आंबेडकर जयंतीनिमित्त श्रीधर तिळवे नाईक

आंबेडकर जयंतीनिमित्त श्रीधर तिळवे नाईक

हिंदुत्ववादी राष्ट्रवाद , वैष्णववादी काँग्रेसी राष्ट्रवाद , मुस्लिम लीगचा इस्लामिक राष्ट्रवाद ह्या तीन पर्यायांपैकी मुस्लिम लीगमुळे पाकिस्तान आणि बांगला देश निर्माण झाले आहेत आता मारामारी सुरु आहे ती हिंदुत्ववादी राष्ट्रवाद  आणि  वैष्णववादी काँग्रेसी राष्ट्रवाद ह्यांच्यात ! गोखले रानडे टिळक गांधी ह्या सर्व डेमोक्रेटिक वैष्णवांनी  वैष्णवांचा धर्मग्रंथ "गीता "ही समस्त हिंदूंच्या डोक्यावर आणि डोक्यात हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून ठेवली हिंदूंच्यातही शैव हिंदू आणि शाक्त हिंदू नावाचे वैष्णवांच्याइतकेच मेजर सम्प्रदाय आहेत हे सोयीस्कररीत्या विसरून ! त्यातून वर्णजातीवाद उफाळणे अटळ होते पुढे काँग्रेसचे सगळे राजकारणच नेहरूंचा लोकायतवादी नास्तिक कालखंड वगळता वर्णजातिनिष्ठ मतांच्या आकडेवारीवर बेतलेले झाले अशावेळी सर्वाधिक आवश्यकता होती ती आगमनिष्ठ राष्ट्रवादाची असा राष्ट्रवाद समग्रपणे मांडण्याची ताकद त्या काळात फक्त एकाच विचारवंतात होती तो विचारवंत  म्हणजे बाबासाहेब आंबेडकर !

भारतीय प्रबोधनाची सुरवात बसवेश्वरांच्या पासून झाली आणि त्याची सर्वोत्कृष्ट सांगता बाबासाहेब आंबेडकरांनी केली बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे सर्वोत्कृष्ट विचारप्रणालीकार (IDEOLOGIST ) आहेत बाबासाहेब अधिक काळ जगते तर त्यांनी एका नवबौद्ध राष्ट्रवादाची समग्र मांडणी केली असती ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही त्याची झलक आपल्याला संविधानात दिसते पण संविधान त्यांना जसे अभिप्रेत होते तसे झालेले नाही आणि हे त्यांनी स्वतःच नोंदवले आहे

प्रश्न असा आहे कि जे कार्य अपूर्ण राहिले आहे ते पुरे कसे करायचे ?

बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म मध्ये बुद्धाचे एक वचन दिले होते ते म्हणजे कोणीही सर्वज्ञ नसतो . दुर्देवाने बाबासाहेबांना सर्वज्ञ बनवण्याचा चंगच अलीकडे नवबौद्धांनी बांधला आहे कि काय अशी शंका येते एकदा तुम्ही मूळ संस्थापकाला सर्वज्ञ मानले कि तो प्रवाह गोठून जातो आंबेडकरवाद हा असा गोठत चाललेला प्रवाह बनतोय कि काय अशी शंका आता यायला लागलीये खुद्द बुद्धाचा समकालीन असलेला महावीर त्याच्या शिष्यांना सर्वज्ञ वाटत असे आणि त्यातून मग जे होणार होते ते झाले बौद्ध धर्म बुद्धाला सर्वज्ञ न मानल्यामुळे सर्वत्र पसरला तर महावीराला सर्वज्ञ मानल्याने जैन धर्म एका मर्यादेत गोठून गेला

आंबेडकरवाद हा धावता प्रवाह ठरवायचा आहे कि गोठता प्रवाह करायचा आहे आहे हे आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांनीच स्वतःला विचारलेले बरे ! नाहीतर हिंदूंच्यात उत्सव काय कमी आहेत ?

श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट