्थिक करण्याऐवजी ते धार्मिक धार्मिक राजकीय राजकीय करत बसले त्यामुळे ना धड सामाजिक सुधारणा झाल्या ना राष्ट्र उभारणी नीट झाली टिळक आणि गांधी हे दोनच नेते असे झाले ज्यांनी काळाची गरज ओळखली होती आणि त्यांना त्यामुळे जनतेचा पाठिंबाही भरपूर मिळाला

राष्ट्रीय अस्मिता अनेक  गोष्टींनी बनतात

१ प्रमुख नेत्यांची ओळख जशी कि गांधी वैष्णव होते व मोक्षक होते टिळक वैदिक वैष्णव धार्मिक व मोक्षक होते
२ राष्ट्राविषयीच्या भविष्यकालीन  व भूतकालीन कल्पना
३ राष्ट्र ज्या स्थितीतुन चालले आहे ती स्थिती मग ती भौगोलिक , वर्तमानकालिक असो कि भावनिक व बौद्धिक असो
४ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांचा  त्या त्या राष्ट्रातील संविधानावर असलेला विश्वास व संशय
५ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांची क्रियाशीलता , कृतिविवेक , कर्तव्याची जाण आणि कर्तव्याशी असलेली निष्ठा
६ त्या त्या राष्ट्रातील नागरिकांची शक्ती तिची जागृती व निद्रा वा बेशुद्धी

ब्रिटिशांनी दिलेल्या संविधानावर सुरवातीच्या काळात हिंदवासीयांचा विश्वास होता पण १८७० नंतर तो ढासळू लागला कारण ब्रिटिश साम्राज्यवादाच्या वृक्षाखाली पनपणारा हा राष्ट्रवाद तकलादू व एकतर्फी होता आणि त्यात प्रजेचा सहभाग नाकारला होता एका अर्थाने डेमोक्रेटिक किंगशिप वा क्वीनशिप चालू होती आणि भारताला लुटणे हाच एककलमी कार्यक्रम चालू होता आणि हे शोषण हळूहळू वैश्य व शूद्रांना कळू लागले होते टिळक तेल्यातांबोळ्याचे पुढारी म्हणून उदयाला आले ते ह्या पार्श्वभूमीवर !

काँग्रेसमधले नेते जेव्हा स्वतःची प्रतिष्ठा नौकरी पद पैसे सांभाळण्यात मग्न होते तेव्हा टिळक जनतेशी थेट संपर्क साधू पाहत होते

योनीव्यवस्थेनुसार ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांचे साटेलोटे असणे अटळ होते आणि टिळकांनी तसा प्रयत्नही केला त्यातूनच त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजींची बाजू घेतली पण त्यात त्यांचे हात चांगलेच पोळले पुढे सयाजीराव व शाहू ह्यांच्याशी त्यांचे जे भांडण झाले त्यात एक महत्वाची गोष्ट हीच होती कि टिळकांना हे साटेलोटे मान्य होते पण सयाजी व शाहू महाराज दोघेही ह्या योनिव्यावस्थेत अडकायला तयार न्हवते ते ब्राम्हण ब्राम्हणेतर ह्या नव्या व्यवस्थेत प्रवेश करायला उत्सुक होते कारण त्यामुळे समाजाचे नेतृत्व त्यात क्षत्रियांच्याकडे येण्याची अधिक शक्यता होती त्यांना ब्राम्हणांचे मांडलिकत्व मान्य न्हवते त्यांना समान दर्जा हवा होता जो वेदोक्त मंत्र नाकारल्यामुळे नाकारला गेलाय असे त्यांना वाटत होते

टिळकांचा प्रॉब्लेम हाच होता कि त्यांना कोणत्याच अर्थाने हे लोक पुरेसे क्षत्रिय वाटत न्हवते इंग्रजांची गुलामी पत्करणारे व त्यांच्या तैनाती फौजेच्या आधारे जगणाऱ्या लोकांना क्षत्रिय कसे मानावे हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता पुढे  ह्या दोघांचीही बाजू व मजबुरी त्यांच्या लक्ष्यात आली आणि त्यांचे ह्या दोघांशीही असलेले संबंधही सुधारले  पांडवही शेवटी काहीकाळ दास होते ह्याचा अर्थ गीताधर्मानुसार ते क्षत्रियच नाहीत असा होऊ शकत न्हवता

ह्यातून एक गोष्ट घडली ती म्हणजे टिळकांनी सुरवातीला आपली राजकीय लढाई चालवतांना ब्राम्हणांच्यावर मदार ठेवली ह्याबाबत त्यांचा आदर्श नाना फडणवीस होते हे लक्ष्यात घेण्याजोगे आहे त्यांच्या लिखाणात नाना फडणवीसांचा गौरव त्यामुळे वारंवार होतो तो ह्यामुळेच !पण ह्यामुळेच ब्राम्हण एकसंध ठेवणं ही त्यांची राजकीय गरज बनली पण ह्या राजकीय गरजेमुळे ब्राम्हणांची एकी तुटू नये म्हणून त्यांनी सामाजिक सुधारणांना विरोधही केला

कर्म बुद्धी आणि भक्ती ह्या तिन्हींमधील विरोध नाहीसा होऊन सर्व आयुष्य यज्ञमय करणे ह्यातच गीताधर्माचे सकळ वैदिक धर्माचे सार आहे असे ते मानत सर्वभूताहितार्थ झटणे हे त्यांना कर्तव्य वाटत होते असे सर्वभूताहितार्थ झटणारे लोक कमी झाले म्हणून हिंदूंचे पतन झाले अशी त्यांची श्रद्धा होती अलीकडे ब्राम्हण असला कि त्याच्या राष्ट्रभक्तीविषयी संशय घेतलाच पाहिजे अशी काही ब्राम्हणेतरांची समजूत झालीये मला वाटतं टिळकांची राष्ट्रभक्ती अस्सल सोन्यासारखी होती संशय कुठे आणि किती ताणवावा ह्याचा विवेक जितका ब्राम्हणांना आवश्यक आहे तितकाच ब्राम्हणेतरांनाही आवश्यक आहे

श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक आणि भारतीय राष्ट्रवाद
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २७ श्रीधर तिळवे नाईक


त्याकाळात फक्त मराठ्यांनाच राष्ट्राची आवश्यकता भासण्याचे कारण त्यांनीच सर्वात मोठा भूभाग ताब्यात ठेवला होता आणि नव्या राष्ट्रवादाच्या आधारे पुन्हा एकदा संपूर्ण भारत आपल्या टापांखाली आणता येईल अशी स्वप्ने मराठयांना पडत होती काँग्रेसमधल्या मराठेतर लोकांना मराठ्यांच्या ह्या स्वप्नाची जाणीव होती त्यामुळेच जेव्हा टिळक केंद्रस्थानी येण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा फिरोजशहा मेथा सारखे लोक कम्फर्टेबल न्हवते कारण सुरतेची लूट आणि ब्रिटिशांची लूट ह्यात डावे उजवे करणे त्यांना कठीण जात होते राजपूत मुघलांच्यानंतर ब्रिटिशांची सेवा करण्यात मग्न होते तर बंगाली लोकांना मराठ्यांची राजवट ब्रिटिश्यांच्या तुलनेत सरस वाटत होती उत्तरेला मराठे नको होते कारण त्यांना मोघलांच्या राजवटी आणि मराठे ह्यांच्या तुलनेत मराठे असभ्य व रानटी वाटत होते दक्षिण मात्र सुरवातीपासूनच स्वतःला स्वतंत्र समजत होता आणि मराठ्यांचा राष्ट्रवाद दाक्षिणात्य नाहीये ह्याचे त्याला दुःख होते ज्याची पर्वा मराठ्यांनी कधीच केली नाही पंजाब्यांना मराठे आपले हितसंबंध राखतील ह्याची पक्की खात्री होती त्यामुळेच लाला राजपत राय  लोकमान्य टिळकांना पाठिंबा द्यायला पुढे सरसावत होते

ह्याकाळात कुणालाच भारत हे अखंड राष्ट्र म्हणून जन्मणार कि भारताची अनेक राष्ट्रे होणार हे माहीत न्हवते इंग्रज , गोखले , रानडे , नौरोजी , टिळकांनी प्रथम अखंड भारताचे स्वप्न जनतेला दाखवले आणि बंगाल्यांना ते मान्य होते किंबहुना टिळकांच्या नेतृत्वाला बंगाली लोकांनी मनापासून पाठिंबा दिला कारण ते टिळकांना नवा शिवाजी समजत होते तशी पार्श्वभूमी तयार झाली होती बंगाली लोकांच्यात ह्याकाळात प्रामुख्याने जे नवजाग्रण झाले होते ते धार्मिक व सामाजिक होते स्वामी विवेकानंद व अरविंद घोष हे दोघेही अध्यात्मिक अधिक होते आणि अरविंदांचा टिळकांना राजकीय पाठिंबा होता बंगाल्यांची राजकीयता हळूहळू डावी बनत गेली कारण ब्रिटिश भांडवलशाही आणि साम्राज्यशाही ह्यांचा सर्वाधिक फटका त्यांना पडला होता आणि ब्रिटिश करत असलेल्या शोषणाची तीव्र जाणीव त्यांना होती मात्र टिळकांच्या काळात ते तीव्र राष्ट्रवादी बनत होते

ह्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो तो म्हणजे मराठे सर्वच उत्तर भारतात आउटसायडर राज्यकर्ते म्हणून वावरत होते त्या संस्काराचा परिणाम म्हणून तर टिळक आउटसायडर कंट्रोलर झाले नाहीत ना ? थेट अखिल हिंदुस्तानचे राज्यपद घेण्याचे डेअरिंग टिळकांच्यातही न्हवते काय ? कि असे डेअरिंग फक्त टिळकांच्यात होते म्हणूनच ते पहिले नॅशनल हिरो झाले आणि मराठ्यांच्या खेकडा वृत्तीने त्यांच्या पायात इतर मराठ्यांनी ते पडावेत म्हणून पाय घातले ?

आजही आरएसएस मधून मराठा आउटसायडर कंट्रोलर म्हणून वावरतात पण थेट पंतप्रधानपद घेत नाहीत ही करणी काय दर्शवते ? हिंदुत्ववाद असणे म्हणजे हिंदूंचे आउटसायडर कंट्रोलर बनणे अशी मराठ्यांची समजूत आहे काय ? कि सत्ता मिळवायची पण निर्णयांची जबाबदारी घ्यायची नाही असा हा सनातन गांडू बगीचा आहे ?

जोवर मराठे स्वतःच्या इतिहासातून बाहेर येत नाहीत तोवर मराठ्यांचे काही खरं नाही शेवटी शिवाजी महाराजांनाही दिल्ली कधी जिंकायचीच न्हवती आणि शिवाजी महाराजांनी आखून दिलेली ही सीमारेषा ओलांडण्याची पहिली हिम्मत करणारा पुरुष म्हणून टिळकांचे नाव घ्यावे लागते किंवा टिळकांनीही ही सीमारेषा ओलांडली नाही असे म्हणावे लागते

टिळक इतर समकालीनांच्यासारखे केवळ राष्ट्रवादी झाले नाहीत तर राष्ट्रीयही झाले आणि इतिहासातील त्यांचे स्थान ह्या एका गोष्टीसाठी अढळ आहे

श्रीधर तिळवे नाईक

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २८ श्रीधर तिळवे नाईक

टिळकांच्या राष्ट्रवादाचे स्वरूप हे आर्य राष्ट्रवादाचे होते आणि आगरकरही त्याच्याशी सहमत होते आर्य झाडाची भारतीय शाखा असा शब्दप्रयोग आगरकरांनी वापरला आहे जावडेकरांनी आगरकरांच्या राष्ट्रवादाला विवेकनिष्ठ राष्ट्रवाद असे म्हंटले आहे ब्रिटिशांचे आंधळे अनुकरण आणि अतिरेकी कर्मठ देशाभिमान ह्यांचा मध्य ह्या राष्ट्रवादाला अपेक्षित होता ह्याकाळात पंजाबमध्ये आर्य समाज बंगालमध्ये रामकृष्ण मिशन व मद्रासमध्ये थिऑसॉफी हे सर्वच भारतीय संस्कृतीचा भारतीय चेहरा निश्चित करण्याच्या मागे लागले होते आणि थिऑसॉफी सारखे काहीजण तर वर्णव्यवस्थेचे समर्थनही करायला लागले होते ह्या सर्वांनाच संस्कृतीचा हिंदू चेहरा घडवायचा होता ज्याला ते सनातन मानत होते हे सर्वच सुधारणावादी होते अपवाद फक्त टिळकांचा होता एकीकडे टिळकांचा जहाल कर्मठपणा तर दुसरीकडे आगरकरांचा जहाल समाजसुधारणावाद हे महाराष्ट्रात एकत्रच नांदत होते एका अर्थाने काँग्रेसचा विचार आगरकर पुढे न्हेत होते तर टिळक चातुर्वर्ण्यवादी हिंदुत्वात  डुबक्या मारत आधी स्वराज्य मग सुधारणा म्हणत होते सामाजिक सुधारणेशिवाय राष्ट्रवाद शक्य आहे असे टिळकांना वाटत होते महाराष्ट्राने त्याकाळात हिंदुत्ववादाची निवड केली आणि आगरकरांच्या विवेकी राष्ट्रवादाला साईडलाईन केले

नेमक्या ह्याचवेळेला इतरत्र धार्मिक व अध्यात्मिक चळवळी उदयाला आल्याने राजकारण दुय्यम झाले नेमक्या ह्याचवेळी ह्यूम इंग्लंडला निघून गेले आणि काँग्रेस चेतनाहीन झाली काँग्रेसच्या पुढाऱ्यांची राजकीय हक्काबाबतची उदासी ही इथल्या जनतेशी संलग्न होती आणि टिळकांना हे उमगलं होतं काँग्रेसच्या दादाभाईंनी डेव्हलप केलेल्या आर्थिक राष्ट्रवादातून संघटन होणे शक्य नाही विवेकनिष्ठ राष्ट्रवाद शक्य नाही आर्थिक राष्ट्रवाद शक्य नाही तर मग करायचं काय ?

टिळकांना ह्या प्रश्नाचे उत्तर धर्मात व हिंदुत्वात  सापडले

राष्ट्रवाद हा नैसर्गिक नाही कारण तो अमूर्त असतो माणसाला कुटुंब नैसर्गिक वाटते पण राष्ट्र नाही शैव धारणेनुसार काम हा एकमेव अक्ष पार्थिव आहे आणि माणूस ह्यांच्यापलीकडे क्वचितच जातो हा कामच त्याच्या संबंधाचे नेटवर्क स्थिर करतो आणि माणूस त्यातच सुरक्षित फील करतो त्यामुळेच भारतीयांची मजल कुटुंब कुल आणि विस्तारित कुल ह्यांच्यापलीकडे जात नाही ह्या विस्तारित कुळांचा गण बनतो ह्या गणाचे नियम अर्थ ठरवतो

पुढे ह्या गणांची राज्ये बनली तरी मूळ प्रवृत्ती कमी झालेली नाही जग हेच कुटुंब हे केवळ मोक्ष मिळाल्यावरच शक्य असते अन्यथा तोपर्यंत मी ज्यात जगतो ते कुटुंब म्हणजे जग ही शैव धारणा आहे राज्याकडे शैव करमणूक म्हणूनच पाहतात किंवा अत्याचारी असेल तर उदासीनतेने ! त्यामुळे राज्याकडून ब्रिटिश राष्ट्राकडे जे अत्याचारी संक्रमण झाले त्याबाबत शैव उदास होते किंवा मग फुल्यांच्याप्रमाणे ब्रिटिशवादी ! फुल्यांनी व्यक्त केलेल्या ब्रिटिश राजवटीकडच्या आशा व अपेक्षा ह्यांची १८९० नन्तर ब्रिटिशांनी साफ धूळधाण उडवली आणि ह्या धुळधाणीकडे लक्ष्य देण्याऐवजी सत्यशोधक समाजाचे धुरीण फुल्यांनी आखलेल्या सीमारेषेत गिरमिटत राहीले फुल्यांच्यावेळची ब्रिटिश राजवट डार्विनिझममुळे पूर्ण बदलली आहे हे सत्यशोधकवाद्यांच्या लक्षातच आले नाही वास्तविक राष्ट्रवादाची गरज ओबीसींना सर्वाधिक होती पण फुल्यांचा पलीकडे विचार करणे जणू पापच आहे अशा थाटात ह्या काळात ओबीसी वावरले शेतकऱ्यांची आणि कारागिरांची परवड त्यामुळे ह्या काळात कळसाला पोहचली

टिळकांच्या राष्ट्रवादाला ह्या काळात ओबीसींची गरज भासली नाही कारण स्वराज्यात ओबीसींची भूमिका काय हे खुद्द टिळकांनाच कळत न्हवते त्यांच्या दृष्टीने फुले ब्रिटिशांचे एजन्ट होते तर फुल्यांच्या मते टिळक रानडे पेशवाईचे अप्रत्यक्ष पुरस्कर्ते टिळकांना त्यामुळे पुढे कामगारांचा पाठिंबा मिळाला पण कारागिरांचा नाही कारण टिळक हे कामगारांचा ज्या आस्थेने विचार करत होते त्या आस्थेने कारागिरांचा करत न्हवते किंबहुना त्यांचा राष्ट्रवाद हा प्रामुख्याने ब्राम्हणांनी संघटित केलेला राष्ट्रवाद होता आणि थोडाफार ओबीसी शैवांचा जो कामगार वा छोटा व्यापारी होता

ह्या काळात महाराष्ट्रात निर्माण झालेला एकमेव संत साईबाबा होता ज्याचा कसलाही राजकीय वा सामाजिक प्रभाव न्हवता फुल्यांचा अँप्रोच धार्मिक होता त्यांना मोक्षाविषयी काहीही देणेघेणे न्हवते त्यामुळे त्याला पाठिंबा मिळणे शक्यच न्हवता किंबहुना तो मोक्षाची जाणीव नसल्याने भारतीय कमी आणि ज्युडायिक ज्यादा होता त्यामुळे केशवचंद्र सेनांचे जे बंगालमध्ये झाले तेच फुल्यांचे महाराष्ट्रात झाले मात्र बंगालमध्ये नंतर  रामकृष्ण परमहंस , विवेकानंद व अरविंद अशी त्रयी उदयाला आली तशी महाराष्ट्रात आली नाही त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि मराठी धार्मिक जाणीव अध्यात्मिक झालीच नाही ती व्रतं आणि उद्दापने ह्यात हरवून गेली किंवा पुढे साईबाबा व विठ्ठल ह्यांच्या दिंड्यात विरघळून गेली आणि जिथे मोक्ष नसतो तिथे धर्म अधिक राजकीय बनतो ह्या न्यायाने टिळक व राजवाडे ह्या दोघांचाही राष्ट्रवाद अधिकाधिक हिंदुत्ववादी बनला राजवाडे ह्यांना हिंदुत्व हवे होते तेही चातुर्वण्याधिष्टित कारण राजवाड्यांच्या भाषेत ज्ञानेश्वरमहाराजांपासून एकनाथमहाराजांपर्यंतचे जे साधुसंत झाले त्यांनी महाराष्ट्रातील लोक हिंदुत्वात राखिले महाराष्ट्रधर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून राजवाडे आणि टिळक ह्यांच्या दृष्टीने हिंदुत्वच होते

टिळक , रामदास , हिंदुत्व आणि इतिहासाचार्य राजवाडे
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती २९ श्रीधर तिळवे नाईक

राजवाडेंना महाराष्ट्र धर्माची संकल्पना रामदासांच्यावरून सुचली हे तर उघड आहे कारण रामदासांनीच महाराष्ट्र धर्म वाढवावा असं सांगितलं होतं आणि रामदासांनीच आपला हा महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी संन्याश्याना संघटित करून समर्थ संप्रदाय निर्माण केला व संन्याश्यांच्या संघटनेचे एक नवीन मॉडेल भारतापुढे सादर केले रामदासांनी मारुतीची बजरंगाची मंदिरे सर्वत्र बांधून त्या आधारे तालमी उभारल्या आखाडे उभारले व बलोपासना हीही उपासना आहे हे ठसवले हिंदुत्ववादी संघटनातील आखाडा किंवा अघोरी किंवा बजरंग दल वा संन्याश्यांच्या संघटना ह्या मॉडेलबर हुकूम चालतात  समर्थ रामदासांची शिवाजी महाराजांशी भेट झाली होती कि नाही हा एक वादाचा विषय आहे ब्राम्हण इतिहासकार ह्या भेटीबाबत पॉझिटिव्ह असतात तर ब्राम्हणेतरवादी निगेटिव्ह आरएसएस आणि हा समर्थ संप्रदाय ह्यांच्यात अनेक साम्यस्थळं आहेत किंबहुना आरएसएसची प्रेरणाच मुळात रामदास स्वामी व त्यांचे संघटन आहे फक्त महाराष्ट्र धर्माऐवजी व्यापक हिंदुत्व आले आहे राजवाडेंच्या मते रामदासांनी ४० ते ५० हजार शिष्य मराठेशाहीमागे उभे केले जिला राजवाडे भोसलेशाही व ब्राह्मणपदपातशाही अशा दोन कालखंडात विभागतात व १७५० नंतर भोसलेशाहीचा अंत होऊन निर्विवादपणे ब्राम्हणपदपातशाही आल्याचे दाखवून देतात (पहा राजवाडे लेखसंग्रह )माझ्या मते भोसलेशही जाऊन पेशवेशाही आली ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागते हिंदुत्ववादाची प्रेरणा ही पेशवेशाही आहे जिच्यात ब्राम्हण पेशवे  कंट्रोलर व गायकवाड , होळकर , शिंदे , भोसले हे अंमलबजावणी करणारे आहेत श्रीकृष्णाच्या पापपुण्यायोनिव्यवस्थेनुसार  वैष्णव क्षत्रियांना हे मान्य आहे

राजवाड्यांच्या मते रामदासांच्या पूर्वी महाराष्ट्रातील ब्राम्हण खंडोबा विठोबा तुळजा ह्यांचीच पूजा करत होते रामदासांनी त्यांना रामाकडे वळवले खंडोबाला ते स्कंद मानतात जे माझ्या मते सत्य आहे माझ्या मते यादवांच्या काळातच कृष्ण हा यादव असल्याने कृष्णाची पूजा सुरु झाली आणि चक्रधरांनी महानुभाव पंथांची स्थापना करून कृष्ण केंद्रस्थानी आणला पुढे विठ्ठल ही शैव देवता असूनही यादवांच्या राजवटीतच जाणीवपूर्वक तिचे वैष्णवीकरण सुरु झाले व ज्ञानेश्वरांच्यापासून सर्वच संत ह्या वैष्णवीकरणात सामील झाले पुढे पंडित कविंनी रामायण व महाभारताची मराठी रूपे सादर करून राम आणि कृष्ण ह्यांचा महिमा वाढवला व रामदासांनी समर्थ संप्रदायाच्या नावाने राम संप्रदाय स्थापन करून उरलेसुरले वैष्णवीकरण पूर्ण केले तेव्हा जे श्रेय राजवाडे फक्त रामदासांना देतात ते योग्य न्हवे वैष्णव संतांनी ह्या कामाची सुरवात आधीपासूनच केली होती जो राजाचा धर्म तोच प्रजेचा धर्म ह्या न्यायाने यादवांच्या काळातच शैव असलेला महाराष्ट्र वैष्णव झाला व देशस्थ कऱ्हाडे कोकणी ब्राम्हणांनी शैव धर्माचा त्याग करून ते वैष्णव बनले आणि चातुर्वर्णाचे समर्थनही करू लागले ह्याचा परिणाम म्हणजे गीता ही मराठी लोकांच्या केंद्रस्थानी आली आणि मराठी लोकांच्यामुळेच ती आख्या हिंदूंची मुख्य धर्मग्रंथ बनली ह्या काळातच पुण्य संपादन करण्यासाठी रोज एक दोन व्रते व दोनतीन उद्दापने व आठवड्यातून तीन चार उपवास व विटाळ वैग्रे धर्मकांडांची बजबजपुरी माजली पुणे ही ह्या धर्मकांडांची राजधानी बनली आणि पेशवेशाहीत राजकारणही धर्मकाण्डात फिरू लागले

टिळकांना ह्या पेशवेशाहीचे वा राजवाड्यांचा शब्द घ्यायचा असेल तर ब्राम्हणपदशाहीचे आकर्षण का वाटले ?
ज्याप्रमाणे पहिल्या शाहू महारांजांच्यानंतर भोसलेशाहीचा अंत होऊन पेशवेशाही आली तसेच काहीसे हिंदुस्तानात झाले होते ब्रिटिशांनी ह्या देशातल्या क्षत्रियांचा व वैश्यांचा पूर्ण खात्मा करून त्यांना साम्राज्याचे मांडलिक बनवले होते अशा पार्श्वभूमीवर फक्त ब्राम्हणांनाच इंग्रजांच्याविरुद्ध लढण्याची थोडीफार मोकळीक होती एक गोष्ट आपण लक्ष्यात घेतली पाहिजे कि राजवाडे ब्राम्हणांच्याकडून एका प्रखर नैतिकतेची अपेक्षा करत होते तत्कालीन पापपुण्ययोनीव्यवस्थेनुसार राजवाडे ह्यांना ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांचे साटंलोटं व त्याचा समाजावर राज्य करण्याचा अधिकार मान्य होता सत्प्रवृत्त ब्राम्हण व सत्प्रवृत्त क्षत्रिय ह्यांच्या युतीतूनच चांगले राज्य निर्माण होते जसे शिवाजीच्या काळात झाले व ही सत्प्रवृत्ती ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांच्यातून नष्ट झाली म्हणून मराठेशाहीचा अंत झाला अशी राजवाड्यांची मांडणी होती व टिळकांना ती मान्य होती

क्षत्रिय ब्रिटिशांचे मांडलीक झाल्याने व त्यांची सत्प्रवृती नष्ट झाल्याने आता सत्प्रवृत्त ब्राम्हणांनी कर्तव्य बुद्धीने संघटित होऊन स्वराज्य स्थापन केले पाहिजे आणि त्यासाठी ब्राम्हणेतरांना सोबत घेतले पाहिजे अशी टिळकांच्या राष्ट्रवादाची मांडणी आहे त्यांची ब्राम्हण शब्दाची व्याख्याच मुळी जो जो स्वराज्य स्थापन करायला निघाला आहे तो ब्राम्हण अशी होती

टिळकांच्या राष्ट्रवादाची तपासणी मी मुद्दामच एतद्देशीय पद्धतीने तपासतोय कारण टिळकांच्यावरचा प्रभाव फक्त मार्गी न्हवता तर देशीही होता हे लक्ष्यात यावे

श्रीधर तिळवे नाईक



संत ,रानडे ,टिळक , इतिहासाचार्य राजवाडे , हिंदुत्व आणि राष्ट्रवाद
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३० श्रीधर तिळवे नाईक

भारतीय जनमानसावर असलेल्या संतांच्या प्रभावाचे राजकीय पातळीवर काय करायचे हा एक प्रश्नच होता आणि ह्याचे उत्तर ह्या काळात तीन पद्धतीने शोधले गेले

१ संतांना सुधारक मानणे हे उत्तर रानडेंनी दिले गोखलेंनी वाढवले गांधींनी मोठे केले
२ संतांना कालबाह्य मानणे हे आगरकरांनी दिले नाही पण सुचवले त्यांनी फक्त गौतम बुद्धाचाच  संस्कृती सुधारक म्हणून उल्लेख केला आहे त्यांना चातुर्वर्ण्य मान्य न्हवता व आपण त्याचा त्याग केला पाहिजे असे ते म्हणत हे तत्व कम्युनिस्टांनी व आंबेडकरांनी धरून ठेवले मात्र वाढवले नाही ज्याचा राजकारणावर वाईट परिणाम झाला
३ आणि संतांनी चातुर्वर्ण्य धर्माचे पुरुज्जीवन करून हिंदू धर्म शाबूत राखला हे उत्तर चिपळूणकर व राजवाडेंनी दिले


आजही आपण संताच्याबाबत ह्या तीन उत्तरात घुटमळतो

युरोपियन प्रबोधनातही धर्माचे , सेंट लोकांचे , प्रेषितांचे आणि ईश्वराचे काय करायचे हा प्रश्न उभा ठाकला होता आजही लोक उत्क्रांतीऐवजी ऍडम आणि ईव्ह ब्रम्हदेव व सरस्वती ह्यांच्यावर आधिक विश्वास ठेवत असल्याने आजही हा प्रश्न सुटलेला नाही संत आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या काळात कितपत रिलेवंन्ट आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो कारण मोक्ष वा निर्वाण म्हणजे काय हेच अनेकांना कळत नाही संत मोक्षवादी आहेत धर्मवादी नाहीत असं म्हणून त्यांची सुटका करता येईल का ?

रामदासासारख्या संतांनी मोक्षाची कमी व महाराष्ट्र धर्माची उपासना आधिक केल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होतो मुळात मोक्षाचे नाव घ्यायचे आणि ब्राम्हणी धर्माचा अजेंडा वापरायचा असाही एक नतद्रष्ट उद्योग काही लोकांनी केल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होतो

शेतकरी आत्महत्या करतांनाही विठ्ठलाचे नाव घेत असतील तर त्यांचं काय करायचं ? दुष्काळांनी तुकारामाची मोक्षसाधना फार विचलित केलीये असं वाटत नाही अशावेळी संत नेमके काय म्हणतायत हे कळणे दुरापास्त होते

वस्तुस्थिती अशी आहे कि विज्ञान व तंत्रज्ञानाला भारतातील दुष्काळ मॅनेज करता आलेले नाहीत आणि त्यामुळेच धर्माचा प्रभाव कमी होत नाहीये भारतीय हवामान खाते मान्सूनची निदाने अचूक करेल तर लोक गुरव ब्राम्हणांकडे का जातील ? शेवटी पेरणी अचूक कधी होईल हा अचूक टायमिंगचा प्रश्न असतो टिळकांच्या काळात गावात त्यामुळेच गुरव ब्राम्हणांचा प्रभाव होता आणि ह्या प्रभावाचे काय करायचे हा खरा राजकीय प्रश्न होता
आरोग्याबाबतही वैद्यराज डॉक्टरांपेक्षा जास्त महत्वाचे होते साहजिकच संतांवरची श्रद्धा ढळलेली न्हवती

त्यामुळेच आगरकरवाद व कम्म्युनिस्ट ह्यांना संतांच्याबाबत फारसा प्रतिसाद मिळाला नाही कारण ते संतांच्यावर स्वतःच्या आयडियालॉजीच्या आधारे तुटूनच पडले नाहीत आणि ही लढाई हरत गेले व शेवटी ह्या लढाईत फक्त दोनच प्रकारचे राष्ट्रवाद उरले

१ पहिला काँग्रेसी राष्ट्रवाद जो संतांना सुधारक म्हणून सादर करत होता
२ हिंदुत्ववादी राष्ट्रवाद जो संतांना चातुर्वर्ण्याचे रक्षक म्हणून सादर करत होता

राजवाड्यांच्या मते हिंदू संस्कृती ही वर्णाश्रमधर्माची चौकट सोडून कधीच गेली नाही आणि ह्या चौकटीला हरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जैन बौद्ध व महानुभाव धर्मांना तिने हिंदू संस्कृतीच्या बाहेर फेकून दिले साधुसंतांनी ही  परंपराग्रस्त चौकट मोडण्याचा प्रयत्न कधीही केला नाही

राजवाडे ह्यांचे म्हणणे हे ऐतिहासिक पुराव्यावर अधिक टिकते हे स्पष्ट आहे प्रश्न आहे हिंदुत्वाला ही चौकटच पुढे न्यायची आहे कि वर्णाश्रमधर्माची ही चौकट मोडायची आहे ? माझ्या मते टिळकांनी शेवटी शेवटी आर्य समाजाचे कर्माप्रमाणे वर्ण ही गोष्ट स्वीकारून ही चौकट लवचिक केली पण सुरवातीला ते चातुर्वर्ण्याचे कट्टर समर्थकच होते वास्तविक आर्य समाजाने कर्माप्रमाणे वर्ण अशी मांडणी केली होती पण ती स्वीकारण्याचे धैर्य सुरवातीला टिळकांच्याकडे न्हवते  आज अविनाश धर्माधिकाऱ्यांच्यासारखे हिंदुत्ववादी  लोक जेव्हा कर्माप्रमाणे वर्ण मानत असतात तेव्हा ते आर्य समाजी वा उत्तरार्धातल्या टिळकवादी हिंदुत्वाचा पुरस्कार करत असतात पण हे उशिरा आलेले शहाणपण आहे

संतांना हे हिंदुत्व मान्य होते का ? स्पष्टच सांगायचे तर ह्याचे कसलेही पुरावे संतांच्या लेखनात सापडत नाहीत

गंमतीचा भाग असा कि १९२३ साली राधामाधवविलासचंपू च्या प्रस्तावनेत राजवाडे उत्तरार्धातल्या  टिळकांच्या प्रभावाखाली येऊन वर्णाचे व जातींचे कार्य होऊन चुकले आहे असे म्हणतात टिळक राजवाडे व आगरकर तिघेही जावडेकर सिद्ध करतात त्याप्रमाणे अज्ञेयवादी पण प्रवृत्तिपर वेदान्ताचे पुरस्कर्ते होते आणि त्यांना संतांचा निवृत्तिपर वेदांत अमान्य होता हा प्रवृत्तिपर वेदांत हिंदुत्ववादाचा कणा आहे



राजवाड्यांनी  ब्राम्हण , मराठा क्षत्रिय , मराठा कुणबी व नागवंशी महार ह्यांना महाराष्ट्र देशाचे गुरुत्वमध्य मानले आहे आणि हा  गुरुत्वमध्य राखण्यासाठीच हिंदुत्ववाद्यांनी मराठा कुणबींना , आंबेडकरांना व नागवंशी महारांना व मराठा क्षत्रियांना ह्यांना कायमच प्रोत्साहन दिले आहे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी वैश्यांना , गैरकुणबी ओबीसींना ,  महारेतर अस्पृश्यांना व आदिवासींना  फारसे प्रोत्साहन देत नाहीत त्याचे कारण राजवाड्यांची ही गुरुत्वमध्य मांडणी आहे आजच्या भाजपतील आयाराम प्रोत्साहनात ह्या मांडणीचा बराच वाटा आहे

श्रीधर तिळवे नाईक

राष्ट्रवाद , हिंदुत्व आणि सुधारणा ह्याबाबत टिळकांना नेमके काय म्हणायचे आहे

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३१ श्रीधर तिळवे नाईक

लोकमान्य टिळकांच्या निबंधसंग्रहाच्या चौथ्या खंडात टिळकांचा " हिंदुत्व आणि सुधारणा " ह्या नावाचा एक लेखच आहे (पान ३७१)  त्यात त्यांनी हिंदुत्वाच्या अंगाने सुधारणेची मांडणी केली आहे आणि त्याचा असलेला राष्ट्रवादाशी संबंधही विशद केला आहे त्याचे सार पुढीलप्रमाणे

१ सुधारणा झाल्या पाहिजेत पण त्या हिंदुत्वाला सोडून होता कामा नयेत बुद्धाचा मांसाहाराला असलेला विरोध व शंकराचार्यांचा असलेला विरोध एकसारखा पण बुद्धाचा हिंदुत्वाला सोडून आहे त्यामुळे तो अयोग्य आहे किंवा ख्रिश्चन व मुस्लिम ह्यांचा मूर्तीपूजेला असलेला विरोध आणि आर्य समाजाचा मूर्तीपूजेला असलेला विरोध ह्यात आर्य समाजाचा विरोध हिंदुत्वाला धरून असल्याने तो योग्य आहे

२ हिंदुत्व म्हणून काही विशिष्टपणा आहे जो प्रत्येक हिंदूने सुधारणा करतांना जपला पाहिजे इंग्रजी शिक्षणात हा विशिष्टपणा नाहीसा होण्याचा धोका असतो

३ सुधारणांचा मुख्य उद्देश राष्ट्रीयत्वाचा अभिमान जागृत करणे हा होय हा अभिमान आम्ही कोणास धरावयाचा ? अर्थात हिंदुत्वाचा होय

४ आमची म्हणून काही धार्मिक परंपरा आहे आणि ती इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे

५ ज्याप्रमाणे ल्यूथरने बायबलवर श्रद्धा ठेवूनच धर्मक्रांती केली त्याचप्रमाणे हिंदूंच्यातील धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवून हिंदूंच्यात धर्मक्रांती करता येणे शक्य आहे व पुढेमागे त्याप्रमाणे सामाजिक सुधारणा देखील !

६ शास्त्री पंडित आणि नवशिक्षित ह्यांना अनुक्रमे नव्या ज्ञानाची व परंपरेची माहिती होणे गरजेचे आहे जेणेकरून सुवर्णमध्य काढता येईल वाईट ते फेकता येईल चांगले ते राखता येईल

टिळकांच्या मते  रानडेदेखील अखेरीला हिंदुत्व कायम राखले पाहिजे ह्या मतांकडे वळले होते

माझ्या मते ह्या निबंधात टिळकांच्या हिंदुत्वाचा अर्क आलेला आहे आणि मी  टिळकांना आद्यहिंदूहृदयसम्राट का म्हणतो हेही इथे स्पष्ट होते

श्रीधर तिळवे नाईक

टिळकांचे हिंदुत्व आणि त्याची सत्यासत्यता १

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३१ श्रीधर तिळवे नाईक

टिळकांच्या हिंदुत्वाची तत्वे आपण पाहिली आता त्याची सत्यासत्यता तपासू


तत्व १ हिंदुत्वाची म्हणून काही धार्मिक परंपरा आहे आणि ती इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे

प्रश्न असा कि हिंदुत्वाची धार्मिक परंपरा काय आहे तर ती पुढीलप्रमाणे आहे
१ वैदिक परंपरा ही आद्य परंपरा
२ त्यानंतर श्रुतिस्मृतिपुराणोक्त ब्राम्हणी परंपरा
३ महाकाव्य , पुराणोक्त वैष्णव परंपरा
४ वरील तिन्ही व संतोक्त , ब्रम्हा विष्णू महेश्वर ह्या त्रिदेवांनी , जातीव्यवस्था युक्त व वेदान्तिक युक्त हिंदू परंपरा

ह्या सर्व परंपरांना हिंदुत्व स्वीकारते.  ह्या सर्वच परंपरांत अनेक परस्परविरोध आहेत मात्र वर्णाश्रमव्यवस्थेला मान्यता हे सर्वच परंपरांचे वैशिष्ट्य आहे ब्राम्हण संस्थेला पुरोहित म्हणून हिंदुत्व मान्यता देते  व शंकराचार्य हेच धर्मप्रमुख ह्यालाही हिंदुत्वाची  मान्यता आहे शंकराचार्य हे ब्राम्हणच असायला हवेत हेही हिंदुत्वाला मान्य आहे ब्राम्हणांचे अधिकार जन्मदत्त ह्यालाही हिंदुत्वाची मान्यता आहे धार्मिक निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार ब्राम्हणांना  व ब्राम्हणांच्यात वाद झाला तर  धार्मिक निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार शंकराचार्य ह्यांना आहे हेही हिंदुत्वाला मान्य आहे

टिळकवादी हिंदुत्वाचे दुसरे तत्व
२ धर्म आणि व्यवहार ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीत त्या एकच आहेत
हे आहे ह्यातून राज्य म्हणजे धर्मराज्य ही संकल्पना जन्म घेऊ शकते

टिळकवादी हिंदुत्वाचे तिसरे तत्व
३ ज्याप्रमाणे ल्यूथरने बायबलवर श्रद्धा ठेवूनच धर्मक्रांती केली त्याचप्रमाणे हिंदूंच्यातील धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवून हिंदूंच्यात धर्मक्रांती करता येणे शक्य आहे व पुढेमागे त्याप्रमाणे सामाजिक सुधारणा देखील करता येणे शक्य आहे !
हे आहे . त्यामुळेच हिंदू धर्मग्रंथांना  विशेषतः वेद व गीता ह्यांना हिंदुत्व पवित्र मानते व सर्व हिंदुत्ववाद्यांनी व ज्याप्रमाणे ख्रिश्चन बायबलवर व मुस्लिम कुराणावर श्रद्धा ठेवतात त्याप्रमाणे हिंदूंनी वेद व गीता ह्या ग्रंथांच्या  पावित्र्यावर श्रद्धा ठेवावी अशी अपेक्षा करते हिंदुत्वाची पवित्र ग्रंथांची यादी खूप मोठी व न संपणारी आहे पण ह्याचा एक फायदा असाही होतो कि कुठल्याही सुधारणेला कुठल्या न कुठल्या धर्मग्रंथाचा आधार मिळतोच


टिळकवादी हिंदुत्वाचे चौथे  तत्व
४सुधारणा झाल्या पाहिजेत पण त्या हिंदुत्वाला सोडून होता कामा नयेत बुद्धाचा मांसाहाराला असलेला विरोध व शंकराचार्यांचा असलेला विरोध एकसारखा पण बुद्धाचा हिंदुत्वाला सोडून आहे त्यामुळे तो अयोग्य आहे किंवा ख्रिश्चन व मुस्लिम ह्यांचा मूर्तीपूजेला असलेला विरोध आणि आर्य समाजाचा मूर्तीपूजेला असलेला विरोध ह्यात आर्य समाजाचा विरोध हिंदुत्वाला धरून असल्याने तो योग्य आहे

हिंदुत्वाचा सुधारणेला विरोध नाही फक्त तुम्हाला हिंदूंच्या पवित्र ग्रंथाचा आधार शोधून तो त्या सुधारणेला द्यावा लागेल असे टिळक सुचवतात


टिळकवादी हिंदुत्वाचे  पांचवें   तत्व हिंदुत्व म्हणून काही विशिष्टपणा आहे जो प्रत्येक हिंदूने सुधारणा करतांना जपला पाहिजे इंग्रजी शिक्षणात हा विशिष्टपणा नाहीसा होण्याचा धोका असतो हे आहे हिंदुत्वाचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना विरोध आहे कारण इंग्रजी शाळेत हिंदुत्व टिकवलं जाणार नाही असं हिंदुत्वाला वाटतं


टिळकवादी हिंदुत्वाचे सहावे   तत्व सुधारणांचा मुख्य उद्देश राष्ट्रीयत्वाचा अभिमान जागृत करणे हा होय हा अभिमान आम्ही कोणास धरावयाचा ? अर्थात हिंदुत्वाचा होय

हिंदुत्वाचे मुख्य उद्दिष्ट हिंदुत्ववादी राष्ट्रवाद आहे त्यामुळे टिळक  सुधारणा कशासाठी तर राष्ट्रीयत्वासाठी असे स्पष्टपणे सांगतात

टिळकवादी हिंदुत्वाचे सातवे   तत्व शास्त्री पंडित आणि नवशिक्षित ह्यांना अनुक्रमे नव्या ज्ञानाची व परंपरेची माहिती होणे गरजेचे आहे जेणेकरून सुवर्णमध्य काढता येईल वाईट ते फेकता येईल चांगले ते राखता येईल

टिळकांना तरुण वैदिक लोकांना स्मृतिभ्रंश झालाय ह्याची पूर्णपणे कल्पना होती त्यामुळेच नव्यानां जुने ज्ञान द्यावे तर शास्त्री पंडितांनी नवे शास्त्रीय ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात करावे म्हणजे हिंदू संस्कृती सुवर्णमध्य काढेल असे त्यांना वाटे


टिळकवादी हिंदुत्वाची ही सात तत्वे समजली कि टिळकही समजतात आणि आत्ताचे हिंदुत्ववादीही

श्रीधर तिळवे नाईक

जहालमवाळवाद कि उदारमतवाद विरुद्ध हिंदुत्ववाद : अडवाणी आणि टिळक

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३२ श्रीधर तिळवे नाईक

सर्वसाधारण टिळकांनी १८९० साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १८९५ साली टिळकांच्यामुळे काँग्रेसमध्ये जहालमवाळवाद सुरु झाला अशी पारंपारिक इतिहासाची मांडणी आहे माझ्या मते ही मांडणी चुकीची आहे वस्तुस्थिती अशी आहे कि टिळकांना आपल्या हिंदुत्ववादाच्या सात तत्वांची पूर्ण जाणीव होती आणि आपल्या सामाजिक सुधारणाविषयीच्या सनातन मांडणीतून त्यांनी ती व्यक्त केली होती रानडेन्च्या  उदारमतवादाला सामाजिक सुधारणेच्या पातळीवर विरोध करून ते आपल्या हिंदुत्वाची मांडणी करत होते इंग्रजांचा धार्मिक हस्तक्षेप हिंदू लोकांनी खपवून घेऊ नये असे म्हणत त्यांनी लोकप्रियता कमवायला सुरवात केली केसरीतील अंक २ व ४ मधेच त्यांनी सुधारणांना हिंदू धर्मग्रंथांचा आधार शोधायला सुरवात केली होती व त्यांच्या आधारे कऱ्हाडे देशस्थ कोकणस्थ ह्यांच्या आंतरजातीय विवाहाचे समर्थन केले होते

राजकारणात उदारमतवाद ब्रिटिशांच्या राज्याला परमेश्वरी प्रसाद मानत होता  आणि व्यवहारात हा प्रसाद हिंदूंची लूट करत होता ह्यूमच्या पहिल्या सात वर्षात ह्या उदारमतवादाने सरकारच्या विरोधात जाणे नाकारले हे शाहबानो प्रकरणात राजीव गांधींनी मुस्लिम सुधारणाविरोधी सनातन लोकांच्या विरोधात जाणे नाकारले तसेच होते ह्याचा फायदा लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेला व हिंदुत्ववादाला  झाला तसाच फायदा टिळकांना नंतर झाला १८९३ च्या मुंबई दंग्यात आणि १९९३च्या मुंबई  दंग्यात फरक असला तरी दिशा एकच होती हिंदुत्ववादाला फायदा ह्यूमला प्रतिसाद न देणे आणि शाहबानोला प्रतिसाद न देणे एकसारखेच होते वृत्ती स्वतःचे हितसंबंध सांभाळणे हीच होती

टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले तर अडवाणींनी राम मंदिर आंदोलन सुरु केले दोन्ही ठिकाणी दंतकथा आणि इतिहासाचा अवलंब होता आणि दोन्ही ठिकाणी उद्देश एकच होता हिंदूंचे संघटन दोन्ही ठिकांणी उद्देश एकच होता हिंदूंच्या काळजाला हात घालणे

टिळकांना असे का करावेसे वाटले ?

टिळकांना प्रामाणिकपणे वाटत होते धर्म आणि व्यवहार ह्या दोन गोष्टी भिन्न नाहीत त्यांचा राजवाडे व चिपळूणकर प्रणित इतिहासावर विश्वास होता आणि ज्याप्रमाणे संतांनी व संत रामदासांनी धर्माच्या आधारे महाराष्ट्र धर्म संघटित केला तसाच धर्माच्या आधारे हिंदू राष्ट्रधर्म आपण संघटित करू असे त्यांना वाटत होते ज्याप्रमाणे रामदासांनी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी असे म्हणत शिवरायांच्या साहाय्याने व नावाने भूमंडळी संघटित केली तशीच आपण शिवजयंतीच्या साहाय्याने भूमंडळी संघटित करू असे त्यांना वाटत होते ज्याप्रमाणे रामदासांनी मारुतीची देवळे बांधून व तालमी आखाडे बांधून संघटन उभे केले त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळाच्या साहाय्याने आपण बुद्धीचा जागर घालून लोकांना संघटित करू असे त्यांना वाटत होते

टिळकांचा हा अंदाज चुकला नाही आणि रामदासी फार्म्युला नव्या युगात कमालीचा यशस्वी झाला लालकृष्ण अडवाणींनी हाच फार्म्युला रामाच्या संदर्भात पुन्हा नव्याने वापरला व टिळकांच्या प्रमाणे हिंदुत्वाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली काँग्रेसने टिळकांना संघटनांसाठी वापरून फेकून दिले भाजपने अडवाणींच्याबाबत हाच कित्ता गिरवला ना टिळकांच्या माथ्यावर पडलेला कर्मठतेचा शिक्का पुसला गेला ना अडवाणींच्या !

दोन्ही लोहपुरुषांची शोकांतिका गंजण्यात झाली टिळक आधीच गेल्याने वाचले अन्यथा गांधींच्यापुढे टिळकांची पंचाईत झाली असती जशी नंतर टिळकवाद्यांची झालीही  मोदींनी अडवाणींचा वापर संपल्यावर त्यांना अडगळीत फेकून दिले मराठी लोकांनी आतबट्ट्यात जाऊन सुरु केलेला धंदा गुजरात्यांनी ताब्यात घेऊन नफ्यात चालवणे ह्याची सुरवात टिळक -गांधींच्यापासून होते

श्रीधर तिळवे नाईक

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३३ श्रीधर तिळवे नाईक

उत्तर पेशवाईत वर्ण जातिव्यवस्थेला कायदेशीर मान्यता मिळाली आणि सारस्वत ब्राम्हण हे शैव ब्राम्हण असल्याने त्यांच्या जमिनी त्यांचे ब्राम्हणत्व अमान्य करून जप्त करण्यात आल्या प्रभू ह्या दुसऱ्या शैव पुजारी समुदायाला फक्त शूद्रांना प्रवेश असणारी शैव देवळे सांभाळण्याचा आदेश देण्यात आला सुवर्णकाम करणाऱ्या शैव देवतांचे सुवर्णालंकार बनवणाऱ्या सोनारांना धोती घालण्याची सक्ती करून त्यांचा शूद्रांच्यात समावेश झाला शैव पुरोहित  गुरव जंगम ह्यांना शूद्रांचा दर्जा देण्यात आला तर महारांच्या गळ्यात मडके कमरेला झाडू बांधण्याची सक्ती करण्यात आली आणि हे सर्व लेखी आदेशाद्वारे करण्यात आले टिळकांनी पेशवाईने राज्यकारभार लिखित खातेनिहाय केला म्हणून पेशवाईचे अनेकदा कौतुक केले आहे पण पेशव्याच्यामुळेच भारतात प्रथम खानेसुमारी होऊन जात लिखित झाली कायमची लवचिकता गमावून बसली हे टिळकांना कधीच कळाले  नाही पेशवाईने लिखित केलेल्या जाती इंग्रजांनी छापील केल्या आणि मग त्या  कायमच्या चिपकल्या ह्या शूद्र झालेल्या लोकांना नमस्कार बोलण्यास बंदी घालण्यात आली आणि रामराम म्हणण्याची सक्ती झाली 

वैदिक कर्मकांड करणाऱ्या ब्राम्हणेतरांची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्याचा अधिकार राज्याला मिळाला पुण्यात तर घाशीराम कोतवालास बोलवण्यात आले 

टिळकांना हे सर्व का दिसले नाही कि हिंदुत्वामुळे टिळक आंधळे झाले ? देश म्हणजे केवळ देशातील राज्य न्हवे तर देश म्हणजे देशातील जनता होय . परधर्मियांचे राज्य म्हणून इंग्रज राज्याला धर्मात हस्तक्षेप करायला मनाई करणारे टिळक पेशवाईतील अत्याचाराकडे पाठ फिरवून का होते ? चित्पावनांचे गेलेले राज्य परत मिळवणे एव्हढाच टिळकांचा अजेंडा होता का ?

पेशवाई बुडाली ती केवळ बेदिलीमुळे न्हवे तर अत्याचारी राजवटीमुळेही ! लोकांच्याकडून देशप्रेमाची अपेक्षा करतांना देशातल्या राजवटीनेही लोकांची काळजी घ्यायची असते पेशवाईने ही काळजी घेतली नाही उलट जनतेला ओरबाडणे लुबाडणे एव्हढाच एक कलमी कार्यक्रम १७९० नंतर सुरु झाला रा गो भांडारकरांच्या भाषेत उत्तर पेशवाईने जनतेवर धार्मिक राजकीय सामाजिक आर्थिक असे सर्व प्रकारचे अत्याचार केले 

टिळकांच्या लिखाणात पेशवाईतील अत्याचाराबाबत जी अनास्था आढळते ती केवळ अनाकलनीय नाही तर बधिरताही दर्शवते प्रश्न एव्हढाच आहे कि ही बधिरता हिंदुत्ववादाचे व्यवच्छेदक लक्षण आहे कि तत्कालीन परिस्थितीवर असलेला टिळकांचा नाईलाज ?

 गीतेतल्या पापपुण्यव्यवस्थेचे भारतावर जे काही दुष्परिणाम झाले त्यातील एक म्हणजे ब्राम्हण क्षत्रिय वर्णात जन्मलेले लोक पुण्ययोनिचे असल्याची गॅरंटी खुद्द भगवान कृष्णांनी दिल्याने हे दोन्ही वर्ण आत्ममग्न वर्णमग्न बनले इतके कि आपले काही जनतेप्रती कर्तव्य आहे ही गोष्टच हे दोन वर्ण विसरून गेले वैश्य शूद्र अतिशूद्र आदिवासी ह्यांना लुटण्याचा आपण पुण्ययोनी असल्याने आपल्याला जन्मसिद्ध अधिकार आहे असे ह्यांना वाटू लागले मुस्लिम इंग्रजी राजवटीची निर्लज्जपणे चाकरी करायला ह्यांना आपण पुण्ययोनी असल्याचे वाटल्याने काही लाज वाटली नाही किंवा काही अपराधबोधही झाला नाही अपवाद शिवाजींच्यासारखे वा पहिल्या बाजीरावांसारखे होते पण हे अपवाद होते खुद्द टिळकांच्या काळात शाहू महाराज सयाजीराव असे राजे होते पण हेही अपवादच होते 

उरलेल्यांना इंग्रजांची राजवट ते पुण्ययोनीत जन्मल्यानेच  प्राप्त झाली आहे असे वाटत होते 

टिळक गाढवांच्यापुढे त्यांचा गीताधर्म वाचत होते काय आणि त्यामुळेच पेशवाईतील अत्याचारांवर पांघरूण घालत होते काय ?


श्रीधर तिळवे नाईक 



टिळकांचे हिंदुत्व , शिवजयंती आणि सेक्युलॅरिझम

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३४ श्रीधर तिळवे नाईक

इतिहासाचार्य राजवाड्यांनी इतिहासाबाबत जे काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले त्यातील एक म्हणजे शिवाजीपासून नाना फडणवीसांपर्यंत प्रत्येकाच्या समोर छापील पुस्तके येत होती तरी ह्यांना ही छापील क्रांती का आत्मसात करावीशी वाटली नाही का हे लोक लिखितातच अडकून पडले ? टिळकांना हा प्रश्न कायमच बोचत राहिला आणि ह्यावर उपाय म्हणून त्यांनी छापील माध्यमाचा दणकून प्रचार केला

टिळकांनी केसरीतून ज्या काही गोष्टी केल्या त्यातील एक म्हणजे चांगल्या छापील ग्रंथांची त्यांनी केलेली समीक्षा व करून दिलेला परिचय अगदी आपल्या शत्रूंच्या ग्रंथावरही टिळक ज्या आत्मीयतेने लिहतात ते पाहण्यासारखे आहे जिनसीवाले असोत कि आगरकर टिळक माणसांना साधकबाधक सर्वांगाने समजूत घेतात त्यांच्याशी असलेले आपले मतभेद प्रामाणिकपणे मांडतात राजकारणाचे सौजन्य टिळक जाणतात त्यामुळेच टिळकांचे मृत्युलेख त्या त्या मृत व्यक्तीचे यथोचित मूल्यमापन करतात मग ती व्यक्ती गोखले असो कि रानडे !

टिळकांनी वेळोवेळी केलेली भाषणे महत्वाची आहेत इज शिवाजी नॉट अ नॅशनल हिरो ( २४ जुने १९०६ MARATHA )ह्या भाषणात त्यांना शिवाजी महाराज का एकमेकाद्वितीय राष्ट्रीय हिरो वाटतात ते त्यांनी सांगितले आहे त्यांच्या ह्या भाषणामुळे ते शिव जयंती सार्वजनिक का करू इच्छित होते ते कळते किंबहुना भारतभर शिवाजीविषयी आदर निर्माण करण्यात टिळकांचा वाटा सिंहाचा आहे भारतातील स्वराज्य चळवळीचा मुख्य आयकॉन (टिळकांच्या भाषेत स्पिरिट )शिवाजी महाराज आहेत पुढे पंजाबी लोकांनी गुरु गोविंदांनाही आणले आणि मग प्रत्येक प्रांताने आपापला आयकॉन आणला .

मुस्लिमांना इरिटेट करण्यासाठी आम्ही शिवजयंतीउत्सव साजरा करत नाही आहोत असं टिळक ठणकावून सांगतात हिंदू आणि मुस्लिम ह्या दोघांनाही शिवाजींच्यापासून प्रेरणा मिळणार नाही का असा प्रश्न ते विचारतात शिवाजीचा लढा हा अन्यायी राजवटीविरुद्ध होता असे ते म्हणतात शिवाजी महाराष्ट्रात जन्मले ह्या गोष्टीला महत्व नाही तर त्यांनी काय केले हे महत्वाचे असे ते म्हणतात शिवाजी महाराजांच्या मुळे भारतीयांची वेळोवेळी क्रिटिकल परिस्थितीत योग्य तडफेचे नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता कळते असे ते म्हणतात

सर्वात धक्कादायक म्हणजे टिळक हिंदू ज्याप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करतात तसा मुस्लिमांनीही अकबर किंवा तत्सम नेता पुढे आणून अकबर जयंती साजरी करायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारतात

प्रश्न असा आहे कि टिळक अशी मांडणी कशी काय करू शकतात ?

मी मागेच सिद्ध केल्याने सर्वधर्मसमभाव हा इसवीसन ९०० पर्यंत बहुतांशी भारतीय राजवटींचा उद्देश होता  ह्या उद्देशाला मुस्लिम राजवटींनी काळिमा फासला व मुस्लिम राजवटीत मुस्लिमधर्मभाव व वैष्णव राजवटीत वैष्णवधर्मभाव तर उत्तर पेशवाईसारख्या वैदिकब्राम्हणी  राजवटीत वैदिकब्राम्हणी भाव प्रस्थापित झाले ह्या राजवटींनी धर्मराज्ये स्थापन केली काही धर्मराज्ये उदार वा लवचिक होती पण अंतिमतः ती धर्मराज्येच होती ह्यातील वैष्णव धर्मराज्यात व वैदिकब्राम्हणी धर्मराज्यात ख्रिश्चन व मुसलमानांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची व त्यांच्या धर्मात धर्मांतर घडवण्याची अनुमती असल्याने धर्मांतर घडवण्याची अनुमती होती त्यामुळेच ह्या देशात वैष्णव व वैदिकब्राम्हणी राजवटीतही सुखाने धर्मांतरे घडत राहिली

भारतात ब्रिटिशांची राजवट आली तेव्हा आम्ही तुमच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही असे वचन ब्रिटिश राजवटीने दिले टिळकांच्या दृष्टीने ही राजवट ख्रिश्चन होती व तिने धर्मात हस्तक्षेप न करण्याचा कायदेशीर व्यवहार स्वतःच स्वीकारला होता आणि त्यामुळेच टिळकांना हिंदू धर्मात सरकारचा हस्तक्षेप मान्य न्हवता कारण असा हस्तक्षेप म्हणजे जनता व सरकार ह्यांच्यातील करार मोडणे होते आणि एक वकील म्हणून टिळकांना हे मान्य न्हवते

फ्रेंच लोक नेपोलियनचा इंग्रज लोक नेल्सनचा उत्सव साजरा करत असतील तर भारतीयांनाही त्याप्रमाणे शिवाजी जयंती उत्सव साजरा करण्याचा हक्क आहे असे ते मानत फ्रेंच व ब्रिटिश लोकांच्याप्रमाणे भारतीयांनाही राष्ट्रीयत्व जोपासण्याचा हक्क आहे असे ते मानत ब्रिटिश राजवट स्वतःला सेक्युलर समजत असली तरी ती स्वतःला त्याबरोबरच प्रोटेस्टंट ख्रिश्चनही समजत असे त्याचप्रमाणे हिंदूंची राजवट स्वतःला सेक्युलर समजूनही हिंदू राहू शकते असा त्यांचा युक्तिवाद होता थोडक्यात टिळक हिंदू सेक्युलर राष्ट्र स्थापन करावयास निघाले होते ज्यात मुस्लिमांचे धार्मिक हक्क अबाधित राहणार होते म्हणूनच टिळक मुस्लिमांना तुम्हीही अकबर जयंती साजरी करा असे म्हणू शकतात कारण अकबर जयंती साजरी करणे हा मुस्लिमांचा धार्मिक हक्क आहे असे ते मानत पण मुस्लिम जर औरंगजेब वा अफझलखान ह्यांची जयंती साजरी करणार असतील तर त्यांच्या हिंदू सेक्युलर स्टेट मध्ये ते बसत न्हवते

मी टिळकांना आद्यहिंदुहृदयसम्राट का म्हणतो हे ह्यावरूनही स्पष्ट व्हावे

श्रीधर तिळवे नाईक


लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३५ श्रीधर तिळवे नाईक

आपण गेल्या काही लेखांत पाहिले कि

१ पेशवे -छत्रपती ह्या ब्राम्हण क्षत्रिय पुण्ययोनी युतीत संघर्ष होऊन उत्तरपेशवाईचा उदय झाला व ही उत्तरपेशवाईच हिंदुत्वाची मुख्य प्रेरणा आहे
२ समर्थ रामदासांचे संघटन हे हिंदुत्ववादी संघटनांचे मॉडेल आहे
३ ह्या उत्तरपेशवाईचे व रामदासीं संघटनाचे आदर्श ठेवत चिपळूणकर व राजवाडे ह्यांनी आद्य हिंदुत्व मांडले
४ ह्या आद्य हिंदुत्वाचा राजकीय फॉर्म्युला टिळकांनी मांडला ज्याला आज हिंदुत्ववाद म्हंटले जाते त्याचा पाया घातला
६ ह्या पायाची सात मुख्य तत्वे टिळकांनी दिली
७ काँग्रेसने टिळकांचा हा हिंदुत्ववाद स्वीकारला नाही मात्र ह्या हिंदुत्ववादाचा व टिळकांचा वापर स्वतःचा मासबेस वाढवण्यासाठी केला काँग्रेसने साधे अध्यक्षपदही लोकमान्य टिळकांना दिले नाही जहालमवाळवाद हा मुळात उदारमतवाद विरुद्ध हिंदुत्ववाद असा वाद होता तो तत्कालीन लोकांना कळला नाही

आजही काँग्रेसने टिळकांना वापरले कि टिळकांनी काँग्रेसला वापरले हे ठरवणे अवघड आहे माझ्या मते दोघांनीही एकमेकाला वापरले मात्र ह्या व्यवहाराचा पाया राष्ट्रभक्ती हाच होता

बंगालमधल्या उदारमतवादी लोकांना मुस्लिम सुभेदारी नको असल्याने त्यांनी ब्रिटिश राज्य टिकले पाहिजे अशी भूमिका घेतली होती आणि राजा राम मोहन रॉय ह्यांचा ब्राम्हो समाज व केशवचंद्र सेन ह्यांचा प्रार्थना समाज ह्यांनी तिला उदारमतवादाच्या चोकटीत व्यवस्थित तात्विक रूप दिले होते त्यांच्या प्रभावाखाली येऊन महाराष्ट्रातील प्रार्थना समाजवादी झालेल्या रानडेंनीही ब्रिटिश राजवटीला ईश्वराचा प्रसाद मानले.ह्या ईश्वराच्या प्रसादाने पुढे चांगलाच प्रसाद द्यायला सुरवात केल्याने बंगाली अस्वस्थ होऊ लागले आणि काही अध्यात्माकडे वळले

त्याउलट महाराष्ट्रात ह्या प्रसादवादी उदरमतवादापेक्षा एक राज्य गेल्याने हळहळ वाटणाराही वर्ग होता १८८० नंतर उदारमतवाद्यांचा प्रसादफ़ुगा फुटला आणि ब्रिटिश राज्याने केलेल्या शोषणाचे चित्र स्पष्टपणे पुढे यायला लागले मात्र ह्यातून निर्माण झालेल्या असंतोषाला आवाज देणाऱ्या नेत्यांपैकी नेमक्या ह्याच वेळी आगरकरांचे निधन झाले परिणामी जहाल उदारमतवादाची व उदारमतवादी जहाल राष्ट्रवादाची जी नवी मांडणी काँग्रेसमध्ये उदयाला येत होती ती आटली ह्याचवेळी काँग्रेसी उदारमतवादाच्या नावाखाली आपले हितसंबंध जपणाऱ्या नोकरदार नेत्यांना कंटाळून ह्यूम इंग्लंडला निघून गेले दादाभाईंचेही वय झाले आणि काँग्रेस कणाहीन शवासारखी निस्तेज झाली

ह्याचा परिणाम असा झाला कि सामाजिक सुधारणांबाबत पारंपरिक व राजकीय बाबतीत जहाल असणाऱ्या टिळकांना व टिळकांच्या हिंदुत्ववादाला मोकळे मैदान मिळाले त्यांनी जनतेचा आवाज ऐकला व त्याला वाच्यताही दिली आणि उपाय म्हणून स्वदेशी , स्वराज्य , स्वातंत्र्य आणि बहिष्कार अशी चार हत्यारे विकसित करायला सुरवात केली . भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी टिळकांना त्यामुळेच मिळाली व ती योग्य होती

टिळकांच्याबद्दल ह्यावेळी फिरोजशहा मेथा म्हणाले किं जोवर शिवाजी आणि टिळक महाराष्ट्राच्या हृदयात जिवंत आहेत तोवर महाराष्ट्रच हिंदी स्वराज्याचा प्रश्न सोडवेल हा आशावाद निर्माण करणे हे टिळकांचे खरे यश होते

१८८९ साली मुंबई इलाका प्रांतिक परिषदेच्या संयुक्त सरचिटणीसपदी टिळकांची नेमणूक झाली सुरवातीचे वाद कायद्याच्या अंगाने होते विशेषतः मुलीच्या लग्नाचे संमती वय विरोधकांच्या थेट छावणीत घुसायची टिळक नीती संमती वयाच्या विरोधकांच्या सभेत सुरु झाली टिळक विरोधकांच्या सभेत घुसून दंगा घालतात अशी टीकाही दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात झालेली दिसते

उक्ती आणि कृती ह्यात विरोधाभास असता कामा नये हा टिळकांचा नेहमीच आग्रह होता किंबहुना सुधारकांच्याबाबत त्यांना जो मुख्य प्रॉब्लेम वाटत होता तो उक्ती आणि कृतीतील अंतर हाच होता स्वतः कृती न करता कायदे करू पाहणारे हे लोक आहेत असे त्यांना वाटे त्याऐवजी शंभरेक सुधारकांनी प्रथम कृती करावी म्हणजे समाजात वातावरण तयार होईल आणि मग कायदा करावा अशी त्यांची भूमिका होती थोडक्यात लोकमान्यता मिळत नाही तोवर कायदे होऊ नयेत असे त्यांना वाटे मात्र मनुस्मृतीचे कायदे कोणत्या लोकांची मान्यता मिळवून केले होते अस्पृश्यांना विचारून अस्पृश्यांविषयीं कायदे केले होते का असे प्रश्न काही त्याकाळात कुणी टिळकांना विचारले नाहीत

साधारण १८९३ ते ९४ दरम्यानच्या अनेक लेखात टिळकांनी हिंदुत्व व हिंदुराष्ट्र हे दोन शब्द अनेकदा वापरलेले दिसतात ह्यामागे कारण काय होते

१८९३ च्या मुंबई दंगलीचा उल्लेख मी केलेला आहे पण ह्यानंतर १८९४ साली पुण्यात झालेल्या दंग्याने चित्र पालटले सार्वजनिक गणेशोत्सव वाढत गेला त्याची प्रतिक्रिया उमटणे अटळ होते रात्री दहा अकरा दरम्यान दारूवाला पुलाच्या मशिदीवरून मेळा जात असतांना श्रीमंत सरदार नातू व मेळा ह्यांच्यावर मशिदीतील काही मुसलमानांनी हल्ला केला व दंगा पेटला ह्या दंग्यात जाणीवपूर्वक ब्रिटिशांनी फक्त हिंदू तरुणांना अटक केली पुढे जस्टीस जेकब ह्यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली पण ह्या घटनेने टिळक अधिकाधिक हिंदू संघटनाविषयी विचार करू लागले तह व स्नेह दोन तुल्यबळामध्येच होतो म्हणून हिंदूंचे संघटनही तुल्यबळ असले पाहिजे असे उपाय म्हणून टिळक सुचवू लागले

१८९५ साली टिळकांनी पहिली निवडणूक लढवली व ३५ मते मिळवून सरदार गरुडांना पराभूत करून जिंकली टिळक नामदार झाले त्यानंतर पुणे नगरपालिका सार्वजनिक सभा अशा एकामागून एक संस्था टिळकांनी हासील करायला सुरवात केली ह्याच वर्षी आगरकर वारले आणि टिळकांच्या मनावरचा सामाजिक सुधारणासंदर्भातला उरला सुरला दट्टा नाहीसा झाला

१८९५ साली काँग्रेसचे अधिवेशन भरवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर पडली त्यात टिळकही होते नेमक्या ह्याचवेळी शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न निर्माण झाला आणि शिवाजीने वाघनख्यां खुपसून अफझलखानाचा वध केला तो योग्य कि अयोग्य असा निरर्थक वादही !शेवटी सुधारक लोकांच्या कारवायांमुळे टिळकांना काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा द्यायला लागला तर सुधारकांची सार्वजनिक सभा जी नेहमी काँग्रेसच्या मंडपात भरायची ती वेगळ्या जागी भरवावी लागली कारण टिळकांचा विरोध व श्रीधर दाते ह्या गृहस्थाने सार्वजनिक सभेचे अधिवेशन काँग्रेसमध्ये झाले तर काँग्रेसचा मंडप जाळून टाकू अशी दिलेली धमकी !

काँग्रेस अधिवेशन भरवण्याच्या जबाबदारीतून मोकळ्या झालेल्या टिळकांनी रायगडावर शिवजयंती साजरी करण्याचा घाट घातला आणि तो यशस्वी झाला ह्यानिमित्ताने टिळक थेट लोकांच्यात उतरले ज्याप्रमाणे महात्मा फुल्यांना भोसले घराण्यांनी शिवजयंती उत्सवासाठी मदत केली नाही त्याप्रमाणे टिळकांनाही केली नाही टिळकांच्या मनात संस्थानिकांच्याबद्दल जी अढी बसली त्याची सुरवात इथे झाली

श्रीधर तिळवे नाईक


काँग्रेसमधील पहिली फूट व टिळक सावरकर का झाले नाहीत
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३६ श्रीधर तिळवे नाईक

लोकमान्य टिळकांनी पुढचे पाऊल टाकून पुण्यात राजकीय कार्य करणारी सार्वजनिक सभा ताब्यात घेतली आणि काँग्रेसमध्ये रानडेवाडी विरुद्ध टिळकवादी असे उघड उघड दोन तट पडले रानडेंना टिळक कुठल्या दिशेने चाललेत ह्याचा अंदाज आला आणि त्यांनी १८९६ साली डेक्कन सभा नावाची नवी राजकीय संघटना काढली हातातून सत्ता गेल्यावर ताबडतोब रानडेंनी वेगळी सभा काढली ह्याचा राग टिळकांनी म्हातारचळ कि पोरखेळ असा प्रश्न विचारून काढला टिळकांना ही फूट रुचली नाही कारण इंग्रजांच्या विरोधात सर्वांनी एकात्म बनून लढले पाहिजे अशी त्यांची धारणा होती हा खरेतर सत्तासंघर्ष होता आणि जुने उदारमतवादी लोक नव्या उदयाला आलेल्या आणि बहुमतात असलेल्या हिंदुत्ववादाला स्वीकारायला तयार न्हवते ह्याचा तो द्योतक होता
टिळक हिंदुत्वाच्या नावाखाली सामाजिक सुधारणांना बुडवायला निघालेले आहेत आणि त्यामुळे आतापर्यंत चाललेला प्रबोधनाचा प्रोजेक्ट धोक्यात आलेला आहे अशी रानडेंना भीती होती

ह्यात भरीसभर म्हणून टिळकांनी दोन पुरुज्जीवनवादी उत्सव सुरु केले १८९४ साली गणेशोत्सव व १८९५ साली शिवजयंती उत्सव टिळकांच्या मते एकराष्ट्रीयत्व ही गोष्ट काही दृश्य पदार्थ नाही तर ती एक कल्पना आहे आणि म्हणूनच सतत जागृत राहून ही कल्पना सतत प्रज्वलित करून टिकवावी लागते राष्ट्राला टिळक कल्पना मानत होते हे आजच्या युवल हरारीच्या चाहत्यांना सुखावणारे वाटेल पण त्यांना ह्यातून हिंदुत्ववाद जन्मतो हे लक्ष्यात आल्यावर युवक हरारी हा प्रत्यक्षात किती डेंजरस विचारवंत आहे तेही कळेल टिळकांना राष्ट्रवाद ही कल्पना जिवंत ठेवण्यासाठी शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव अशा उत्सवाची गरज भासत होती कल्पनांच्या साहाय्याने कल्पना जिवंत ठेवण्यातला हा प्रकार होता ह्याचाच विस्तार म्हणून आपण सर्जिकल स्ट्राईकला बघू शकतो आणि राम जन्मभूमीच्या आंदोलनालाही ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टिळकांच्याच विचाराचा विस्तार करून कल्पनांच्या साहाय्याने हिंदू राष्ट्र ही महाकल्पना आजतागायत जिवंत ठेवली आहे

पुढे ह्या कल्पनेचा भाग म्हणून चातुर्वर्ण्य ही समाजरचनेची कल्पना म्हणून प्रमोट केली जाऊ शकते आणि ब्राम्हण भूदेव आहेत ही कल्पनाही ! एकदा सगळा खेळ कल्पनेचा म्हंटला कि कल्पनेच्या नावाने काहीही खपवता येते फक्त मार्केटिंग चांगले पाहिजे ह्याचा शेवट शेवटी कुणाचे मार्केटिंग सरस व अधिक लोकव्यापी ह्यावर अवलंबून !
न्यायमूर्ती रानडेंचे व राहुल गांधींचे मार्केटिंग टिळक व मोदी ह्यांच्या तुलनेत कमी सरस व कमी लोकव्यापी ठरल्याने रानडे व राहुल गांधी हरले असे म्हणता येईल का ?

ह्या प्रश्नाचे ५०% उत्तर हो आहे पण त्याबरोबरच हेही सत्य आहे कि भारतातील तत्कालीन लोकांना इंग्रजांनी इतकी अपमानास्पद वागणूक दिली होती कि स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देण्यासाठी त्यांना परंपरेखेरीज दुसरा कुठलाच आधार शिल्लक न्हवता शिवाय राजकीय पातळीवर काही घडल्याशिवाय आपल्या आर्थिक पातळीवर काहीही सुधार होणे शक्य नाही असे त्यांना वाटायला लागले टिळक नेते म्हणून रानडे ह्यांच्यापेक्षा अधिक जेन्युईन होते आपल्या मित्रांसाठी मैत्री निभावणारे होते आणि वेळप्रसंगी ते देशाच्या भल्यासाठी जेलमध्येसुद्धा जायला तयार आहेत हे लोकांना स्पष्टपणे दिसत होते एकीकडे स्वतःचे सरकारी पद प्रतिष्ठा आणि पैसा सांभाळणारे उदारमतवादी व  दुसरीकडे जेलमध्ये जाण्याचीही आणि सर्वस्व गमावण्याचीही तयारी असलेले हिंदुत्ववादी टिळक असा हा सामना होता आणि व्यक्तिमत्वाच्या गरीमावर टिळकांनी हा सामना जिंकला

प्रश्न असा उपस्थित होतो कि टिळक जर एव्हढे जहाल होते तर ते क्रांतिकारक का झाले नाहीत

१ टिळकांना मुळात क्रांतीची वेळ आलीये असे वाटत न्हवते त्यामुळे एका अर्थाने ते क्रांतीला लागणारी पार्श्वभूमी तयार करत होते मी नेहमीच म्हणत आलोय कि जगन्नाथ शंकर सेठ दादाभाई नौरोजी फिरोज मेथा ऍलन ह्यूम महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे बॅरिस्टर गोखले स्वामी विवेकानंद गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक शाहू महाराज सयाजी महाराज महर्षी  शिंदे नारायण गुरु महात्मा गांधी पेरियार महर्षी कर्वे बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर सरदार पटेल कॉम्रेड डांगे मानवेंद्रनाथ रॉय हे भारताचे तत्कालीन सर्वच नेते आपला रोल काय ह्याविषयी विलक्षण जागृत होते आणि ह्यातील प्रत्येकाने आपला रोल उत्तम रीतीने निभावला ह्या लोकांना जी समज होती त्याच्या १० टक्के समज जरी नंतरच्या नेत्यात असती तर भारताची ही अवस्था झाली नसती टिळकांनाही आपला रोल काय हे नीट माहित होते

२ सामान्य जनतेची प्रातिनिधिक संस्था मग ती काँग्रेस असो वा इतर कुणी भारतात क्रांती घडवू शकते असा त्यांना विश्वास होता कुठल्याही क्रांतीत सामान्य माणसाचा सहभाग असेल तरच ती यशस्वी होते हा धडा ते शिवाजी महाराजांच्याकडून शिकले होते आणि ह्या सामान्य माणसाच्या सहभागासाठी त्यांना काँग्रेस ही संघटना योग्य वाटत होती नेत्याने नुसते पुढे जाऊ नये आपल्या पाठीमागे राष्ट्रही नीट येते आहे ना ते पाहावे असे ते म्हणत

३ ब्रिटिशांच्याकडून टिळकांनी एक गोष्ट आत्मसात केली होती ती म्हणजे बहुमताचा गौरव बहुमताने मान्य झालेला निर्णय टिळकांनी संपूर्ण आयुष्यात कधीही फिरवला नाही जेव्हा बहुमताने त्यांच्या चिटणीसपदाच्या  राजीनाम्याची मागणी आली तेव्हा त्यांनी चिटणीसपदाचा राजीनामा दिला ह्या अर्थाने टिळक बहुमतवादी होते ह्याउलट गंमतीचा भाग असा कि स्वतःला उदारमतवादी म्हणवणाऱ्या लोकांनी टिळकांच्या बाजूने स्पष्ट बहुमत असूनही त्यांना  काँग्रेसच्या अधिवेशनात यायलाच मनाई केली त्यामुळेच  तत्कालीन बहुमत सशस्त्र क्रांतीच्या बाजूने न्हवते म्हणून टिळकांनी कधीही सशस्त्र क्रांतीचा उघड पुरस्कार केला नाही ते कायदेशीर चौकटीतच राजकारण करत राहिले

भारतीय बहुमत कधीही सशस्त्र क्रांतीच्या बाजूने पडले नाही त्यामुळेच पुढे सावरकर व त्यानंतर बोस एकटे पडत गेले आणि आत्ताचे माओवादीही एकटे पडणे अटळ आहे

टिळक एकटे पडले नाहीत कारण टिळक कायमच बहुमताचा आवाज ऐकत राहिले

श्रीधर तिळवे नाईक

टिळकांनी उत्सव का निवडले ? हिंदू संघटन पण कसे आणि टिळक : आद्यमीडियासम्राट
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३७ श्रीधर तिळवे नाईक

मागच्या लेखात टिळकांना हिंदूंचे संघटन का करावेसे वाटले ते पाहिले प्रश्न होता कसे ?

समर्थ रामदासांनी

सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयाचे
परंतु तिथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे

असा एक मूलमंत्र दिला होता टिळकांनी तो नव्याने अप्लाय केला

मागे उल्लेख केल्याप्रमाणे टिळकांनी त्यांच्यापुढच्या सार्वजनिक सभा नगरपालिका आणि काँग्रेस ह्या वर्तमानकालीन संघटना बळकावण्याचा घाट घातला व काँग्रेसचा अपवाद वगळता ते यशस्वी झाले मात्र ह्या सर्वच संघटनाद्वारे फक्त एलिट क्लासच टिळक-क्षेत्रात दाखल होत होता टिळकांना आपली राष्ट्रवादी चळवळ फक्त एलिट क्लासपुरती मर्यादित ठेवायची न्हवती त्यांना सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत ही चळवळ न्ह्यायची होती

त्यासाठी त्यांनी शिवजयंती उत्सव व गणेशोत्सव सार्वजनिक करण्याचा घाट घातला १ सप्टें १८९६ साली टिळकांनी "राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता " ह्या नावाचा लेख केसरीत लिहून आपली भूमिका विस्तृत प्रमाणात मांडली आहे त्यांच्या मते पाश्च्यात्य देशात जसे राजकीय व औद्योगिक उत्सव होतात व त्यामुळे तिथे लोक एकत्र होतात तसे भारतात लोक एकत्र करायचे असतील तर धार्मिक उत्सवांना पर्याय नाही कारण भारतात लोकांची पहिली प्रायोरिटी धर्म आहे राजकारण वा अर्थकारण नाही त्यामुळे जर सामान्य लोकांना संघटित करायचे असेल तर त्यांना नवे धार्मिक उत्सव पुरवायला हवेत गणपती हा लोकप्रिय देव असल्यानेच त्याच्या नावाने उत्सव केल्यास लोक जमतील हीच गोष्ट शिवाजी महाराजांच्याबद्दल आहे

जर पर्वत महम्मदाकडे जात नसेल तर महंमदाने पर्वताकडे जायला हवे तसेच लोक जर आपल्याकडे येत नसतील तर आपण लोकांच्याकडे जायला हवे भारतात लोक उत्सव कुंभमेळा आणि जत्रा ह्या ठिकाणी जमत असल्याने आपण ह्या ठिकाणी जायला हवे

त्यामुळेच टिळक गणेशोत्सव व शिवाजीउत्सव असे दोन सार्वजनिक उत्सव साजरे करून थांबले नाहीत त्यांनी पारंपरिक जत्रा व उत्सव इथेही आपली लोकं पाठवली त्यांच्या काळात इतर कुणीही हे केलेलं नाही

टिळक फक्त इथेच थांबले का ? तर नाही ! त्या काळात भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली कला ही मेळा होती जिच्यात नाटक नृत्य आणि विनोद ह्यांची बहार उडवलेली असे टिळकांनी राष्ट्रवादी मेळे तयार करायला प्रोत्साहन दिले सेवादलात मेळा पथके नंतर आली सुरवात टिळकांनी केली

थोडक्यात टिळकांनी पारंपारिक मीडिया पुनरुज्जीवित केला नवा उभा केला आणि स्वतःच्या स्वराज्य चळवळीचा सर्वांगाने प्रचार केला

मीडिया कळलेले  टिळक हे  पहिले राजकीय नेते होते टिळक फक्त आद्यहिंदुहृदयसम्राट न्हवते ते आद्यमीडियासम्राटही होते

श्रीधर तिळवे नाईक
लोकमान्य टिळक शेतकरी व दुष्काळ

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३८ श्रीधर तिळवे नाईक

मागील लेखात टिळकांची संघटना वाढवण्यासाठी उत्सव व जत्रा ह्यांचा वापर करण्यासाठी असलेली भूमिका पाहिली टिळक हे कर्मयोगी असल्याने ते फक्त मीडियापुरते मर्यादित राहणे शक्य न्हवते

टिळकांच्या मते वाईट व विपन्न स्थितीत सात्विक मनुष्य परमेश्वरी कृपेची वाट पाहतो तापसी रक्तरंजित कृती करतो तर राजस मनुष्य योग्य विवेकशील अशी समतोल ठेवत कृती करतो देशाच्या विपन्न स्थितीत  टिळक राजस कृती करू इच्छित होते

दुर्देवाने १८९६  साली महाराष्ट्राला अधूनमधून ग्रासणारा दुष्काळाचा प्रश्न उद्भवला १८७६ साली महाराष्ट्रात आलेल्या भयानक दुष्काळाइतका हा तीव्र दुष्काळ होता मात्र महात्मा फुले आणि इतर ह्यांनी त्याकाळात जे कार्य केले होते त्याला मर्यादित यश मिळून सरकारने फॅमिन रिलीफ कोड करून फॅमिन रिलीफ फ़ंड करून त्याची मार्गदर्शनपर तत्त्वेही मुकर्रर्र केली होती  त्यानुसार दुष्काळात सारासूट , वेळप्रसंगी तहकुबी व पिकानुसार सारा ह्याचे प्रावधान होते

टिळक हे एकेकाळचे खोत असल्याने ते महात्मा फुल्यांच्याइतके तज्ञ नसले तरी त्यांना शेतीची थोडी कल्पना होती खोत असल्यानेच सरकारशी टॅक्सेशनबाबत कसे डील करायचे हे त्यांना माहिती होते त्याचा पुरेपूर वापर करून सरकारच्या प्रवधानाचा कसा फायदा घ्यायचा ह्याचा एक आराखडा त्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केला आणि ह्याविषयी शेतकऱ्यांचे शिक्षण करावयाला सुरवात केली ताब्यात आलेल्या सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी ह्यासाठी कामाला जुंपले उदारमतवाद्यांच्या नुसत्या भाषणबाजीला कंटाळलेल्या कार्यकर्त्यांना प्रथमच एक ऍक्शन प्रोग्राम मिळाला हे कार्यकर्ते प्रचारक बनून गावोगावी फिरू लागले

१३ डिसेम्बर १८९६ साली ठाणेच्या उमरगावातील सार्वजनिक सभेच्या अ सि  साठे ह्यांनी खतलवाड गावी गरीब रयतेची सभा भरवून पिके बुडाली तर शेतसारा देऊ नका असे आवाहन केले टिळकांच्या भाषेत सांगायचे तर ही सभा पोलिसांच्या बंदुकीच्या टापात भरली होती तरीही त्यांच्यासमोरच हे आवाहन केले गेल्याने सरकारच्या रोषास टिळक पात्र झाले सरकारने टिळकांच्या अ सि साठे शिवरामपंत परांजपे दत्तोपंत आपटे ह्यांच्यावर खटला भरला टिळक ह्यावेळी काँग्रेस अधिवेशनासाठी कोलकत्यात होते त्यांना बातमी कळताच ते परतले व खटला कसा चालवावा ह्यावर चर्चा सुरु झाली खटल्याच्या दिवशी कोर्टाबाहेर रयतेने प्रचंड गर्दी केली व टिळक पोहचताच टिळक महाराजकी जय अशा घोषणा द्यायला सुरवात केली लोक काहीकेल्या शांत होईनात तेव्हा खुद्द जस्टीस ब्रूकनी टिळकांना लोकांना शांत करा असे सांगितले टिळक बोलायला उभे राहताच शेतकरी शांत झाले ह्या खटल्यात अ सि साठे ह्यांना शिक्षा झाली पण बाकीचे निर्दोष सुटका झाली ह्या एका घटनेने टिळक फक्त ब्राम्हणांचे नेते राहिले नाहीत तर शेतकऱ्यांचेही नेते बनले उदारमतवादी ह्या काळात फक्त अधिवेशन भरवत राहिले

दुष्काळात सारा तहकूब करता येतो वा पिकानुसार कमी पीक असल्यास कमी भरता येतो हे कळलेल्या शेतकऱ्यांनी काही ठिकाणी मग नो शेतसारा आंदोलन सुरु केले हे आंदोलन कायदेशीर असल्याने व त्या पाठीमागे सार्वजनिक सभेचे कार्यकर्ते असल्याने सरकारची चांगलीच पंचाईत झाली

दुसऱ्या पातळीवर टिळकांनी दुष्काळाचा फायदा घेऊन व्यापारी वर्ग साठेबाजी करून किंमती वाढवणार म्हणून स्वतः दुकानांना भेटी देऊन व्यापाऱ्यांना धार्मिक आवाहन करून विवेकशील कृतीचे आवाहन करून किंमती काबूत ठेवल्या तर तिसऱ्या पातळीवर मिळालेल्या देणगीचा गरिबांना स्वस्त धान्य देणारी दुकाने खोलली

ह्या दुष्काळाचा फटका विणकरांना बसलाय हे लक्ष्यात येताच टिळक त्यांच्या भेटीला थेट सोल्हापूरला गेले व जे करता येणे शक्य आहे ते ते सर्व केले

टिळकांच्या ह्या कामांमुळे ते थेट बहुजन समाजात दाखल झाले आणि तेल्यातांबोळ्याचे पुढारी अशी त्यांची काही ब्राम्हणांनी हेटाळणीही सुरु केली

श्रीधर तिळवे नाईक
======================================================================
ताजा कलम

मी इथं समाजांना दिलासे द्यायला इतिहास लिहीत नाही दिलासे आणि ऐत्याहासिक उत्तेजना देण्याचा साठोत्तरी प्रोग्राम भरपूर झाला ऐत्याहासिक उत्तेजनाची उत्तेजक इंजेक्शने घेऊन आपण फक्त बेडकासारखे फुगले आहोत प्रत्यक्षात नेमके काय झाले व घडले हे शोधण्यात मला रस आहे आणि हे शोधताना वर्ण जात वर्ग धर्म ह्यांच्यामुळे बायस होण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही

श्रीधर तिळवे नाईक
=====================================================================
लोकमान्य टिळक : शेतकरी , दुष्काळ व स्वदेशीचा राजकीय उदय
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ३९ श्रीधर तिळवे नाईक

टिळकांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात एक कर्तव्यपत्रकच जारी केले होते त्यानुसार

१ दर तालुक्यास एक तरी रीलिफवर्क व एक तरी अन्नछत्र चालू आहे कि नाही ते पाहणे व नसेल तर मागून घेणे

२ रिलीफ वर्क वर काम करणाऱ्या लोकांना मजुरी अथवा शिधा बरोबर मिळतो कि नाही ते पाहणे व मिळत नसल्यास अर्ज करवून त्याची दाद लावून घेणे

३ पीक बुडाले असल्यास साऱ्याच्या तहकुबीबद्दल व माफीबद्दल अर्ज करवून घेणे त्यासाठी फॅमिनकोडच्या तरतूदचा वापर करणे

४ दरेक गावात गायरान वा कुरण असल्यास ते सुटले कि नाही ते पाहणे सुटले नसल्यास आपणासाठी ते मोकळे सोडा असा गावकऱ्यांकडून अर्ज करवून त्याचा पाठपुरावा करणे

५ सर्व अधिकाऱ्यांना रयतेची स्थिती भेटून सांगणे व लेखी कळवणे

६ कोळी विणकर लोकांना फॅमिन कोडप्रमाणे मदत मिळते कि नाही ते पाहणे

७ जनावरांची गावात सोय होत नसल्यास त्यांना सरकारी बंगल्यात पाठवणे

८ सरकारी अधिकाऱ्यांच्या दांडगाईला जुमानु नका वेळप्रसंगी तुरुंगात जावे लागले तरी घाबरू नका कारण तुरुंगाला भिऊन उपयोगाचे नाही

टिळकांनी सांगितलेल्या कर्तव्यानुसार त्यांचे लक्ष्य केवळ शेतकऱ्यांच्याकडे न्हवते तर धनगर , विणकर व कोळी ह्या दुष्काळग्रस्त सर्वांच्याकडे होते हे स्पष्टच दिसते

सरकारी दांडगाईला जुमानू नका असाही आदेश टिळकांनी दिलेला दिसतो त्यावरून एक गोष्ट स्पष्टच दिसते ती म्हणजे त्यावेळचे सरकारी अधिकारी आणि आत्ताचे सरकारी अधिकारी ह्यांच्या दृष्टिकोनात फरक नाही थोडक्यात राज्ययंत्रणा जशी गोऱ्यांची काळी झाली तरी फरक काहीच पडला नाही तद्वतच शासनयंत्रणेतही काही फरक पडलेला नाही

तुरुंगाला भिऊन उपयोगाचे नाही हे म्हणण्याचा अधिकार टिळकांना होता कारण ते आणि आगरकर डोंगरीच्या  १०० दिवसाचा कारावास भोगून आले होते

पुढे दत्तोपंत आपटे ह्यांना १ वर्षाची साधी कैद व २०० रुपये दंड अशी शिक्षा झाली

सरकारने मार्च १८९७ ला एका कार्यकर्त्याने निराधार मजकूर छापल्याचे निमित्त करून सार्वजनिक सभेच्यावतीने आलेल्या अर्जाचा  सरकार विचार करणार नाही असा आदेश काढला

१८९५ पर्यंत सरकारने विलायती व इथल्या गिरणातील सुतावर व कापडावर ५ टक्के जकात लावली होती

१८९६ साली सरकारने विलायत कपड्यावरील जकात काढून टाकली व आम्ही देशी लोकांचेही पक्षधर आहे हे दाखवण्यासाठी वीस नम्बर सुतावर असलेली जकात कायम ठेवत सरसकट सर्व देशी सुतावरची जकात साडेतीन टक्के केली ह्यातला चालूपणा उघड होता म्हणजे विलायती व देशीतले प्रत्यक्षात ५ टक्के असलेले अंतर आता साडेतीन टक्के होऊन त्याचा फायदा विलायती सुताला होणार होता व श्रीमंतांना स्वस्त कापड मिळणार होते तर गरिबांना महाग !

टिळकांच्या हे लक्ष्यात येताच त्यांनी लोकहितवादींनी मांडलेले व सार्वजनिक काकांनी संघटित केलेले स्वदेशीचे शस्त्र बाहेर काढले व इतरांनीही हे शस्त्र उगारावे म्हणून जाहीर आवाहन केले इतकेच न्हवे तर सरकारी प्रतिनिधी हे श्रीमंतांचे व राजेरजवाड्यांचे प्रतिनिधी असल्याने ते कायदेमंडळात बोलणार नाही म्हणून आता लोकप्रतिनिधींनीच ह्या विषयावर बोलले पाहिजे असा आग्रह धरला व लोकप्रतिनिधींनी स्वदेशी वस्त्रे घालावीत व परदेशी वस्त्रांचा त्याग करावा असेही सांगितले हे स्वदेशीचे राजकीयीकरण होते उदारमतवाद्यानी वाच्छा ह्यांना पुढे करून स्वदेशीचा आग्रह धरल्यास निर्माण होणारे स्वदेशी कापड देशातील संपूर्ण जनतेला पुरणार नाही असा आग्रह धरला सार्वजनिक काकांनी असा आग्रह धरूनही असे कापड निर्माण झाले नाही तेव्हा ते आता कसे निर्माण होणार असा प्रश्न वाच्छा ह्यांनी विचारला टिळकांनी ह्यावर युक्तिवाद करताना म्हंटले कि काँग्रेस काढून तरी आतापर्यंत काय फायदा झाला असा प्रश्न विचारण्यासारखे हे आहे सुरवातीला इच्छाशक्ती तरी निर्माण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी हे पहिले पाऊल आहे

आचार्य जावडेकरांनी ह्या संक्रमणाला सरकारमान्यतेकडून लोकमान्यतेकडे असे गौरवले आहे जे सार्थ आहे टिळकांनी प्रतिकारशक्ती ब्रिटिश राजवटीविरुद्ध जन्माला घातली होती आणि आता ती वाढवण्याची गरज होती त्यासाठी कुणीतरी ट्रिगर ओढणे गरजेचे होते

श्रीधर तिळवे नाईक




स्वार्थत्याग व स्वधैर्य हे दोन सदगुण ह्यानिमित्ताने काँग्रेसमध्ये शिरले व हे घुसवणारे टिळक होते


हिंसा , अहिंसा आणि खून १
लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४० श्रीधर तिळवे नाईक

धनंजय कीर ह्यांनी टिळकांचे चरित्र लिहिताना म्हंटले होते

In his lifetime Tilak was a subject of bitter and long controversies. Now that the dust raised by those controversies has settled down and almost all the actors in the scene have departed this life, the time has arrived to study the life of this great man and to look at the events concerning his life, with an objective and dispassionate view. 

प्रत्यक्षात आजही an objective and dispassionate view अशक्य झालाय ह्याचे कारण टिळकांचे हिंसा आणि हिंदुत्व ह्यांच्याशी नेमके नाते काय हे आजही ठरवता येत नाही काँग्रेसला टिळकांना हिंदुत्ववादी ठरवणे मान्य नसते कारण अंतिमतः ते काँग्रेसचे पुढारी असतात तर हिंदुत्ववाद्यांना ते हिंदुत्ववादी म्हणून उघडपणे स्वीकार्य नसतात कारण ते काँग्रेसमध्ये असतात 

खरा an objective and dispassionate view हाच आहे कि काँग्रेस ही सुरवातीपासूनच आयडियालॉजिमुक्त संघटना होती आणि प्रथम मर्यादित हक्क नंतर स्वराज्य व पुढे स्वातंत्र्य हे तिचे ध्येय होते तिची पहिली आयडियालॉजी ब्रिटिशदासी उदारमतवाद ही होती टिळकांनी तिला हिंदुत्ववाद व स्वराज्यवाद पुरवला मात्र तिची पक्की आयडियालॉजी ठरली ती गांधींच्यामुळे ! गांधींनी टिळकांचा स्वराज्यवाद स्वीकारला पण हिंदुत्ववाद नाकारला त्यातील हिंसा नाकारली आणि मग नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना हिंसक मार्गाचा स्वीकार करावा असे वाटले तर त्यांना काँग्रेस सोडावी लागली दादाभाई रानडे गोखले ह्यांनी काँग्रेसमध्ये ब्रिटिशदासी उदारमतवाद आणला तरी त्यातील उदारमतवाद काँग्रेसचे तत्वज्ञान म्हणून पक्का झाला न्हवता तो आयडियालॉजी म्हणून पक्का झाला गांधीपर्वात आणि तो तसा पक्का झालाय हे लक्ष्यात आल्यानेच सावरकरांच्यासारखा मनुष्य जो तुरुंगातून सुटल्यावर काँग्रेसमध्ये जाण्याचा सिरियसली विचार करत होता शेवटी काँग्रेसमध्ये शिरला नाही टिळकांचे हिंदुत्ववादी राजकारण आता काँग्रेसमधून पुढे रेटता येणे शक्य नाही हे कळलेले सावरकर हे पहिले राजकारणी होते

टिळक हे फक्त हिंदुत्ववादी न्हवते त्यांचे हिंसेशी संदिग्ध नाते होते म्हणूनच गांधीपर्वात ते मोठेच अडचणीचे बनून गेले मात्र त्यांच्यामुळेच सावरकर व भगतसिंग ह्यांची सुटका व्हावी म्हणून गांधी प्रयत्नशील होते गांधींना आपण सावरकरांचे हृदयपरिवर्तन करू अशी खात्री होती म्हणूनच ते त्यांना भेटायला गेले होते त्यांच्या राष्ट्रभक्तीविषयी त्यांना काडीचीही शंका न्हवती अलीकडे सावरकरांना माफीवीर म्हणून जे काही गरळ ओकलं जातंय ते केवळ भंपकच न्हवे तर नालायकपणाही आहे हिंदुत्ववाद्यांचं मूल्यमापनही सभ्यतेने आणि सत्याला धरूनच केले गेले पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि मला खात्री आहे कि गांधींनी आत्ता माझ्यासारखाच आग्रह धरला असता 

राष्ट्रसभेला म्हणजेच काँग्रेसला छेद म्हणूनच हिंदू महासभा आली 

पुढे नेहरूंच्या काळात काँग्रेसने गांधीवाद व लोकशाही समाजवाद ह्यांचे मिश्र मॉडेल तयार करून गांधीवादानंतरची चौथी आयडियालॉजी दिली 

आणि १९९० नंतर काँग्रेसने गांधीवाद व लोकशाही भांडवलवाद ह्यांचे मिश्र मॉडेल तयार करून 
गांधीवादानंतरची पाचवी आयडियालॉजी दिली 

काँग्रेसच्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या आयडियालॉजीमध्ये दोन  फॅक्टर कायम आहेत ते म्हणजे 
१ उदारमतवाद 
आणि 
२ गांधीवाद 

१९२५ नंतर टिळकांच्या हिंदुत्ववादाला काँग्रेसचा पूर्ण नकार आहे म्हणजेच हिंदुत्ववाद ही आयडियालॉजी म्हणून जरी टिळकांनी काँग्रेसमध्ये जन्माला घातली असली तरी खुद्द काँग्रेसमध्ये तिला आता जागा नाही प्रश्न इतकाच आहे कि काँग्रेसमध्ये नव्या पार्श्वभूमीवर टिळककेंद्री हिंदुत्ववाद हा पुन्हा काँग्रेसची सहावी आयडियालॉजी म्हणून जन्म घेईल कि काँग्रेस पुन्हा आपल्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या आयडियालॉजीत गटांगळ्या खात बसणार आहे ?

एक गोष्ट नक्की आहे हिंदुत्वाच्या प्रचंड आगेकुचीला थांबवण्यासाठी काँग्रेसला टिळकांचा पुन्हा विचार 

करावा लागणार आहे 

प्रश्न इतकाच आहे टिळकांना २१ व्या शतकात अपडेट कसं करायचं ? लोहा  लोहेको काँटता हैं ह्या न्यायाने टिळकांचा हिंदुत्ववादी लोहा भाजपाई हिंदुत्वला काटू शकेल ?

गांधीजींच्या पुढे इंग्रज होते काँग्रेसपुढे भाजपकेंद्री हिंदुत्ववादी आहेत हे हिंदुत्ववादी इंग्रजांच्याप्रमाणे तोडा आणि फोडा ही नीती जाणतात इंग्रजांना त्यांच्या स्वतःच्या देशाचा आधार होता ह्यांना विश्व हिंदुत्वाचा आधार आहे इंग्रज इंग्लंडमध्ये आउटसायडर आणि इंडियात पण आउटसायडर होते हे तसे नाहीत हे बाहेरही आणि आतही स्वतःला इन्सायडर म्हणून प्रोजेक्ट करतात मात्र हे करतांना ते आउटसायडर पंडितांचा आधार घेतात बनारस मधून पेशवाईत दाखल होणारे पंडित आणि अमेरिका युरोपमधून दाखल होणारे हे गोरे पंडित ह्यांच्यात फरक काय ?

आणि समजा टिळक आता हिंदुत्ववाद्यांना देऊनच टाकायचे असे ठरले व टिळक स्वीकारायचे नाही असं ठरलं तर गांधीवाद ह्या तिसऱ्या आयडियालॉजीचा आधार कसा घ्यायचा ?

गांधींचे दिवस पुन्हा आलेत असं समजा आपण गृहीत धरलं तर गांधी २१ व्या शतकासाठी अपडेट कसे करायचे ?

ह्या प्रश्नांची आपण पुढे चर्चा करूच आता पुन्हा एकदा हिंसेच्या प्रश्नाकडे वळूं . 

धनंजय कीर स्पष्टच म्हणतात (कंस माझा )

Most of them(biographies ) have,
in their zeal to make Tilak and Gandhi appear alike, strained
to shape Tilak in such a way as to fit him in Gandhian mood
and methods. This is surely a great injustice to Tilak. It is
history that Tilak, whose sole aim was to win back independence,
cared more for the ends than for the means whereas Gandhi
strove more after the purity than for the ends. That is why
Tilak never condemned the revolutionaries using physical force
against the British regime. 


कीर ह्यांच्याशी मी सहमत आहे

टिळक आणि हिंसा ह्या संबंधाची सुरवात जरी हिंदू मुस्लिम दंग्यापासून झाली असली तरी टिळकांच्या हिंसेशी असलेल्या संबंधाची सार्वजनिक चर्चा १८९६ च्या प्लेग संदर्भातच अधिक होते कारण साधनांविषयी टिळकांना फारशी पर्वा नाही हे प्रथम अधोरेखित इथेच होते सप्टेंबरऑक्टोंबऱ मधेही प्लेग आटोक्यात येईना तेव्हा ६ ऑक्टोंबर १८९६ च्या केसरीच्या अंकात त्यांच्या हिंदुत्ववादी धारणेला अनुसरुन टिळकांनी ह्याचे मूळ प्राचीन परंपरेत शोधले व वाग्भटात वर्णिलेल्या अग्निरोहिणी ह्या रोगाशी साम्य आहे हे सिद्ध केले १६११ ते १८३६ पर्यंत प्लेगची साथ हिंदुस्तानात कशी कशी आणि कुठे कुठे आली ह्याचा आढावा घेतला

ऑक्टोंबऱपर्यंत टिळक संयम ठेवून शांतच होते पण पुण्यात रँड नावाचा अधिकारी आला आणि चित्र बदलले

श्रीधर तिळवे नाईक

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४१ श्रीधर तिळवे नाईक
सत्यशोधक समाज , टिळक , प्लेग आणि रँडचा खून

 दुष्काळाबरोबर प्लेग आला आणि मराठी लोकांची पळताभुई सुरु झाली ही पळताभुई नवीन न्हवती शिवाजी महाराज आणि पहिला बाजीराव ह्यांनी निर्माण केलेला मराठयांचा एकछत्री अमंल उत्तर पेशवाईतील नतद्रष्ट ब्राम्हणांनी स्वतःच्या ताब्यात आणून जेव्हा मनुवाद आणला तेव्हापासून दुष्काळ आणि प्लेग किंवा आक्रमणाचे संकट आले कि पळायचे अशी सवयच पुण्यातील मराठी जनतेला लागली होती पानिपतची लढाई हा केवळ बाह्य अविष्कार होता आणि तिथून सुरु झालेली पळापळ व्हाया पळपुटा बाजीराव आता प्लेगपर्यंत आली होती

टिळक उत्तर पेशवाईचे बायप्रॉडक्ट असले तरी पळपुटा बाजीराव न्हवते त्यांनी ह्या पळताभूईवर टीका केली
नऊ मार्च ९७ च्या केसरीत टिळक म्हणतात ,"  परवा जे हजारो लोक गाडीत बसून पळाले ते अगदी मूर्खपणाने गेले    " त्यांना होळकरांच्यावेळी झालेल्या दंग्याची ह्यावेळी आठवण झाली मात्र गोरे सोजीर जे ह्या काळात प्लेगचे निमित्त करून त्रास द्यायचे ह्याचाही समाचार टिळक घेतात घरात घुसून सामान उसकटवणे किंमती ऐवज उचलून न्हेणे बायकांच्या अब्रूला हात घालणे असे अनेक अनाचार प्लेगची झडती ह्या नावाने सुरु झाले साहजिकच टिळक ह्यावर तुटून पडले

दुष्काळाने हवालदिल झालेल्या ग्रामीण जनतेवर तर ही झाडाझडती एखाद्या कयामतीसारखी कोसळली मुख्य म्हणजे गर्भार बायकांनाही जेव्हा नग्न करून कॅम्पात न्हेणे सुरु झाले तेव्हा त्याचा उद्रेक होणे अटळच होते १८९० साली महात्मा फुल्यांचा मृत्यू झाला तरी सावित्रीबाईंनी फुल्यांची चळवळ जिवंत ठेवली होती १८८३ सालानंतर ब्राम्हणांच्यावर बहिष्कारच टाका असा आक्रमक पवित्रा फुल्यानी घेतला व पुढील वारसा नारायण  स्वामी अय्यावरु , राणुजी अरु ,  मेघाजी लोखंडे , भाऊ पाटलांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी चालवावा अशी अपेक्षा व्यक्त केली

१८९५ -९६ च्या दुष्काळात सत्यशोधक समाजाने आणि टिळकांच्या सार्वजनिक सभेने आपले काम स्वतंत्रपणे चालू ठेवले तरी सत्यशोधक समाजाचा ब्रिटिश राज्यावरचा विश्वास उडाला न्हवता इतकेच कशाला १८९१ ते १८९५ साली जेव्हा जुन्नरमधल्या कोळी समाजाने अज्ञानापोटी सत्यशोधक समाजाविरुद्ध चळवळ उभा केली तेव्हा सावकारी पाशाविरुध्द लढणाऱ्या भाऊ पाटलांनी १८९५ साली कोळी समाजाशी बोलणी करून त्यांना सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान पटवून दिले व त्यांनी ते स्वीकारून ब्राम्हणांना पौराहित्य नाकारून आपलाच पुरोहित आणला एका बाजूला सत्यशोधक चळवळ ब्राम्हणांच्यावर बहिष्कार टाका अशी टोकाची भूमिका घेत होती तर टिळक ब्राम्हणांचे हितसंबंध सांभाळत संपूर्ण गाव ओस पडत असतांनाही डॉक्टरांच्या मिटींगा घेत आपदग्रस्तांच्या सोयी करत पुण्यात हिंडत होते

सत्यशोधक  समाजाने कल्याणमध्ये बर्दापूरमध्ये कोऑपरेटिव्ह चळवळ उभी केली होती आणि सावकार व खोत ह्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवायला आरंभ केला होता दुष्काळातही सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक समाजाचे शेतकऱ्यांना मदत देणे सुरु झाले मात्र फरक पडला तो दुष्काळी काम करतांना टिळकांच्या कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेने ! ह्या अटकांच्यामुळे व कार्यकर्त्यांना झालेल्या शिक्षांच्यामुळे टिळकांची शेतकऱ्यांच्यातील विश्वासार्हता वाढीस लागली

टिळकांचा हिंदुत्ववाद आणि फुल्यांचा बहुजनवाद हे दोन्ही दुष्काळ व प्लेग ह्या निमित्ताने टक्करले खरे पण ह्यांच्यातील मतभेद कायम राहिले ह्या प्लेगमध्ये सावित्रीबाई फुले ह्यांनी रुग्णसेवेचा आदर्श निर्माण केला पण त्याही शेवटी प्लेगला बळी पडल्या आणि सत्यशोधक चळवळीला बांधून ठेवणारे नेतृत्वच निखळले बहुजनवादाच्या प्रबोधनवादाला नाही म्हंटल तरी त्यामुळं थोडी घरघर लागली

ह्या काळात जे मीडिया युद्ध सुरु होते त्यात दोन्हीही पक्ष एकमेकांच्या कामांची दखल घेत न्हवते सगळ्यात विनोदी रोल टाइम्स ऑफ इंडिया व तत्सम इंग्रजी पत्रांचा होता ह्यातील काहींना सरकारी रोष पत्करायचा नसल्याने हे लोक टिळकांचे लेख भाषांतरित करून छापत काही अतिशहाण्या मुस्लिमवाद्यांनी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला असा आरोप केला तेव्हा टिळकांनी प्रोफेसर चि ग भानू  ह्यांचे व्याख्यान लावून महाराजांनी जो केला तो वध केला अशी मांडणी समोर आणली त्यावेळी कुणाला हे माहीत होते कि अफझलखानाबाबत उद्भवलेला शिवाजीने अफझलखानाचा केला तो खून  कि वध हा वाद काही दशकांनी गोडसेवादी लोक  महात्मा गांधींच्या संदर्भात उलट्या क्रमाने मांडणार आहेत  आणि गांधींच्या खुनाला वधाचे स्वरूप देणार आहेत

गांधी हे तुकारामाचा आत्मा असलेले अहिंसक योद्धे होते हे कळायला आणखी किती काळ जाणार आहे कुणास ठाऊक ?

हा वाद चालू असतानाच केसरीच्या अंकात निशाणी भवानी तलवार व शिवाजीचे उद्गार ह्या कविता छापल्या गेल्या केसरीच्या अंकातील मजकूर जस्टीस असे टोपण नाव धारण करणाऱ्या माणसाने टाइम्समध्ये भाषांतरित केला त्यातच भर म्हणून दत्तो तुळजापूरकर ह्यांचा लेखही टाइम्समध्ये भाषांतरित झाला अफवा पसरली कि टिळक किंवा तुळजापूरकर ह्यापैकी कुणावर तरी राजद्रोहाचा खटला दाखल होणार तुळजापूरकर टिळकांना भेटायला आले तेव्हा टिळक म्हणाले ," तुरुंगात सरकारने कोणत्याही फॅसिलिटीज दिल्या नाही तरी सरकार तुमचा विचार करण्याचे स्वातंत्र्य हिसकावून घेऊ शकत नाही "

श्रीधर तिळवे नाईक

रँडचा खून , मीडियायुद्ध आणि पहिला बळी : लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक फिक्शन आणि वस्तुस्थिती ४२ श्रीधर तिळवे नाईक

दिल्लीकरांची चाटणाऱ्या मराठी माणसांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे व न चाटणाऱ्या  व राष्ट्रीय नेता बनू पाहणाऱ्या मराठी माणसाची राजकीय शिकार करणे हा  इंग्रजी वर्तमानपत्रांचा उद्योग टिळकांच्यापासून सुरु होतो  शरद पवार हे अलीकडचे बळी सद्या कोणी राष्ट्रीय पातळीवर मुख्य नेता नसल्याने नितीन गडकरींच्याबाबत आपले कर्तव्य पार पाडून हा मीडियाउद्योग थांबला आहे

लोकमान्य टिळकांच्या मराठाची लोकप्रियता वाढत गेली तशी एक अस्वस्थतेची कळ टाइम्स व इतर वर्तमानपत्रात पसरत गेली आंग्लशिक्षित वाचक हा ह्या दैनिकांचा टीआरपी होता आणि टिळकांच्या मराठा वर्तमानपत्राने त्याला आव्हान देण्यास सुरवात केली टिळकांना थेट शांत बसवणे शक्य न्हवते एकीकडे टिळकांचा हिंदुत्ववाद हा ह्या हिंदुविरोधी वर्तमानपत्रांना पसंद न्हवता तर दुसरीकडे मराठा व केसरीची लोकप्रियताही त्यांना सहन होत न्हवती ह्या वर्तमानपत्रांनी टिळकांचं काय चाललंय हे इंग्रज सरकारला कळावं म्हणून टोपण नांवांनी टिळकांच्या लिखाणातले व भाषणातले मजकूर जाणीवपूर्वक आपल्या वर्तमानपत्रात भाषांतरित करून छापायला सुरवात केली टिळकांना पायबंद घालण्याची सुप्त इच्छा ह्यामागे होती ह्यासाठी आवश्यक अशा घटनाही घडत गेल्या

व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला साठ वर्षे पूर्ण होणार होती व त्यानिमित्ताने हिरकमहोत्सव साजरे करणे गरजेचे होते २२ जूनला गणेशखिंडीत जेव्हा हा महोत्सव सुरु झाला तेव्हा सर्व प्रतिष्ठित ह्या सभारंभाला हजर होते
सभारंभ संपल्यानंतर रँडसाहेब एका गाडीत बसले व त्यांच्या मागल्या गाडीत एका सीटवर ले आयर्स्ट  व त्यांची पत्नी बसली ५५० फुटांचा प्रवास झाला नि अचानक झाडीतून पाठीमागून एक माणूस आला व त्याने रँडसाहेबांच्या पाठीमागून गोळी झाडली ती डाव्या खांद्यातून आरपार गेली तर दुसरी फैरी आयर्स्टच्या थेट डोक्यात झाडण्यात आली

गणेशखिंडीची ताबडतोब नाकाबंदी करण्यात आली टिळकांना ह्या घटनेची कुणकुणही न्हवती रँडच्या आमदानीत अत्याचार झाल्याने हा खून त्या अत्याचाराचा बदला म्हणूनच झाला असावा अशी शंका सर्वांना येणे साहजिकच होते नेमक्या ह्याच दिवसाच्या आसपास केसरीमधले लिखाण आक्रमक होत चालले होते ह्याचा पुरेपूर फायदा घेऊन इंग्रजी वर्तमानपत्रांनी विशेषतः टाइम्सने ह्या खुनामागे पुण्यातल्या एका ब्राम्हणाचा हात आहे अशी कुजबुज मोहीम सुरु केली इशारा साफ होता

दोन साहेबांचा खून होऊनही पुणेकर एकही श्रद्धांजलीपर वा तत्सम भाषण घेत नाही हे सरकारला खटकायला लागले पुन्याच्याविरुद्ध बोंब सुरु झाली हा जो काही तमाशा सुरु होता त्याला उद्देशून टिळकांनी " सरकारचे डोके ठिकाणावर आहे का " ह्या नावाचा एक अग्रलेखच लिहिला ह्याचवेळी इंग्लंडमध्ये  नामदार गोखलेंनी पुण्यातील रँडच्या अत्याचारी राजवटीमुळेच हे खून झाले असावेत असे बयान दिले २७ जुलै ला टिळक मुंबईत पोहचले सरकारची सिद्धता झाली व टिळक रात्री १० -११ ला दाजीसाहेब खरे ह्यांच्या घरी असतांना युरोपियन अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली

काँग्रेसच्या इतिहासातील काँग्रेस  पुढाऱ्याला झालेली ही पहिली अटक होती आणि ती होण्यात इंग्रजी वर्तमानपत्राचा भरीव  वाटा होता इंग्रजी वर्तमानपत्रांनी भाषांतरे केली नसती व कुजबुज मोहीम चालवली नसती तर टिळक मुळात फ्रेमच झाले नसते ही मीडिया युद्धाची सुरवात होती आणि आता लोकशाहीचे शहाणपण सांगणारी अनेक वर्तमानपत्रे त्यावेळी ब्रिटिशांच्या बाजूने होती

श्रीधर तिळवे नाईक
































































करंदीकरांनी टिळक भारत मध्ये एक किस्सा दिलाय ज्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये माधवराव गोळेना विमानात तांत्रिक दोष राहिल्याने त्यांचे विमान उडेना तेव्हा टिळकांनी हे दोष दुरुस्त करून ते विमान कसे उडवले आहे ते सांगितले आहे (पान क्रमांक ३३ -३४)



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट