प्रिय आशुतोष

आपण दोघेही वाकणकरांच्यावर प्रेम करतो हे तर उघडच आहे तू अक्षरचित्रकार आहेस त्यामुळे तुझे लिपीवरचे प्रेम मी समजू शकतो पण इतिहास ही वेगळी गोष्ट आहे ती पुरावा मागते आणि निसर्गयुगाबाबत सर्वात मोठा प्रॉब्लेम विशेषतः भारतात पुराव्याचाच आहे ह्या काळापुरते तरी आपण अगतिकच ज्यादा आहोत आणि म्हणूनच कल्पनाविलासाला सर्वाधिक वाव ह्याच युगात मिळतो वाकणकर हे पक्के वैदिक होते आणि दाक्षिणात्य स्कूल मध्ये ह्या वैदिक कुळात ब्राम्हणी जाणिवेचा धुमाकूळ जोरदार आहे(खरेतर तो प्रत्येक स्कूलमध्ये  आहे ) माझे स्वतःचे धोरण असे कि एखादा इतिहासकार ब्राम्हणी जाणिवेचा असेल तर त्याची ब्राम्हणी जाणीव बाजूला काढून तो जे म्हणतोय त्यातला सत्यांश तपासणे हीच गोष्ट मी ब्राह्मणेतर इतिहासकाराबाबत करतो (ह्याचा वर्णाशी संबंध नाही म्हणजे राजारामशास्त्री भागवतांना मी ब्राह्मणेतर जाणिवेचा मानतो तर नरेंद्र मोदी ब्राम्हणेतर असले तरी पक्के ब्राम्हणी जाणिवेचे आहेत असे माझे मत आहे )

आता तुझे एकेक विधान तपासत जाऊ
आशुतोष आपटे :१.ऋग्वेद काळात लिखित भाषा -लिपी नव्हती असे म्हणता येणार नाही. ( वाकणकर तर स्पष्टपणे म्हणत की लिपी होतीच. )

श्रीधर तिळवे नाईक  :मित्रा अशी लिपी असल्याचा कसलाही पुरावा अद्याप सापडलेला नाही सिंधू संस्कृतीतील लिपी ही भाषालिपी आहे कि चित्रलिपी आहे हे अद्यापही उलगडलेले नाही आणि उलगडले तरी त्या लिपीत वेद लिहिलेले जोवर सापडत नाहीत तोवर वेद लिखित लिपीत लिहिले जात होते हे स्वीकारता येत नाही मात्र मौखिक स्वरूपात वेदांची निर्मिती इसवीसनपूर्व १००० च्या आसपास झाली असावी असे सर्वच इतिहासकार मानतात काहीजण इसवीसनपूर्व १५०० हे साल गृहीत धरतात कारण इंडो युरोपियन देवतांविषयीचे पुरावे भारताबाहेर आढळायला प्रारंभ होतो त्याच्याआधीचे भारताबाहेरही काही सापडत नाही वाकणकर म्हणतात ऋग्वेद काळात लिखित भाषा -लिपी होती म्हणतात पण मूलभूत प्रश्न आहे ऋग्वेदाचा काळ कोणता तर तो इसवीसनपूर्व १००० असावा 
आशुतोष आपटे:२.सिंधू लिपी अद्याप उलगडली नसली तरी ती लिपी त्या काळात होतीच.

श्रीधर तिळवे नाईक  :सिंधू लिपी ह्याकाळात होती पण वर म्हंटल्याप्रमाणे ती भाषालिपी होती कि चित्रलिपी होती हे अद्याप स्पष्ट नाही दुसरी गोष्ट सिंधू संस्कृती वैदिकांची न्हवती खोटे पुरावे निर्माण करून तिच्यावर क्लेम करण्याचा जो उद्योग हिंदुत्ववाद्यांनी चालवला आहे तो केवळ चुकीचाच नाही तर घृणास्पद आहे सर्व काही ब्राम्हणांचेच ह्या अहंकारापोटी हे होते ब्राम्हणेतरांचे श्रेय जास्तीत जास्त लाटण्याचा हा उद्योग ब्राम्हणांनी २१ व्या शतकात तरी बंद करावा वाकणकर आदरणीय आहेत पण त्यांनीही हा उद्योग केलेला आहे त्यातूनच ज्यू म्हणजे तामिळ ब्राम्हण किंवा मेगॅस्थिनीसचा चंद्रगुप्त म्हणजे गुप्त साम्राज्यातील चंद्रगुप्त अशा थापा ते मारतात मी ह्या थापांच्याकडे दुर्लक्ष्य केले आहे 

आशुतोष आपटे:३. ऋग्वेदातील सगळी अक्षरे मोजलेली आहेत.. हे लिखीत भाषेशिवाय केवळ अशक्य आहे. 

४. वेद छंदोबध्द आहेत.. छंद हे अक्षरे मात्रा मोजून मापूनच लिहीले जातात.

श्रीधर तिळवे नाईक  :मित्रा , छंद हा मौखिकच असतो आणि बहिणाबाई पासून ते गावातल्या खेडवळ बायकांच्या काव्यात तो आढळतो अक्षरलिपी त्यासाठी गरजेची नाही खुद्द वैदिक परंपराच सांगते कि त्यांनी वेद मौखिक पाठांतर पद्धतीने जतन केले उलट पाठांतर पद्धतीत छंद अधिक अचूक असावा लागतो अन्यथा तो गाणे व मंत्रबद्ध म्हणणे अशक्य होते वेद छंदोबद्ध आहे कारण तो मौखिक व मोजून मापून तयार केल्यानेच शेकडो वर्षे पाठांतर पद्धतीने जतन करता आला . 
आशुतोष आपटे:५. बौध्द कालखंडात ब्राह्मी व खरोष्टी अशा दोन भिन्न लिप्या आढळतात, तसेच अन्य लिप्याही होत्या असा उल्लेख आढळतो. या लिप्या अचानक विकसीत अवस्थेत तयार होणं संभवत नाही. विशेषत: ब्राह्मी लिपी तर स्वर, जोडाक्षरे, कानामात्रा वेलांटी उकार रफार अशा लिपी अविष्काराच्या पूर्णावस्थेत आहे. त्यामुळे आज जरी त्या आधीची प्रब्राह्मी लिपी सापडली नसली तरी ती निश्चित बौद्ध कालखंडाच्या कितीतरी आधीच निर्माण व्हायला सुरुवात झाली असावी.

श्रीधर तिळवे नाईक  :जैनांच्या सूत्र ग्रंथात जे अनेक लिप्यांचे उल्लेख आढळतात त्यात ब्राम्ही १ व खरोष्टी ४ नंबरवर आहे पण हेही ग्रंथ इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकातले आहेत वाकणकरांचे गणपती वा गाणपत्य लिपी संदर्भातील  योगदान सर्वांनाच विशेषतः दाक्षिणात्य स्कूल मधल्या सर्वांनाच मान्य आहे पण तरीही ब्राम्ही लिपी मौर्य कालखंडापासूनच आत्ताच्या रूपात विकसित झालेली असावी त्याआधीच्या लिप्या ह्या अजूनही गृहीतक आहे ब्राम्ही लिपी ही इसवीसनपूर्व ६०० च्या आसपास विकसित व्हायला सुरवात झाली असावी पण ह्या लिपीचा आणि वेदांच्या देवनागरी लिपीचा संबंध इसवीसनपूर्व १०० च्या पूर्वी आढळत नाही वेद हे वेदव्यासांनी लिखित स्वरूपात लिहिले असे दंतकथा सांगते पण ह्यातही गोची अशी आहे कि महाभारत व्यासांनी सांगितले आणि प्रत्यक्षात गणपतीने लिहिले ह्याचा अर्थ असा कि त्यावेळीही वैदिकांना लिखाण येत नसावे म्हणून लिखाणासाठी तत्कालीन शैव गणपतींना पाचारण करण्यात आले असावे आणि पुढे ह्या सत्याला दडवण्यासाठी त्याला मस्त दंतकथेचे गोंडस रूप देण्यात आले असावे आता गणपतीने कुठल्या लिपीत महाभारत लिहिले हे आपणाला माहित नाही ती कदाचित  प्रब्रम्ही लिपी असावी किंवा गाणपत्य वा गणपती लिपी असावी जोवर ठोस काही सापडत नाही तोवर हा कल्पनाविलास आहे 

आशुतोष आपटे:६. सिंधू संस्कृती आधी गुजरात मधील ढोलविरा व महाराष्ट्रातील पितळखोरे ईथल्या संस्कृती अस्तित्वात होत्याच. हे पुरातत्व विभागाच्या उत्खननातून सिध्द झालेले आहेच.

श्रीधर तिळवे नाईक  :ढोलवीरा सभ्यता ही हराप्पा संस्कृतीचाच भाग आहे आणि तिथे सिंधू लिपीच्या (चित्रलिपीच्या )खुणा आढळतात 
सर्वात मोठा साइन बोर्ड तिथेच सापडलाय पण ही सभ्यता अद्यापतरी सिंधू सभ्यतेचाच भाग वाटते पितळखोरे तर इसवीसनपूर्व ३०० च्या आसपासची आहे सिंधू सभ्यतेपूर्वीच्या अनेक प्रागैत्याहासिक सभ्यता भारतात सर्वत्र आढळतात पण त्यांना इतिहासपूर्व सभ्यतेतच गणले जाते 

आशुतोष आपटे:७. मध्यप्रदेशातील भोपाळ जवळील भीमबेटका येथील प्रस्तरचित्रे तर त्याही आधीपासून अस्तित्वात आहेत. गंमत म्हणजे या भीमबेटका येथे राहणाऱ्या लोकांना बौध्द कालखंडातील मौर्य नगरे चांगलीच ज्ञात असावीत असे दिसते. कारण त्यातील चित्रांतून तेव्हाची तटबंदी, दुमजली घरे अगदी स्पष्ट चितारलेली आढळतात. 

श्रीधर तिळवे नाईक  :वाकणकरांच्या बंधूंनी म्हणजे व्ही एस वाकणकरांनी भीमबेटक्या शोधल्या मात्र आसपासच्या आदिवासींना त्या पूर्वीपासूनच माहित होत्या आणि १८८८ च्या डब्ल्यू .किंकेड च्या पेपरमध्ये त्याचा उल्लेख आहे असे म्हणतात मी हा पेपर वाचलेला नाही त्यामुळे ग्यारंटी नाही ह्या चित्रातील जी दुमजली घरे म्हणतो वा तटबंदी म्हणतो ती भारतीय आदिवासी पाड्यांची एकेकाळी विशेषतः होती जी इंग्रजांनी नष्ट केली असे मला अनेक आदिवासींनी सांगितले आहे भारतीय आणि आफ्रिकी हवामानातच पहिला मानव उभा राहू शकतो हे आता सर्वांनाच मान्य आहे ह्या मानवाने तीन ते दीड लाख वर्षांपूर्वी पावसाळ्यातील पाण्यापासून रक्षण व्हावे म्हणून पहिली लाकडाची वा झावळ्याची झोपडी बांधली व पुढे ती दुमजली पद्धतीने विकसित केली (युरोपमधल्या बर्फ संस्कृतीत अश्या झोपड्या अशक्य आहेत ) ह्यातूनच पुढे भारतात दुमजली घरे विकसित झाली भीमबेटका चित्रात जी चित्रे आहेत त्यात ह्यांचे चित्रण आहे कि नाही हे संशयास्पद आहे मात्र भारतातील ती सर्वात प्राचीन चित्रे आहेत ह्यावर एकमत आहे अशी घरे विकसित रूपात असती तर ह्यांनी पूर्ण विकसित अशी भित्तिचित्रे निर्माण केली असती अशी भीमबेटका शैलीतली चित्रे कशाला काढली असती ? तू चित्रकार आहेस आणि चित्रे आणि स्थापत्य हे हातात हात घालून विकसित होतात हे तुला माहित असेलच स्थापत्य विकसित आणि चित्रे अविकसित असे होत नसते . असो 

आशुतोष आपटे:८. चारही वेदातील आधी त्याज्य असलेला व नंतर वेद म्हणून स्विकारला गेलेला अथर्व वेद सर्वात आधी जन्माला आला असावा हे तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत अवश्य विचारात घ्यावे. कारण वैदिक भाषेचा तौलनिक अभ्यास करताना ते महत्वाचे ठरेल.
१०. अथर्ववेदांमध्येही तत्वज्ञानापेक्षा जादूटोण्यावर भर आहे. म्हणून ती आदीम मानवाची संस्कृती तथा समाजव्यवस्थेकडे संक्रमण करणारी प्रथम अवस्था असावी

श्रीधर तिळवे नाईक  :अथर्ववेदातील काही भाग आणि ऋग्वेद असे मी म्हंटले आहेच शिवाय पहिल्याच लेखात मी शैव वेद आधी होते अशी मांडणी केली आहेच ती तू वाचली असशीलच जगात सर्वत्रच यातुग्रंथ  प्रथम निर्माण झाले माझा स्वतःचा सिद्धांतच असा आहे कि समस्त वेदच यातू वेद आहेत आणि देवतांना प्रसन्न करून घेणारे मंत्र म्हणून ह्या ऋचा रचल्या आहेत हीही  जादूच आहे म्हणूनच ब्राम्हण तिच्याबाबत इतके पझेसिव्ह आहेत कारण फक्त यातू शास्त्रातच ज्याला मंत्र येतात तो ते फक्त आपल्या गोतावळ्यात वारसा हक्काने देतो त्याच्यासाठी यातुग्रंथ पवित्र व दैवी असतात ब्राम्हणांसाठी त्याअर्थानेच वेद अतिशय पवित्र व ईश्वरी आहेत आणि ते ते मंत्र इतरांना देऊ इच्छित नाहीत कारण मंत्रांचे चुकीचे उच्चारण स्वविनाश घडवून आणू शकते तर अचूक उच्चारण इप्सिताचा विनाश व स्वतःचा विकास घडवून आणते फलप्राप्ती देते अथर्वात असुरांचे असुरी मंत्रही असल्याने त्याला ब्राह्मणांनी सुरवातीला मान्यता देणे नाकारले पण पुढे तो वेद म्हणून स्वीकारावा लागला . कारण स्थलांतरानंतरही भारतात विशेषतः गुजरात कर्नाटक काश्मीर बिहार (मग्ग )बंगाल महाराष्ट्रात भारतीय असुर पुरोहित मोठ्या संख्येने होते ज्यांनी शैवही स्वीकारला होता ह्या शैव बनलेल्या पण असुर ओळख शाबूत ठेवणाऱ्या ब्राम्हणांना  नाकारणे परवडणारे न्हवते अथर्ववेदाचा काही भाग आधीच दक्षिणेत विकसित झाला होता आणि काही उत्तरेत विकसित झाला असावा . 


आशुतोष आपटे:९. शैव लिंगपुजक या अर्थाने व वैदीक यज्ञ करणारे या अर्थाने पाहीले तर माझ्यामते संपूर्ण पृथ्वीवरचा आदिम मानव या दोन्ही विभागणीत होता. आदिम मानवासाठी जीव जन्माला येणे म्हणजे प्रजोत्पादन हा तेव्हा आज ईतकाच चमत्काराचा विषय असणार. त्यामुळे सर्वत्रच मातृका किंवा मातृदेवता तसेच लिंग प्रतिके आढळतात. अगदी ज्वालामुखीच्या उद्रेकात नष्ट झालेले पण अभ्यासाच्या दृष्टीने शाबूत असलेले ग्रिकांचे पाम्पी हे शहर बघीतले तर तिथे भित्तीचित्रांपासून ते मुर्तीपर्यंत लिंगप्रतिमा आढळतात. अल्तामिरा गुंफा किंवा अन्य आदिम मानव गव्यांची चित्रे काढायचा व त्याखाली अग्नी पेटवून काही जादूटोणा करत असावा असे दिसते. त्याचे कारण गवा व ईतर प्राणी हे त्याचे मुख्य अन्न होते व अग्नी हे अन्न भाजण्याचे साधन. पुजा जादूटोणा करून हे अन्न मुबलक मिळत राहावे ही त्याची साधी ईच्छा असावी.
गव्याचे पुढे पाळीव रुपांतर गाय झाले असावे.. व या प्राण्यांचा बळी देत अग्नीचे रुपांतरण यज्ञात झाले असावे. एकूण लिंगपुजक व यज्ञपुजक एकत्रच विकसित  झाले असावेत. अवेस्ता व ऋग्वेद यांत भाषिक साम्य आहेच. काही अभ्यासक ( युगानुयुगे माणसाने चालवलेला ईश्वराचा शोध -शंकर सामंत) फक्त सचा ह करण्याच्या सवयी मुळे असूरचा अहुर झाला असावा..
व ईंद्राचा अपभ्रंशाने आंद्र


श्रीधर तिळवे नाईक  :जगातील सर्वच संस्कृती ह्या प्रथम भारत आफ्रिका पट्ट्यात निर्माण झाल्या त्यातूनच आफ्रिकेत सुमेरियन मेसोपेटियम असिरियन वैग्रे तर भारतात सिंधू शैव व चीनमध्ये चिनी संस्कृती विकसित झाल्या व पुढे अमेरिकेत माया इंका सर्वत्रच लिंगपूजा होती कारण लिंग सृजनतेचे जननकेंद्र होते स्त्रीच्या योनीतुन जीव बाहेर येत होता व त्यातूनच मातृका उदयाला आल्या पण फक्त भारतच असा देश होता जिथे लिंगसंस्कृतीतून मोक्ष आला आणि योग ही पद्धतीही !त्यामुळे सिंधू संस्कृतीतील लिंगपूजा आणि आदिम लिंगपूजा ह्यांच्यात जामीनअस्मानाचा फरक आहे आणि हा फरक मोक्षामुळे निर्माण झाला आहे 

यज्ञबाबत असे म्हणता येत नाही किंबहुना अग्नीची उपासना करणाऱ्या सर्वच युरोपीय व यूरेशिय संस्कृतीत यज्ञ संस्कृती उदयाला आली पण मोक्ष उदयाला न आल्याने त्यांची मजल धर्माच्या पलीकडे गेली नाही पुढे जेव्हा हे यज्ञउपासक भारतात आले तेव्हा शैवांच्याकडून ते मोक्ष शिकले विशेषतः असुर आणि मग त्यातूनच पुढे असुर व वैदिक उपनिषदे निर्माण झाली पुढे मग इराणमध्ये हचा स होऊन असुरचा अहूर झाला व त्यावेळचाच अवेस्ता आपल्या हातात आहे सुरवातीचा मूळ ग्रंथ " ह"चा स करतच असेल ह्याची खात्री नाही 

फेसबुकवरील आशुतोष आपटे ह्यांच्या प्रतिक्रियेला दिलेले उत्तर 

श्रीधर तिळवे नाईक 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट