भारतीय असुरांचा प्रश्न आणि देशीवादी वैदिक तत्वे श्रीधर तिळवे नाईक


बळिवंशाची चर्चा कायमच कृषी समाजाला असुरांचा विचार करायला भाग पाडते महात्मा फुले असुरांच्या प्रश्नात का घुसले नाहीत हा एक प्रश्न आहे ज्या वैदिक समाजाची चर्चा आपण वारंवार करतो तो मुळात असुरांचा समाज होता हेही अनेकांना माहित नाही खुद्द ऋग्वेदच देवाव असुरा म्हणजे देव असुर होते असं म्हणतो इतकेच न्हवे तर ज्यांना आज आपण वैदिक देवता म्हणतो त्या सुरवातीला सर्व असुरच होत्या असे वेदच म्हणतात अगदी देवाचा राजा इंद्रही असुर होता अशी ग्वाही ऋग्वेद होतो म्हणजे सुरासुर हा भेद देव दानव भेद नंतर निर्माण झाला हे तर उघड आहे ते बाहेरून आले कि इथलेच ह्यावरून वाद होऊ शकतो पण ते शैवांच्यापासून सुरवातीला स्वतंत्र होते हे नक्की ते सुरवातीला पशुपालक होते हे नक्की प्राचीन जगात ज्यांना cradle ऑफ सिव्हिलायझेशन म्हंटले जाते त्यांच्या आसपास अनेकदा असे पशुपालक समाज आढळतात आणि ते ह्या सभ्यतांच्यावर हल्लेही करतात आणि मग सामावले जातात असे दिसते पुढे पितृसत्ताक धार्मिक समाजाचा उदय झाल्यावर ज्या पितृसत्ताक राजवटी येतात त्या मग मातृसत्ताक सभ्यतांच्यावर हल्लेही करताना दिसतात त्यांना गिळंकृत करू पाहतात त्यांची अनेक उदाहरणे शरद पाटलांनी दास शूद्रांची गुलामगिरी ह्या त्यांच्या ग्रंथामधल्या स्त्रीराज्य ह्या प्रकरणात दिली आहेत .
(पान क्र १३५ ते १७९)

गुलामगिरी ह्या ग्रंथात बळीवंश चांगला होता असे फुले वारंवार म्हणतात पण एक मूलभूत प्रश्न ते विचारत नाहीत तो म्हणजे हा असुरवंश राजा कधी झाला आणि त्याच्यात पित्याचा मुलगा हाच राज्याचा वारस ही पितृसत्ताक पद्धत आली कशी ? बळी अतिशय न्याय्य  पद्धतीने शेतीचा सारा घेत होता हे ठीक आहे हो पण मुळात त्याला हा अधिकार दिला कुणी ?कारण तत्कालीन कसणारे हे स्त्रीसत्ताक शैव होते आणि जमीन त्यांच्या किंवा गणाच्या  मालकीची होती जर जमिनीची मालकीचं संपूर्ण गणाची होती तर बळी शासकीय वाटा कश्याच्या आधारे मागत होता ? क्षत्रियांना समर्थन देतांना मुळात क्षत्रिय व क्षेत्रपती हे क्षेत्राचे मालक झाले कधी हाही प्रश्न विचारायला हवा . एखादा डॉन विवेकपूर्ण खंडणी घेतो ह्याचे कौतुक जरूर असावे पण मुळात त्याला हा अधिकार दिला कुणी हा प्रश्न डोळ्याआड करता कामा नये


  महात्मा फुलेंना शासन मान्य आहे मग ते कुणाचेही असो मुस्लिमांचे असो कि ब्रिटिशांचे फक्त त्याने विवेकपूर्ण कर घ्यावा शेतकऱ्यांची काळजी घ्यावी इतकीच त्यांची अपेक्षा आहे कारण राजा व शासनप्रमुख शेतकऱ्याच्या जमिनीचे व शेतमालाचे संरक्षण करतो ह्यावर त्यांची श्रद्धा आहे ही श्रद्धा फक्त फुल्यांची नाही तर समस्त शेतकऱ्यांची आहे

प्रत्यक्षात ब्रिटिश हे करत होते का ? वस्तुस्थिती अशी आहे कि ब्रिटिश बिनधास्तपणे जमीनदारांच्या आणि व्यापाऱ्यांच्या घश्यात जमिनी घालत होते आणि जो शेतमाल तयार होई त्यातला खाण्यापुरता मागे सोडून उरलेला कर लादून घेऊन जाई . म्हणजे ब्रिटिश ना शेतकऱ्यांना जमीन संरक्षण देत ना त्यांच्या शेतमालाला ! कष्टाखेरीज शेती होत नाही म्हणून फक्त कष्टासाठी शासनसंस्थांना शेतकरी लागतो नाहीतर त्याला शेतातून उखडायला कुठल्याही शासनसंस्थेने कमी केले नसते . ही परिस्थिती आजही बदललेली नाही

बळीवंश , शिवाजी महाराज हे शेतकऱ्याच्या जमिनीचेही संरक्षण करत आणि शेतमालाचेही म्हणून ज्योतीबांना त्यांच्याबद्दल प्रेम आहे

मात्र तरीही प्रश्न उरतोच तो म्हणजे हा अधिकार असुरांना कधी मिळाला आणि कसा ?

ह्यापुढचा प्रश्न असुर सिंधू संस्कृतीतील शासक होते का ? आणि सुरासुरांच्यातला संघर्ष हा सत्तासंघर्ष होता का ? कि दारू (सोम )कुणी प्यायची ह्यावरून हा झगडा होता ?

देवांनी नंतर रचलेल्या कथा खोट्या आहेत मग खऱ्या कथा काय आहेत ?

कि हा संघर्ष परंपरेनुसार पशुपालक राहू इच्छिणाऱ्या परंपरावादी देशी असुर आणि परंपरा नाकारून शैवांची शेतीप्रधान व्यवस्था स्वीकारू पाहणाऱ्या नवतावादी मार्गी असुर ह्यांच्यातील आहे ?

ह्यापुढचा प्रश्न असा कि त्यावेळी शैवांच्या शेतीचे संरक्षण करणारे कोणी होते कि नाही आणि जर ते होते तर मग असुर राजे त्यांना हरवून राजे बनले काय ?

महा हरची चर्चा करतांना मी ते शेत जमिनींचे सरंक्षण करत व सीमेची भांडणे झाल्यास त्याचा न्याय करत असे म्हंटले होते प्रश्न असा आहे कि सीमेवर महा हर पंचम वैगरे ठीक पण गावात त्यांचा बॉस कोण होता ह्याचे उत्तर यक्ष हे आहे यक्ष आणि राक्षस (ह्या शब्दाचा अर्थच मुळी रक्षण करणारा असा आहे ) साहजिकच असुरांचा त्यांच्याशी सुरवातीच्या काळात संघर्ष होणे अटळ होते

शेवटी सोन्याचे हात असलेला दयाळू असुर आमच्या मदतीसाठी येवो आणि राक्षसांना व यातुधनांना पळवून लावो अशी सूर्याची केलेली प्रार्थना आहेच कि ! (हिरण्यहस्तो असुरः सुनीथः सुमृळीकः स्ववाँ यात्वर्वाङ् ।
अपसेधन्रक्षसो यातुधानानस्थाद्देवः प्रतिदोषं गृणानः ॥१०॥  ऋग्वेद १:३५ : १०)
सर्वच वैदिक सुरवातीला सूर्यपूजक होते आणि ते सूर्याला असुर म्हणत आणि स्वतःलाही ! मग ते राजे कधी बनले कि प्रथम पुरोहित बनले आणि मग राजे ?
ह्यापुढचा प्रश्न असा कि सुरवातीला जंगलात राक्षसांची व गावनगरात यक्षांची व यक्षप्रमुखाची  ( महाराष्ट्रात त्यांना मल्हार व त्याच्याखालच्या उपप्रमुखांना खंडोबा म्हंटले जाई ) लीडरशिप मानणारे महा हर पुढे असुर वंशाकडून लढायला उभे कसे राहिले ?आणि जर महा हर असुरांच्या बाजूने लढले असतील आणि जर असुर म्हणजे मूळ वैदिक बाहेरून आले असतील तर मग पूर्वाश्रमीचे महार काय परकीय राजांच्या बाजूने म्हणजे बळीच्या बाजूने  दुसऱ्या परकियांविरुद्ध म्हणजे देवांविरुद्ध लढले काय ?

वस्तुस्थिती अशी आहे कि सुरवातीपासूनच इंडस लोकांनी  ह्या मूठभर असुरांना  प्रेमाने जागा दिली होती आणि शेती स्वीकारल्यानंतर सामावूनही घेतले होते मातृसत्ताक पद्धतीने ज्याने राणीशी म्हणजे गणिकेशी  लग्न केले त्याला राणीच्या हाताखालचे राजपदही दिले . बळीचा वंश हा शेती स्वीकारलेल्या असुरांचा वंश आहे

त्याउलट शेती नाकारणाऱ्या असुर पशुपालकांनी शैवांच्याविरुद्ध सुरवातीला युद्धच पुकारले त्यासाठी त्यांनी पुढे आपली मुख्य देवताच बदलली आणि सूर्याऐवजी इंद्राची म्हणजे पाऊसदेवतेची पूजा करायला सुरवात केली शिवाला आणि असुराला म्हणजे सूर्याला नाकारणाऱ्या आणि इंद्राला प्रमाण मानणाऱ्या ह्या लोकांनी पुढे वैदिक संस्कृतीचा पाया घातला ह्यांनी आपल्या देशी पारंपरिक देवांचे पुनरुज्जीवन केले थोडक्यात काय वैदिक धर्म हा  पशुपालक असुरांनी आपल्या देशी तत्वांना व देवांना संरक्षित करण्यासाठी उभा केलेला देशी धर्म होता जो पुढे मार्गी बनत गेला .

(अप्रकाशित इंग्लिश ग्रंथातील असुरासंदर्भातील प्रकरणांचा सारांश )

श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट